https://www.maayboli.com/node/72101
भाग 1
पहाटे 4 च्या आसपास जाग आली. म्हणजे तशी झोप नव्हतीच रात्रभर आम्हा तिघांपैकी कोणिना कोणी उठत होता, आणि स्वतः सोडून बाकीचे किती स्वस्थ झोपलेत याचे आश्चर्य करत होता सकाळी जेव्हा तिघे उठलो तेव्हा कळले प्रत्येकाची चाहूल सगळ्यांना लागत होती, सगळे जागेच होते.
जी काही थोडीफार झोप येत होती ती पण पूर्णपणे उडाली कारण बाहेर पावसाचा आवाज येत होता. 18 पर्यंत रोज संध्याकाळी पाऊस हजेरी देत होता, 19 ला दिवसभर विश्रांती घेतली होती, झाडून सगळी वेदर aaps 20 ला सकाळपासून पाऊस चे भाकीत सांगत होती.
परत एकदा जोरात पाऊस- लो visibility - स्वीम उशिरा किंवा कॅन्सल - ओल्या रस्त्यावर सायकल चालवायला त्रास वगैरे ची साखळी मनात पिंगा घालू लागली.
सुदैवाने पाऊस 15 20 मिनिटात कमी झाला आणि पूर्ण थांबलाच.
आता लौकर उठलोच आहोत तर WA पाहू म्हणून मोबाईल हातात घेतला, तर कोचिंग ग्रुप वर एकाचा मेसेज,
"सॉरी guys, had an anxiety attack yesterday night, and i am.backing off, i wont be participating in the race today. I know apna time aayega, but that time is not today"
हे वाचून चरकायला झाले, जानेवारी फेब्रुवारी पासून चे परिश्रम केवळ एका रात्रीच्या ताणाने मातीमोल होत होते
तो मुलगा इतकाही क्लोज नव्हता की त्याच्याशी बोलून काही फरक पडला असता.तसेही युद्धाचे आधी 2 तास शस्त्र त्यागून बसलेल्या अर्जुनाला कर्तव्याभिमुख करायचे काम केवळ भगवंत करू जाणोत. त्यामुळे तो विषय तिकडेच सोडून स्वतःच्या कामाकडे लक्ष देऊ लागलो.
पुण्यात असताना अश्या मोठ्या वर्क आउट आधी ओट किंवा रवा वगैरेंची खीर खाऊन जायचो. इकडे हॉटेल मध्ये तसे काही मिळणार नाही म्हणून pre वर्क आउट स्नॅक्स म्हणून थेट पुण्यातून पुरणपोळी घेऊन गेलो होतो त्यात अमूल टेट्रापॅक चे दूध घालून छान ताव मारला. After all what can you expect a guy from kothrud , pune 52 त्या बद्दल किरण आणि आदित्य ने यथेच्छ थट्टा केली. त्याने त्याच्या सवयीचे सीरिअल्स खाल्ले.
सकाळी सगळेच जण कार ने मिरामार सर्कल कडे येतील आणि ट्राफिक जॅम होईल म्हणून आदल्या रात्रीच एक ऍक्टिवा भाड्याने घेऊन ठेवली होती किरण एकेकाला त्यावरून ड्रॉप करणार होता.
फायनली 2 शिलेदार मिरामार सर्कलवर पोहोचते झाले.
आता किरण आमच्या पर्सनल फोटोग्राफरच्या भूमिकेत जाणार होता.
आत गेलो, सगळा जामानिमा सायकल वर चढवला, पुढच्या ट्रान्झिशन च्या गोष्टी नीट मांडून ठेवल्या. रिकामी बॅग त्यांच्याकडे डिपॉसित केली. तरीही अजुन रेस सुरू व्हायला अर्धा पाऊण तास होता. पण सरप्रायसिंगली आता खूप कमी टेन्शन वाटत होते.
तितक्यात घोषणा झाली की रेस स्टार्ट टाइम अर्ध्यातासाने पुढे ढकलला गेला आहे.
बावरे मन लगेच असे का बरे झाले असेल? च्या कारणांच्या शोधात निघाले, पाऊस, लो विसीबीलिटी, chopy वॉटर, जेली फिश हे नेहमीचे स्टॉप घेत आता स्वीम कॅन्सल होणार च्या फिनिश लाईन कडे दौडत निघाले असतानाच त्याचा कान धरून परत ट्रॅक वर आणले.
पण आता स्वीम उशिरा, म्हणजे पर्यायाने रन उशिरा चालू होणार, म्हणजे उन्हाचा तडाखा वाढणार... जाऊ दे 80 तिथे 85 एवीतेवी दीड च्या उन्हात धावायचे ते 2 च्या उन्हात धावू...
मग मी आणि आदित्य बीच वरच्या छोट्या टेकाडावर जाऊन बसलो आणि बाकीच्यांची घाई बघत बसलो,
तितक्यात आमच्या ओळखीचा दुसरा एक मुलगा, राम (मुलगा म्हणायचे फक्त हा 50 क्रॉस केलेला माणूस आहे) भिर भिर फिरताना दिसला, त्याला विचारले तर म्हणाला त्यांच्या ग्रुप मधला एक मुलगा काल रात्री कुठेतरी हेल्मेट विसरून आला, आणि आता हेल्मेट नाही तर रेस मधून तात्काळ डिस्क्वालिफाय होईल. मी पुण्याहून येताना एक हेल्मेट एक्सत्रा घेऊन आलो होतो (तेच ते... असू दे!!) लगेच बाहेर किरण ला फोन करून ते आणवून राम ला दिले. बहुतेक हे होण्यासाठीच स्वीम उशिरा सुरू झाले.
शेवटी स्वीम साठी लाईन अप होण्याची घोषणा झाली. 5-5 च्या फाईल मध्ये लोकांना उभे राहायला सांगितले. उभे राहतात सेल्फ सीडिंग करून , म्हणजे आपल्याला 30-40-50 मिनिटे, किती वेळ लागेल याचा अंदाज घेऊन लाईन मध्ये पुढे मागे राहणे अपेक्षित होते,(कमी वेळ वाले पुढे) म्हणजे फास्ट स्वीमर्स अडथळा न होता पोहू शकतील. पण लोकांनी त्यांकडे सपशेल दुर्लक्ष्य करून लाईन लावली.
रांगेत उभ्या राहिलेल्या लोकांतून घोषणाबाजी चालू झाली. नेहमीचे यशस्वी गणपतीबाप्पा, भारतमाता होतेच पण जे मोठे मोठे ग्रुप्स होते त्यांचे त्यांचे स्लोग्नस पण होते. दर वर्षी बाप्पाला बुडावणार्या लोकांनी, स्वतः बुडायची वेळ आल्यावर बाप्पाला हाक मारावी यातल्या विरोधाभासाने मला हसू आले.
शेवटी शिट्टी वाजली, चट्टेरीपट्टेरी झेंडा हलला आणि अथलिट्स ना दर 5 सेकंदात एक 5 लोकांची बॅच अशी आत सोडायला सुरवात झाली.
काय बदललेले माहीत नाही पण आज पाण्यात प्रवाह जाणवत होते. कदाचित मानसिक असेल पण आज लाटा सुद्धा जास्तच मोठ्या वाटत होत्या. (कदाचित हा उशिरा पाण्यात शिरल्याने वाढलेल्या भरतीचा परिणाम असू शकेल) पण ठीक आहे, आलिया भोगासी म्हणत पोहोणे सुरू केले, थोड्या वेळात लय मिळाली, सुरवातीच्या 200 मिटर मध्ये आजूबाजूच्या लोकांचा त्रास झाला, पण हळू हळू लोक स्पेस आउट होत गेले.
नेटाने हात पाय मारत पहिला लूप पूर्ण केला, आता दुसरा लूप सुरू करायला काही अंतर मांड्यां इतक्या पाण्यातून चालत परत स्टार्ट पॉईंट पर्यंत जायचे होते.(50 60 मीटर्स) And that was not easy at all. ज्याने तश्या पाण्यात चालले आहे त्याला माझे म्हणणे पटेल, आणि त्यात इकडे लाटा सुद्धा होत्या. पाण्याचा प्रतिरोध पार करत चालताना लाट अंगावर घेऊन स्थिर राहायचे असेल तर खूप शक्ती कोअर मध्ये घालावी लागते. पहिल्या 3 4 लाटा झेलल्यावर कळले हे काही वर्थ नाहीये. मग पुढची प्रत्येक लाट येई तेव्हा पाण्यावर आडवे पडावे, लाट किनाऱ्याकडे ढकलून देई, अनायचे उथळ पाण्यात फेकला जात होतो पण चालायचे अंतर त्यामुळे वाढत होते.
ही strategy आम्ही आधी वर्क आउट केली नव्हती , त्यामुळे आजुबाजूचे काय करतायत ते पाहून इम्प्रेव्हाईज करणे भाग होते.
दुसरा लूप सुरू केला आणि सम्पला, घड्याळात पाहिले तो 44 मिनिटे झालेली. माझा पूल मधला 2 k साठी चा बेस्ट टाइम 50 52 मिनिटे होता, म्हणजे लाटा, प्रवाह, मधले चालणे सगळे सहन करून मी फास्ट होतो दिल गार्डन गार्डन हो गया,
माझ्या अगदी मागोमाग आदित्य बाहेर आला. स्वीम एन्ड पॉईंट पासून transition एरिया बराच लांब होता (साधारण 400 मीटर्स) तो धावत पार केला,
टोकाशी ओपन शॉवर होते, त्याखाली काळजीपूर्वक शॉवर घेतला, कारण सूट मध्ये अडकलेली वाळू आणि मीठ वाहून जाणे महत्वाचे , नाहीतर पुढचे 6 7 तास ते अंगावर काचून असे हाल करेल की ज्याचे नाव ते. त्या पेक्षा एखादे मिनिटं जास्त गेलेले परवडले.
बीचवर बघे होतेच, ओळखीचा चेहरा दिसला की हात हलवून ओरडून चिअर करत होते. एकीच्या हातात बोर्ड होता " wave if you havent peed in your wet suit" बहुतेक स्वीमर्स पाण्यातून बाहेर पडतानाच वेळ वाचवण्यासाठी कार्यभाग आटपून घेतात, त्यावरून ते meme होते. तिच्याकडे बघून हात हलवला आणि निसर्गाच्या अर्जंट हाकेला ओ द्यायला युरीनल मध्ये शिरलो.
हा सगळा वेळ ट्रान्झिशन T1 म्हणून धरला जातो.
ट्रान्झिशन एरिया मध्ये आलो तर बहुतेक सायकली तिकडेच होत्या , आपण बहुतांश लोकांपेक्षा फास्ट आलोत याची नोंद मेंदूने घेतली,
सायकलपाशी येऊन नॅपकिन ने डोके आणि पावले पुसली. ओल्या पायात मोजे घालणे हे कठीण काम, हे चालू असतानाच एका हाताने T1 स्नॅक्स म्हणून ठेवलेले शेंगदाणा लाडू खाणे चालू होते. त्या मागोमाग तयार करून ठेवलेल्या सॉल्ट वॉटर चा एक शॉट मारला.
शूज पायात, हेल्मेट डोक्यावर, सायकल हातात मी बाहेर पडायला तयार,
आता सायकल घेऊन एका रेषे पर्यंत धावत जायचे आणि तिकडे सायकल वर स्वार व्हायचे. मी धावायला लागलो तेव्हा आदित्य सायकलवर बसून निघताना दिसला,
सायकल माउंट लाईन क्रॉस केली , काही मिटर पॅडल केले आणि लगेच जाणवले आज पायातील शक्ती खलास झाली आहे.
मी ब्रेस्ट स्ट्रोक ने पोहोतो, यात पुढे जाण्यासाठी पायाची लाथ पूर्ण काम करते, उत्साहाच्या भरात स्विमिंग करताना मी बहुदा जास्त जोर वापरला ( जो माझ्या बेस्ट स्वीम टाइम मध्ये दिसतो) + पाण्यातील चालणे यामुळे पाय थकले आहेत , लगेच त्यांना कामाला लावणे शक्य नाही.
नशिबाने पहिले 15 20 km सपाटीचे होते, स्वतः वर चिडचिड करत सायकल मारत होतो, मागून बऱ्याच लोकांनी येऊन मला ओव्हरटेक केले, मी मात्र अजून कोणाला ओव्हरटेक केले नव्हते. या विचाराने अजून चिडचिड व्हायला लागली.
सायकलिंग सुरू केल्या पासून 10- 15 मिनिटात माझा माईंडसेट "कोणीही आपल्या पुढे जायला नको"या हेक्या पासून पासून " किमान आपल्या वयोगटातील आणि वरच्या वयोगटातील कुणी आपल्या पुढे जायला नको" अशा नम्र अपेक्षेपर्यंत आला होता
आमच्या age ग्रुप ला A B अशी नावे दिलेली आणि ते अक्षर उजव्या पोटारीवर टॅटू करून चिकटवले होते. माझी कॅटेगरी K होती, पुढे जाणार माणूस A-I मधला असला तर माझी चिडचिड होणे बंद झाले.
शेवटी एका हायब्रीड सायकल वर (ही सायकल वेगाने जाण्यासाठी बनवली नाहीये) जाणाऱ्या माणसाला मी ओव्हरटेक केले आणि पोटात हुश्श झाले.
इतक्यात समोरून आदी येताना दिसला, मला पाहिल्यावर ओरडला , पुढे यु टर्न आहे.
काल आम्ही कोर्स पाहायला गेलेलो तेव्हा नक्की माहीत नसल्याने खूप पुढपर्यंत जाऊन आलेलो, आता इतक्या जवळ यु टर्न म्हणजे लॉटरीच होती.
यु टर्न लाच aid स्टेशन होते.
म्हणजे 100 एक मीटर लांब भागात व्हॅलेंतीअर्स पाणी, इलेक्ट्रोलाईट भरलेल्या बाटल्या, केळी, एनर्जी gel वगैरे घेऊन उभे असतात, आणि घरचेच कार्य असल्या सारखे घ्या घ्या म्हणून हाकारत असतात. अथलिट्स नि केवळ त्यांच्या हातातून घ्यायचे,
पाणी वगैरे बाटल्या हव्यातर सायकलवर अडकवून पुढे न्याव्यात किंवा ते थोडे घोट घेऊन टाकाव्यात , ते त्या गोळा करून बाजूला करतात ( पण हे रस्त्यावर टाकाव्यात ही सूट केवळ aid स्टेशन च्या पुढे मागे 100 मीटरच हं, इतर रूट वर कचरा टाकलात तर ब्लू कार्ड मिळेल.) अर्थात यात अधेमध्ये पडलेल्या बाटल्या वरून सायकली घसरू नयेत हा पहिला विचार.
तर... या aid स्टेशन कडे दुर्लक्ष करून मि पुढे निघालो, अजून काही km जाताच घसा कोरडा पडू लागला, T1 मध्ये जो एक्सत्रा मिठाचा शॉट मारलेला त्याचा हा परिणाम होता, सायकल वर असणाऱ्या दोन्ही बाटल्यात इलेक्ट्रल + सॉल्ट असेच सोल्युशन होते, म्हणजे पुढच्या aid स्टेशन ची वाट पाहण्याशिवाय मार्ग नव्हता.
