एक सांगते बाप्पा तुला, माझ्या मनीची खंत
तुझ्या आगमनाने व्हावा देवा, महामारीचा अंत।
तुझ्या इच्छेनुसार चाले, जगाचा हा रथ
का रे देवा खप्पामर्जी, कसली धाडलीस साथ?
तुझीच ना रे सारी पृथ्वी, करतोस ना रे फेरा?
तरी सुद्धा वाजले रे, जगताचे या बारा।
कशी झाली हालत बाप्पा, तुझ्याच लेकरांची
निसर्गावर मात करण्या, धावे मती मानवाची ।
साधन होता साध्य, शस्त्र झाले शास्त्र
अशी कशी फिरते बुद्धी, हाती येता अस्त्र।
गणराया, तूच दिला ना धडा हा अनमोल?
मानवाने निसर्गाशी साधावा समतोल।
गणेशा, समजली मला तुझीच ही शक्कल
आता तरी उघडतील डोळे, वेळीच येईल अक्कल।
बाप्पा, तूच विघ्नहर्ता, आरंभ तू , तू स्वरूपॐकार
तूच दयाघन, तूच प्रथमेश, तूच निर्गुण निराकार।
तुझ्याच हाती आता गजानना, मानवाचे अस्तित्व
गुणाधीश तू, सांभाळ गणेशा, सृष्टीचे सत्व तत्व।
मागणे हे एकच माझे, मांडले विनायका तुज चरणी
पार्वतीनंदन विघ्नेश्वर तू, सावर सारी अवनी।
© सौ मंजुषा थावरे (२१.८.२०२०)