अवेळी आलेल्या पावसानं चांगलाच जोर धरला होता. बऱ्याच वेळ वाट बघून मी घरापर्यंत भिजत जायची मानसिक तयारी केली. खाली जाऊन सायकलवर टांग टाकली आणि निघालो.
ऑफिसपासून घरापर्यंतचा सायकलचा निवांत प्रवास म्हणजे मनात खूप वेळ वाट बघत बसलेल्या विशिष्ट विचारांना एक हाक असते. दिवसभर ह्या विचारांना पुरेसा वेळ किंवा 'फुरसत' मिळत नाही.
निवांत आणि एकांत क्षणाची वाट बघत बसलेले हे विचार संधी मिळताच डोक्यात तरळू लागतात. त्यातून हेडफोनवर 'ट्रांस' सुरू असेल तर मग ह्या विचारांना अजूनच पोषक वातावरण. हा ट्रान्स 'आतलं' आणि 'बाहेरचं' जग यांच्यातील एक भिंत बनून जातो.
"काहीतरी वेगळं करायला पाहिजे राव ! काय हे रोजचं आयुष्य.. घर आणि ऑफिस..... कुछ तो कर, यूही मत मर !"
"अरे पण काय वेगळं करायचं? हिंडणं फिरणं मौज मजा तर सुरूच आहे !"
"आपल्या लोकांसाठी, ह्या समाजासाठी काय बरं करता येईल?"
"ह्म्म्म विचार चांगला आहे, पण सुरुवात कशी आणि कुठून करायची ?"
तितक्यात सिग्नल मोडून काही दुचाकीस्वार आडवे आले आणि मी भानावर येत करकचून ब्रेक मारला. त्या तीनचार गाड्यांनी सिग्नल मोडला बघून अनेकांना धीर चढला, आणि बघता बघता ट्राफिक जॅम झाला.
"ए भाडx x , सिग्नल पाळायला काय होतं" माझी नैसर्गिक प्रतिक्रिया.
समाजासाठी काहीतरी चांगलं करायचा महत्त्वाचा विचार मी करत होतो, आणि लोकांच्या बेशिस्तीमुळे हे चांगलं काम होता होता राहिलं.
"जाऊ दे.. लोकांना साधा सिग्नल पाळता येत नाही.. नाही सुधारणार.. गेले उडत .. त्यांना नसेल सुधारायचं तर तू कशाला कष्ट घेतो त्यांच्यासाठी?"
एव्हाना गर्दी इतकी वाढली कि मला बाहेर पडायचा रस्ता मिळेना.
गर्दी कमी का होईना ते बघायला मी मान वर केली.
चौकाच्या मधोमध एक रिक्षा बंद पडली होती, त्यावरून लोकांचा आरडा ओरडा आणि ताशेरे चालू होते.
जोरात कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण अधिकच 'तापलेलं'.
खाली उतरून रिक्षा ढकलण्यापेक्षा रिक्षावाला जागेवर बसूनच तिला चालू करायचा आटोकाट प्रयत्न करत होता.
रिक्षा मात्र रुसून बसली होती. सुरू व्हायलाच तयार नाही !
अर्धा एक मिनिट गेल्यावर रिक्शातून 'ती' खाली उतरली.
सडपातळ, नाजूक बांधा, पाच-सव्वापाच फूट उंची, गोरापान, सुंदर आणि निरागस चेहरा, बारीक काळेभोर डोळे आणि नोकदार नाक, अंगावर सुंदर कपडे...
माझ्यासकट सर्वांच्याच नजर तिच्यावर खिळल्या..आता पुढे ती काय करणार त्याकडेही सगळे उत्सुकतेनं बघू लागले.
ती रिक्षावाल्याला काहीतरी म्हणाली. त्याने तिला होकारार्थी मान डोलावली.
तिनं स्वतःची पर्स रिक्शात टाकली आणि ..
आणि चक्क रिक्षा ढकलायला सुरू केली !
गर्दीने खचाखच भरलेल्या चौकात, भर पावसात, एक सुंदर तरुण मुलगी आपल्या नाजूक हातांनी रिक्षा ढकलतीये.
हाऊ इंटरेस्टिंग !
शेजार पाजारचे जागेवरच आपल्या गाड्या तिरक्या करून रिक्षाला जागा करून द्यायची नाटकं करत होते.
'ती' मात्र सगळं बघत होती.. सगळ्यांना ओळखून होती.. चेहऱ्यावरती निरागसता कायम. वैताग किंवा चिडचिड दूर दूरपर्यंत दिसत नव्हती.
लोक आपल्याकडेच बघतायत.
पण तिला कुठे काय पडली होती ! किंवा आपण काहीतरी विशेष करत आहोत असं तिला बहुतेक वाटतच नव्हतं !
चेहऱ्यावर गोड हास्य ठेवत, प्रचंड निरागसतेने रिक्षा रस्त्याच्या मधून बाजूला कशी जाईल त्यासाठी ही मुलगी धडपड करतीये. रिक्षावाल्याने सुद्धा रिक्शाला थोडासा धक्का मारला.
काही सेकंदांच्या त्या 'नाजूक' परिश्रमानंतर अखेर रिक्षासुद्धा नमली आणि अचानक चालू होऊन पुढे निघून गेली...
गर्दीत अडकलेल्या असंख्य वाहनांना वाट मोकळी झाली. मी सुद्धा त्याच गर्दीतून पुढे निघून गेलो.
साहजिकच त्या गोष्टीचं मनाला खूप कौतुक वाटलं. ती घटना मनात खूप खोलवर रुतली आणि टोचली सुद्धा तितकीच.
विशेष म्हणजे ती मुलगी भारतीय नव्हती. परदेशातून आलेली 'गोरी' होती !!
एव्हाना मी विचारांच्या सायकलवर टांग टाकली होती. खूप लांबच्या प्रवासाला निघालो होतो.
हेडफोनवर "वि आर वॉट वि आर" नावाचं माझं आवडतं गाणं सुरू झालेलं.
समाप्त
ध्येयवेडा
मनोगत वरती पूर्व प्रकाशित
छान आहे विचारांची सायकल.
छान आहे विचारांची सायकल.
he he, mee pan riksha la
he he, mee pan riksha la dhakka marala ahe pune mandai chya ithe.
traffic jam navhate, pan tyanna riksha suru hot navhati ..
छान मनोगत
छान मनोगत
... लक्षात राहील असा प्रसंग
...
स्मृतीत राहील असा प्रसंग!
स्मृतीत राहील असा प्रसंग! +१
स्मृतीत राहील असा प्रसंग! +१
अगदीच!
आपल्या सर्वांच्या
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद