पाककृती स्पर्धा 2 - नैवेद्यम स्पर्धा - adm

Submitted by Adm on 22 August, 2020 - 21:28

Full Taat 1.jpg

*
चेकलिस्टः
१) पाककृती स्वत: तयार केलेली असावी. : होय
२) नैवेद्याचे पदार्थ शाकाहारी असावेत. : होय
३) नैवेद्याच्या ताटातले पदार्थः
2 भाज्या: पालक मेथी पातळ भाजी , पंचकडधान्यांची उसळ
चटणी: कोथिंबीर, खोबरं, पुदीना
मेतकूट: ह्याचं प्रसादाच्या ताटात नक्की काय करतात माहीत नाही. त्यामुळे त्याऐवजी 'पंचामृत' केलं.
2 कोशिंबीरी:
काकडी टमॅटो आणि कोबी-गाजर
भात: वरण-भात आणि मसाले भात
पोळी/ पुरी: पोळी
तळणीचा पदार्थ: कोथिंबीरीची भजी
एखादे गोड पक्वान्न : बासुंदी
उकडीचे वा कोणत्याही प्रकारचे स्वत: केलेले मोदक: घरी केलेल खव्याचे मोदक
ह्या शिवाय : सुरळीच्या वड्या, खीर आणि पुरण केलं होतं.
४) नैवेद्याच्या पानात बाहेरून विकत आणलेला गोड ,तिखट,चटपटीत इत्यादींपैकी कोणताच पदार्थ नैवेद्यम च्या पानात नसावा. : होय
५) शक्यतो नैवेद्याचे पान हे केळीचे किंवा इतर पान असावे. : केळीचे पान

