आज बर्याच दिवसांनी कॉलेजला गेलो होतो. तिथल्या स्टाफची मिटींग चालू होती म्हणून मी जरा बाहेर उभा राहिलो.
मार्च महिना असल्यामुळे रणरणतं ऊन होतं. मी आपला एका झाडाखाली सावलीत मोबाईल बघत उभा होतो. तेवढ्यात अचानक पाठीवर कुणीतरी धक्का दिल्यासारखा वाटला. मी मागे वळून बघितलं तर एका मुलीचा चुकून धक्का लागला होता. तिच्या बॅगमधले काही पुस्तकं खाली पडले होते. ती बहुतेक गडबडीत होती. मी तिचे पुस्तकं गोळा केले आणि तिला देऊ लागलो. परंतु तिचं त्याकडे लक्षच नव्हतं पळत आल्यामुळे तिला धाप लागली होती. मग मी तिला शेजारच्या एका बाकड्यावर बसायला सांगितलं आणि तिचं पुस्तक घेऊन मीही तिच्या शेजारीच बसलो.
तिला दम लागला होता आणि नेमकं त्याच वेळी माझ्याजवळही पाणी नव्हतं. तेवढ्यात मला तिच्या बॅगमध्ये पाण्याची बॉटल दिसली. मी तिचीच बॉटल काढून तिला दिली आणि आग्रहाने पाणी पिण्यास सांगितले. तिनं घोटभर पाणी पिलं आणि डोळे मिटून बसली.
मीही तिच्याच बॉटल मधलं थोडसं पाणी पिलं आणि तिच्याकडे एक कटाक्ष टाकला.
तिने मस्त पिवळ्या रंगाचा टॉप आणि पांढरी स्लॅक्स घातली होती. लांब सडक केस मोकळे सोडले होते आणि उन्हापासून संरक्षण म्हणून पांढऱ्या रंगाचा स्टोल तिने मानेभोवती गुंडाळला होता. माझी नजर तिच्यावरुन हटतच नव्हती. दिसायला तशी फार सुंदर नव्हती अगदीच साधारण होती. पण तिचे डोळे- तिच्या बंद डोळ्यातही काहीतरी जादू असल्यासारखा भास होत होता. मी तिच्याकडेच पाहत होतो, विशेषतः तिच्या डोळ्यांकडे.
थोडी हालचाल झाली आणि तिने डोळे उघडले.
आणि मला माझं प्रतिबिंब तिच्या डोळ्यांत दिसू लागलं. घाम आलेल्या कपाळावर लावलेली ड्रेसला मॅचिंग पिवळ्या रंगाची टिकली, तिचे ते निळसर घारे डोळे आणि त्या डोळ्यांभोवती रेखीवपणे असलेली काजळाची हलकीशी लकेर! त्याक्षणी असं वाटलं की विश्वसुंदरीसुद्धा हिच्यासमोर काहीच नाही.
मी तिच्या डोळ्यात पाहत होतो. तिच्या त्या मादक डोळ्यांत पाहताना समाधी लागल्यासारखं वाटत होतं. शेवटी न राहवून तिनेच मला प्रश्न केला,"हॅलो काय पाहताय?"
मी गोंधळून गेलो आणि म्हणालो, "अं....काही नाही. कसं वाटतंय तुम्हाला?"
ती- "मी ठिकंय आता!"
ती तिचे पुस्तक घेऊन बॅगमध्ये ठेवू लागली आणि मी पुन्हा तिच्या डोळ्यात हरवून गेलो.
उतरत्या उन्हात तिचे डोळे अजूनच चमकत होते. असं वाटत होतं की आयुष्यातलं सगळ्यात सुंदर दृष्य आपण बघतोय. रणरणत्या उन्हातही वातावरण आल्हाददायक वाटत होतं. एव्हाना तिची एक बट चेहऱ्यावर आली तिने बोटानेच ती बट कानामागे सारली आणि माझ्याकडे बघून हसत म्हणाली," तुम्हाला धक्का लागला त्याबद्दल सॉरी! मी येते."
जाताना मी माझ्या हातात असलेली तिची पाण्याची बॉटल तिला दिली. ती तिच्या कामासाठी गेली. ती नजरेआड होईपर्यंत मी तिची पाठमोरी आकृती पाहत होतो.
आजपर्यंत मी अनेक गाणे ऐकली असतील पण त्यातील एकही गाणं तिच्या डोळ्यांना सूट होत नाही.
उन नजरोंकी बात ही कुछ और है!
काही दिवसांनी मी हा प्रसंग विसरेन, पण 'ती' नजर कायम लक्षात राहील!
मस्त
मस्त