मित्रहो, हि कथा मी पाच वर्षांपूर्वी मायबोलीच्या दिवाळी अंकामध्ये लिहिली होती. तीच संशोधित (अपडेट) करून पुन्हा उपलब्ध (पोस्ट) करीत आहे.
*****
कानानी बहिरा मुका परी नाही ।
शिकविता भाषा बोले कसा पाही II
चंद्रशेखर गाडगीळ यांच्या सुरेल स्वरातील गीत आपण अनेकदा ऐकले असेल. या हृदयस्पर्शी गीतातील आशय आणि त्यातील व्यथेशी आयुष्यभर लढणाऱ्या एका झुंजार डॉक्टरांची हि कथा आपणाला निश्चित आवडेल ....
******
नादब्रह्माचा जादूगार !
******
काळाच्या पडद्याआड …
साल १९७५,
स्थळ . . ऑस्ट्रेलियामधील कियामा गावाचा शांत समुद्रकिनारा …
एक स्त्री दोन छोट्या मुलींबरोबर वाळूची घरे बनविण्यामध्ये गर्क झालेली दिसत होती. शेजारच्याच एका खडकावर सुमारे पस्तीस वर्षांचा उंचापुरा गोरा माणूस बसलेला दिसत होता. त्याच्या डाव्या हाताच्या बोटांमध्ये गोगलगायीच्या पाठीवर असणारा एक छोटासा शंख होता आणि उजव्या हातामध्ये होते लव्हाळ्याचे एक अणकुचीदार पण लवचिक असे पान. तो ते लवचिक पान त्या चक्रवर्तुळाकृती शंखाच्या पोकळीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करीत होता. ती हिरवी काडी तो पुन्हा बाहेर काढून पुन्हा आत घुसवत होता आणि कितीतरी वेळ तो त्या शंखामध्ये घुसलेल्या गवताच्या काडीकडे स्वप्नाळू आणि अनिमिष नेत्रांने पाहत होता. अचानकपणे अंगामध्ये काही संचार व्हावा तसे तो उठला आणि आनंदातिशयाने धावत पलीकडे वाळूमध्ये खेळणाऱ्या आपल्या पत्नीला उचलून नाचू लागला, म्हणू लागला, "युरेका! युरेका!! युरेका !!!"
काळाच्या पडद्याआड …
साल १९७५
स्थळ .. माझे घर, पुणे.
मी नुकताच एमडी ची परीक्षा झाल्याने घरी राहण्यास आलो होतो. बऱ्याच दिवसांनी आईच्या हातचे ताजे जेवण मिळण्याचा योग होता. मी घरी आहे हे काळातच शेजारी राहणाऱ्या भागीरथी काकू देखील माझ्यासाठी केलेले खास पदार्थ घेवून आल्या होत्या. जेवता जेवता काकूंनी हळूच त्यांच्या नातवा विषयी सांगायला सुरु केले. या काकू नगरकडील एका खेड्यात राहत असत. त्यांचे यजमान निवर्तल्यानंतर त्यांनी त्यांच्या नातवांच्या शिक्षणासाठी पुण्याला बिऱ्हाड केले. तीन छोट्या नातवंडांना घेवून त्या एकट्याच आमच्या घराशेजारी राहत असत. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे आमच्या कुटुंबाशी अगदी घरोब्याचे संबंध तयार झाले होते. सर्वात लहान नातू अडीच वर्षांचा झाला होता पण अजून बोलत नव्हता. एक वर्षाचा असताना त्याला एकदा खूप ताप आला आणि तेंव्हापासून त्याला कमी ऐकायला येत असावे अशी शंका काकूंना आणि इतरांना येत होती. जवळच असलेल्या नाक-कान आणि घसा तज्ञ डॉ. भुतडा यांच्याकडे त्याला नेले. त्यांनी या मुलाला तापामुळे अथवा औषधांमुळे कानाची संवेदना कमी झाल्याचे सांगितले. तो अगदी ठार बहिरा असल्याने त्यावर काहीही उपचार होणार नाहीत असेही ठामपणे सांगितले. काकुंच्यावर तर आकाशच कोसळले. त्यांना जेवण गोड लागेना आणि डोळ्यातील पाणीही थांबेना.
केविलवाण्या स्वरात त्यांनी डॉक्टरांना सुचवले, "डॉक्टरसाहेब, तुमचे सर्व खरे आहे. पण याला थोडे थोडे ऐकू येत असावे असे मला वाटते. त्याला विमानाचा आवाज, बांगड्यांचा आवाज किंवा प्रेशर कुकरची शिट्टी ऐकू येते."
"बाई, तुम्ही म्हणता ते कदाचित खरे असेलही. मोठ्या माणसाप्रमाणे या मुलाच्या कानाचा ग्राफ काढता येणे कठीण आहे. याच्या कानातील काही विशिष्ठ शिरा कदाचित काम करीत असतीलही पण त्या संभाषण ऐकण्याच्या अथवा बोलण्याच्या कामाच्या नाहीत. त्याला ऐकू येत नसल्यामुळे त्याच्या मेंदूमधील संभाषण केंद्र तयार होणार नाही. अशा मुलांना खुणांच्या भाषेनेच इतरांशी संभाषण करावे लागेल."
"साहेब, आमच्या परिचयातील एका वृद्ध गृहस्थाच्या कानाला कसलेसे मशीन लावल्यामुळे त्याला आता ऐकू येवू लागले आहे. आमच्या धनुला तसे मशीन नाही का चालणार ?"
"आजी, असे श्रवणयंत्र ज्यांची ऐकण्याची नस म्हणजे नर्व्ह चांगली असते त्यांना उपयोगी पडते. ज्यांना कानाशी अथवा मोठ्याने बोलल्यानंतर ऐकू येते त्यांच्यासाठी असे यंत्र उपयोगी असते. पण आपल्या बाळाची नस खराब असल्यामुळे त्याला या यंत्राचा उपयोग होणार नाही. "
"डॉक्टर, माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे. केवळ माझ्या समाधानासाठी आपण या बाळाला फक्त दोन दिवस ते मशीन लावा. नाही म्हणू नका."असे म्हणून काकू डॉक्टरांचे पाय धरण्यासाठी खाली वाकल्या. डॉक्टर पटकन मागे सरकले आणि त्यांना उठवत म्हणाले, "अहो आजी, माझी खात्री आहे त्याचा काही उपयोग होणार नाही."
पण आजींनी अजीजीने त्यांचे हात घट्ट धरून ठेवले.
"ठीक आहे. तुमचा हट्टच असेल तर मी ते यंत्र जोडून देतो पण माझी खात्री आहे काही उपयोग होणार नाही याची."
धनुच्या एका कानाला ते मशीन लावूनच काकू घरी आल्या. दोन दिवस त्यांचे अविरत प्रयत्न चालू होते धनुला शिकवण्याचे ! काकूंची चिकाटी म्हणा किंवा परमेश्वराची कृपा म्हणा, पण तिसऱ्या दिवशी धनुने काकूंना साद दिली आणि त्याने एक पहिला शब्द उच्चारला, "आई !"
धनुची ही प्रगती पाहून डॉक्टरदेखील चकित, खरे म्हणजे, खजीलच झाले.
धनुने हळू हळू चांगलीच प्रगती केली.
काकू त्याला येथील रुईया मूकबधीर विद्यालयात घेवून गेल्या.
"आमच्या शाळेमध्ये ज्यांना अगदीच ऐकू येत नाही अशी मुले असतात. तुमच्या धनुला थोडेसे ऐकू आणि थोडे बोलताही येते आहे. त्याला नेहमीच्याच शाळेत पाठवा."
