चिंबोऱ्यांचा झणझणीत रस्सा

Submitted by बोकलत on 23 October, 2020 - 05:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. चार मोठ्या चिम्बोऱ्या
चिम्बोऱ्या पकडण्यासाठी तुम्हाला खास खाडीवर जायला लागेल. तिथे चिखलात, दलदलीत गमबुट घालून, हातात काठी घेऊन चिम्बोऱ्या शोधायच्या आणि पकडली की सोबतच्या टोपलीत टाकायच्या. या पकडताना चावल्या तर बोटाचा तुकडा पडलाच म्हणून समजा. त्यामुळे फर्स्ट एड बॉक्स पण सोबत न्यायचा. हे सगळं नको असेल तर मच्छी बाजारात घेऊन कोळीनिकडून विकत घेऊ शकता. चॉईस इस युअर्स. कोळीनिकडून घेतल्यात तर शक्यतो नांग्या तोडायच्या नाहीत, त्यातला रस महत्वाचा असतो. घरी आल्यावर तास दोन तास फ्रीझरला लावून ठेवल्या की त्यांची हालचाल मंदावते. मग तुम्ही जर हळव्या मनाचे असाल तर हृदयावर दगड ठेऊन ते नांगे तोडायचे. मला पण खूप वाईट वाटतं ते तोडताना. पण जिभेच्या आणि हाताच्या लढाईत नेहमी जिभच जिंकते असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे.

२. 2 मध्यम आकाराचे कांदे
३. किसलेले खोबरं पाव वाटी
४. 1 टोमॅटो
५. 1 चमचा धने पावडर
६. 2 चमचे तिखट
७. पाव चमचा हळद
८. अर्धा चमचा गरम मसाला
९. अर्धा चमचा गोडा मसाला
१०. 4-5 लसूण पाकळ्या
११. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट
१२. मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

सगळ्यात प्रथम दोन चमचे तेल कढईत काढून घ्या. त्यात कांदा,टोमॅटोचे स्लाइस आणि पाव वाटी किसलेलं खोबरं मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटे परतून घ्या. आता यात लसूण पाकळ्या टाकून हे मिक्सरला लावा. कढईत तीन चमचे तेल, आलं लसूण पेस्ट, मिक्सरला लावलेलं वाटण चार ते पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्या व त्यात हळद , तिखट ,मीठ, धने पावडर गोडा मसाला, गरम मसाला टाकून ते एकजीव करा. मंद आचेवर या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. साधारण चार पाच मिनिटांत मंद आचेवर तेल सुटायला लागतं. त्यानंतर यात दोन ग्लास उकळलेले पाणी टाका. या मिश्रणाला एक उकळी आल्यावर त्यात साफ केलेले खेकडे टाका. टोपावर झाकण ठेवून अर्धा तास शिजल्यावर डिश तयार होते. शेवटी सर्व्ह करताना वरती कोथिंबीर टाकायची.

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी
अधिक टिपा: 

चिंबोऱ्या घेताना उलट्या करून खालची बाजू बघून घ्यायची. लालसर पिवळसर दिसत असलेल्या चिंबोऱ्या भरलेल्या असतात आणि चवीला पण छान लागतात.

माहितीचा स्रोत: 
बायको
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

या पकडताना चावल्या तर बोटाचा तुकडा पडलाच म्हणून समजा. >> प्रकरण डेंजर दिसतंय... Uhoh खरेच का बोटाचा तुकडा पडतो..?? नॉन्व्हेजेटेरीयन असुनही ही डीश मी अजुनही खाऊ शकलो नाही.. कसं खायचं तेच कळत नाही.

बोकलत यु टू Uhoh
आता कुठलंच शेलफीश खाता येत नाही पण इच्छुकांना ही रेसिपी नक्की देणार. Happy

वाह!!! अगदी याच पद्धतीने मीही खेकडे करते. मात्र एक तर इथे गोडा मसाला मिळत नसल्याने फिश फ्राय किंव फिश करी मसाला वापरते.
आणि बोकलत, या विशविशीत नांग्यांचे तुम्ही काय करात? आम्ही त्या मिक्सरमध्ये फिरवुन घेतो व गाळून त्यांचा रस खेकड्याच्या रश्श्यात घालतो.

वा मस्त झणझणीत दिसतोय रस्सा... खुप आवडीचे कुर्ले.. डेंगे खाताना खुप मस्त वाटतं.. सर्दि वगैरे असेल तर हा रस्सा कामी येतो Happy

मस्त रेसिपी. पारल्याला गजाली मध्ये एक जर्मन आणि एक कोंकणी सोबत मी चिम्बोऱ्या खायचा प्रयत्न केला. गजाली वाल्यांनी नांगी फोडण्याचा अडकित्ता पण दिला होता. मला काही जमला नाही हा प्रकार. त्या दोघांनी मस्त एन्जॉय केले, मी मासे खाल्ले.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
@DJ, काही नाही सोप्प असतं, एकदा ट्राय करून बघा.
@सामो, त्या मी दाताने फोडून खातो, लहानपणापासून सवय आहे. एकदोनदा फक्त असं झालेलं की मला त्या फोडता नाही आल्या. मग कशाने तरी ठेचून खातो.
@श्रवु, नाही दिल्या, नवरात्रीत ते खात नाहीत. Happy

आम्ही त्या मिक्सरमध्ये फिरवुन घेतो व गाळून त्यांचा रस खेकड्याच्या रश्श्यात घालतो.>>>>> सेम हिअर.बोकलतांनी ते पाय तसेच ठेवले आहेत.

बोकलतांनी ते पाय तसेच ठेवले आहेत.>> बहुतेक ते पाय चोखुन सुप्प.. सुप्प.. आवाज करत आतील ऐवज जिव्हेवर आणत त्याचा अवर्णनीय आस्वाद घेत असावेत.. (हे मी ऐकलं आहे फक्त... करुन बघायचं धाडस होत नाही... पण बोकलत म्हणतात तर एक्दा डोळे झाकुन ट्राय करेन पुढे कुणी आयती डीश आणुन दिली तर..!) बाय द वे.. एक वेळ नांगी कशाने त्री फोडुन आतील गर खाता येईल पण ते खेकड्याचं शरीर कसं फोडणार..? Uhoh ते फोडायला गेलं की ताटाच्या आजुबाजुला रांगोळी चित्तारायची भीती..!

बहुतेक ते पाय चोखुन सुप्प.. सुप्प.. आवाज करत आतील ऐवज जिव्हेवर आणत त्याचा अवर्णनीय आस्वाद घेत असावेत..>>> +११११११ त्यासाठीच ठेवले आहेत ते. पण मला जास्त आवडत नाहीत. कंटाळा येतो ते खायला. घरी बाकीचे आवडीने खातात.