आनंदछंद ऐसा - मामी

Submitted by मामी on 28 February, 2020 - 04:09

मी अवलच्या कृपेनं चार वर्षांपूर्वी क्रोशाची सुई हातात घेतली. याआधी जवळजवळ २० वर्षांपूर्वी भाचीकरता क्रोशाचा स्वेटर केला होता. म्हणजे ट्रेनमधल्या मैत्रीणी शेजारी बसून इथे सुई घाल, अशी बाहेर काढ, असा दोर्‍याचा वेढा दे .... अशा पद्धतीनं शिकवत असत आणि मी मठ्ठपणे ते करत होते. त्यातही घामाघूम. मग अर्ध्याहून अधिक स्वेटर त्यांनीच केला. मुका खांब, खांब .... यातही गोंधळ होत असे. मी अवलचा ऑनलाईन क्लास लावला होता पण तिथे हळूहळू शिकण्यापेक्षा डायरेक्ट एक पर्सच घेतली करायला.... आणि मग अवलला जे काय पिडलंय त्याला तोडच नाही. भयानक शंका यायच्या पण कळल्याशिवाय पुढे जायचंच नाही असं ठरवून टाकलं. सुई आता कुठे खुपसायची हेच कळायचं नाही. मग अवलला फोन, असंख्य व्हिडिओ कॉल्स (अवल, आठवतंय का?) ती पर्स मी किमान २० वेळा उसवली असेल आणि जेव्हा पूर्ण केली तेव्हाही वाकडीच झाली होती खरंतर. पण केली बाई एकदाची चिकाटीनं पूर्ण. मग एक साबांकरता वाकडी पर्स केली. मग मी युट्युबवर व्हिडिओ बघून करायला सुरूवात केली. काही नविन टाका असेल तर त्या टाक्याचा व्हिडिओ आधी बघायचा - पुढे मागे अनेक वेळा बघत, स्लो मोशनमध्ये बघत, अजून एखादा व्हिडिओ बघत तो टाका शिकून घ्यायचा, मग पुन्हा मूळ व्हिडिओत बघून काम सुरू करायचं. बारीक सारीक स्कील्स अशी शिकत गेले आणि सातत्यानं विणत राहिले. आणि मग एकदम कधीतरी जाणवलं की अरेच्चा जमतंय की आपल्याला.

आधी दोरा नीट हातात न धरता येणारी, क्रोशाची सुई हातात घेऊन विणत असलेल्या तुकड्याकडे नुसतीच मिटीमिटी बघत पुढचा टाका नक्की कुठे कसा घालावा याचा विचार करत करत घाबरत क्रोशेकाम करणारी मी हळूहळू टाके वाचायला शिकले. शास्त्रीय संगीत गायक कसे तालासुरात पक्के होतात तशी मी टक्केटोणपे खाऊन टाके ओळखायला शिकले. काही चुकलंच तर उसवून पुन्हा ठीक करायला आलं म्हणजे जमलंच म्हणायचं.

किती प्रचंड आवाका आहे विणकामाचा. विणकाम म्हणजे दोरे गुंफायची कला. मग त्यात अनेक पद्धती, प्रकार आणि प्रॉप्स वापरले जातात आणि गंमत म्हणजे या प्रत्येक पद्धतीचं आपलं सौंदर्य आहे. प्रत्येक पद्धतीत चिक्कार प्रकारचे टाके आहेत, डिझाईन्स आहेत आणि करण्याची वेगळी मजाही आहे. अनेक धागे, अनेक तंत्रं, अनेक प्रकारच्या सुया, विविध टाके ... करता करता कितीतरी नव्या गोष्टी, नव्या युक्त्या, नवी तंत्रं खुणावत राहतात. यु-पिनवरचं क्रोशेकाम , विविध लूम्स वापरून केलेलं विणकाम, नुसत्या बोटांनी / हातांनीकरायचं विणकाम, पिनव्हिल वरच्या नाजूक नक्ष्या आणि त्या जोडून केलेली शाल, छोट्याश्या हातमागावरचं टॅपेस्ट्री विणकाम .... यातलं काही शिकलेय, काही शिकतेय आणि बरंच शिकायचं आहे.

क्रोशेमध्ये प्रत्येक टाका वेगळा असतो आणि तो पीळदार असतो त्यामुळे काम जरा जाड बनतं. त्याचं एक रस्टिक सौंदर्य आहे. तर दोन सुयांच्या विणकामाचं एक वेगळं सौंदर्य आहे. विणकामात दोरे एकमेकांच्यात अडकवत पुढे जातात त्यामुळे टाके एककेकांत फसलेले असतात. काम अधिक पातळ, नाजूक आणि रेखिव होतं. ते काम जास्त फाईन दिसतं. पिक्सेल कसे जितके बारीक तितकं दृश्य अधिक रेखिव ... तसंच काहीसं.

मात्र त्याचबरोबर क्रोशे खूपच फ्लेक्सिबल आहे (असं मला वाटतं) त्यात चुका झाल्या तर तिकडम करून झाकता येतात, नाहीतर निदान पटकन उसवून मागे जाऊन पुन्हा सहजपणे डिझाईन सावरून घेता येतं. दोन सुयांच्या विणकामात टाके पडले की गडबड होते (असं मला आठवतंय. मी किमान ३५ वर्षांपूर्वी प्रयत्न केला होता.). पण विणकामातली डिझाईन्स खूप नाजूक आणि वेल डिफाईन्ड दिसतात.

सध्या ट्युनिशियन क्रोशे पद्धती शिकण्यासाठी एक स्कार्फ विणायला घेतलाय. हे म्हणजे क्रोशे आणि दोन सुयांवरचे विणकाम या दोघांच्या मधलंच तंत्र. एकच क्रोशासारखी पण लांब सुई पण ती वापरताना दोन सुयांवरच्या विणकामासारखे टाके विणायचे. मजा आहे एकंदरीत यात. मधेच थोडं मॅक्रमे देखिल करून पाहिलंय आणि ते अजून करण्याचा विचार आहेच.

या माझ्या प्रवासात मैत्रीणींच्या ऑर्डर्सही येत गेल्या (माझ्या कामावर विश्वास दाखवला याबद्दल या सर्व मैत्रीणींना धन्यवाद) आणि कामातली सफाई वाढत राहिली. हल्ली ध्यानी मनी स्वप्नी रंगित दोरेच दिसत राहतात. इतका ध्यास कधीच कोणत्याच गोष्टीचा घेतला नव्हता. खूप खूप आनंद मिळतोय मला क्रोशे आणि संबंधित कामातून आणि जितकं शिकत जातेय तितकं क्षितिज लांब जातंय हे लक्षात आलंय.

अजून बरंच काही आत्मसात करायचं आहे, प्रचंड पल्ला गाठायचा आहे. पण मी हे करत राहणार हे लक्षात आलंय. तरी अजून दोन सुयांवरचं विणकाम येत नाहीये. हाताला आत्ताशी कुठे ११ बोटांची सवय झालीये. बारावं बोट कधी फुटतंय याची मी देखिल वाट बघतीये.

माझं काम इथे बघता येईल : https://www.instagram.com/tales_of_the_yarn/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाताला आत्ताशी कुठे ११ बोटांची सवय झालीये. बारावं बोट कधी फुटतंय याची मी देखिल वाट बघतीये.>> एकदम मामीस्टाईल खुसखुशीत

मस्तच तू, तुझं हे लेखन आणि तुझे केलेले क्रोशे पॅटर्न्स (आणि तुझा सेन्स ऑफ ह्युमर)

खूप पेशन्सचा हा छंद आहे. मी कधीतरी विणायचे त्यामुळे अनुभव आहे.
खूप छान वर्क ! मामी, वाकडी पर्स पण फोटोत दिसतेय. Happy

बारावे बोट Lol

धन्यवाद हार्पेन, कविन आणि विनिता.झक्कास.

मामी, वाकडी पर्स पण फोटोत दिसतेय. >> ती वाकडी पर्स नाहीये फोटोत हां. आता तुम्हाला जी वाकडी दिसतेय ती केवळ फोटो मध्ये दिसतेय. आता माझ्या पर्सेस वाकड्या होत नाहीत. Lol

खूप छान लिहिलंय मामी. मी आत्ता २ वर्षांपूर्वी तुनळी बघून बघून क्रोशे शिकत गेले. सुरवातीला प्रत्येक टाक्याचा ( single crochet, double crochet, triple crochet etc.) थोडा स्वतंत्र सराव केला. मग पहिली वस्तू म्हणजे माझ्या मोबाईल साठी कव्हर बनवले. नंतर माझ्या साठी साधे बूट / मोजडी. ४-५ वेगवेगळ्या डिझाईन चे रुमाल (doily) बनवले. मग नवर्याच्या आग्रहाखातर त्याच्या साठी बूट बनवायला घेतले पण प्रयत्न फसला. त्या नंतर जो उत्साह कमी झाला तो झालाच. सध्या जाईचा लेख वाचल्यानंतर प्रौढ रंगकामाची इच्छा उफाळून येते आहे.

भारी लिहीलय मामी. आणि तुमचं insta page बघून साष्टांग दंडवत स्विकारा. पण insta वर मी नाही त्यामुळे थोडंच बघता आलं

Instagram वरील काम पाहिले.

खूप छान.

मी सुद्धा लग्नानंतर ट्रेन च्या कंटालवाण्या प्रवासात वेल जावा म्हणून बेसिक शिकून घेतले. व नंतर YouTube च्या सहाय्याने बरेच छोटे मोठे काम केले. जसे कानटोपी, मफलर , landline टेलीफोन कवर, २-३ टिपीकल क्रोशे रूमाल, तोरण इ. मी पहिल्यांदा केलेले रुमाल चुकतमाकत, office मधल्या मुलींकडून दुरूस्त करून घेत केले होते त्याची आठवण आली.

गेले वर्षभर ट्रेन प्रवास बंद असल्याने काम थांबलेय. पण आपला हा लेख वाचून पुनः सुई हाती घ्यायची इच्छा होतेय

मस्त लिहिलेय , पेजला भेट दिली . सुंदर नमुने आहेत .

मुंबईत लोकलमध्ये बऱ्याच मुली हे करत असतात . खूप छान सफाईदारपणे त्यांची बोटं चालतात . क्रोशेकाम करताना बघणं ही छान वाटत .
(अवलला शिकण्यासाठी कॉन्टॅक्ट करावा असेही मनात आहे .पण टाळाटाळ केली तर अवल छड्या देईल ही भीतीही आहे Lol Biggrin )

छान लिहिलंय. फोटोपण आवडले.

<<< गेले वर्षभर ट्रेन प्रवास बंद असल्याने काम थांबलेय. पण आपला हा लेख वाचून पुनः सुई हाती घ्यायची इच्छा होतेय >>
मग ठीक आहे. मला वाटलं की ट्रेनचा प्रवास परत सुरु करायची इच्छा होतेय की काय? Light 1

अरे, काय मस्त लिहिलस ग Happy
आणि नाही हं, माझ्या कोणत्याच विद्यार्थी, विद्यार्थिनीने मला त्रास दिला नाही. उलट आनंदच दिलात तुम्ही सगळ्यांनी Happy
मामी तू तर हुषार, हरहुन्नरी, कष्टाला मागे न हटणारी आहेस, जे करशील सुंदर आणि व्यवस्थितच करशील.
बाकी 12 काय 64 कलांची 64 बोटं फुटू देत तुला ___/\___

मामी, काय सुंदर नमुने आहेत एकेक. बघत रहावे. तो गोंड्यावरचा पक्षी कसला क्युट आहे. लेख सुद्धा फार आवडला. तुमचा 'चिकाटी' हा गुण घेण्यासारखा आहे.
>>>>>>> आत्ताशी कुठे ११ बोटांची सवय झालीये. बारावं बोट कधी फुटतंय याची मी देखिल वाट बघतीये.>>>> मजेशीर वाक्य आहे. फार आवडले.

मस्तच मामी. मोहक आणि देखणे आहे सर्व काम तुझं.

खूपच सफाईदार आणि पेशन्स वालं काम आहे.
पुढच्या कामांसाठी शुभेच्छा.
मी कधीकाळी ट्रेन मध्ये बघून बघून एक दोन क्रोशा बटवे केले होते.पण नंतर उत्साह मावळला.

वाह खूप छान लिहिलं आहे. Hats off to you!

परवाच एका मैत्रिणीच्या सासूबाईंनी स्वतः केलेलं देवाचं आसन भेट दिलं. ते इतकं सुंदर आहे की मलाही क्रोशे शिकण्याचा मोह झाला.

माफ करा, डबल पोस्ट Happy

Pages