शतपावली!!

Submitted by इन्ना on 6 January, 2020 - 05:03

शतपावली!

उगाच नसते चॅलेंजेस घेतले नाहीत तर पुरेस जिवंत वाटत नाही बहुतेक मला . अश्याच एका येडेगीरीची ही गोष्ट -शतपावली.

२०१९ च्या फेब्रुअरी मार्च मधे एका चालकरी ग्रुपात सामिल झाले. ऑक्स्फाम नावाची एन जी ओ निधी संकलनासाठी , जगभरात (भारतात बंगलोर अन मुंबई ( कर्जत) येथे ,) एका अल्ट्रा वॉकथॉन चे आयोजन करते. १०० के अन ५० के असे दोन गट असतात. वर्षभर त्याचे लहान लहान प्रॅक्टिस वॉक देखिल आयोजित केले जातात. जिम मधे दान धर्म करायचा नाही अन आपापलेच हात पाय हलवायचे हे ठरवल होतं . अन असा एखादा ग्रुप असला की सातत्य राहिल हा एक हेतू होता. एखाद दुसरा वॉक त्यांच्याबरोबर केला देखिल. पण चार जणांची टिम करणे अन सगळ्यात महत्वाच म्हणजे फन्ड रेझिंग करणे हे जमेल अस वाटेना. आपण स्वतः उचलून मदत करणे वेगळ पण अमुक तमुक लोकाना मदत करा म्हणून लोकाना भरीस घालणे त्यासाठी तोंड उघडून दहा ठिकाणी मागणी करणे , हे जमेलस वाटेना. मग काय चालण चालू राहिल . पण आपापल.

मे मधे कामिनो द सांतियागो नावाचा ट्रेल पायी चालून झाला ( १५० किमी पाच दिवसात) अन २५ -३० के , सलग काही दिवस चालता आल्यानी थोडा कॉन्फिडन्स वाढला. पण तिथून परतल्यापासून घरची आजारपण ,लेकाच शिकायला परदेशी जाण , मग गणपती यात ३-४ महिने तसेच गेले. मी ह्या इव्हेंट बद्दल विसरूनही गेले. मात्र. चालण पळण वैयक्तिक स्तरावरच ,अन नियमितता रहावी म्हणून १०० डेज ऑफ रनिंग वगैरे चालू होत . तोवर चाल्कर्‍यांच्या वॉट्स अ‍ॅप ग्रुपात चौथा भीडू पाहिजे , आहे का कोणी अशी विचारणा झाली! मग मी कोण मेंबर्स वगैरे न पहाता 'मै हू ना' म्हणून टाकल. ऑक्टोबर ची सुरवात होती जवळपास .

टिम ईव्हेंट म्हणजे टिम अन सपोर्ट क्रु यांच एकमेकांना , एकमेकांच्या कुवतीला , गुण , अवगुणांना नीटच ओळखून असण!! पण इतर टिमचे जेव्हा एकत्र ७-८ प्रॅक्टिस वॉक करूनही झाले होते तेव्हा आमच्यासारखे फ्री आयन्स एकत्र आले. काही म्हणता काही साम्य नाही ,ओळख नाही , सराव तर दूरच राहिला. त्याहून महत्वाच म्हणजे फंड रेझिंग . त्यालाही मोजकेच दिवस उरले होते. ( ठराविक रक्कम उभी करणे हे क्वालिफायर असते सहभागी होण्यासाठी) मग सगळ्यात पहिल्यांदा टिम रजिस्टर करून टाकली. नाव एकदम साजेसं 'द स्ट्रेन्जर्स!

आमची टिम दोन मुली दोन मुलं अशी मिक्स्ड होती. वयं -२४,२८,३८,४८. सपोर्ट क्रु खंदा पूर्वी ६ वेळा हा इव्हेम्ट करून जिंकून झालेला अविनाश. पहिला एकत्र सराव पुण्यातच बाणेर टेकाड , युनिव्हर्सिटी , सिंबायॉसिस ची टेकडी , वेताळ टेकडी असा २०- किमी चा केला. पावसानी निसरड्या टेकाडावर चालू पायताणं उपयोगी नाहीत हे कळाल. बाकीची टिम आपलं जमू शकेल अशी आहे हे कळाल. अन वीस तर झाले पण अधीक चालल्याशिवाय कौन कितने पानीमे. ( खरतर मीच कितने पानीमे) कळणार नाही अस ठरवून , अन हा पुढचा वॉक थेट दिवाळीनंतरच अस ठरवून पांगलो.

दिवाळी नंतर भूगाव ते पौड असा ३५-३६ के चा वॉक ठरला. अन मधेच लवासा चा रस्ता कमी रहदारीचा चढावाचा दिसला अन ऐन वेळी तो रूट केला. पहिले १८-२० मस्त पेस नी झाले . अन फाजिल आत्मविश्वास यायच्या आत सुर्य देवानी तडाखा दाखवला. ३६ पूर्ण केले खरे पण हाय्ड्रेशन च महत्व काय ते नीटच कळल. हाय्ड्रेशन बॅग , ईलेक्ट्रोलाइट्स हे 'टू बी अ फॅशनेबल रनर 'अस नसून गरजेच आहे हे मी माझ्या मनाला बजावल. अन गोळा करायच्या लिस्ट मधे टाकल. फिट्नेस अन अल्ट्रा चालता येण्यासाठी अजूनही, चाचपणी आम्ही गुडघाभर पाण्यातच करतोय हे कळल. सन बर्न ! ह्याच पण काहीतरी करायला हव हे कळाल. शेफिंग चा त्रास झाला. अन दुसरा प्रॅक्टिस वॉक पण भरपूर लर्निंग सह सफल झाला.

तोवर फन्ड रेझिंग साठी चाचरत कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या लोकाना आवाहनं सुरू केली. हे पण एक लर्निंगच म्हणाव लागेल. अगदी १०० रू च्या पटीत कितीही फुलाची पाकळी , फुल ,पुष्पगुच्छ द्या म्हणून पाहिल. काही ठिकाणाहून अनपेक्षित भरघोस , काही ठिकाणी म्हटल्याबरोबर त्वरीत , काही ठिकाणी एखाद दोन वेळा आठवणी करून टिम मधल माझ टार्गेट झालं . खर सांगायच तर तोवर मला ते १०० के चालण्यापेक्षा अवघड वाटल होतं . एकदा ते झाल्यावर मात्र १०० के चालायच जरास दडपण आलं . मनाच्या बळावर काहीही धकवता येतं खरं पण किमान पात्रता , तयारी तरी हवी, अन ती अत्यंत तोकडी आहे हे जाणवत होतं . आता केवळ रोज बाणेरच टेकाड अन सगळ्या विकेंडाना २०-२५ के अस ठरवून टाकलं . टेकाड किती स्पिड नी चढल की कुठेपर्यंत पोचल्यावर धाप लागते ते खुणेच झाड पुढे पुढे सरकत गेलं . अजून एक बरं काम केल ते म्हणजे गॅजेट्स वरचा डिपेंडन्स कमी केला. स्ट्रावा , नाय्की रनिंग अ‍ॅप्स वर लॉग करत तो वाढता आकडा बघायचा , आज काय पेस , उद्या काय टार्गेट वगैरे बाजूला ठेवल्यावर निखळ चालतानाचा आनंद जास्त भावणारा वाटला.

हे सगळ करताना महिनाभर आधी एक भिडू गळला. काही इंज्युरीज मुळे. मग सपोर्ट क्रु पैकी एकाला चालकरी बनवून टाकल. त्यानी आधी तीनदा ह्या ईव्हेंट मधे चालून झालं होतं . रनर होता त्यामुळे फिट्नेस बद्दल खात्री होती. मात्र एकत्र चालण्यासाठी मात्र वेळ मिळाला नाही. एखाद दोन दा भेटून ओळखी करून घेतल्या मात्र. अश्याच एका भेटीत सपोर्ट च्या चालतानाची काय स्ट्रॅटेजी यावर चर्चा झाली . माझ्या डोक्यात तोवर ४८ तास आहेत म्हणजे पुरवून वापरायचे अस होत> निम्यापेक्षा अधीक ६० ते ७० के पहिल्या दिवशी चालून उरलेल दुसर्‍या दिवशी चालायच अस होत. आम्च्या मास्तरानी सांगीतल ( नंतर तर त्याच नाव शाकाल ठेवल.) एक बार जो चालू किया तो सौ के बादही रुकनेका. biggrin
तसही कोणताही अल्ट्रा खेळ्प्रकार मनाचा खेळ जास्त असतो शेवटच्या टप्प्यात. चेक पॉइंट ते चेक्पॉइंट ( सरासरी दर १० के ला असतो) चालायच . टार्गेट फक्त पुढचा चेकपॉइंट . काय खायच प्यायच याची जबाबदारी पण सपोर्ट क्रु च्या डोक्यावर! आमच काम फक्त चालणं !

रेस डे च्या आधीचे ३-४ दिवस अगदी पाय मोकळे करण्याइतपत चालणं केल. बाकी कार्बलोडिंग ( म्हणजे साध्या भाषेत दोन्ही जेवणं, भात आमटी पोळी भाजी खाल्ली. biggrin) व्यवस्थीत झोप अन हाय्ड्रेशन . (नेहेमीपेक्षा दोन ग्लास अधीक पाणी .)

१३ डिसेंबर शुक्रवारी फ्लॅग ऑफ होता . आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही चार जण अन आमचा सपोर्ट क्रु कर्जत ला जाउन ठेपलो. जमेल ना , नाही जमलं तर ज्यानी डोनेशन दिल त्याना काय तोंड दाखवायच? वगैरे शंका मनात होत्याच . पण शाकाल ने बोला , १०० चा विचारच करायचा नाही फक्त पुढच्या १० च्या टप्प्याचा करायचा. ते जमेल! अन हात पाय दुखणारच आहेत , ब्लिस्टर्स येणारच आहेत पण इंज्युरी झाली तर मात्र माघार घ्यायची . शिवाय डोनेशन तुला नाही तर ऑक्सफाम ला दिलय त्यांच्या कामासाठी . त्याच ओझं नको. शिवाय एकाच्या माघारीनी टिम ला नाही तरी वैयक्तीक फिनिशर ला सर्टिफिकेट मिळेलच. हे सगळ ऐकून जीवात जीव आला. अन जो होगा देखा जायेगा म्हणून झोपून टाकल मी.

सकाळी , कडाव गावच्या शाळेपासून सुरवात होती. तिथे बिब शिवाय आर एफ आय डी बॅन्ड्स पण मिळाले. ह्यात प्रत्येक चालकर्‍याची मेडिकल इन्फो , इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर्स फीड केले होते. टिम च्या चौघाही जणानी चेक पॉइंट वर एकत्र लॉग इन अन लॉग आउट करायच होत. पहिला टप्पा १३३ टिम्स च्या घोळक्यात ( १३३ *४ लोक) सुरू झाला. आमच्या सपोर्ट मधल्या प्रदिप नी बरोबर चालून छान पेस सेट करून सुरवात केली. नो गॅजेट्स ठरवल्या मुळे मोबाइल नव्हता नेहेमीसारखा . उगवता सुर्य त्या ट्रेल्स वरून चालताना सुंदर दिसला. आमचे बहुतांश प्रॅक्टिस वॉक स्त्यावरून झाले होते. इथे सुरवातीचे २-४ के: १३३ टिमांचा जथा अन त्यांनी चालताना उडवलेला धुरळा , प्रलंबीत पावसानी माती वाहून गेल्यानी पायवाटांवर डोकावणारे दगड अन ठेचकाळणारे पाय , यावरून ये तो असली मजा है हे कळलच होत . smile पहिला टप्पा ११.२५ के चा होता .
दुसरा टप्पा वाकस गाव ते पोशीर गाव १३.६ के चा टप्पा . ह्या नंतर हळूहळू उन्हाचा टप्पा सुरू झाला होता. सगळ्यात जास्त एलिव्हेशन्स नेमकी उन्हाच्या दरम्यान होती. आजूबाजूची गर्दी पांगली होती. क्रॅम्प ब्लिस्टर्स इंज्युरी वाले चालकरी दिसायला लागले होते. चेक पोस्ट वर फिजिओथेरपी अन नर्सिंग ची सोय अत्यंत छान होती. ह्या खेरीज वाटेत काही मदत लागली तर रुट मार्शल्स होतेच. इतर चालकरीपण शक्यती मदत , ढेपाळल्याना प्रोत्साहन हे आपल्यापरीनी करत होतेच.
तिसरा टप्पा पोशिर ते माथेरान वॅली स्कूल उम्बरवाडी ६.९ के . इथे उसाच गुर्‍हाळ होतं चेकपोस्ट्वर. दोन ग्लास रस पिउन जरा तरतरी आणली !
चौथा टप्पा उम्बरवाडी ते गुडवन वाडी -८.६१ के . इथवर ४० के चालून झाले होते. उन्हाची तलखी कमी झाल्यानी जरा जीवीत जीव आला होता. वाटेत ल्या लोकाना राम राम म्हणत , लहान पोराना लिमलेट च्या गोळ्या वगैरे देत, गप्पा मारत इथवर हाती पायी धड पोचलो होतो.
पाचवा टप्पा म्हणजे निम्म काम फत्ते. ९.४५ चा हा टप्पा होता. गुडवन वाडी ते कशेळी. इथेच ५० के झाल्यावर मुक्काम करणार्‍या काही टिम्स होत्या. एका मोठ्या हॉल मधे जवळपास ५० लोकांसाठी व्यवस्था होती . हाच दुसर्‍या दिवशी चालू होणार्‍या ५० के चा स्टार्ट पॉइंट होता त्यामुळे ती पण लगबग दिसत होती.

सहावा टप्पा कशेळी गाव ते कोथींबे . हा ७ के चा होता. इथे आमच्या सपोर्ट क्रू नी जगात भारी अशी,भरपूर भाज्या घालून केलेली गरम्गरम दालखिचडी आणली होती.जवळच्या धाब्यावरून समोर उभराहून करवून घेतलेली. उकडलेले बटाटे रताळी पण . खायचे प्यायचे खरच लाड केले आमचे . आधी च्या टप्यातही कलिंगड कापून फोडी करून , संत्री सोलून , सुकामेवा मुठभर हातात देउन जय्यत तयारीत असायचा क्रु. पाण्याच्या पिशव्या भरणे , स्ट्रेचेस देउन दुखरे मसल्स मोकळे करणे हे होतच . आम्हाला फक्त चालायच काम शिल्लक ठेवल होतं . काही टिम्स बरोबर सपोर्ट क्रु नवखे होते , त्यांची चाललेली पळापळ अन स्व्तःच सगळ करण पाहिल्यावर तर हे जास्तच जाणवल.

एव्हाना अंधार सुरू झाला होता. हेड टॉर्च विराजमान झाले होते. गावा गावा मधले रस्ते रानावनातून होते . खुणेचे दगड ( दगडावर पांढरे पेंट मार्क्स /अ‍ॅरो) , अन झाडावर बांधलेल्या फिती शोधत जाणं कठिण होतं. रिफ्लेक्टीम्ग स्टिकर्स टोकाला लावलेल्या ह्या फुटभर रिबीनी आजूबाजूच्या झाडावर बांधलेल्या होत्या. दोनशे मिटर चालून दिसल्या नाहीत तर परत फिरून रस्ता शोधायचा अश्या सुचना होत्या. मिट्ट काळोखात झाडावर रिबिनी शोधायच्या तर पाय खाली पाय ठेचकाळात होते . शेवटी टिम मधल्या नी एका मागोमाग चालायच, एकावर खुणा पहाय्च काम अन एकाला खालचे दगड्गोटे . 'जागते रहो म्हणत हाळ्या देत जाणारे रखवालदार असतात तसे आम्ही पत्थर है, ढलान है, गड्ढा है असा मेसेज मागे रिले करत होतो. ह्यानी मागच माणून किती टप्प्यात आहे , फार मागे नाही ना हे देखिल कळत होत. एव्हाना प्रत्येक टिम एकटी चालत होती. ह्याच दर्म्यान कुठेतरी वाटेतल्या मार्शल नी तुमच्या आधी दहा टिम गेल्यात . मिक्स्ड टिम मधे तुम्ही तिसरे वगैरे माहिती पुरवली. हैला नंबरात येउ शकतो . जोर मारुया जरासा अस आलच. पण परत आमचे सदैव तत्पर सल्लागार , सपोर्ट क्रु नी , गुमान चालायच , नंबराचा विचर करायचा नाही. स्टेडी पेस अस सांगून वाटेला लावल.

सातवा टप्पा कोथिम्बे गाब ते गुळवाडी १३ के चा. कडक कॉफीची डीकॉक्शन्स बरोबर होती. जाग रहायला गप्पा मारू अस ठरवल होतं पण एव्हाना चालण्याखेरीज काहीच करायच्या पलिकडे होते सगळे . एका टप्प्याला हा निव्वळ मनाचा खेळ असतो. ७० के चालून झालय अन थोडच बाकी आहे हे मनाला बजावत अधून मधून दिसणारा चंद्र , रातकिड्याचा आवाज , वाटेत तंबू ठोकून मदतीला तयार अन जागे असे मदतनीस ,पावलागणीक दुखणारा ग्लुट मसल अन मनातही शांतता अस चालायला फार चान वाटल. दुखरे पणा पण सवयीचा होतो एका टप्प्यानंतर .
ह्याच दर्म्यान एका ठिकाणी अंधारात १५-२० डोळे चमकले . पोटात गोळा आला . या जंगलात वाघ बिघ आहे अस वाचल्याच आठवेना . तेवढ्यात आमच्यातल्या अनुभवी माणसानी हेड टॉर्च झाकायला सांगितला. त्या एल ई डी चा प्रखर प्रकाश जनावराना बिथरवतो. गायी गुरांचा कळप होता हे त्याना ओलांडून पूढे गेलो तेव्हा कळल. परत एकदा हाळ्या देत आम्ही मार्गाला लागलो. झोप उडायला उपयोग झाला ह्याचा हे वेगळ सांगालया नकोच. biggrin

आठवा टप्पा गुळवाडी ते पोटल. ११.९ के . ८० के चा पल्ला पार पडला होता. आता एक हाफ मॅरॅथॉन बाकी फक्त. हा बराचसा कॅनॉल च्या कडे कडेनी जाणारा मार्ग होता . त्यामुळे चुकायची शक्यता जरा कमी.

नववा टप्पा पोटल ते विवेकानंद शाळा गौरकमथ. हा १०.६ के चा . चेक्पोस्ट टू चेक्पोस्ट चालायच ठरवल होतं अन आता या पुढचा टप्पा फिनिश लाइन!

शेवटचा टप्पा उगवतीच्या वेळेला सुरू झाला होता . ७.९ के चा . गावात जागमाग सुरू झाली होती. एक तळं लागल वाटेत . सगळ्यात निसर्ग रम्य अन सगळ्यात कस पहाणारा असा टप्पा . शेताच्या बांधावरून खाली उतर, वर चढ करत , अन चढता उतरताना काय काय दुखतय याची मोजदाद करत , जरासा तरी सरळ रस्ता असूदे अशी प्रार्थना करत, पण शेवटचे फक्त १०० मिटर सरळ रस्ता , असा टप्पा. ढोल ताशे प्रत्येकच टिम च स्वागत करायला उभेच होते. आदल्या दिवशी सकाळी सहा ला केलेली सुरवात दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजून १ मिनीटानी स्माप्त झाली! ओव्हर ऑल सातवे अन मिक्स्ड टिम मधे स्ट्रेन्जर्स चक्क पहिले आलो . आमच्या अन आम्च्या क्रु च्या अपेक्षेपेक्षा उत्तम वेळेत सांगता झाली . ( चालण्याचा वेळ २२ तास ३३ मिनिट , उर्वरीर चेकपोस्टवरचा रेस्ट टाइव ). पोडियम फिनीशर म्हणून आम्च्याबरोबर सेल्फ्या काढल्या , फोटो झाले , स्टेज वर जाउन मेडलं मिळाली ,सर्टिफिकीट मिळाली. पण त्या मेडल पेक्षा मनातला केल्याचा कॄतार्थ भाव जास्त मोलाचा होता. आता मात्र फिजिओ अन नर्सिंग बूथ वर जाउन पाठ टेकली. शूज जे सुरवातीला चढवले होते काढलेच नव्हते. ते काढल्यावर ठेचकाळून काळ निळ झालेल , उचकटलेले अंगठ्याच नख , ब्लिस्टर्स सगळ दिसल. नर्सिंग वाल्या स्टाफ नी व्यवस्थितच काम्गिरी केली , ब्लिस्टर्स फोडून दिले , फिजिओ वाल्यांनी स्ट्रेचिंग करून दिल. अन ही शतपावली परत करायची पुढल्या वर्षी अस ठरवूनच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

अशी आमच्या शतपावलीची कथा सफळ संपूर्ण!!

tree.jpg

असे काही मार्कर्स होते. हा शाळेच्या वाटेवरचा झाडावरचा

photo.jpg
सरळ उभं रहाता येत नाही पण हौस भारी फोटो ची!

marker.jpg
ऑक्स्फाम च्या पेज वर आमची बातमी . लै भारी वाटल ही कॅप्शन वाचून! Happy

IMG_6412.jpg

हे फक्कीनी रंगवलेले मार्कर्स.

marker 2.jpg

हा धूळीनी झाकला गेला तर कस कलणार अशी मला सतत धास्ती होती. Wink

79009089_2829745663742134_7248295406977679360_o.jpg
वाटेत उन्हात , अंधारात जंगलात भेटलेले जलदूत

marker .jpgteam.jpg २६ तास १ मिनीट ४३ सेकंद Happy

78907894_2829562647093769_5103733075473334272_o.jpg

चालकरी अन सपोर्ट क्रु!! ऑल बिकॉज ऑफ देम!!

86066583-440f-4911-a5eb-f982ac849ae2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है! वाचूनसुद्धा मस्त वाटलं! तुमचं आणि तुमच्या टीममेट्सचं हार्दिक अभिनंदन! सपोर्ट क्रूलाही बक्षीस दिलं पाहिजे खरं म्हणजे. देतात का? सिम्बांचा आयर्नman चा अनुभव वाचतानाही सपोर्ट/ मदत करणाऱ्यांचं महत्त्व खूप जाणवलं होतं.

वेगळीच शर्यत आहे. नवीनच माहित झालं हे. त्यामुळे काहीही करतात लोक असंही मनात आलंच वाचताना.

अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी.

खरच कौतुक आहे तुमच्या सर्वांचं! रात्र भर न झोपता चाललात असं दिसतय! आणी सपोर्ट क्रूच सुद्धा कौतुक. अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या शतपावलीसाठी.

सपोर्ट क्रूलाही बक्षीस दिलं पाहिजे खरं म्हणजे. देतात का? सिम्बांचा आयर्नman चा अनुभव वाचतानाही सपोर्ट/ मदत करणाऱ्यांचं महत्त्व खूप जाणवलं होतं.>> सपोर्ट क्रु ला ही पोडियम वर सर्टिफिकिट्स देतात . त्यांच काम निश्चितच फार महत्वाच असत.
धन्यवाद ,हर्पेन साधना वावे सस्मित अन्जुटी Happy

१०० किमी एका दमात. एकदम अबब झाले वाचुनच. दंडवत स्वीकारा. पण किती इन्स्पायरीन्ग लिहीलय. लगेच आपणही चालाव असे वाटले. सगळे टीम मेंबर्स सगळं अंतर एकत्र चालतात का, की बटान पास करतात एकाचे झाले की दुसऱयाला?
फ़ोटो मात्र दिसले नाहीत.

वा !! फारच भारी कामगिरी !! एकदम १०० के म्हणजे खुपच भन्नाट काम केले. अभिनंदन

फोटो दिसत नाहीत ?