काकूंनी धनुला भावे प्राथमिक शाळेत घातले. तेथे त्याच्या वर्गामध्ये धनुसारखेच कमी ऐकू येणारे व मशीन वापरणारे आणखी चारजण होते. या विद्यार्थ्यांवर या शाळेमध्ये जास्त लक्ष देवून शिकवण्याची व्यवस्था देखील होती.
हा हा म्हणता दिवस निघून गेले. धनु पुढे शेतीशास्त्र विषयामध्ये पदवीधर झाला आणि आज तो एक प्रगतीशील शेतकरी आहे. अजूनही तो श्रवणयंत्र वापरतो. काकू मात्र केंव्हाच काळाच्या पडद्याआड निघून गेल्या पण त्यांच्या वात्सल्याचा सुगंध धनुच्या घरामध्ये आणि आम्हा सर्वांच्या मनात अजूनही दरवळतो आहे !
आपले कान ही एक मोठी परमेश्वरी देणगीच आहे. कान हे अतिशय गुंतागुंतीचे पण नाजूक यंत्र आहे. लौकिक अर्थाने ज्याला आपण कान म्हणतो त्याचे काम ध्वनिलहरी गोळा करून आतील कर्ण-नलिकेकडे पाठविणे इतकेच असते. सुमारे एक इंच कर्णनलिकेच्या दुसऱ्या टोकाला एक पडदा असतो त्याला 'ढोल' असे म्हणतात. या कर्ण-नलिकेमध्ये मेणासारखा घट्ट पदार्थ साचल्यामुळे तात्कालिक बहिरेपणा येवू शकतो. कानाच्या पडद्याला छिद्र पडल्याने देखील ऐकण्यावर परिणाम होवू शकतो. या पडद्याच्या पलीकडे मध्य-कर्ण नावाची पोकळी असते व त्यापलीकडे असतो आंतर-कर्ण. ढोल व आंतर्कर्ण हे तीन चिमुकल्या हाडांच्या साखळीने जोडलेले असतात. आपल्या कानावर पडलेल्या ध्वनीलहरींमुळे ढोल हलतो व त्यामुळे हाडांची साखळी हलते व ही हालचाल सुमारे वीस पटीने वाढवून आंतर्कर्णापर्यंत पोहोंचवली जाते. आपला आंतर्कर्ण हा अतिशय प्रगत नैसर्गिक तंत्र असलेला जणू एक चमत्कारच आहे. याला कॉक्लिया (स्क्रू अथवा स्नेल,गोगलगाय ) असे नाव आहे. आपण त्याला शंख-कर्ण असे नाव देऊ या. या शंखकर्णाचा आकार एखाद्या शंकूप्रमाणे असून त्याला सुमारे अडीच चक्राकार वेढे असतात. एखाद्या आईस्क्रीम कोनवर निमुळते होणारे वेढे असावेत तसे! एखाद्या गोगलगायीच्या पाठीवर असणाऱ्या शंखासारख्या आकाराचा सुमारे एक सेमी रुंदी व उंचीचा असतो. समजा, ही अडीच वेढ्यांची सुरळी ताणून सरळ केली तर सुमारे तीन सेमी एव्हढी लांब असते. या नळीच्या आत एक आडवा असा दुभाजक पडदा असतो ज्याची रुंदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हळूहळू मोठी होत जाते. या पडद्यामध्ये सूक्ष्म केस असलेल्या पेशी असतात ज्या ध्वनिलहरींचे रुपांतर विद्युत संदेशामध्ये करतात. या पडद्याला सुमारे दहा हजार नसतंतू जोडलेले असतात. जेंव्हा ध्वनिलहरी आंतर्कर्णावर आदळतात तेंव्हा त्या शंखकर्णामधील पडद्यामध्ये कंप निर्माण करतात. ध्वनिमधील कंपनसंख्येनुसार म्हणजेच स्वर-व्यंजनानुसार ठराविक भागातील केशपेशी हलतात व त्या ठराविक नसतंतू ती संवेदना मेंदूमधील श्रवणकेंद्रापर्यंत पोहोंचवतात व आपल्याला त्या स्वरांचे ज्ञान होऊन ‘ऐकू’ येते.
