"राजमाता..... अशक्य आहे हे!"
"तु ही जाणतोस हे किती गरजेचे आहे."
भीष्माचार्य काहीच बोलेनात.
"तुझ्या प्रतिज्ञेनुसार तू हस्तिनापूर राजगादीच रक्षण करणार आहेस. हो ना?"
"होय राजमाता. शब्द आहे माझा."
"पण कसे भीष्म? हस्तिनापुरची राजगादी अशी रिक्त ठेवून?"'
"राजमाता...."
"राजवंश संपला तर राज्य विखरून जाईल. चालून येणाऱ्या शत्रूला कळले, की राजगादीला कोणी वारस नाही, ती रिकामी आहे, तर शत्रूपुढे हे हस्तिनापुर किती काळ टिकेल? सैन्य एका राजाची आज्ञा ऐकते भीष्मा. प्रजा देखील. राजघराण्याची आज्ञा नाही. ऱाजा नसेल तर कसली राजगादी आणि कसली त्या राजगादीला सांभाळण्याची प्रतिज्ञा? "
"मला अश्या धर्मसंकटात टाकू नका." भीष्म हात जोडून नुसतेच उभे राहिले.
"राजाज्ञा देण्यास भाग पाडू नकोस मला, भीष्मा. सोप्प्या सरळ गोष्टींना अवघड बनवू नकोस माझ्यासाठी. अजून विचित्रवीर्य जाण्याचे दु:खही सरलेले नाही."
सत्यवतीने विचित्रवीर्य चे नाव काढले तसे भीष्म मनातून हळहळले.
"भीष्मा, तु जर समजावून ऐकणार नसशील, तर....."
"राजमाता, मला इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त आहे."
"भीष्मा...!" भयचकित नजरेने तिने भीष्माकडे पाहिले.
"क्षमा. पण तुमची ही विनंती मी स्विकारू शकत नाही." भीष्म शांतपणे म्हणाले.
"एकांत" तिने भीष्मांकडे पाठ फिरवली आणि जाऊन आसनावर विचार करत बसून राहिली.
'अंबिका, अंबालिकेला संतान, राज्याला वारस, राजगादीला अधिकारी नाही.... याचे दु:ख माझ्याहून अधिक कोणाला कळेल राजमाता? हा भीष्म स्वतःच्याच प्रतिज्ञेमुळे अधर्माच्या दलदलीत धसत चाललाय. पण तुम्ही सांगता आहात तो अधर्म.... अशक्य! अंबिका, अंबालिकासोबत विवाह? संतान ? ब्रह्मचर्य व्रत घेतलेल्या या भीष्माला कस विचारू शकता तुम्ही हे? जोवर धर्म आणि न्यायाचे राज्य येत नाही, तोवर जिवंत राहण्याकरता मिळालेले वरदान आता शाप बनलयं, राजमाता! कदाचित हे न संपणार जीवन, देवी अंबांना मी दिलेल्या यातनांची परतफेड म्हणून मिळाले असावे.' भीष्म मनातल्या मनात सत्यवतीच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत विचार करत होते. तिथून निघाले, तितक्यात सत्यवती उभी राहिली , " भीष्मा..."
"आज्ञा राजमाता."
"ऋषी व्यासांना घेऊन ये."
"राजमाता? ते कोण...."
"प्रश्न विचारायच्या आधी सांग, तयार आहेस विवाहास?"
"राजमाता...."
"मग तुला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही भीष्मा!"
"आज्ञा असावी." भीष्मांनी नमस्कार केला आणि कक्षाच्या बाहेर गेले.
चेहऱ्यावर आणलेला कृत्रिम कठोरपणा गेला. सत्यवतीने भीष्मांना उत्तर दिले असते, तर काय मान राहिला असता भीष्मांच्या मनात तिचा? कोण होते व्यास ऋषी? काय लागत होते ते या राजघराण्याचे?
'ऐकवले असते तुला भीष्मा? झाले असते सत्य सहन? सत्य कटू आहे, भीष्मा! इतके की त्याचा कडवटपणा नात्यांमध्ये असा भिनेल की सारे आयुष्यच बेचव होईल. इतके सरळ साधे नसते रे सारे!