पदार्थांची माहिती:
१. पालक मेथीची पातळ भाजी : आळू आणि आंबट चुक्याची पातळ भाजी करतात त्या सारखीच पालक आणि मेथीची भाजी केली. दोन्ही भाज्या आणि डाळ, दाणे वाफवून घेतले. भाज्या एकत्र घोटून त्यात दही आणि डाळीच पीठ घातलं. फोडणीला घालून गुळ, मीठ आणि तिखट घातलं. मेथीच्या चवीप्रमाणे गुळ, तिखट घालावं.
२. पंचकडधान्यांची उसळ: मुग, मटकी, मसूर, छोले आणि चवळी धान्ये १:१ प्रमाणात घेऊन १ रात्र भिजत घालून, त्यांना मोड आणले. आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि जिरं ह्यांच वाटणा करून त्यात ही उसळ केली. चवीनुसार मिठ आणि चिमुटभर साखर घातली.
*
Usal.jpg
*
३. काकडी टमॅटो कोशिंबीरः नेहमीची कोशिंबीर
*
Koshibeer_2.jpg
*
४. कोबी गाजर कोशिंबीर: कोबी आणि गाजर किसून त्याला वरून जिर्‍याची फोडणी घातली. ह्यात डाळींबाचे दाणेही घालायचे होते. पण ऐनवेळी डाळींब मिळालं नाही.
*
Koshimbeer_1.jpg
*
५. वरण-भात
६. मसाले भातः फ्लॉवर, मटार आणि तोंडली ह्या भाज्या आणि खडा मसाला भाजून घेऊन त्याची पावडर करून त्याचा इंस्टापॉट मध्ये मसाले भात केला. शिजवताना त्यात काजू घातले आणि खाताना खोबरं कोथिंबीर आणि तुप घेतलं.
*
Masala bhat_1.jpg
*
Masala bhat_2.jpg
*
७. चटणी: खोबरं, कोथिंबीर आणि पुदीना मिक्सरवर वाटून त्यात मिठ, लिंबू घालून चटणी केली.
८. पंचामृतः दाणे, सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, सिमला मिरच्या आणि तिळकुट अश्या पाच अमृतांमध्ये चिंच, गुळ घालून पंचामृत केलं. हे आम्ही पहिल्यांदाच केलं. आंबट, तिखट, गोड अश्या सगळ्या चवी मिळून एकदम चटकदार लागलं. एका पंचामृत एक्सपर्टांकडून हिरव्या मिरच्या घालण्याची टीप मिळाली होती, ती खूपच चांगली होती.
*
Panchamrut.jpg
*
९. पोळी
१०. कोथिंबीरीची भजी: कोथिंबीर एकदम बारीक चिरून भज्यांच्या पिठात भिजवली. पिठाची कंसिस्टंन्सी नीट जमून आल्यावर हलकी आणि कोथिंबीरीच्या सुंदर स्वादाची भजी झाली.
१२. सुरळीच्या वड्या: ह्या ही पहिल्यांदाच केल्या. डाळीच पिठ, ताक आणि पाणी १:१:२ प्रमाणात एकत्र करून घ्यायचं. गुठळ्या पूर्ण मोडायच्या. त्यात मीठ, हळद, लाल तिखट घालून मंद गॅसवर ठेवायचं. उलतन्याने सतत हलवायचं. ते पटापट घट्ट व्हायला लागलं. उलतनं वर उचलल्यावर त्याला जीभ आली की (म्हणजे काय ते केल्यावरच कळतं!) स्टिलच्या ताटाच्या मागच्या बाजुला उलतन्याने भराभर पीठ फासायचं. वरून खाली फासायचं आणि जाड थर द्यायचा. खोवरं, कोथिंबीर, लिंबू ह्यांच मिश्रण त्यावर भुरभुरायचं. मोहरी, जिरं तीळ ह्यांची खमंग फोडणी द्यायची. सुरीने पट्ट्या पाडून वड्या वळायच्या. वरून पुन्हा थोडीशी फोडणी घालायची.
*
Suralichi wadi.jpg
*
१३. बासुंदी: ८ कप फुल फॅट दुध. कंडेन्स्ड मिल्क, इव्हॅपोरेटेड मिल्क हे एकत्र करून इंस्टंट पॉटमध्ये बासुंदी केली. आधी सगळं मिश्रण 'सॉटे मोड' वर उकळून घेतलं आणि नंतर स्लो कुकींग मोड वर सुमार सहा तास ठेवलं. मधे मधे ढवळलं. चव बघून अगदी थोडी साखर घातली. बदामाचे काप, जायफळ आणि केशराच्या काड्या घातल्या.
१४. खव्याचे मोदकः यंदा उकडीचे मोदक आमचे एक शेजारी देणार होते. त्यामुळे नैवेद्यासाठी खव्याचे मोदक केले. खवा थोडा भाजून घेऊन त्यात साखर आणि वेलची पावडर घालून मोदक केले.
१५. नैवेद्याचं ताट होतं म्हणून खीर आणि पुरण केलं होतं. शास्त्र असतं ते!
इथे एका जपानी दुकानात केळीची पानं मिळाली. ती मोठ्या पानाची कापलेली होती. त्यातल्या त्यात चांगल्या आकाराची पानं वापरली. गेल्या काही दिवसांपासून एकदा थाळी बनवून बघायला हवी असा किडा वळवळत होता. मायबोलीच्या गणेशोत्सवाचं निमित्तं मिळालं. एकंदरीत आढावा घेता बरेच पदार्थ चांगले झाले. बासुंदी थोडी अजून दाट चालली असती आणि भजी अजून हलकी होऊ शकली असती. सुरळीच्या वड्या आणि पंचामृत हे सगळ्यात छान झालं होतं असं आम्हांला वाटलं. एकंदरीत आम्हांला सगळं करायला खूप मजा आली. यंदा गणपतीला कोणाचं येणं जाणं नसल्याने पुढचा आठवडाभर स्वंयपाक करायची गरज भासणार नाही.
तर आम्ही गणपतीला दाखवलेला हा नैवेद्य गणपतीबाप्पा गोड मानून घेईल अशी आशा आहे.

गणपती बाप्पा मोरया !!

(त.टी. काही काही फोटो ऑफ फोकस्ड आहेत की काय असं तुम्हांला वाटेल, पण ते तसं नसून इकडून तिकडून ब्लर करून 'कलात्मक' करण्याचा प्रयत्न केलेला आहे. Wink

Group content visibility: 
Use group defaults

फारच सुरेख दिसतयं सगळं. खूपच आवडले. स्टेप्सचे फोटो पण आवडले. अगदी कलात्मक. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.

सुंदर!!
शेजारी देणार म्हणून उकडीचा मोदक ह्या ताटात नाही, पण एकूणात पंचपक्वान्न - २ मोदक, बासुंदी, खीर, आणि पुरण- झालं की!! थाट आहे!!!

