वाळवणाच्या वड्यांची सुकी भाजी

Submitted by योकु on 9 July, 2020 - 10:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मिश्र डाळींचे सांडगे/ वाळवणाच्या वड्या/ मूगवड्या/ मंगोडी इ.
या दुव्यावर सांडगे कसे करावेत आणि त्याची एक ग्रेव्ही वाल्या भाजीची कृती आहे.

तर या वड्या फ्रिजर मधे होत्या अन अनायसे आज दुसरी कुठली भाजीही नव्हती तर हा प्रकार केला. सुरेख चव येते या प्रकारात आणि फार पट्कन होतो. नक्की करून पाहा.

एक मोठी वाटी सांडगे
२ मध्यम मोठे कांदे (चिरलेला कांदा सांड्ग्याच्या प्रमाणात त्यामानानी भरपूर हवा)
५/६ लसणीच्या पाकळ्या
हळद
लाल तिखट
जरा काळा/गोडा मसाला
मीठ
तेल
मोहोरी
जरा जास्त प्रमाणात हिंग
थोडी कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

सांडगे जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर कोरडेच भाजायला घ्यावेत.
जरा बर्‍यापैकी गरम झालेत की त्यावर दोन टीस्पून तेल घालून पुढे जरा लालसर होईपर्यंत भाजावेत (हे मंद आचेवरच करायचं आहे). भाजून झाल्यावर बाजूला काढून ठेवावेत.

कांदा चौकोनी बारीक चिरून घ्यावा. लसणी सोलून ठेचून घ्याव्यात.
कोथिंबीर धूवून बारीक चिरून घ्यावी.

ज्या कढईत सांडगे भाजलेत त्याच कढईत दोन-तीन टेबलस्पून तेल घालून ते चांगलं तापू द्यावं. यात मोहोरी, ती तडतडल्यावर हिंग घालावा. तो फसफसला की लसणी घालून जरा लालसर होईतो काही सेकंद परतावं. नंतर कांदा घालून त्याच्या कडा सोनेरी झाल्या की हळद, लाल तिखट घालून काही सेकंद परतून कच्चट वास जाईल तेव्हा यात भाजलेले सांडगे घालावेत.
जरा परतून यात अगदी जेमतेम सांडगे बुडतील एव्हढं कोमट पाणी घालावं.

यात चवीपुरतं मीठ घालावं (सांडग्यात मीठ, तिखट आहेच), जरा काळा मसाला घालावा आणि झाकण घालून भाजी शिजू द्यावी.
भाजी चांगली शिजली की कडेनी तेल सुटलेलं दिसेल आणि पाणी पूर्ण शोषल्या गेलेलं असेल. पुढे अजून जरा एखाद मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्यावी; वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरमच खायला वाढावी.

फुलके, भाकरी यांबरोबर सुरेख लागते. सोबत कच्चा कांदा घ्यावा.

वाढणी/प्रमाण: 
इतकी भाजी दोन लोकांना पुरली
अधिक टिपा: 

मीठ तिखट सांडग्यांत आहे तर भाजी करतांना त्यामानानी त्याचं प्रमाण कमी-जास्त करावं.

माहितीचा स्रोत: 
-
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाकृ...
फोटो नाही , असं का करता तुम्ही??
पुन्हा करा बरं ही भाजी आणि फोटो द्या

Mast
Aai chi recipe. Barobar ek bhakri