देवव्रताचा भीष्म कसा झालास हे मानाने सांगू शकतोस तू .... पण मी कोणत्या तोंडाने सांगू ? एका मत्स्यगंधेची योजनगंधा कशी झाली.... कोणी केली.... ' सत्यवती तिच्या भुतकाळात हरवू लागली. मत्स्यगंधेच्या अंगातून येणारा दुर्गंध तिला सवयीचा झाला होता. पण तिच्या नौकेच्या व्यवसायावर मात्र तो ग्रहणासारखा लागला होता. कोणी तिच्या बोटीत बसायला तयार नव्हते. कोणी बसले की नाक दाबून बसत. पिता निषादला तिची चिंता वाटायची. कोण स्विकारणार तिला अशी? आणि नाही स्विकारले तर.... आपल्यानंतर कशी जगेल? उदरभरणाचा काय मार्ग काढेल? मत्स्यगंधेलाही हे जाणवायचे. आपण सर्वांना नकोसे वाटतो, याचा त्रासही व्हायचा. पण तिने जिद्द सोडली नव्हती. नौकेला सजवून, रंगरंगोटी करून शोभिवंत केली तिने. निदान त्यामुळे का होईना यात्री यावेत. एकेदिवशी एक ऋषी नदीकाठी थांबले होते. पराशर ऋषी! तिने 'जायचे आहे का' विचारल्यावर ते येऊन तिच्या नौकेत बसले. नौका यमुनेच्या प्रवाहात प्रवास करत जवळपास मध्यावर आली. ऋषीमुनी तिच्याच पाहत होते..... त्या नजरेत तिरस्कार नव्हता! त्यांनी तिच्या दुर्गंधाला विटून नाकही मुरडले नव्हते. तिला आश्चर्य वाटले.
"काय झाले ऋषी?"
"ती तू आहेस तर!"
"कोण?"
"जिचा उल्लेख केला होता त्यांनी!"
"माझा उल्लेख? कोणी?"
"या विश्वाचा कर्ताधर्ता.... ईश्वर!"
"माझा उल्लेख केला होता? कश्यासंदर्भात ऋषी?"
"संयोग पुत्रप्राप्ती संदर्भात!" तिला धक्का बसला.
'संयोग? या अश्या दुर्गंधी शरीराची ही मत्स्यगंधा आणि एक तपस्वी ऋषीमुनी?'
तिला क्षणभर स्वतःची लाज वाटून गेली. पुढच्याच क्षणी तिच्या मनाला एक आनंदाची पालवी फुटली. आजवर तिच्या वासामुळे तिला सर्वांनी नजरेतून ती तुच्छ असल्याची जाणिव दिली होती. पण ऋषींनी तिला तिरस्काराने बघण्याऐवजी तिची याचना केली.
"पण मी कुमारीका आहे."
"चिंता करू नकोस. तुझ कौमार्य पुत्रजन्मानंतर पूर्ववत होईल."
"पण माझ्या शरीरातून दुर्गंध येतो, ऋषीमुनी."
"आता तुझे फुल बनून दरवळण्याचे दिवस आले आहेत योजनगंधे..... "
'योजनगंधा? म्हणजे दुरवर सुगंध पसरणार ? या मत्स्यगंधेच्या शरीरातून? लोकांचा तिरस्कार संपणार?
"पण.... कोणी पाहिले तर....?" स्त्री सुलभ लज्जा तिच्या चेहऱ्यावर पसरली...
पाहाता पाहाता सभोवती दाट धुके पसरले. नौकेतल्या दुर्गंधीची जागा मंद सुगंधाने घेतली! धुके ओसरले तेव्हा फक्त सुगंधाने शरीरात नाही तर सोबतच तिच्या उदरात एका दिव्य शक्तीनेही प्रवेश केलेला होता......!
सत्यवती आठवणींमधून बाहेर आली.
'खरचं परशर ऋषी माझ्यासाठी आशीर्वाद ठरले.... ते नसते आज तर ना मत्सगांधा योजनगंधा बनली असती, ना योजनगंधा सत्यवती! क्षणात मोठा होत होत तरुण दिसू लागला आमचा पुत्र....! नमस्कार करून तो मला म्हणाला होता.... "माते, आपल्याला गरज पडेल तेव्हा बोलावून घ्या. मी येईन." माझा व्यास! माझा पुत्र महर्षी कृष्णद्वैपायन व्यास! भीष्मा, तु राजघराण्याच्या कानिन पुत्राला भेटणार आहेस!!!'
©मधुरा
#युगांतर_आरंभ_अंताचा
तळटीप:
औरस, कानिन, सहोढ.... असे अनेक प्रकार आहेत. कानिन पुत्र म्हणजे विवाहाआधीच प्राप्त झालेला पुत्र. स्त्री च्या विवाहानंतर तिच्या पतीचा तो कानिन पुत्र बनतो.
Part 14
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2560193317373362&id=10000148...
दोन्ही भाग सलग वाचले. आज
दोन्ही भाग सलग वाचले. आज तुम्ही तळटीपेत दिलेली माहिती माझ्यासाठी नवीन आहे. पु.भा.प्र!
धन्यवाद मन्या.
धन्यवाद मन्या.
मस्त माहीती.
मस्त माहीती.
आतापर्यंत दीर्घ तपस्येनंतर पराशर कामुक झाल्यामुळे त्यांनी धुके निर्माण करून भोग घेतला अशी माहीती ऐकिवात होती.
आज नविनच माहीती मिळाली कि ती तर दैवी योजना होती.
धन्यवाद आसाजी!
धन्यवाद आसाजी!
तपस्या, ध्यानधारणा करणाऱ्यांना वैराग्य प्राप्त होते. मोह, वासना त्यांना शिवत नाहीत.