नैवेद्य आणि तयारी दोन्ही जोरदार आहे.

खरच किती छान वाटले आहे नैवेद्याचे. आणि एवढा स्वयंपाक करताना शिस्तीत तयारी करून त्याचे व्यवस्थित फोटो पण काढले आहेत. Hats off!

किती सुंदर ताट..
बाप्पा नक्कीच खूष झाले असणार..
फार सुंदर पदार्थ दिसतायेत..
स्वयंपाक करणाऱ्यांचे खूप खूप कौतुक
कमालीची मेहनत लागते इतके पदार्थ बनवायला

वा, मस्तच ताट Adm.
तुमच्याकडुन गोड पदार्थात क्रुसॉंंट यायला हवा होता Wink

खरच किती छान वाटले आहे नैवेद्याचे. आणि एवढा स्वयंपाक करताना शिस्तीत तयारी करून त्याचे व्यवस्थित फोटो पण काढले आहेत. Hats off!>>>>>> +१.

अरे वा सुरेख दिसतय नैवेद्याचं पान! बाप्पा पण नक्कीच खुष होणार. आणि लिहीलय किती छान, सविस्तर खुसखुशीत! प्रेझेंटेशन ला जास्तीचे १० मार्कस्.

ते पटापट घट्ट व्हायला लागलं. उलतनं वर उचलल्यावर त्याला जीभ आली की (म्हणजे काय ते केल्यावरच कळतं!) >>>>>> Lol अगदी बरोबर

अरे वा सुरेख दिसतय नैवेद्याचं पान! बाप्पा पण नक्कीच खुष होणार. आणि लिहीलय किती छान, सविस्तर खुसखुशीत! प्रेझेंटेशन ला जास्तीचे १० मार्कस्. +11111

एकट्याने एवढं केले.. सही हैं..

काय उरक आहे!!!!

ताट प्रचंड आवडले. खरेच पूर्ण थाळी आहे, बाप्पा खुश झाला असेल.

पंचामृताची रेसिपी द्या.

मस्त ताट एक नंबर.. सु वडी चे हेच प्रमाण आम्ही घेतो आणि अशीच कढईत वाफवून करतो. 3/4 ताट तयार ठेवावी लागतात आणि पटापट पसरावी लागते. मिश्रण जर नीट शिजले नाही तर अजिबात पडत नाहीत वड्या. आणि खूप लवकर सम्पवाव्या लागतात.

किती सुंदर.. सात्विक .. नेवेद्याच ताट आहे..रंगसंगती पण खूप सुंदर आहे..बाप्पा खूप खुश झाला असेल..

सुंदर पान! पदार्थ पण मस्त दिसताहेत!

पानं वाढली आहेत असं मी बरेचदा म्हणते पण प्रत्यक्षात मात्र मी कधीच केळीच्या पानावर वाढले नाही की वाढलेल जेवली नाहीये! पत्रावळ मात्र वापरली आहे!

सुरेखच रे पराग ! एकदम देखणे आहे. ब्लर बद्दल शेवटचा कमेंट लिहिला हे बरे केलेस. पटकन तेव्हढे जाणवले होते Happy

प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांना धन्यवाद. Happy

सीमंतिनी, पंच पक्वांन्नांचं लक्षात नाही आलं आधी. एकंदरीत बरेच "पंच" आलेत नैवेद्यात! Wink

एवढं सगळं तू केलेस !!! >>> जाई आणि ShitalKrishna एकट्याने एव्हडं करणं शक्य नाही. आम्ही दोघांनी मिळून केलं. आणि मुलीने थोडी(शीच) लुडबूड करून हातभार लावला. Wink

तुमच्याकडुन गोड पदार्थात क्रुसॉंंट यायला हवा होता >>>> फ्रान्समधल्या गणपतीलाही आवडेल मग. Happy

साधना आणि ShitalKrishna, पंचामृताची रेसिपी लिहीन नंतर.

मिश्रण जर नीट शिजले नाही तर अजिबात पडत नाहीत वड्या. >>>> मग त्याच्या पाटवड्या करायच्या. Wink

ADm म्हणजेच पराग का?>>> हो.

__/\__

Pages