भाषा शिकणे आणि बोलणे हे शिकावे लागते आणि फक्त मानवच बोलू आणि लिहू शकतो. लायन किंग मधील लांडग्यांनी वाढवलेल्या बाळाला आपली भाषा बोलता येणार नाही व समजणारही नाही. ती शिकावी लागेल.
बहिरेपणा मुख्यत्वेकरून दोन कारणांमुळे येतो. आंतर्कर्णापर्यंत ध्वनीलहरी पोहोंचण्यामध्ये अडथळा आल्यास जो बहिरेपणा येतो तो ‘आवाज मोठा करणाऱ्या’ साध्या कर्णयंत्राचा उपयोग करून दूर करता येतो. पण आंतर्कर्णामधील केशपेशी काम करेनाश्या झाल्यास मात्र या अशा ‘केवळ आवाज मोठा करणाऱ्या कर्णयंत्राचा’ उपयोग होत नाही व अशा व्यक्तींचा बहिरेपणा दूर करता येत नाही.
असा नस-बहिरेपणा येण्याची अनेक कारणे आहेत. विषाणू संसर्ग, अतिज्वर, ध्वनी-प्रदूषण, कर्ण-विषारी औषधे, गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ताप किंवा गोवर येणे अथवा वयोवृद्धत्व ही मुख्य कारणे आहेत. पण अनुवन्शिकतेमुळे येणारी कर्णबधिरता हे मूकबधिरतेचे एक मुख्य कारण आहे.
पण म्हणतात ना की ‘गरज ही शोधाची जननी आहे’. अशा असाध्य बहिरेपणावर उपाय शोधण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक शास्त्रज्ञांनी सतत प्रयत्न केले. कल्पना अशी होती की नस काम करीत नसेल तर त्या नसेल बाहेरून इलेक्ट्रिक शॉक देवून ऐकू येते का पाहावे. १७९० साली व्होल्टा याने तर १८६८ साली ब्रेनर यांनी स्वताच्या कानाला शॉक देवून पाहिले. धातूची वस्तू पडल्यासारखा आवाज कानात आला इतकेच. पण या धक्कादायक अनुभवामुळे पुढील पन्नास वर्षे पुन्हा कोणी हा प्रयोग करण्यास धजावले नाही. १९५७ मध्ये जोर्नो नावाच्या एका फ्रेंच सर्जनकडे एक बहिरा रुग्ण आला. त्याच्या चेहेऱ्याच्या स्नायूंना चेतना देणाऱ्या दोन्ही बाजूच्या नसा काम करीत नव्हत्या, लुळ्या पडल्या होत्या. ही फेशियल नस आंतर्कर्णाजवळून जात असताना तिच्यावर दाब येवून त्या निकामी झाल्या होत्या. या सर्जनने कानाचे ऑपरेशन करून त्या नसेला शॉक देणारे एक छोटे यंत्र बसवले. त्यामुळे चेहेर्याचे स्नायू तर हलले नाहीच पण त्या माणसाला त्या कानाने थोडेफार ऐकू येवू लागले. दुर्दैवाने ते यंत्र फक्त एक महिनाभरच चालले. परंतु त्या फ्रेच डॉक्टरांनी ही केस शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केली. तीन वर्षांनी डॉ. हाऊस या अमेरिकन सर्जनला त्याच्या एका रुग्णाने या निबंधाचे हे कात्रण दाखवले. डॉ. हाऊस यांनी त्याचा अर्थ ओळखून असे शॉक देणारे एक यंत्र तयार केले व त्याची एक तार त्यांनी शंखकर्णाच्या सुरळीमध्ये घातली व त्यातून बाहेरच्या आवाजाचे रूपांतर एका मशीनद्वारे बदलत्या ध्वनी कंपनामध्ये करून विजेचे धक्के दिले व बहिर्यांना थोडेफार आवाज येवू लागले. अशा रीतीने तयार झाला जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक कान ! हे एक-तारी यंत्र अनेक रुग्णांना बसवण्यात आले. याचा एक तोटा असा होता कि याने फक्त एकाच वेळी सर्व नसतंतूंना चेतना म्हणजे शॉक दिला जात असे व त्यामुळे फक्त आवाजाचा ऱ्हिदम म्हणजे ताल ऐकू येत असे पण संभाषण समजत नसे. त्यामुळे जगामध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी आणखी चांगल्या तंत्राचा शोध चालूच राहिला.
काळाच्या पडद्याआड …
स्थळ .. मेलबॉर्न, ऑस्ट्रेलिया
डॉ. ग्रीम क्लार्क हे ऑस्ट्रेलियन डॉक्टर १९६५ साली लंडनमध्ये नाक-कान-घसा या विषयातील उच्च शिक्षण घेवून परतले. स्वतःचे वडील बहिरे असल्यामुळे या आजारावर संशोधन करण्यामध्ये त्यांना जास्तच रस होता. संशोधन करता यावे म्हणून त्यांनी मेलबोर्न विद्यापीठामध्ये प्रोफेसरची नोकरी पत्करली. रात्रंदिवस त्यांनी मांजरीसारख्या प्राण्यांच्या कानावर अनेक प्रयोग केले. त्यासाठी मेलबोर्न विद्यापीठामध्ये जैववैद्यकीय अभियांत्रिकी विषय सुरु केला, माणसे जमवली, तयार केली. पण हे सर्व करण्यासाठी पैशांची गरज होती. टीका करणारे खूप पण मदत करणारे फार थोडे, असे निराशाजनक चित्र होते. पण परमेश्वर रूपाने मदतीला धावून आला एक टीव्ही चॅनेल! या चॅनेलने मोफत आवाहन केले आणि मग पैशांचा ओघ सुरु झाला. नानाविध मार्गांनी पैसे जमा झाले, संशोधन चालू राहिले. ऐकण्याच्या नैसर्गिक क्रियेचा खूप सखोल अभ्यास करण्यासाठी लंडनला परत जावून मेंदू आणि भाषा विकास या विषयाचे तीन महिने शिक्षण घेतले आणि आपल्या नवीन कल्पनांनी तेथील तज्ञांनाही थक्क केले.
त्यांनी शंखकर्णाच्या सुरळीत घातल्या जाणाऱ्या एका तारेऐवजी चोवीस अतिसूक्ष्म तारांची एकच तार तयार केली व त्यातून शंखकर्णामधील पडद्याला बारा ठिकाणी शॉक देण्याची पद्धत विकसित केली. या तंत्रामुळे निरनिराळ्या कंपनसंख्या वाहून नेणारे निरनिराळे नसतंतू येणाऱ्या आवाजाच्या कंपन संख्येबरहुकूम उत्तेजित करता येत होते. अर्थात दहा हजार तंतूंचे काम केवळ बारा तारा करणार होत्या. शिवाय शंखकर्णामध्ये ही चेतातार सुमारे १५ मिमी पर्यंतच घुसवता येत होती. अगदी टोकाकडील व कमी कंपनसंख्या असणारे नसतंतू चेतविता येत नव्हते. ही तार आत सरकवीत असताना अनेक अडचणीसुद्धा येत होत्या. क्लार्क यांचे सतत चिंतन आणि चर्चा चालूच होत्या. आपल्या कुटुंबासमवेत सुट्टीवर गेल्यावर देखील हाच विचार सतत त्यांना व्यथित करीत असे. एके दिवशी समुद्रकिनारी शंख पाहताना त्यांना लक्ष्यात आले कि शंखकर्णामध्ये वापरण्याची चेता-तार ही पुढील टोकाला लवचिक तर मागे मात्र ताठ असली पाहिजे. बस्स, त्यातूनच तयार झाला नवा दुसऱ्या पिढीचा संभाषण ऐकवणारा यांत्रिक कान ! या कथेच्या सुरुवातीस वर्णन केलेल्या प्रसंगातील तरुण म्हणजे आपले डॉ. क्लार्क हेच होते हे सूज्ञांच्या लक्ष्यात आलेच असेल.
पुढची अडचण अशी आली कि ऑस्ट्रेलियामध्ये साथ हजारांपेक्षाही जास्त बहिरे असून त्यांना त्या प्रयोगासाठी माणूस मिळेना. त्यांच्याविषयी अपप्रचार करणारे तर होतेच. शेवटी रॉड नावाचा एक रुग्ण या प्रयोगाला तयार झाला. ती तारीख होती एक ऑगस्ट १९७८ ! अनेक सहाध्यायी डॉक्टरांनी तर त्यांना घाबरवलेच होते," तू हा रुग्ण बहुतेक खलास करणार आज !"
डॉ. क्लार्कना देखील खूपच तणाव जाणवत होता. सर्जरीविषयी त्यांना विश्वास तर वाटत होताच पण जर हा प्रयोग फसला तर काय ही अनामिक भीतीदेखील वाटत होती. आतापर्यंतचे कष्ट, सर्वांचे अथक परिश्रम, देणगीदारांचा विश्वास, स्वतःचे आणि कुटुंबाचे भवितव्य असे सारेच जणू पणाला लागले होते. क्लार्क आणि त्यांचे सहकारी पायमन यांनी रुग्णाला आधार देवून आपण प्रामाणिकपणे आपल्या प्रयत्नांची शिकस्त करणार असल्याचे सांगितले.
"सिस्टर मार्टिन, मला स्कालपेल द्या, मी आता ऑपरेशन सुरु करतो आहे." देवाचे नाव घेवून त्यांनी रोडच्या कानाच्या मागे छेद घेतला आणि मग पुढील तब्बल नऊ तास सर्व टीमने मिळून ऑपरेशन संपवले.
रॉडची तब्येत हळूहळू सुधारत होती. चार दिवसांनंतर एकदा रॉड ज्या मजल्यावर होता तेथील इमर्जन्सी घंटा वाजली आणि डॉ. क्लार्क यांच्या हृदयाचा ठोका चुकला. ही घंटा रॉड साठी तर नसेल. त्यांना त्या नतदृष्ट मित्राचे वाक्य आठवले," तू हा रुग्ण बहुतेक खलास करणार आज!" त्यांना धावत जिना चढत असतांना आपली शरीरामध्ये किती घर्मग्रंथी आहेत त्याची जाणीव झाली. खरोखरच रॉडच्या जखमेचे ड्रेसिंग बदलत असतांना तो चक्कर येवून पडला होता. सुदैवाने ती साधी चक्कर होती आणि रॉड सुखरूप होता. ऑपरेशननंतर एक महिन्यानंतर रॉडला बसवलेल्या कर्णयंत्राच्या चाचणीचा आणि क्लार्क यांच्या परिश्रमाच्या परिणामाचा दिवस उजाडला. रॉडला शस्त्रक्रिया झालेल्या कानातून आवाज ऐकविण्यात आले पण उफ् ! रॉडला कणभर देखील आवाज येत नव्हता. सर्वजण खिन्न होवून घरी गेले. पण दुसऱ्याच दिवशी ज्या बाह्य यंत्राने टेस्ट केली त्यात बिघाड असल्यचे कळाले. मग पुन्हा टेस्ट ठरली. रॉडला चाचणीसाठी ऐकवले ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत, "गॉड सेव्ह द क्वीन !" आणि काय आश्चर्य … रॉड जोडलेल्या तारांसकट खाडकन उठून उभा राहिला ! त्याला राष्ट्रगीत ऐकू गेले होते ! सर्वाच्यासाठी आनंदाचा क्षण होता तो ! डॉ. क्लार्क शेजारच्या खोलीमध्ये जावून आनंदातिशयाने चक्क रडले !
आतापर्यंत या कर्ण यंत्राला चेता देण्यासाठी टेबलावरील मोठा संगणक वापरत होते. त्या ऐवजी रॉडला बरोबर अंगावर घेवून फिरता येईल असा छोटा संगणक तयार करणे महत्वाचे होते. तब्बल साठ हजार छोटे ट्रान्झीस्टर्स वापरून एखाद्या शब्दकोशाच्या आकाराचा बाह्यसंगणक तयार केला गेला. मेलबोर्न विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियन सरकारने या शोधाची दखल घेवून भरभर पावले उचलली. त्याच सुमाराला सिलिकॉन चीपचा शोध लागला होता. हृदयासाठी लागणारे 'पेसमेकर' तयार करणाऱ्या टेलेट्रोनिक्स या कंपनीने कानामागे बसेल एव्हड्या छोट्या आकाराचे यंत्र तयार केले. आता या कॉक्लियर इम्प्लांटचे व्यापारी तत्वावर उत्पादन सुरु आहे.
साल २०२०…
पुढे या संपूर्ण संचामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. आज वापरात असलेले मशीन दोन भागात असते. एक भाग ऑपरेशन द्वारे कानामागे त्वचेखाली बसवतात. त्यात एक लोहचुंबकदेखील असतो. दुसरा भाग हा सुटा असून तो कानामागे बाहेरून काढता घालता येईल असा बसवता येतो. त्याचा एक भाग त्वचेखालील भागावर लोह्चुम्बाकामुळे घट्ट चिकटतो.
कानाबाहेर बसवलेल्या भागात एक मायक्रोफोन असतो जो बाहेरचा आवाज पकडून त्याचे डिजिटल रुपांतर करतो व त्या ध्वनिलहरी वायरलेस तंत्राने त्वचेखालील यंत्राला दिल्या जातात. तेथे त्यांचे विद्युतलहरींमध्ये रुपांतर करून शंखकर्णामधील मधील चेतातारेस दिल्या जातात. तेथून स्वर आणि व्यंजने योग्य त्या नसतंतुपर्यंत जातात व पुढे मेंदूपर्यंत जावून आवाज ऐकू येतो.
हि यंत्रणा जर जन्मतः कर्णबधिर रुग्णांना जेवढ्या लवकर म्हणजे दोन वर्षांच्या आत बसवली तर फारच चांगला उपयोग होतो. नऊ वर्षे वयानंतर फारसा उपयोग होत नाही. जन्मतः कर्णबधिरता ओळखण्यासाठी OAE ही चाचणी जन्मानंतर लगेचच करता येते व ही चाचणी बर्याच शहरांत उपलब्ध असते.
भाषाकेंद्र तयार झाल्यानंतर देखील काही कारणांमुळे बधिरता आली असल्यास या तंत्राचा खूप चांगला फायदा होतो. मोठ्या व्यक्तींना उत्तर आयुष्यात आलेल्या नसबधीरतेसाठी देखील उपयोग होतो. काही मुलांना दोन्ही कानांना इम्प्लांट बसवल्यास जास्त फायदा होतो.
आत्तापर्यंत संपूर्ण जगभर सव्वातीन लाख रुग्णांना ह्या यंत्राचा लाभ झाला आहे. तीन वेगवेगळ्या कंपन्यांची यंत्रे उपलब्ध आहेत. भारतामध्ये जवळजवळ तीस लाख कर्णबधिर रुग्ण आहेत. हे तंत्र बऱ्याच मोठ्या शहरांत उपलब्ध आहे. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये डॉ. नीलम वैद यांनी गेल्या तेरा वर्षांत एक वर्षाच्या बाळापासून ते सत्तरीच्या वृद्धांना अशा सुमारे साडेपाचशे एका कामासाठी रुग्णांना हे यंत्र बसवले आहे. तेथे हि यंत्रणा बसवण्याच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे सात लाखांपर्यंत खर्च येतो.
