असे म्हणतात की "A picture is worth a thousand words" आणि खरे ही आहे ते!
पण ते हजार शब्द बोलणारे छायाचित्र काढणे ही एक कला आहे. आजकाल स्मार्टफोनच्या जमान्यात फोटो काढणे ही तितकीशी नाविन्याची गोष्ट राहिलेली नाही. अगदी उठता बसता आपण फोटो काढत असतो पण अर्थ गर्भ, आशय गर्भ छायाचित्रे काढणे हे एक अनोखे कसब आहे.
तंत्र शिकता येते पण नेमके दृष्य टिपणारी दृष्टी सगळ्यांकडेच असते असे नाही.
या गणेशोत्सवात खास मायबोलीकरांकरिता घेऊन आलो आहोत.... एक आव्हानात्मक स्पर्धा "बोलकी चित्रे"!
या स्पर्धेसाठी सरधोपट विषय न देता आपण एक वेगळा प्रयोग करत आहोत.
संयोजक मंडळ इथे दोन गाणी देत आहेत आणि आपल्याला त्या गाण्यातील वर्णनाच्या/आशयाच्या जास्तीत जास्त जवळ जाणारी छायाचित्रे काढायची आहेत
स्पर्धेसाठीचा पहिला विषय आहे: "श्रावण आला"
हासरा नाचरा, जरासा
लाजरा, सुंदर साजरा
श्रावण आला
तांबूस कोमल पाऊल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण
आला
मेघांत लावीत सोनेरी
निशाणे आकाशवाटेने
श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात,
केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या
बांधित कमानी
संध्येच्या गगनी
श्रावण आला
लपे ढगामागे, धावे
माळावर, असा खेळकर
श्रावण आला
सृष्टीत सुखाची करीत
पेरणी आनंदाचा धनी
श्रावण आला
स्पर्धेसाठीचा दुसरा विषय आहे: "सुट्टी लागली सरली शाळा"
मारू बेडूक उडी, गड्यांनो घालू या
लपाछपी खेळता देउ या झाडामागे दडी !
सुट्टी लागली सरली शाळा
कोण पहाटे उठतो खुळा !
"अभ्यासाला बसा !", कुणी ना ओरडती घडिघडी !
गावाबाहिर वाहे नदी
झाडे बघती पाण्यामधीं
सळसळणार्या लाटांमध्ये घेईल कोणी बुडी !
कुणी पाडतिल चिंचा बोरे
"एक आकडा मलाही दे रे ?"
झाडाखाली कुणी बापडा लावील लाडीगोडी !
आवडले का विषय?
स्पर्धेचे नियम:
१. एका आयडीतर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
२. प्रकाशचित्र स्वत:च काढलेले असावे.
३. स्पर्धेसाठी पाठवलेले प्रकाशचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.
४. कॅमेरा कुठला वापरला आहे (manual /digital SLR, aim & shoot, mobile, IPad etc) हे लिहिणे बंधनकारक आहे. पण त्यानुसार वेगळी वर्गवारी होणार नाही
५. पिकासा, फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेअर वापरण्यास परवानगी आहे. प्रकाशचित्रात असे काही बदल केले असल्यास काय बदल केले आहेत हे नमूद करणे अपेक्षित आहे.
६. फाईलचे आकारमान २००kb पेक्षा जास्त नसावे
७. प्रकाशचित्रांवर स्वतःच्या नावाचा किंवा वेबसाइटचा लोगो न टाकता "मायबोली गणेशोत्सव २०१९" असा वॉटरमार्क टाकावा.
८. स्पर्धेसाठी प्रत्येक विषयाची एक प्रवेशिका विजेती म्हणून घोषित केली जाईल.
९. स्पर्धेचा अंतिम निकाल मतदान पद्धतीने ठरवण्यात येईल. तो स्वीकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
१०. मतदान करताना सदस्यांनी तांत्रिक गोष्टींपेक्षा गाण्याच्या आशयाशी जुळणाऱ्या प्रवेशिकांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे.
प्रवेशिका कशा पाठवाल?
१. स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवताना ती गणेशोत्सवाच्या संयोजकांना gsanyojak2019@maayboli.com ह्या पत्त्यावर इ-मेल करून पाठवणे अपेक्षित आहे.
२. तसेच इ-मेल पाठवताना "बोलकी चित्रे: छायाचित्रण स्पर्धा: श्रावण आला" (किंवा) "बोलकी चित्रे: छायाचित्रण स्पर्धा: सुट्टी लागली सरली शाळा" असा विषय लिहावा.
३. संयोजकांना इ-मेल पाठवताना, प्रकाशचित्राच्या फाईलचे आकारमान हे २०० kb पेक्षा जास्त नसावे.
४. स्पर्धेसाठी प्रकाशचित्र पाठवताना इ-मेल मधे प्रकाशचित्राची प्रत जोडावी. त्याच बरोबर मायबोली आयडी लिहावा आणि या विषयाला अनुसरून प्रकाशचित्रात विषय कसा हाताळला आहे ते एका ओळीत लिहावे.
५. प्रवेशिका संयोजकांना इ-मेल केल्यानंतर ती प्रवेशिका स्पर्धेच्या धाग्यावर प्रकाशित होण्यास २४ तासाची मुदत द्यावी. २४ तासानंतरही तुमची प्रवेशिका दिसत नसेल तर संयोजकांना इ-मेल करावी.
प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व रविवार १५ सप्टेंबर २०१९पर्यंत स्वीकारल्या जातील.
या स्पर्धेची अंतिम मुदत
या स्पर्धेची अंतिम मुदत रविवार १५ सप्टेंबर २०१९ रात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे.