सोशल सिक्यूरिटी - व्हाय धिस कोलावेरी?

Submitted by Barcelona on 13 July, 2020 - 22:36

सोशल सिक्यूरिटी (ढोबळ मानाने)

अमेरिकेतील पहिला पगार! पण तो हाती येतानाच एका ‘फ’ शब्दाची ओळख होते - FICA उर्फ शोषण सिक्यूरिटी. ऊप्स.. सोशल सिक्यूरिटी. पगाराच्या सुमारे 7.65%-8.5% कर म्हणून कापले जातात. जर शाळा, कॉलेज, अग्निशमन इ जागी नोकरी असेल तर नाही पण बाकी बहुतेकांकडून हा कर घेतात. कशासाठी? ह्या करामागची मूळ संकल्पना ‘किसीका दर्द मिल सके तो ले उधार’ इतकी साधी आहे. म्हणजे आपल्या कडून एक डॉलर घेतला तर ८५ सेंट्स एका निवृत्तास निवृत्तीवेतन देण्यात जातात तर उरलेले एका विकलांग व्यक्तीस वेतन देण्यात जातात. हे चांगलं आहे की! पण जरा थांबा …

थोडं क्लिष्टतेकडे जाऊ -
ह्याचा अर्थ मी निवृत्त झाले किंवा इतर शारिरीक क्षमता बदलल्या तर मलाही फायदा होईल का? ह्याचे उत्तर खरेतर पटकन ‘हो’ देता यायला हवे पण नाही. सोशल चा फायदा मिळण्यासाठी चाळीस क्रेडीट मिळवणे आवश्यक आहे. एका वर्षात चार क्रेडीट मिळतात. असं दहा वर्ष कर भरल्यावर निवृत्त झाल्यावर बेनेफीट्स मिळतात. एक क्रेडीट मिळवायला उत्पन्न किमान $1410 हवे. म्हणजे साधारण दरवर्षी $ साडेपाच हजार तरी किमान उत्पन्न हवे. किमान दहा वर्ष आणि सेवेची कमाल पस्तीस वर्ष आहे. (हल्ली आपल्या ऑनलाईन सोशल खात्यात आपले किती क्रेडीट्स आहेत हे तपासता येते.)

इथे काही भारतीयांची अडचण होते उदा: एच वन च्या सहा वर्षात हा कर भरला पण नंतर मायदेशी परतलो तर काही फायदा नाही. मात्र इतर युरोपिय देशात, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इ जागी नोकरी लागली असेल तर क्रेडीट्स उपयोगी येतात. भारताशी अमेरिकेचा अद्याप काही करार नसल्याने हा बुडीत व्यवहार होतो. (आपण मदर टेरेसा नाही झालो तरी सोशल मायेने भरली ह्या भावनेने सुखी व्हायचं असं शहाणपण एका मैत्रिणीकडून ऐकले होते.)

जे योग्य कागदपत्रांशिवाय (undocumented) आले आहेत त्यांच्याकडून हा कर घेत नाहीत कारण देशात त्यांचे अस्तित्त्व गृहीत नसते. ही परिस्थिती कशी हाताळावी ह्याबद्दल अनेक मतांतरे आहेत.

ही सामाजिक सुरक्षा आवश्यक का?

१९३५ साली जेव्हा अमेरिकेत सोशलची निर्मिती झाली तेव्हा ती अतिशय आवश्यक होती. वृद्ध कामगारांना कारखान्यातून सन्मानाने निवृत्त करून नवीन तरुणांना वाव या योजनेमुळे मिळाला. १९३५ साली भारत कृषिप्रधान देश असल्याने अशा योजनांची गरज पडली नाही. अमेरिका व अनेक युरोपिय देशात यंत्रयुग होते. कारखाने बंद पडल्याने अशी योजना आवश्यक होती.

सध्याच्या काळात अशी सुरक्षा हवी का? याबद्दल एकवाक्यता नाही. इंडस्ट्रीयल एज मागे पडून संगणक युग आल्याने अनेक क्षेत्रात वृद्ध ही काम करू शकतात. त्यामुळे सक्तीने त्यांना निवृत्त करावे का हा प्रश्न आहेच. असलेली सोशल सिक्यूरिटी यंत्रणा किती वर्ष टिकेल? कोव्हीड-१९ पूर्वीच्या अंदाजानुसार २०३५ साली ही योजना बुडीत (बॅंकरप्ट) होणार आहे किंवा किमान तीस टक्के कमी वेतन वाटप करेल.

सोशल फायदे अल्प उत्पन्न गटात निवृत्तीत पगाराच्या 75% वेतन मिळते, तर मध्यम उत्पन्न गटास पगाराच्या 40% आसपास वेतन मिळते. बुडीत गेल्यावर ह्यात तीस टक्के कपात होईल. महागाई, वैद्यकीय खर्च लक्षात घेता हे भयावह आहे. मात्र इतर अनेक प्रायव्हेट निवृत्ती वेतन योजना (ऍन्यूइटी इ) पेक्षा बुडीत जाणारी सोशलच बरी असा मतप्रवाह आहे. एकूणात या विषयी खूप मतांतरे आहेत.

मंडळी, हे सगळं वाचून निराश होऊ नका. जाता जाता एक गंमत ऐका - वॉरेन बफेटला सोशल सिक्युरिटी मिळते का? होय! कर कापताना त्याच्या पूर्ण पगारावर कर कापला जात नसल्याने त्याची सोशल सिक्युरिटी आणि इथल्या अनेक कष्टाळू जनांची सोशल सिक्युरिटी सारखी असू शकते. उगाच कॉलर ताठ करायला एक कारण..

(हा लेख अतिशय त्रोटक, अप्रवाही असा आहे. अमेरिकेशिवाय इतर देशातील लोकही मायबोली वाचतात म्हणून माहिती अगदी मूलभूत स्वरूपाची आहे. त्यात चूका ही असतील. असतील तर प्रतिसादात दुरुस्त करा Happy मी या विषयात तज्ञ् नाही आणि अभ्यास करायची फार इच्छा नाही. सोशल बद्दल कुठलीही ठाम भूमिकाही नाही. पण एक कॉन्व्हर्सेशन स्टार्टर म्हणून हे सुरुवातीचे स्फुट. फ्रॅन्सिसची गोष्ट ह्या धाग्यावर सोशल बद्दल मते व्यक्त झाली. त्या धाग्याचा तो विषय नाही म्हणून सोशल सिक्युरिटी बद्दलची मते असल्यास इथे मांडावी ही विनंती).

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली माहिती. अजून भाग दोन पण लिहा. ज्यांना प्रोजेक्ट बेसिस वर फीज मिळतात पगार नाही उनका कैसे कटता है? म्हणजे कमाविलेला प्रति डॉलर कट होउन हातात , पक्षी कॅश इन हँड किती येते हे नवी नोकरी घेताना मोजुन बघता येते का? नाही म्हणजे रुपी सीटीसी व $ सीटीसीत फरक असतो पण कापत असतील व रुपी सीटीसी जास्त असेल वट्टात तर इत्के जास्तीचे कश्ट घ्यायला नकोत ना. दीप चे फ्रोझन समोसे घ्यावेत का इथे समोर भवानी स्वीट शॉप मध्ये लगोलग ताजे तळून मिळतात ते घ्यावेत?

फ्रा ची कथा हपिसात जाउन वाचते.

प्रोजेक्ट बेसिस किंवा इतर स्वयंरोजगार (बेकरी ते डॉक्टरी काहीही) असेल तरी ~१५% आसपास FICA भरावा लागतो. टॅक्स विथहोल्डींग किती ते विचारलं तर एच.आर मंडळी सांगतात किंवा सरळ स्वतः त्रैराशिक मांडायची. ते गणित अवघड नाही फक्त जरा वेळ जातो. बाकी रूपी सीटीसी बद्दल माहिती नाही, कुणीतरी जाणकार सांगतील.

अमा, मय बोली अभ्यास नैच करने का मेरेकू तो भाग २ की बातां कायकू .... Happy

सोशल सेक्युरिटी फंड मॅनेज कसा केला जातो? त्याची गुंतवणूक, रिटर्न्स? >> जाणकारांसाठी योग्य प्रश्न आहे. Happy

गुंतवणूक, रिटर्न्स: २०१७ सालचे (त्यानंतर अमेरिका सोडल्याने माहित नाही. )

समजा जर एखादी व्यक्ति २०१६ मध्ये ६५ वर्षीय झाली. आणि त्या व्यक्ती निव्रुत्त होताना महिना १०,५०० कमवत होती. तसेच त्या व्यक्तीने ३५ वर्ष अमेरिकेत काम केले आहे आणि त्याचा पगार पण अमेरिकेच्या सरासरी प्रमाणे वाढत होता.

जर या माणसाने २०१७ जानेवारी पासुन सोशल सिक्योरिटीचा चेक घ्यायचा ठरवला तर त्याला महिना २६३५ मिळाले असतिल त्यातिल. $११० ईन्सुरन्स प्रिमियम कापुन. बाकीची रक्कम हातात आली असेल . ह्या रकमेवर आयकर लागतो. दर वर्षी ज्या प्रमाणात सरासरी अमेरिकन लोकाचे पगार वाढतात त्या प्रमाणात दर वर्षी चेक ची रक्कम वाढते. ही रक्कम मरेपर्‍यन्त दर महिन्याला मिळाते. (१०५०० पेक्षा जास्त पगार असता तरी सोशल बेनिफिट तेवढेच मिळेल पण कमी असेल तर बेनिफिट कमी होईल. कमी होण्याचे प्रमाण लिनियर नाही)

ह्याच माणासाने जर २०२२ जानेवारी पासुन जर चेक घेतला असता तर महिन्याला २५% जास्त मिळाले असते. मात्र २०१७ ते २०२१ मध्ये काही मिळाले नसते..

सोशल मिळन्यासाठी कमित कमी ४० क्रेडिट लागतात . १क्रेडिट म्हनजे ३ महिने. म्हणजे १० वर्श अमेरिकेत काम करावे लागेल नाहीतर जे पैसे भरले त्यातुन बाकीच्या लोकाचा फायदा होईल

सध्या सोशल मिळन्याचे वय ६५ पासुन ६७ करायची प्रक्रिया चालु आहे . लोकाचे आयुष्मान वाढल्याने अमेरिकी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पॅशन काढन्याची पद्धति खुप किचकट आहे त्यात किती कर भरला आहे , किती वर्ष भरला आहे, कुठल्या वर्षी भरला आहे हे विचारात घेतले जाते. ३५ पेक्षा कमी वर्ष काम केले तर प्रोरेट केले जात, ३५ पेक्षा जास्त वर्ष काम केले तर best 35 विचारात घेतली जातात.

फंड कसा मॅनेज केला जातो ते माहित नाही पण ६५ वरुन ६७ वय करताना सरकार ने सांगितले होते की तसे न केल्यास १० वर्षामध्ये फंड संपेल .

जर शाळा, कॉलेज, अग्निशमन इ जागी नोकरी असेल तर नाही पण बाकी बहुतेकांकडून हा कर घेतात. >> असं का बरं? त्यांना सोशल सिक्युरिटीमधून निवृत्ती वेतन मिळत नाही का?

पन म्हणजे आपल्या इथे प्रॉविन्डंट फंड असतो तसे का? अर्धे आपण घालायचे मग अर्धे कंपनी घाल्णार व सरकार कडे जमा. मग आपण रिटा यर्ड झाले की सरकार त्याचे पन काय तरी काँट्री घालून आपल्याला देणार. डिफेन्स बजेट कमी करून ह्या वर पैसे खर्च केले तर जनतेच्या खिशातले पैसे जाणार नाहीत. इथे पी एफ चे पैसे पण गुंतवतात मार्केट मध्ये.

माझ्या मते शाळा, कॉलेज, अग्निशमन इ जागी नोकरी असेल तर सोशल कर घेतात. फक्त amish लोक सोशल टॅक्स भरत नाहीत आणि सोशल बेनिफिट घेत नाहीत.

आपल्या कडे जसा प्रॉविन्डंट फंड असतो तसा अमेरिकेत ४०१-k असतो. त्यात काही पैसे आपण घालायचे काही कंपनी घालणार मग ते पैसे आपल्या आवडीच्या म्युचल फंड किंवा Debt फंड मध्ये गुंतवायचे. हे पैसे वयाच्या ५९ वर्ष ६ महिन्या नंतर अतिरिक्त टॅक्स पेनेल्टी शिवाय कधीही काढु शकतात. हे उत्पन्न करपात्र असते . ह्या फंड चा बॅलेन्स रोज वर खाली होत असतो.

अमेरिकेत आपला खर्च स्वतः करायचा असल्याने म्हातारपणी सोशल आणी 401-k मधुन येण्यार्या पैस्यावर घर चालते.

माझ्या मते शाळा, कॉलेज, अग्निशमन इ जागी नोकरी असेल तर सोशल कर घेतात. >> नाही, त्यांचे वेगळे पेन्शन प्लॅन्स असतात. खाजगी शाळा/कॉलेज असतील तर सोशल कर घेतात.
सोशलचा कर कापला जातो तेव्हा कंपनी ही त्या कामगारासाठी/नोकरदारासाठी काही रक्कम सोशल मध्ये जमा करते. शाळा, कॉलेज, अग्निशमन, पोलिस इ साठी ही रक्कम जास्त असते. राज्यानुसार ही रक्कम बदलते म्हणून आकडा लिहीत नाही पण इतर कंपन्यांच्या सोशल एम्प्लॉयर काँट्रीब्युशन पेक्षा ही रक्कम जास्त असते. म्हणजे शाळेतील शिक्षिकेला कामाचा पगार कमी मिळतो पण नंतर निवृत्तीवेतन सन्मानाने जगता येईल असे असते. मात्र हल्ली ही परिस्थिती बदलत आहे. अनेक पेन्शन फंड ही बुडीत जाण्याचा धोका आहे.

अर्धे आपण घालायचे मग अर्धे कंपनी घाल्णार व सरकार कडे जमा.>> हो. अगदी बरोबर. मात्र मला असलेल्या जुजबी माहितीनुसार भारतात प्रोव्हिडंट फंडातून मुलीचे लग्न आहे, शिक्षण आहे तर पैसे काढता येतात. तसे सोशल मध्ये नसते. वय ६५/६७ होईपर्यंत सोशल वाले नखातील माती पण देणार नाही. तसेच एकरकमी पण काही देणार नाही - दरमहा वेतन देतात.

टवणे सर, अमेरिकेत कमितकमी ६ क्रेडीट (१.५ वर्षे) असली की कॅनडामधील क्रेडिट्स एलिजिबिलिटीसाठी मोजतात. क्रेडिट्स ट्रान्सफर होत नाहीत.
https://www.ssa.gov/international/Agreement_Pamphlets/canada.html#:~:tex...).

पीएफ (इंडिआ) == ४०१के (युएस) == आरआरएसपी (कॅनडा)
सोशल आणि पीएफचे उद्देश आणि कॉन्ट्रिब्युशन संपूर्ण वेगळे आहेत.

>>सोशल सेक्युरिटी फंड मॅनेज कसा केला जातो? त्याची गुंतवणूक, रिटर्न्स?<<
अमेरिकन सरकारचाच ट्रस्ट फंड आहे, जो इनकमिंग फंड्स गवर्नमेंट सिक्युरिटिज मध्ये गुंतवतो...

>>सध्या सोशल मिळन्याचे वय ६५ पासुन ६७ करायची प्रक्रिया चालु आहे<<
फुल बेनिफिट मिळण्याचे वय ६७ आहे; ७०व्या वर्षापर्यंत थांबलात तर बोनस आहे. परंतु एखादि व्यक्ती तिच्या गरजेनुसार ६२व्या वर्ष्या पासुन क्लेम करु शकते...

>>३५ पेक्षा कमी वर्ष काम केले तर प्रोरेट केले जात,<<
या सिनॅरियोत देखील बेस्ट इयर अर्निंग धरलं जातं...

गंमतीचा भाग असा कि सोशॅलिझम्च्या दृष्टिकोनातुन सुरु झालेली हि योजना जगभरात सोशलिझम जसा फसला तशीच फसत चालली आहे. ती का आणि कशी, याची काहि ठळक कारणं -
१. अमेरिकेत लाइफ एक्स्पेटंसी वाढलेली आहे. म्हणजेच बेनिफिशरी वाढलेत पण त्या प्रमाणात कांट्रिब्युटर्स (पगारदार) वाढलेले नाहित. आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपय्या सदृश परिस्थिती लवकरच येणार आहे.
२. अमेरिकची अर्थव्यवस्था गेली बरीच वर्षे हॉट वॉटर मध्ये असल्याने गुंतवणुकिंचा परतावा अपेक्षेनुसार मिळत नाहि.
३. पोलिटिकल पार्टीज ची याबाबतची उदासिनता. सोशल सिक्युरिटीची समस्या सोडवण्यापेक्षा ती भिजत ठेवण्यात जास्त फायदा असल्याने अवलंबलेली उदासिनता आहे ती.

सध्या इतकंच, बर्‍याच प्रश्नांची उकल सोशल सिक्युरिटिच्या वेबसाइट वर होउ शकेल. इछुकांनी लाभ घ्यावा...

पन म्हणजे आपल्या इथे प्रॉविन्डंट फंड असतो तसे का? अर्धे आपण घालायचे मग अर्धे कंपनी घाल्णार व सरकार कडे जमा. मग आपण रिटा यर्ड झाले की सरकार त्याचे पन काय तरी काँट्री घालून आपल्याला देणार.>>>>

आता सगळे ctc बेस्ड असल्यामुळे सगळे आपणच घालायचे. सरकार काहीही घालत नाही, जे इंटरेस्ट मिळते तेच सरकारी कॉन्ट्री समजायचे. हे नोकरी बदलल्यावर एकरकमी काढता येते, निवृत्त झाल्यावर एकरकमी मिळते. ते आपण गुंतवून महिना काहीतरी मिळवायची तरतूद करायची. कित्येक लोक ही रक्कम मिळताच लगेच काही कारणांमुळे खर्च करून बसतात व नंतर पस्तावतात.

भारतात एम्प्लॉयी पेंशन फंड 1995 ही एक स्कीम होती ज्यातून पेन्शन मिळण्याचे चान्सेस होते. त्यात मुळात खूप कमी पैसे जमा होत होते, नंतर ते वाढवले तरी कमीच होते. किती जमा करावेत याला कॅप होती. यातून पेन्शन मिळायला खरेच पेंशनीत निघावे लागते, म्हणजे 58 वय असावे लागते. यात जाणारी रक्कम कमी असल्यामुळे मिळणारीही कमी आहे व त्यालाही कॅप आहे. सुरवातीला काही वर्षे पीएफ सारखी हीचे मेम्बर होणे बंधनकारक होते पण नंतर ऐच्छिक केले. त्यामुळे नवे किती लोक यात पैसे टाकतील याबद्दल शंका आहे. नोकरी बदलल्यास हे ट्रान्स्फर करून घ्यावे लागते. पैसे मिळत नाहीत. यात आपले किती पैसे गेले हेही कधी कळत नाही.

Esic ही कमी उत्पन्न गटातल्या कर्मचाऱ्यांसाठीची स्कीम होती. यांची हॉस्पिटले सुद्धा होती. यातून पेन्शन होती का हे आता आठवत नाही पण हॉस्पिटलचा लाभ निवृत्तीनंतरही मिळत असायचा. सध्या ही आहे का हे माहीत नाही. कोणे काळी लोकांचे पगार प्रोसेस करणे व ह्या सगळ्या स्कीमस मध्ये पैसे टाकणे हा कामाचा भाग होता त्यामुळे माहिती होती.

मिल्टन फ्रिडमन? छ्या, ट्रेवर नोवा किंवा तत्स्म कमिडियनचं र्‍हेटरिक असेल (मग ते फॅक्ट ट्विस्टिंग असेना का) तर पचनी पडेल इथे... Proud

Esic ही कमी उत्पन्न गटातल्या कर्मचाऱ्यांसाठीची स्कीम होती. यांची हॉस्पिटले सुद्धा होती. यातून पेन्शन होती का हे आता आठवत नाही पण हॉस्पिटलचा लाभ निवृत्तीनंतरही मिळत असायचा. सध्या ही आहे का हे माहीत नाही. कोणे काळी लोकांचे पगार प्रोसेस करणे व ह्या सगळ्या स्कीमस मध्ये पैसे टाकणे हा कामाचा भाग होता त्यामुळे माहिती होती.>>>>>

ESIC scheme अजुनही आहे. आधी 15000 रूपयांपर्यत पगार असणार्यांना त्याचा लाभ घेता येत होता.. गेल्याच वर्षीच बदल करण्यात आला आणि आता 21000 रूपयांपर्यंत पगार असणार्यांना त्याचा लाभ घेता येतो. आधी निवृत्तीनंतर ह्याचा फायदा घेत येत होता पण आता ते शक्य नाही कारण निवृत्ती येईपर्यंत पगार वाढलेला असेल.. 21000 च्या पुढे पगार गेला तर हि स्कीम आॅटोमॅटीक बंद केली जाते.

ही पण एक फसवणूकच आहे कारण ESIC चे पैसे 21000 पगारापर्यंत कापले तर जाणार पण फायदा शून्य..जर आधी मध्ये गरज असली तरच फायदा घेता येईल.

अमेरिकेत किती भारी असं वाटायचं कारण जाॅब नसेल तरीही सरकार तुम्हाला वेतन देते किंवा असे बरेचसे फायदे ऐकून होतो अर्थात ते फक्त तिथल्या नागरिकांनाच पण तरीही भारतापेक्षा अमेरिका फार फार बरी आहे ह्याबाबतीत पण छुप्पे नियमपण असतात हे माहीत नव्हतं. अजुन माहिती मिळाली असती तर वाचायला आवडलं असतं.घ

जर तुमच्या करिअरमधे बहुतांशी काळ तुम्ही अमेरिकेत खाजगी क्षेत्रात काढला असेल तर करिअरच्या शेवटी शेवटी राज्य, केंद्रिय किंवा स्थानिक सरकारी नोकरी (State, Federal or Local government jobs) घेण्याआधी एक मोठी काळजी घ्या. तुम्हाला या सरकारी नोकरीतून जितकी पेंशन मिळू शकते त्याच्या काही प्रमाणात निवृत्तीनंतर तुम्हाला मिळणारी सोशल सिक्युरिटीची रक्कम कमी होते. दोन्ही एकत्र संपूर्ण मिळत नाही. तुमच्या परिस्थितीनुसार हे फायद्याचे किंवा तोट्याचे असू शकते.
https://www.ssa.gov/pubs/EN-05-10007.pdf

चांगली लिंक.
राष्ट्राध्यक्ष बायडन यांनाच ह्या नियमाचा अतिशय जाच होणार असल्याने (पत्नी सरकारी कॉलेजात आहेत!), हा नियम बदलला जाण्याची दाट शक्यता आहे Wink गंमतीचा भाग जाऊ द्या, पण अजय यांनी दिलेली लिंक महत्त्वाची आहे. Government pension offset हा नियम हल्लीच्या काळास अनुरूप नाही कारण लोक सरकारी-खाजगी क्षेत्रात आळीपाळीने किंवा एकाच वेळी नोकर्‍या करतात. शिक्षक संघटनेने 'हा नियम रद्द करू' ह्या आश्वासनावर विसंबून बायडन यांना पाठींबा दिला आहे. यापूर्वीही काही अध्यक्षांनी अशी आश्वासने दिली होती पण काही बदल झाला नाही. त्यामुळे ह्या नियमांची माहिती नोकरदारास आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कुटूंबियास माहिती असणे गरजेचे आहे. (नोकरदार गेल्यावर जिवीत जोडीदारास आर्थिक फटका बसतो.)