डॉ. क्लार्क यांचे संशोधन कार्य अजूनही अव्याहतपणे आणि नवनवीन सहकार्यांच्या मदतीने चालू आहे. मेलबोर्नमधील त्यांच्या संस्थेमध्ये आता अंध व्यक्तींसाठी कृत्रिम नेत्र म्हणजे 'बायॉनिक आय' तयार करण्याचे संशोधन चालू आहे. त्यांच्या या अलौकिक कार्याला आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि त्रिवार वंदन !
खूपच छान
खूपच छान
वा, अतिशय माहितीपूर्ण लेख.
वा, अतिशय माहितीपूर्ण लेख. खूप दिवसांपासून कर्णबधिरांकरता वापरण्यात येणाऱ्या मशिन्स बद्दल वाचायचे होते. आणि तुमचा अतिशय सरल भाषेत आणि मराठीत हा लेख वाचायला मिळाला.
छान
छान
माझा एक प्रश्न आहे की मी
माझा एक प्रश्न आहे की मी कुठेतरी वाचलं/ऐकलं होतं की आपल्या कानांची ऐकण्याची क्षमता ही लॉग्यारिथमिक आहे. म्हणजे समजा एक x आवाज आहे तो त्याचा square झाला तर तो आपल्याला 2logx ऐकू येतो x गुणिले x ऐकू नाही येत. हे खरं आहे का?
अप्रतीम ! खूप छान आणी
अप्रतीम ! खूप छान आणी माहितीपूर्ण लेख बर्याच दिवसांनी वाचायला मिळाला. धन्यवाद डॉ. !
डॉक्टर, नेहमीप्रमाणेच
डॉक्टर, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद!
माझा एक प्रश्न आहे की मी
माझा एक प्रश्न आहे की मी कुठेतरी वाचलं/ऐकलं होतं की आपल्या कानांची ऐकण्याची क्षमता ही लॉग्यारिथमिक आहे. म्हणजे समजा एक x आवाज आहे तो त्याचा square झाला तर तो आपल्याला 2logx ऐकू येतो x गुणिले x ऐकू नाही येत. हे खरं आहे का?>>
किती छान लेख.
किती छान लेख.
कॉक्लियर इम्प्लांट बद्दल एक खूप सुंदर इंग्रजी सिनेमा Sweet Nothing in My Ear पाहिला होता.
डॉक्टर, नेहमीप्रमाणेच
डॉक्टर, नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद!
मस्त! ओपनिंगला एक छोटासा सीन
मस्त! ओपनिंगला एक छोटासा सीन दाखवुन, प्रेक्षक/वाचकांची उत्कंठा (किडा) ताणायला लावुन त्याचा फॉलो थ्रु शेवटाला करुन द्यायची शैली (नोलन, श्यामलनची मेडिकल थ्रिलर वाटेल अशी) आवडली...
सुंदर लेख. गुंतागुंतीचा विषय
सुंदर लेख. गुंतागुंतीचा विषय सुलभतेने मांडण्याची आपली शैली जबरदस्त आहे!
मस्त! ओपनिंगला एक छोटासा सीन
मस्त! ओपनिंगला एक छोटासा सीन दाखवुन, प्रेक्षक/वाचकांची उत्कंठा (किडा) ताणायला लावुन त्याचा फॉलो थ्रु शेवटाला करुन द्यायची शैली (नोलन, श्यामलनची मेडिकल थ्रिलर वाटेल अशी) आवडली...>>धन्यवाद!
खूप छान लेख. वेळात वेळ काढून
खूप छान लेख. वेळात वेळ काढून इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद. अजून लेख येऊदेत.