जर्मन शिकण्याची आवड मला कधीपासून वाटू लागली, तेच मला आठवत नाही. अगदी आठवी किंवा नववीत असताना कुठूनतरी “जर्मन शिका मराठीतून” टाईपची पुस्तके मिळवून “आईन्स, त्स्वाय “ शिकलेले आठवते. पण इचलकरंजीसारख्या ठिकाणी शिकण्याची साधने (त्या काळात तरी) बरीच मर्यादीत असल्याने ते राहूनच गेले. त्यानंतर नोकरीमध्ये थोडा स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न केला खरा, पण २००८ सालची आर्थिक मंदी आली, अन् नोकरी वाचवण्यासाठी बेंगलोरला पळावे लागले. पण मे २०१५ मध्ये मात्र योग जुळून आला आणि मला ‘गोएथे इन्स्टीट्यूट’, मॅक्स मुलर भवन, कोरेगाव पार्क इथे सकाळी सात ते साडेआठ या वेळेतील बॅचला प्रवेश मिळाला.
ते दिवस इतके धावपळीचे अन कठीण होते, की आज मी विचार करतो, जर एवढी आतून उर्मी नसती तर आपण हे करू शकलो असतो का ? रोज सकाळी साडेपाचला उठून, आवरून, साडेसहाला पिंपळे सौदागरहून निघायचे, सात ते साडेआठ या वेळेत क्लास, मग तेथून खराडीला ऑफिस करून संध्याकाळी घरी परतायचे. अभ्यास शनिवारी आणि रविवारी होईल तितकाच. तशातही ए-वन (पहिली लेव्हल) यामध्ये ९६% मिळाले अन् पहिला आलो. मग मात्र उत्साह वाढला आणि पुढच्या दोन वर्षांत ए-टू, बी-वन, बी-टू असे टप्पे पार पाडत, सी-वन सर्टीफिकेशनही पूर्ण झाले.
त्याच वेळी पुण्यात जर्मन शिकणाऱ्यांची संख्यादेखील एक्स्पोनेन्शिअली वाढू लागली. २०१५ साली ज्या ‘गोएथे ए-वन’मध्ये ताबडतोब प्रवेश मिळायचा, तिथेच २०१७ साली सहा-सहा महिने वेटिंग करणे भाग पडू लागले. अर्थात रोज सकाळी उठून, क्लाससाठी कोरेगाव पार्क गाठून, परत हिंजवडीला जाणेही बऱ्याच जणांना शक्य नव्हते. जर्मन शिकण्यासाठी एखाद्या सोयीस्कर पर्यायाची गरज निर्माण झाली, आणि यातूनच जन्म झाला “केदार्स जर्मन क्लासेस” चा.
सुरूवातीला अगदी जवळच्या दहा मित्र-मैत्रिणींना ‘विद्यार्थी’ म्हणून प्रवेश देऊन हे क्लासेस सुरू झाले. माझे स्वतःचे बी-टू सुरू असल्याने दिवस आणखीनच धावपळीचा अन अवघड झाला. पण ‘जर्मन’ आणि ‘शिकवणे’ या दोन्हीही गोष्टींबद्दल मुळातच आवड असल्याने, जर्मन शिकवण्याचा वेळ हा दिवसातील माझा सर्वात आवडता वेळ झाला ! सुदैवाने मला पहिली बॅचही चांगली मिळाली, अन् सगळे ए-वन चांगल्या गुणांनी पासही झाले. यामुळं माझा आत्मविश्वास दुणावला.
पहिली बॅच सुरू करतानाच ठरवले होते की, या ‘कामा’साठी एक रूपयाही घ्यायचा नाही. मी क्लासेस घेतो कारण जर्मन भाषा ही माझी पॅशन आहे, आणि ती मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. जर्मन शिकण्यासाठी पैसे भरावे लागतात म्हणून एखाद्याने जरी हे क्लास नाही केले, तर तो माझ्या विचारांचा पराभव वाटत होता. त्यामुळे यातील कितीतरी जवळच्या मित्रांनी कितीही आग्रहाने पैसे देऊ केले, तरी मी ते घेतले नाहीत. मग जवळच्याच मित्र-मैत्रिणींची दुसरी एक बॅच झाली अन् मग तिसरी… मग कुणी आपल्या मित्राचे/मैत्रिणीचे नाव सुचवले अन् अशा प्रकारे बॅचेस वाढत गेल्या.
माझे बी-टू सुरू असताना, मला गोएथेमधे जर्मनी ‘जॉब सीकर व्हिजा’बद्दल कळले. जर्मन जर पक्के करायचे असेल, तर जर्मनीमधे जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही. हा विचार करून मी ती प्रोसेस सुरू केली आणि साधारण एका वर्षभरात मी जर्मनीमध्ये म्युनिक येथे ‘सिनॉप्सिस’ला रूजू झालो.
त्यावेळी मी ए-टू चेही क्लासेस घ्यायला सुरूवात केली होती, अन् त्या बॅचला अर्धवट सोडणे शक्यही नव्हते. मग त्यावर पर्याय निघाला, तो म्हणजे - ‘स्काईप’वर ऑनलाईन क्लासेस घेणे. आधी हे जमेल का याबद्दल धाकधूक वाटत होती, कारण मला स्वतःला प्रचंड इंटरऐक्टीव्ह रहायला, प्रत्यक्ष संवाद साधायला आवडते. पण प्रयत्न केल्यावर समजले की, ऑनलाईन स्वरुपातही आपण वेगवेगळ्या प्रकारे इंटरऐक्टीव्ह राहू शकतो. आणि या पहिल्याच प्रयत्नात चांगले यशही मिळाले.
मग मात्र मला या ‘ऑनलाईन क्लासेस’चे फायदे लक्षात यायला लागले. एक म्हणजे, आता जगाच्या कानाकोपऱ्यातून कुणीही क्लास जॉईन करू शकत होते. माझ्या पहिल्याच क्लासमधे जगातील पाच देशांमधील नऊ शहरांमध्ये राहणारे विद्यार्थी होते. दुसरे म्हणजे, या ‘ऑनलाईन क्लासेस’साठी कुणालाही कुठेही जाण्याची गरजच नव्हती, त्यामुळे जागेचा आणि प्रवासाचा प्रश्नही सुटत होता. पूर्वी क्लास न करू शकणारे काहीजण - उदाहरणार्थ, अगदी लहान बाळ असलेल्या मैत्रिणीही या सोयीमुळे आता क्लास करू लागल्या. आणि मग एका मागोमाग एक बॅचेस सुरू झाल्या. आजवर माझ्या तेवीस बॅचेसमधून मी तीनशेहून अधिक लोकांना जर्मन शिकवले आहे. गेल्या काही बॅचेससाठी तर जागा भरल्यामुळे पुढील बॅचेससाठी वेटींगही करावे लागले. या गोष्टीचे मला वाईट वाटले, पण नाईलाज होता. कारण एकदा एखाद्या व्यक्तीला शिकविण्यासाठी होकार दिला, तर मग ते नीट शिकतात की नाही याची जबाबदारी माझी आहे, असे मला वाटत राहते. म्हणून एका मर्यादेबाहेर विद्यार्थी संख्या वाढली, तर प्रत्येकाकडे असे लक्ष देणे शक्य होत नाही.
अर्थात, वाढत्या बॅचेसबरोबर काही अडचणीही वाढल्या. मला या कामातून पैशांची अपेक्षा नव्हती, पण त्यामुळे फक्त ‘फुकट आहे’ म्हणून शिकायला येणाऱ्यांची संख्याही वाढू लागली. आणि जे फुकट मिळते त्याची किंमत नसते ही दुर्दैवाने अनेकांची मानसिकता असल्याने, विद्यार्थ्यांची गुणवत्ताही घसरू लागली. त्यातून आता हे ‘विद्यार्थी’ माझे अगदी जवळचे मित्र नसल्याने, त्यांना काही बोलणेही अवघड झाले होते. उदाहरणच द्यायचे तर, याच पुरुषांच्या बॅचमधील तीसपैकी चौदा जणांनी पहिल्या पंधराच दिवसांत क्लास सोडला. त्यांनी एका शब्दानेही “मला आता जमत नाही, म्हणून मी क्लास सोडत आहे” असे सांगितले नाही. अर्थात, त्यांनी मला न सांगता क्लास सोडल्याबद्दल मला फारसे वाईट वाटले नाही, पण त्या चौदा जागांवर ‘वेटींग लिस्ट’मधल्या ज्या इतर सिन्सिअर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला असता त्यांचे नुकसान झाल्याबद्दल मात्र नक्कीच वाईट वाटले.
आता हे जर्मन क्लासेस ही माझी पॅशन झाले आहेत. कितीही मोठे कारण असले तरी मी कधी क्लास चुकवले नाहीत. कारण आपल्यामुळे इतक्या लोकांचा वेळ वाया जाऊ नये, हीच भावना मनात होती. माझी आजी वारल्याचे जेव्हा मला जर्मनीमध्ये समजले, त्याही दिवशी मी क्लास घेतला. अगदी माझे सासरे वारले, त्याच्या चौथ्या दिवशीही मी त्यांच्या घरून क्लास घेतला. तिथे बरेच नातेवाईक आले होते, त्यांच्यातील काहीजणांना माझे असे वागणे चुकीचेही वाटले असेल. पण माझ्यासाठी हे खूपच महत्वाचे होते.
या क्लासेसचे काही वेगळेपण असेल, तर ते म्हणजे - जर्मन भाषा रोजच्या व्यवहारात वापरता येण्यावरचा भर. तुम्ही चांगले जर्मन वाचू, लिहू, बोलू शकलात, तर तुम्ही आपोआपच कुठलीही परीक्षा पास व्हाल. फक्त परीक्षेसाठी अभ्यास करण्यात अर्थ नाही, हे माझे कायमचे सूत्र राहिले आहे. साधारण तीन महिन्यांच्या क्लासमध्ये मी फक्त शेवटचे पंधरा दिवस परीक्षेची तयारी करून घेतो. आणि तरीही माझ्या विद्यार्थ्यांच उत्तीर्ण होण्याच प्रमाण ९४% आहे , माझ्या कितीतरी विद्यार्थ्याना ९०% च्यावर (एकीला तर १००%) गुण मिळाले आहेत !
दुसरे म्हणजे, मी मुख्यतः मराठीतून, आणि अगदीच गरज असेल तर हिंदीतून शिकवतो. मराठी आणि जर्मन या भाषांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. उदाहरणार्थ, तो, ती, ते / der die das तसेच आदरार्थी बहुवचन, वगैरे. यामुळे बऱ्याच संकल्पना लवकर समजायला मदत होते. मी फक्त जर्मन भाषाच नाही, तर जर्मन संस्कृती, जर्मनीमधील लोक यांच्याबद्दलही माहिती देतो. मी दिवसभर ऑफिसमध्ये जर्मन भाषेत बोलत असल्याने, मला काही पुस्तकी संकल्पनांच्या ऐवजी रोजच्या व्यवहारात वापरले जाणारे शब्दही माहिती झाले आहेत. तेदेखील मी माझ्या क्लासमध्ये शिकवतो.
मला बरेच जण विचारतात की, मला यातून काय मिळते ? मला सगळयात महत्त्वाचे काही मिळत असेल, तर ते म्हणजे - ‘आपण कुणाला तरी उपयोगी पडू शकतो याचे समाधान’ ! देण्यातला आनंद एकदा कळला की मग त्यासारखे सुख नाही, कारण घेणारे तर अनेक आहेतच. माझी मुलगी ओवी हीदेखील हे सर्व प्रत्यक्ष पाहून शिकत आहे, याचेही समाधान आहेच. संस्कार-संस्कार म्हणजे आणखी काय असते ?
अर्थात् मी अजून ‘संत’ बनू शकलो नाही, हेदेखील खरे आहे. ‘कर्म करो, फल की इच्छा मत करो’ हे आचरणात आणणे प्रचंड अवघड आहे. जेव्हा तुम्ही कामावरुन धावत-पळत येऊन क्लास सुरू करता, आणि तीस विद्यार्थ्यांपैकी फक्त आठजण हजर असतात… आणि मग नंतर, मी एका पार्टीला गेलो होतो, आज कंटाळाच आला होता, अशी कारणे देतात. (हो, लोक खरोखर अशी कारणे देतात, अशा मेसेजचे स्क्रीनशॉट मी जपून ठेवले आहेत.) अशा वेळी मात्र राग, उद्वेग, खेद या सगळ्या भावना उफाळून येतात.
पण यातूनच मी प्रगल्भ - मॅच्युअर होत गेलो, असेही मला वाटते. मी या विषयात जेवढा पॅशनेट आहे, तेवढेच इतरांनीही असावे, ही माझी अपेक्षाच चुकीची आहे, हे मला हळू-हळू समजत गेले. खरे सांगायचे तर, आजवर माझ्याकडून जर्मन शिकलेल्या ३०० "विद्यार्थ्यां’पैकी अगदी दहाजणांनीही नंतर कधी स्वत:हून संपर्क करायचा प्रयत्नही केला नाही (यापैकी काहीजण माझे पूर्वीचे मित्रही आहेत). आधी या गोष्टीचे फार वाईट वाटायचे, पण या अनुभवातूनच माणसांचा स्वभाव समजत गेला.
पण सगळेच असे वागतात असेही नाही. जेव्हा कधी राग-राग होतो अन् क्लास बंद करायचा विचार मनात येतो, तेव्हा आजारी लहान बाळाला मांडीवर घेऊन क्लास करणारी सुश्मिता डोळ्यांसमोर येते. प्रत्येक तीस विद्यार्थ्यांमागे असे फक्त चारजण जरी मिळाले, तरी या सर्व प्रयत्नांचे सार्थक झाले, असे मला वाटते. यंदाच्या वर्षी, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी, मी माझ्या सध्याच्या बॅचला ‘ऐच्छिक गुरूदक्षिणा’ मागितली अन् बघता-बघता ४८ जणांनी मिळून एक लाख वीस हजार रुपये एवढी रक्कम गोळा केली, तेव्हाची भावना शब्दात व्यक्त करणे खरेच कठीण आहे. तुम्ही इतरांसाठी चांगले काम केले, तर ते चांगले काम पुढे चालत राहते, यावरील माझा विश्वास आणखी दृढ झाला.
सध्या आणखी एक प्रयोगही सुरू आहे, तो म्हणजे - रोज फक्त पाच मिनिटांचे वैयक्तिक क्लासेस. मला आणि शिकणाऱ्या व्यक्तीला, दोघांनाही जेव्हा कधी वेळ असेल त्या वेळेत. माझ्या मते, अशा प्रकारे बराच फावला वेळ सत्कारणी लागू शकेल. सध्या फक्त दोघा जणांवर हा प्रयोग सुरू आहे. जर तो यशस्वी झाला, तर संख्या वाढवताही येऊ शकेल.
कधी कधी वाटते की, रोज संध्याकाळच्या वेळेत आपण स्वतःला बांधून घेतो आहोत. हाच वेळ मी माझ्या मुलीसाठी - ओवीसाठी - देऊ शकलो असतो, संध्याकाळी फिरायला जाऊ शकलो असतो…पण मग मनात विचार येतो की, मला माझ्या लहानपणी जी संधी मिळाली नाही, ती इतरांना उपलब्ध करून देण्याचे भाग्य मला लाभले आहे. नव्हे, हे तर माझे कर्तव्यच आहे.
त्यामुळे हे क्लासेस तर नक्कीच सुरू राहतील. तुम्हालाही जर्मन शिकायची मनापासून इच्छा असेल, तर तुमचेही स्वागतच आहे - मग ते क्लाससाठी असो, की फक्त जर्मन भाषेबद्दल दिलखुलास गप्पा मारण्यासाठी असो. अट फक्त एकच, जर्मन भाषेवर तुमचे प्रेम असायला हवे !!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पालवी, महाराष्ट्र मंडळ म्युनिक दिवाळी ई अंकात पूर्व प्रकाशित
संपर्कासाठी व्हॉट्सअॅप : +४९ १७६७३९१५१९५
वाह छान वाटल वाचून.. तुमची
वाह छान वाटल वाचून.. तुमची passion अशीच टिकून राहो .. शुभेच्छा..
वाह मस्त असे पॅशनेट टीचर
वाह मस्त असे पॅशनेट टीचर मिळणं म्हणजे भाग्यच.
अभिनंदन केदार खूप छान उपक्रम
अभिनंदन केदार खूप छान उपक्रम चालवताय तुम्ही. एक छोटासा प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही शिकण्यासाठी जर्मन भाषा निवडली या मागे काही खास कारण अभ्यास आहे का ते मला जाणून घ्यायला आवडेल. आपण भारतीय म्हणून आपल्याला सगळ्यांना साधारण ३ भाषा तर येतातच एखाद दुसऱ्या व्यक्तीला चौथी भाषा हि अवगत असते. पण जेव्हा आपण भारताबाहेरच्या भाषांचा विचार करतो तेव्हा आपल्याला संपूर्ण जग मोकळ असतं.
मी अमेरिकेत ज्याठिकाणी काम करतो तेथे एक इंटरप्रिटर विभाग आहे, त्या विभागाचं काम म्हणजे कोर्ट केसेस मध्ये बिगर इंग्रजी लोकांना दुभाषी पुरवणे. त्या विभागात इंग्रजी आणि स्पॅनिश भाषे वितिरिक्त इतर भाषा जाणणाऱ्या लोकांची नेहमीच कमतरता असते. छोटा शहर असल्याने इमिग्रण्टस सुद्धा जास्त नाही त्यामुळे बरेच लोक आपलाही नोकरी सांभाळून हे काम फ्रीलान्सर म्हणून काम करतात.
त्या विभागातल्या लोकांशी मैत्री झाल्यामुळे, मला हि विचारणा करण्यात आली. मला हिंदी आणि मराठी भाषा उत्तम येते पण त्याच बरोबर अजून एखादी भाषा शिकावी असा विचार सुरु आहे. पण आता प्रश्न हा पडल्या कि पूर्ण जग खुल आहे, नक्की कोणती भाषा शिकावी. चांगली डिमांड हा एक मुद्दा असू शकतो, पण इतर कोणत्या गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो.
कृपया इतर माबोकरांनि सुद्धा मार्गदर्शन करावे.
जर्मन भाषा शिकायची असे ठरले तर तुमच्याकडे शिकवणी पक्की समजा
व्वा! फार सुंदर उपक्रम! _/\_
व्वा! फार सुंदर उपक्रम! _/\_
तुमचे हे पवित्र कार्य असेच सुरु राहो!
धन्यवाद आर्या , सायो, वेडोबा
धन्यवाद आर्या , सायो, वेडोबा , वर्षा , बुन्नु, स्वाती२
बुन्नु , मला जेव्हापासून
बुन्नु , मला जेव्हापासून जर्मन आवडते तेव्हा मला यात काही संधी असतात की नाही हे माहितही नव्हते . आवड एवढ एकच कारण होत शिकायच
पण आज मात्र जर्मन शिकायला बरीच डिमांड आहे अस दिसत आहे
वा, !! छान उपक्रम आणि मस्त
वा, !! छान उपक्रम आणि मस्त लिखाण.
1 देशी आणि एक परदेशी भाषा शिकणे हे बकेटलिस्ट मध्ये आहे. बघू कधी अजेंड्यावर येते ते
धन्यवाद सिम्बा . बकेट लिस्ट
धन्यवाद सिम्बा . बकेट लिस्ट मधे जर्मन आणायची ठरली तर नक्की कळवा
वा! खूपच छान! शुभेच्छा!
वा! खूपच छान! शुभेच्छा!
मी रानडे मधून जर्मन चा
मी रानडे मधून जर्मन चा डिप्लोमा पूर्ण केला आहे . माझी मुलगी आत्ता ११ वी मध्ये शिकत आहे . तिने A२ परीक्षा दिली आहे . ती आता B१ ची तयारी करीत आहे . तिला जर्मन मध्येच पुढे करीअर करायचे आहे . तरी आम्हाला मार्गदर्शन कराल का ? कृपया विपू बघा .
काय भारी! तुमचं खूप कौतुक आणि
काय भारी! तुमचं खूप कौतुक आणि अभिनंदन!
आता कोणाला जर्मन भाषा शिकण्यात रस असेल तर तुमचं नाव नक्की सुचवेन.
धन्यवाद झेलम , जिज्ञासा
धन्यवाद झेलम , जिज्ञासा
अश्विनी , तुम्हाला उत्तर दिल आहे
अरे सहीच!
अरे सहीच!
स्वतः शिकून तू इतकी मेहेनत शिकवायला घेतोयस! रिस्पेक्ट!
जर्मन का शिकायची पॅशन निर्माण झाली त्याबद्दल कुतुहल वाटलं. लिहिलंयस पण छान
मस्त... हा लेख जर्मन मध्ये
मस्त... हा लेख जर्मन मध्ये लिहिला असता तर जास्त आवडला असता ..
वाह, ग्रेट, सलाम तुम्हाला.
वाह, ग्रेट, सलाम तुम्हाला.
वा खूपच छान उपक्रम.
वा खूपच छान उपक्रम.
माझी पहिली ऑनसाईट असाईनमेंट जर्मनीत होती. तेव्हा आकडे, जुजबी शब्द/वाक्य शिकलो होतो. नंतर फ्रान्सच्या फेऱ्या झाल्या तेव्हा हाच प्रकार फ्रेंच बरोबर केला. नेदरलँड मध्ये मात्र व्यवस्थित पैसे देऊन शिकवणी लावून डच शिकायचा प्रयत्न केला. पण मुळात तुमच्यासारखी आंतरिक ओढ नसल्याने टिवल्याबावल्या, दांड्याच फार झाल्या.
पण मी (जर्मन/ फ्रेंच/ डच) भाषा शिकायचा प्रयत्न करतोय याचं माझ्या सगळ्या स्थानिक सहकाऱ्यांना फार कौतुक.
तुमच्या या लेखामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!
जबरीच रे !! भारी लेखन आणि
जबरीच रे !! भारी लेखन आणि उपक्रम.
खूप शुभेच्छा !
मस्तय केदार!!
मस्तय केदार!!
मस्त लेख आणि टायटल.
मस्त लेख आणि टायटल.
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!!
tolle Arbeit! wünsche Ihnen
tolle Arbeit! wünsche Ihnen alles Gute für Ihre zukünftigen Bemühungen!!!
धन्यवाद अमितव , अन्जू
धन्यवाद अमितव , अन्जू ,व्यत्यय , पराग , रॉनी, सई , जरबेरा
केदार सर कृपया विपू बघा.
केदार सर
कृपया विपू बघा.
अश्विनी , मला तुमची पोस्ट
अश्विनी , मला तुमची पोस्ट दिसत नाही आहे
शक्य असल्यास मला दिलेल्या नंबर वर व्हॉट्सअॅप मेसेज कराल का ? मग आपण सविस्तर बोलू शकू
Pl check spam folder.
Pl check spam folder.
Will send whatsapp msg also.
क्या बात है!
क्या बात है!
जर्मनीमध्ये काही काळ काम करण्याच्या निमित्ताने काही पुस्तकं तेव्हा जवळ केली होती. भारतात आल्यावर मात्र हे न ते करत राहूनच गेलं. क्लायंटशी बोलतांना दोन desktop वर bug simulate करावं लागे. इंग्लिश आणि supported language. Client base बहुतेक करून जर्मन असल्यामुळे साहजिकच तिकडे ओढा होता. तुमच्या लेखामुळे ती धावपळ आठवली. Bug solve झाल्यानंतर मिळणारं समाधान मात्र लाखमोलाचं असायचे.
खूप चांगलं काम करत आहात. Keep it up!
ऑसम आहे हे!
ऑसम आहे हे!
कमाल वाटली वाचून... इंटरनेटच्या सकारात्मक बाजूंपैकी ही एक.
यासाठी पॅशनच हवी. __/\__
धन्यवाद ललिता-प्रीति
धन्यवाद ललिता-प्रीति
जर्मन शिकायची खरोखर इच्छा
जर्मन शिकायची खरोखर इच्छा असल्यास , खालील लिंक पहा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157900320068833&id=690628832
कौतुक आणि आदर वाटला.
कौतुक आणि आदर वाटला.
मस्तच !
मस्तच !
Pages