लसणीच्या पातीची हिरवी चटणी

Submitted by मनिम्याऊ on 5 January, 2020 - 03:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लसणीची पात - 1 जुडी
टोमॅटो -३
हिरव्या मिरच्या 3-4
बचकभर कोथिम्बीर
चमचाभर जीरे, मोहरी
चवीपुरते मीठ
फोडणीसाठी तेल
हिंग
IMG_20200105_134843.JPG

क्रमवार पाककृती: 

आज सकाळी जरा घरच्या किचन गार्डनमधे पाहणी केली.
लसणाची पात छान फोफावली होती. 2-4 टोमॅटो लाल रंगावर आले होते. काही मिरच्या डोकावत होत्या.
लगेच ठरलं की ही चटणी करायची

कृति एकदम सोप्पी आणि झटपट होणारी.
लसणाची पात धुवून चिरून घ्या.
चिरलेली पात, टोमॅटो, कोथिम्बीर, मिरच्या, जीरे आणि मीठ मिक्सरला बारीक वाटून घ्या.
तेल कडकडीत तापवून हिंग मोहोरीचा तडका करा.
त्यात वाटलेली पेस्ट घाला. पाणी आटेपर्यन्त परता.

हिरवी चटणी तयार आहे

IMG_20200105_133229.JPG

पात काढून उरलेल्या लसणाचं सार करणार आहे Happy
https://www.maayboli.com/node/72712

वाढणी/प्रमाण: 
एक मोठ्या बाऊलभर झाली
अधिक टिपा: 

पराठ्या बरोबर उत्तम लागतं.
तसेच सँडविच स्पेड, पास्ता सॉस, फ्रँकी साठी पण वापरता येतं

माहितीचा स्रोत: 
प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

झकास.
उंधियोसाठी आणलेली पात आहे,कदाचित वाळली असेल.पण उद्या करेनच.

रेसिपी आवडली, फक्त एक जुडीला टोमॅटो एकच घेईन आणि कच्ची ठेवणार. शेवटची शिजवणे स्टेप स्कीप करणार. वाटलंच तर हिंगाची कमी तेलातली फोडणी वरून घालेन.

माबोवर काही लिहिणार नाही असं ठरवलं होतं पण असं काही छान दिसलं की राहवत नाही. भारी लागेल असं वाटतय. घरी नेहमी लसून असतो पण असं काही ट्राय नाही केलं. करून पाहीन.

राजसी,लसणाची एकेक पाकळी ,साल ना काढता वेगळी करायची.अर्धा दिवस पाण्यात ठेऊन नंतर जमिनीत जरा श्या अंतरावर पेरावी.मी कुंडीत लावली असून 2 इंच पात आली आहे

धन्यवाद देवकी.
पाकळीच्या शेपटीची बाजू वर का खाली पेरताना?
कधीही पेरलं तरी उगवेल का?

आभार सर्वान्चे.
<<फक्त एक जुडीला टोमॅटो एकच घेईन आणि कच्ची ठेवणार. शेवटची शिजवणे स्टेप स्कीप करणार. वाटलंच तर हिंगाची कमी तेलातली फोडणी वरून घालेन.
Submitted by मीरा.. on 5 January>>

मीराताई, कच्ची ठेवली तर चटणीला सतत पाणी सुटत राहील.
>>लसणाची एकेक पाकळी ,साल ना काढता वेगळी करायची.अर्धा दिवस पाण्यात ठेऊन नंतर जमिनीत जरा श्या अंतरावर पेरावी.
Submitted by देवकी on 5 January, 2020>>
मी ताकात घालून ठेवते रात्रभर. बाकी पद्धत तीच.
किंवा सोललेल्या पाकळ्या घट्ट झाकणाच्या डबीत दोन दिवस बंद करून ठेवायच्या. लगेच अंकुर फुटतात

पाकळीच्या शेपटीची बाजू वर का खाली पेरताना?>>>>

शेपटी वर. नवा कोंब तिथून येणार ना

अख्ख्या लसणीच्या गड्ड्याला पाहिलेत तर खाली सुकलेली मुळे दिसतात . लसूण उलगडून ती बाजू खाली करून पेरायचा.

मीराताई, कच्ची ठेवली तर चटणीला सतत पाणी सुटत राहील. >>> कुंडीत ट्रायल बेसीसवर लावलेला लसूण, त्याची पात निघून किती निघणार. एक छोटी जुडी, तेवढ्यात एका वाढणीची चटणी होईल. वेगळी चव आणि किचन गार्डन मध्ये उगवलेली म्हणून कौतुक. पाणी सुटायला शिल्लकच रहाणार नाही. Happy

मला हे लसणाची पाकळी पाणी / ताकात भिजवायचे माहीत नव्हतं. मी पाकळ्या सुट्या करून ओल्या मातीत खोचून टाकल्या होत्या. मस्त हिरवीगार पाती उगवली आहेत. पुढच्या वेळेस भिजवुन मगच पेरेन.

वेगळी चव आणि किचन गार्डन मध्ये उगवलेली म्हणून कौतुक. पाणी सुटायला शिल्लकच रहाणार नाही>>
Happy

मी पाकळ्या सुट्या करून ओल्या मातीत खोचून टाकल्या होत्या. >>>>>>मीही असंच करायची. पण भिजवून पेरले की पाने फुटायची प्रोसेस जरा लवकर होते असं वाटते.

मस्त! मी खोबरं, हि.मि.कोथिंबीर घालून करते ... मी पण आता ताकात भिजवून लावून पहाते

मी खोबरं, हि.मि.कोथिंबीर घालून करते.
Submitted by मंजूताई on 6 January, 2020 - >>

अरे वा! मी पण पुढल्या वेळी खोबरं घालून करेन.

>>
ताकात का पण?
Submitted by आंबट गोड >>

माहित नाही. Sad बाबांना विचारून सांगते.

thanks अन्जू Happy

अख्ख्या लसणीच्या गड्ड्याला पाहिलेत तर खाली सुकलेली मुळे दिसतात . लसूण उलगडून ती बाजू खाली करून पेरायचा. >>> हे भारी आहे, अशीच ती बाजू पेरायची की तीही पाण्यात भिजवायची. एकदा मी आपोआप लसणीला आलेला मोड बघून ती पेरली होती, छोटी पात आली पण खाली लसूण फार आली नाही.

मी ती लसूण म्हणते, पात असो किंवा पाकळी.

कांद्यासारखीच लसणाची पात आणली

दही घालून कच्ची पात वापरून कोशिंबीर केली , खाताना भयानक उग्र लागली , तरी खाल्ली

दुसरा दिवस पोट भयानक बिघडले , लसणाच्या वासाच्या ढेकरा आणि अगदी पातळ संडास झाली

हा प्रकार इतका उग्र आहे , तर ह्याचे करतात तरी काय ?

चटणी करणार्यानीही शिजवून केले तर बरे होईल

कच्ची नसते खायची अजिबात. शिजवणे मस्ट आहे........पा कृ मध्ये लिहिले आहे.पण माझ्याही नजरेआड झाले. मलाही वाटले कच्ची खायची म्हणून.

छान आहे ही कृती, पण आम्ही वर्षानुवर्षे लसणीच्या पातीची कच्चीच चटणी करतो, लसूण पात, मिरच्या, कोथिंबीर आणि थोडं दाण्याचं कुट. चवीपुरते मिठ. माझ्या सासरच्या गावी हुरड्या बरोबर खायची अशी ही चटणी आहे. मोडनिंबलाच प्रथम खाल्ली. दगडी खलात कुटलेली. असली अफाट लागली, कारण सगळंच परसात उगवलेलं घेउन आणि दगडीत कुटलेली. तर सांगायची गोष्ट अशी कि लसणाची पात कच्ची खाल्ली तर काही होत नाही.

आम्ही ही बार्शी ला हुरडा खायला जायचो दर वर्षी,तिथे कच्ची लसूण पात चटणीच खायची पद्धत आहे,आणि आताही मंडईत कधी मिळाली तरी कच्च्या पातीचीच चटणी खाल्ली जाते, कधी त्रास वगैरे झाला नाही

आमच्याकडे पण कच्चीच करतात चटणी. कधी असा त्रास नाही झाला. उग्र लागते थोडी चवीला पण त्यात दाण्याचा कूट दही लिंबू वगैरे मंडळी उग्रपणा कमी करायचं काम करतात.