एकंदर गोष्टी मनाप्रमाणे जात नाहीयेत म्हणून अजून चिडचिड होऊ लागली.
परतीच्या रस्त्यावर मिरामार सर्कल क्रॉस केले तेव्हा टाइम चेक घेतला तर 35 मिनिटात 15km पार झाले होते, नॉट बॅड, अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली नाहीये असे वाटून परत हुरूप आला.
दरम्यात पाय सुद्धा नवीन ऍक्टिव्हिटीला रुळले होते, and i was getting into full race mode.
आता पुढे आव्हान होते ते डोना पाऊला च्या चढाचे.
तसा हा चढ फार थोर नव्हे, चांदणी चौक च्या चढावर प्रॅक्टिस केलेल्याना हा जड जाऊ नये. पण ट्रीकि होता, एक चढण चढून वर पोहोचल्यावर रस्ता अचानक डावीकडे वळतो आणि तिकडून दुसरा छोटा चढ सुरू होतो.
या दुसऱ्या चढासाठी काही शक्ती आणि गिअर्स राखून ठेवली नाहीत तर मात्र हालत खराब होते.
आदल्या दिवशी च्या रेकी मध्ये ही गोष्ट डोक्यात नीटच ठसवून घेतली होती. त्यामुळे चढ कुरकुर न होता पार पडला, वर जाताना 2 3 जणांना ओव्हरटेक सुद्धा केले. मग वरचा रस्ता काही चॅलेंज नव्हता , थेट पुढच्या यु टर्न जवळ असणाऱ्या एक स्टेशन ला पोहोचलो , पाण्याची बाटली हातात आली, थंडगार पाण्याचा पहिला घोट घेताच त्यातल्या सुखाची चटक लागली
पूर्ण ट्रेनिंग मध्ये इव्हेंट ला कसे असेल काय माहीत म्हणून कटाक्षाने रूम टेम्प चे पाणी प्यायले होते, दमल्यावर थंडगार पाणी पिण्याचे सुख अडीक्टिव्ह होते, मग चक्क सायकल थांबवून उरलेले गार पाणी अंगावर ओतले. पुढे निघालो.
या सगळ्याचा परिणाम इतकाच झाला की मी प्रत्येक वेळी aid स्टेशन वर थांबून पाणी पिणे, आंघोळ करायला लागलो.
बाकी लुप्स निर्विघ्नपणे पार पडले.
नाही म्हणायला तिसऱ्या लूप मध्ये त्या चढावर भयावह दृश्य होते, पहिल्या स्लोप सेक्शन मध्ये एक सायकलिस्ट आडवा पडला होता, त्याची सायकल व्हॉलेंटिअर्स बाजूस घेत होते, काही मीटर्स पुढे दुसरा बसून आपला दुखऱ्या पायाला मालिश करत होता, बरेच से जण चक्क उतरून सायकल ढकलत वर नेत होते,
आजूबाजूला अशी वाताहात दिसत असताना आपण सायकल वरून व्यवस्थित जात आहोत हे फिलिंग आपला इगो जबरदस्त सुखावणारे असते आणि त्याने मला मस्त कॉन्फिडन्स बुस्ट मिळाला.
नशिबाने तिसऱ्या वेळी उतारावर समोर कोणी नव्हते त्यामुळे त्या उताराचा पूर्ण फायदा घेत मी मिरामार सर्कल ला पोहोचलो,
सायकल वरून उतरलो, तेव्हा वेळ पहिली , 90 km साठी मला 3:24 लागली होती.
प्रॅक्टिस सेशन मध्ये 3:05 -3:10 वेळ लागायचा, म्हणजे त्या गार पाण्याच्या कौतुकात जवळपास 10 15 मिनिटे जास्त गेली होती.
