आनंद छंद ऐसा ... मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 29 February, 2020 - 05:52

जावयाना द्यायच्या अधिक महिन्याच्या वाणावर घालायचा क्रोशेकामाचा रुमाल असो किंवा भरतकाम , क्विलटिंग असो अगर मार्केटला भाज्या महाग करणारा माझा व्हेजिटेबल कारविंग चा छंद असो , क्रेपची अगर सॅटिन ची फ़ुलं असोत , आकाश कंदिला सारखे क्राफ्ट प्रोजेक्ट असोत ह्या सगळ्या बद्दल मी मायबोलीवर बरच लिहिलं आहे आणि त्याच मायबोलीकरांनी खूप कौतुक ही केलं आहे त्यामुळे वेगळं नवीन काय लिहावं ह्या संभ्रमात आहे मी.

मला अगदीच माहीत आहे की कोणत्याही छंदात मी फार प्राविण्य मिळवलेलं नाहीये पण तरी ही ह्या सगळ्या गोष्टी मला फार आनन्द देतात. स्वाNत सुखाय हेच त्यांचं स्वरूप मला आवडणारं आहे. ह्या छंदांमधून मी कधी ही द्रव्यार्जन केलेले नाही कारण विकण्या एवढ्या त्या काही परफेक्ट नसतात ह्याची मला जाण आहे. आणि तरी ही ह्या गोष्टी करण्यात मी खरोखर मनाने रमते आणि सगळ्या व्यथा, चिंता ह्यांचा मला विसर पडतो. म्हणून त्याना माझ्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे.

आजकाल नेट मुळे फार प्राविण्य मिळवलं नाही तरी तुमची कोणतीही आवड प्राथमिक स्वरूपात शिकणे फारच सोपे झाले आहे जे पंचवीस तीस वर्षांपूर्वी शक्य नव्हते. ह्या तंत्रज्ञानाची मी आभारी आहे.

एकच एक तीच ती गोष्ट करण्याचा खूप जणांना कंटाळा येतो. पण मला नाही येत कंटाळा. उलट एकसारखे बारीक गव्हले वळताना मी त्यात रमून जाते. त्याची स्वतःची एक लय असते ती मी एन्जॉय करते आणि सगळ्या चिंता , ताण ह्यांना त्या लयीत समर्पित करून ताजी तवानी होते. म्हणून फणसाचे गरे काढणे, वाल सोलणे , एवढंच कशाला मन लावून भांडी घासणे , चांदीची भांडी काना कोपऱ्यातून चकचकीत करणे, अशी इतरांना कंटाळवाणी वाटणारी कामं माझी आवडती आहेत.

आमच्या छोट्या गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने आम्हाला शिक्षणासाठी घर सोडून हॉस्टेल वर राहावं लागलं. त्या काळी मोबाईल तर सोडाच फोन ही फक्त emergency साठी राखून ठेवलेले असत. त्यामुळे दर आठवड्याला खुशालीच पत्र घरी पाठवायला लागायचं. माझं लिखाण फारच कच्चं होत. व्यक्त होणं मला अजिबात जमत नसे. ते पोस्ट कार्ड भरून पत्र लिहिणे हे माझ्या साठी फारच मोठं टास्क असे. बाकी सर्व ठीक ने पत्राला सुरवात होऊन बाकी सर्व ठीक नेच त्याचा शेवट होत असे. ☺ शाळेत निबंध लिहिणे ही मला कधी फारसे जमले नाही. ह्या पार्श्वभूमीवर अलोकडच्या काळात आमच्या कोकणावर आणि इतर ही मी जे काही लिहिले आहे त्याच सगळं श्रेय मी मायबोली ला देईन . माझ्यात लिखाणाची आवड निर्माण करणाऱ्या मायबोलीचे आभार न मानता तिच्या सदैव ऋणातच राहयालाच मला आवडेल. मला सांगायला आनन्द वाटतोय की लवकरच कोकणातल्या घरावरच माझं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. बघू या प्रत्यक्ष कधी योग येतोय ते.

माझे सगळे छंद craft किंवा हस्तकला ह्या स्वरूपातले आहेत पण मला खरी ओढ आहे ती संगीत आणि चित्रकला ह्यांची. ह्या दोन्ही कला दुसऱ्याला आणि स्वतःला ही तेवढाच आनन्द देतात. पण ह्या पैकी एक ही कला मला अजिबातच येत नाही . तेव्हा देवाने मला पुढच्या जन्मात तरी ह्यापैकी एक कला थोडी तरी द्यावी अशी माझी परमेश्वरा जवळ प्रार्थना आहे.

जाता जाता एक निरीक्षण इथे नोंदवते. ह्या वर्षीचा हा उपक्रम खूप छान आहे. आपला छंद वाचकांपर्यंत पोचवण्याची एक चांगली संधी आहे ही .पण आत्ता पर्यंत प्रसिद्ध झालेले सगळे लेख हे स्त्री आयडींचे आहेत एक फक्त पशुपत आणि कुमार ह्यांचा अपवाद वगळता. मला खात्री आहे की जगावेगळे छंद जोपासणारे अनेक पुरुष आयडी मायबोलीवर नक्कीच असतील. अजून ही वेळ आहे तेव्हा सरसावा की बोर्ड आणि लिहा लवकर आपापल्या छंदां बद्दल. आम्ही वाट बघतोय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनमोकळे लिहीलेत ममो Happy

चित्रकला मला पण फार आवडते, पण ते कौशल्य माझ्या बोटांत नाहीये.

कोणत्याही छंदात मी फार प्राविण्य मिळवलेलं नाहीये >> माझ्या मते, छंद हे आपापला मानसिक आनंद मिळवण्यासाठीच असतात, त्यात प्राविण्य मिळवावेच असे काही नाही.

आणि हो...पुस्तकासाठी शुभेच्छा Happy

मनीमोहोर खूप मनापासून आणि प्रामाणिक लिहिलं आहेस. विविध हस्तकला तुला मोहात पाडताना नेहमी बघितलं आहे. तुझं कोकणप्रेम इतकं खरं आहे की तुझी लेखणी साहजिक त्याला न्याय देते. पुस्तक तर छानच होणार.

ममो, छान लिहीलयंस! मलाही चित्रकला व संगीत शिकायची इच्छा अपूर्ण आहेत.....
पुस्तक प्रकाशनला शुभेच्छा व आमंत्रणाच्या प्रतिक्षेत....

ग्रेट हेमाताई, ऑलराऊंडर, किती गोष्टीत गती, फार सुरेख, कौतुकास्पद.

पुस्तकं प्रकाशनासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन.

मनीमोहोर ,पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा !
तुमचे कोकणाविषयीचे लेख छानच असतात.
छंद स्वान्त सुखाय (च) असावा असं माझं तरी मत आहे. तेव्हा तो परफेक्ट नसला तरी त्यातून स्वतःला मिळणारा आनंद महत्वाचा Happy
एखादया छंदाचे यशस्वी व्यवसायात रूपांतर झाल्याचं उदाहरण असेल ही. पण मग त्याबरोबर रूक्ष व्यवहार आलाच.

छंद असतात.
१) फक्त ते ललित पद्धतीने मांडणे जमलं पाहिजे ना!
२) छंद का सुरू होतात आणि ते कसे थांबतात हा सुद्धा विषय आहे.
३) फोटो. यामुळे शब्द नसले तरी कल्पना पोहोचते.
४) लहान मुलांना काय आवड आहे हे कुणालाच कळत नाही. त्यांना निरनिराळ्या गोष्टींना सामोरे नेण्याचं काम आहे पालकांचं. एकदा का वय निघून गेलं की त्यातली गम्मत जाते.
५) आपले छंद दाखवून इतरांना छांदिष्ट करण्यासाठी आहेत सामाजिक माध्यमं, फोन, इंटरनेट. ते आता आहे भरपूर.

खूप सुंदर लिहिता हो तुम्ही , तुमचे कोकणचे लेख खूप छान असतात मी पण तुमच्या बरोबर येते फिरून वाचतावाचता , अगदी तुमच्या गावी घरी सुद्धा , लिहीत राहा

सर्वाना प्रतिसादासाठी धन्यवाद.

पुस्तक प्रकाशना बद्दल मायबोलीवर लिहीनच.

प्रशस्तीपत्रक छानच झालं आहे त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार.