मेथी लसूण पराठा + चटणी

Submitted by योकु on 26 June, 2019 - 14:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आज हा एक नेहेमीचा प्रकार पण जरा वेगळ्या चवीचा केला. करून पाहा. साहित्य जरी दिसायला जास्त असलं तरी सगळं एकत्रच करायच आहे सो त्यामानानं सोपा आहे. सकाळच्या नाष्त्याला, ब्रंच ला जेवण म्हणून, संध्याकाळी कुणी येणार असेल तर करायला; डब्याला असं सगळीकडे चालू शकेल.
तर साहित्य -

पराठ्यांकरता -
दोन ओंजळीभरून ताज्या मेथीची पानं
चमचाभर लाल तिखटपूड
अर्धा चमचा हळद
८-१० लसूणपाकळ्या
चमचाभर जिरं
दोन चमचे तीळ
अर्धा चमचा ओवा
चवीनुसार मीठ
दीड वाटी कणीक + पाव वाटी बेसन + पाव वाटी ज्वारीचं पीठ
दोन लहान चमचे तेल पराठ्यांच भिजवायला + लागेल तसं भाजायला

चटणीकरता-
एक मध्यम लहान वाटी चण्याची डाळ
तितकेच सुक्या खोबर्‍याचे लहान लहान तुकडे
तेव्हढंच दही
३ हिरव्या मिरच्या
मीठ, साखर चवीनुसार
अर्धा चमचा मोहोरी
अर्धा चमचा जिरं
३/४ लाल सुक्या मिरच्या
आवडत असतील तर एक-दोन डहाळ्या कढिलिंब
पाव चमचा हिंग
तीन टेबल स्पून तेल

क्रमवार पाककृती: 

पराठ्यांकरता
लाल तिखट, लसूण आणि जिरं हे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावं.
मेथी फार कोवळी असेल तर तशीच वापरावी नाहीतर जरा ओबडधोबड चिरून घ्यावी
मोठ्या परातीत मेथी, सगळी पिठं, दोन लहान चमचे तेल, तीळ, ओवा, मिक्सरमधलं वाटण, हळद, मीठ घालून लागेल तसं पाणी घालून नेहेमीप्रमाणे गोळा भिजवावा. १५-१० मिनिटं रेस्ट देऊन जरा जाडसर पराठे लाटून तेलावर खमंग भाजावेत.

चटणीकरता
चणाडाळ आणि सुकं खोबरं तासभर गरम पाण्यात भिजत घालावंं (हा वेळ कृतीत नाही धरला). खोबरं भिजवल्यानी तुकडे करायला सोपं पडेल.
मिक्सरच्या भांड्यात, खोबरं, डाळ, मीठ, साखर, मिरच्या आणि दोन चिमटी जिरं बारीक वाटावं. पाणी न वापरता दहीच वापरावं.
नंतर भांड्यात काढून घेऊन तेलाची खमंग फोडणी वरून द्यावी. फोडणीत मोहोरी, उरलेलं जिरं, हिंग आणि अजिबात जळू न देता लाल सुक्या मिरच्या आणि कढिपत्ता घालावा. चटणी फ्रीजमध्ये गार करत ठेवावी.

गार चटणी; गरमागरम, वरून जरासे खरपूस आणि आतून मऊ लुस्लुशीत अश्या चविष्ट पराट्यांसोबत खावी. पराठ्यांवर आवडत असेल तर अमून बटरचे रट्टे मारावेत. नंतर पडी टाकावी अर्धातास तरी.

वाढणी/प्रमाण: 
किती खाणं आहे आणि काय प्रसंगी देताय त्यावर
अधिक टिपा: 

- लसूण चटणीचा खमंगपणा सुरेख येतो या पराठ्यांना, सो ते अवश्य करा
- पिठांत उन्नीस बीस चालेल; एखादं पीठ वगळलं किंवा कणकेचेच केले पराठे तरी चालतील.
- एखादवेळेस पीठ कमी/जास्तही घालायला लागू शकेल; मेथीत बसेल इतपत वापरायचंय
- चटणी वाटतांना पाण्याऐवजी दहीच वापरा.
- हे तसे हेवी होतात. जेवण म्हणून करणार असाल तर सोबत दहीबुत्ती परफेक्ट जाते.
- चटणीच्या फोडणीत कुटाच्या मिरच्या असतील तर चटणी अजूनच खमंग लागेल; त्या केस मध्ये वाटणात हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसर कमी करता येऊ शकेल.

माहितीचा स्रोत: 
बायडी, आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो?
पाककृती मस्त वाटत आहे. करुन बघेन.

मस्त.
मेथी पराठा चहा सोबत माझा आवडता..... लसुण घालुन करुन बघेन.

मस्त पाकृ योकू.

डावभर दही घातलं आणी कणिक कोमट पाण्यात भिजवली तर आणिक खुसखुशीत होतात पराठे.