ट्रान्झिशन एरिया मध्ये आलो, आता कपडे, शूज काहीच बदलायचे नव्हते,
यु ट्यूब वर जे व्हिडीओ दिसतात त्यात अथलिट्स अक्षरशः सायकल टेकवतात आणि तसेच पळत बाहेर पडतात, माँ कसम, एक बार वैसा करने की तमन्ना है
पण मी कोथरूडकर असल्याने परत एकदा T2 स्नॅक्स उघडून तहान लाडू भूक लाडू करत बसलो. माझ्या अगदी समोर एक मुलगी येऊन सायकल लावून गेली सुद्धा, पोट्टी जाता जाता माझ्या लाडवांकडे पाहून हसून गेली पण हे सगळे प्रकरण 6 7 मिनिटात आटपून मी बाहेर पडलो, अजूनही तर ट्रान्झिशन एरिया रिकामा दिसत होता, बरेच लोक परत यायचे बाकी होते.
दुसऱ्या लूप मध्ये कुठेतरी मी आदित्य ला ओव्हर टेक केले होते.तो नक्की किती मागे आहे याची कल्पना नव्हती.
धावायला सुरवात करताना एक गोष्ट डोक्यात नक्की होती की आता रेस पूर्ण होणार, दमलो तर चालत, रांगत का होईना पण पूर्ण होणारच. हाताशी वेळ भरपूर होता, चालणे/धावणे ही तुलनेने कमी unknown फॅक्टर असणारी/ सेफ ऍक्टिव्हिटी होती. स्वीम मध्ये जेलिफिश, किंवा सायकल मध्ये पंक्चर/अपघात झाले तर तुम्ही काहीच करू शकत नाही.पण धावण्यात तसे काही नाही .
धावायचा रूट आम्ही पहिला नव्हता, पण जवळपास 60%कोर्स सायकलिंग रूट वरच होता. डोना पाऊला चा पहिला खडा चढ चढून वर गेले की राज भवनच्या दिशेने वळायचे, आणि थेट राजभवन च्या दारात यु टर्न.
दर एक km वर aid स्टेशन होते.
हे aid स्टेशन हायड्रेशन स्टेशन कमी आणि लंगर जास्त होते :D. पाणी, इलेक्ट्रोलाईट, मीठ लावलेल्या संत्र्याच्या फोडी, एनर्जी जेल,बिस्किट्स, कोक, रेड बुल, salted चिप्स इतके प्रकार तिकडे होते. आणि प्रत्येक व्हॉइंटिअर ला इतके ग्लास गेलेच पाहीजेत असे टार्गेट दिल्या सारखे ते लोकांना ऑफर करत होते.
पण या सगळ्यां खाण्यापेक्षा अतिशय आवडलेली आणि तितकीच आवश्यक गोष्ट होती ती म्हणजे वॉटर splash,
भरपूर बर्फ घातलेले पाणी मोठ्या जारने थेट डोक्यावर ओतायचे. बाहेर च्या ऊन आणि मी म्हणणाऱ्या ह्युमीडिटीवर हा रामबाण उपाय होता.
पहिल्या लूप या सगळ्या मोहाकडे दुर्लक्ष करून थेट चढाला भिडलो, पुण्यात भरपूर हिल रन केल्याचा अभिमान अर्ध्या चढावर गळून पडला. आधी झालेली साडेचार तासाची ऍक्टिव्हिटी +ऊन + ह्युमीडिटी हे कॉम्बिनेशन सगळ्या ट्रेनिंगचे पापुद्रे सुट्टे करत होते.
परत एकदा स्मार्ट स्ट्रॅटेजी --- चढावर चक्क चालायचे, जो काही वेळ वाचवायचाय तो उतारावर धावून वाचवू.
फार तर काय 2 3 मिन जास्त लागतील || धृ ||
आदित्य स्ट्रॉंग रनर आहे, त्याने पहिल्या लूप मध्येच मला मागे टाकले.
धावताना आजूबाजूची गंमत बघायला भरपूर वेळ होता,
पार्टीसिपेंट्स चे नातेवाईक आणि गोवेकर दुतर्फा गर्दी करून उभे होते.
मध्ये एका ठिकाणी फूटपाथवर गाडी पार्क करून मोठ्ठ्या आवाजात झिद्दी दिल, चकदे इंडिया वगैरे गाणी वाजवत होते.
एके ठिकाणी शिस्तीत मोठा स्पीकर लावून एक मुलगी नाचत होती.
कोर्स पासून 40 50 मिटर लांब बिल्डिंग च्या गच्चीत प्रचंड मोठ्या आवाजात गाणी लावून तिकडून लोक चिअर करत होते. पण हा प्रकार दुसऱ्या लूप ला दिसला नाही, बहुदा पोलिसांनी बंद केला असावा.
बघे लोक अगदी बिब वरचे नाव वाचून, नावानिशी चिअर करत होते, इतके पर्सनलाईझड चिअरिंग पाहून मस्त वाटत होते. पुण्याचे ओळखीचे चेहरे पण मध्ये मध्ये दिसत होते.
डोना पाऊला च्या चढावर एक कनवाळू चेहऱ्याची ख्रिश्चन आजी अतिशय प्रेमळ आवाजात " come on, come on give your best " म्हणून प्रत्येकाला चिअर करत होती, दुसऱ्या तिसऱ्या लुप ला आजोबा, आणि तिची मुलगी/सून कमरेवर पिल्लाला घेऊन तिला जॉईन झाले. त्यांच्या समोरून शेवटचे पास होताना त्यांना मुद्दामून थांबून थँक्स फॉर चिअरिंग म्हंटले.
मध्ये एक माणूस राक्षसाचा मास्क लावून " you run better than government" चा बोर्ड घेऊन उभा होता, त्याला अगदी " दे टाळी" म्हणून पुढे धावत गेलो.
ही बघ्यांची तर्हा तर रनर्स ची अजून वेगळी,
आधीच्या सेक्शन मध्ये स्ट्रॉंग वाटणारे इकडे ढेपळलेले दिसत होते, तर माझ्या नंतर सुरू केलेले टणाटण पुढे जाताना दिसत होते.
एका रनर च्या खांद्यावर तिरंगा दिसला, लोक साधारण फिनिश लाईन ला जाताना झेंडा वगैरे घेऊन जातात, मला वाटले याचा तिसरा लूप चालू आहे, मी अगदी त्याला गुड गोइंग वगैरे म्हणून चिअर केले, नंतर पाहिले तर हा बाबा माझ्याच आज मागे होता, म्हणजे हा खांद्यावर झेंडा घेऊन पूर्ण 21 km पळाला.
पण एकंदर ह्युमीडिटी ने मॅक्सिमम लोकांना लोळवले होते.
अर्थात हे सगळे मी आम जनतेचे बोलत आहे, प्रो अथलिट्स आमचा पहिला लूप अर्धा होई पर्यंत स्पर्धा संपवून रिकव्हरी एरिया मध्ये कोक पीत बसले होते.
स्पर्धेचा ताण केवळ खेळाडूंनाच होता असे नाही, त्यांचे नातेवाईक सुद्धा तशाच ताणातून जात होते.
प्रत्येक अथलिट् ची हालचाल एक अँप वरून ट्रॅक करता येत होती. मध्येच त्या अँप ने डुलकी दिली आणि सगळे अथलिट्स जैसे थे दिसायला लागले. तेव्हाच एक अम्ब्युलन्स त्या रस्त्याने गेली.
किरण कोर्सवर फोटो काढत होता, त्याच्या बाजूची बाई रडवेली झाली. माझ्या नवऱ्याची movement दिसत नाहीये, आणि अम्ब्युलन्स पण त्याच दिशेला गेलीये, i hope he is all right .... शेवटी किरण ने मी दोघांना ट्रॅक करतोय त्यांची movement पण थांबलीये पण एक आत्ताच इकडून क्रॉस झाला वगैरे सांगून तिला धीर दिला.
कट to running....
शेवट चे 5 km बाकी होता, घड्याळात पाहिले तर 2 ला 10 मिनिटे कमी, रेस साधारण पावणे 7 ते 7 तासात संपावी असे ढोबळ उद्दिष्ट ठेवले होते,
रेस 7 ला सुरू होते म्हणजे 2 पर्यंत संपवायला हवी, या थकलेल्या अवस्थेत 5 km म्हणजे 40 45 मिनिटे नक्की, म्हणजे टार्गेट 25 30 मिनिटांनी चुकणार, हर... हर .. जन्म वाया गेला, आपला सगळा जोश फक्त प्रॅक्टिस सेशन मध्ये दिसतो , काय गरज होती प्रत्येक वॉटर स्टेशन वर टाईमपास करायची अशी स्वतःची खरडपट्टी काढणे चालू झाले, आणि तितक्यात आठवले अरे, रेस 7 ला नाही 730 ला सुरू झालेली, म्हणजे 7 तास अडीच ला पूर्ण होतील, म्हणजे 5km 40 मिनिटं हे शक्य साध्य टार्गेट आहे.
बुडत्या सूर्याच्या प्रकाशात जयंद्रथाला पाहून अर्जुनाला जितका आनंद झाला असेल तितका मला झाला.
मग मात्र शेवटच्या आईस बाथ चा मोह टालुन पुढे स्लो धावत राहिलो.
आता शेवट अगदी 500 mt वर आला होता, हातात त्या मानाने बराच वेळ होता. आमचे आधीच ठरलेले , it should be a strong finish. एन्ड लाईन पूर्ण फोर्स ने आणि चांगल्या फॉर्म मध्ये ओलांडायची, pain is momentary, but you tube videos are permanent
Google च्या अंतापर्यंत खुरडत फिनिश लाईन ओलांडणारा मी , मला बघायचा नव्हता,
त्यामुळे आमचा कोड ठरलेला, साधारण 150 200 मिटर असताना किरण ,"गो" म्हणून clue देणार आणि तिथपासून पूर्ण शक्ती एकवटून मुसंडी मारायची.
पुढच्या 200- 300 मीटर मध्येच कुठेतरी किरण असणार होता, मग एनर्जी कनझर्व्ह करायला चक्क चाललो. शेवटी खुणेचा "go" कानावर पडल्यावर असेल नसेल ती शक्ती एकवटून पळालो आणि स्पर्धा चालू झाल्यापासून 6:53:09 ला फिनिश लाईन ओलांडली.
"जानेवारी 2019 मध्ये सुरु झालेला एका वेडेपणाचा प्रवास संपला" असे म्हणायचे की " जानेवारी 2019 मध्ये सुरु झालेल्या वेडेपणाचा एक प्रवास संपला " असे म्हणायचे हे अजून ठरवता येत नाहीये
फारच भारी! वाचायला मजा आली.
फारच भारी! मनापासून अभिनंदन! लेख वाचताना मजा आली. शेवटच्या दोन वाक्यांपैकी दुसरं खरं होऊ दे. तुमच्या अशा अनेक आयर्न मॅन यशस्वीपणे पूर्ण होवोत!
भारी लिहीले आहे. म्हणजे एकूणच
भारी लिहीले आहे. म्हणजे एकूणच घडामोडीच भारी आहेत त्याच्यामुळे आपोआपच लिखाण भारी झाले म्हणायचे.
आधीचे भाग वाचले नाहीत. कधी आणि कुठे असते स्पर्धा ही ? भाग घ्यायचा असेल तर किती आधी पासून तयारी करावी लागेल ?
मस्त लिहिलं आहे! अभिनंदन!
मस्त लिहिलं आहे! अभिनंदन!
अभिनंदन...!!!
अभिनंदन...!!!
लिहिलंय ही छानच....
Pages