रात्री आकाशात दिसणाऱ्या तारे, ग्रह, चंद्र, धूमकेतू अशा सगळ्यांबद्दल मानवाला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव नुसत्या डोळ्यांनी आकाशाचे निरीक्षण करत आलेला आहे. इ.स. सोळाव्या शतकात गॅलिलिओने आकाशाकडे दुर्बीण रोखण्यापूर्वी केवळ डोळ्यांचा वापर करून भारतीय, चिनी, ग्रीक, इन्का इत्यादी संस्कृतींमधल्या माणसांनी रात्री दिसणाऱ्या चंद्राचे, ताऱ्यांचे, ग्रहांचे भरपूर निरीक्षण केलेले होते आणि त्यांच्या गतीविषयीही आपले अंदाज मांडलेले होते. दुर्बिणीचा वापर सुरू झाल्यापासून मात्र माणसाच्या खगोलशास्त्रविषयक ज्ञानात मोलाची भर पडली. काळानुसार विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा वापर करून खगोलशास्त्रातही बरीच मोठी मजल मारली गेली. विसाव्या शतकात खगोलनिरीक्षणासाठी फक्त दृश्य प्रकाशावर अवलंबून न राहता इतर प्रकारच्या लहरींचा उपयोग करायलाही सुरुवात झाली.
या इतर प्रकारच्या लहरी कोणत्या? अवकाशात असलेले तारे त्यांच्या अंतरंगात घडत असलेल्या घडामोडींमुळे विद्युच्चुंबकीय लहरींचं ( electromagnetic waves) उत्सर्जन करत असतात. आपल्याला दिसणारा प्रकाश हाही विद्युच्चुंबकीय लहरींचा एक प्रकार आहे. एएम आणि एफ़एम रेडिओच्या लहरी, दूरचित्रवाणीच्या लहरी, उपग्रहांकडून होणारे संदेशवहन, क्ष-किरण, मायक्रोवेव्ह्ज ही सगळी या विद्युच्चुंबकीय लहरींची विविध रूपं आहेत. या विविध रूपांपैकी काही रूपांचा वापर खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी केला जातो. त्यासाठी ऑप्टिकल दुर्बिणी ( उदा. आपण नेहमी पाहतो त्या लहान दुर्बिणी किंवा आयुकाची गिरवली येथील महाकाय दुर्बीण, अवकाशात असलेला हबल स्पेस टेलिस्कोप इत्यादी), एक्स रे आणि गॅमा रे टेलिस्कोप, रेडिओ दुर्बिणी ( उदा.जीएमआरटी, जॉड्रेल बँक, अरेसिबो इत्यादी) अशी साधने वापरली जातात.
हा आहे विद्युच्चुंबकीय लहरींचा वर्णपट ( spectrum). यात आपण जसे उजवीकडून डावीकडे जाऊ, तशी लहरींची तरंगलांबी ( wavelength) कमी होत जाते, तर लहरींची वारंवारिता ( frequency) आणि लहरींमधील ऊर्जा ( energy) वाढत जाते. या वर्णपटातल्या २ ’ खिडक्या’ आपल्याला अवकाशात डोकावून पाहण्यासाठी उघड्या आहेत. त्या खिडक्या म्हणजे दृश्य प्रकाश ( visible light) आणि रेडिओ लहरी. अवकाशातील तार्यांकडून येणार्या लहरींपैकी बाकी जवळजवळ सर्व लहरी ( एक्सरे, गॅमा रे इत्यादी) पृथ्वीच्या वातावरणामुळे वरच्या वर रोखल्या जातात. जणू त्या खिडक्यांवर वातावरणाचा जाड पडदा ओढलेला आहे. त्यामुळे त्या लहरींचा अभ्यास करायचा असेल तर तो त्या पडद्यापलीकडे, म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जाऊन करावा लागतो.
Credit:
ESA/Hubble (F. Granato)
रेडिओ दुर्बिणींमधून अवकाशातल्या रेडिओ स्त्रोतांचा अभ्यास केला जातो. सूर्य हाही एक रेडिओ स्त्रोत आहे. त्याचप्रमाणे आपल्या आकाशगंगेचे केंद्र हाही एक महत्त्वाचा रेडिओ स्त्रोत आहे. याशिवाय इतर तारकाविश्वे/ दीर्घिका (galaxies), स्पंदक ( pulsars) अशा अनेक रेडिओ स्त्रोतांची निरीक्षणे रेडिओ दुर्बिणींद्वारे घेतली जातात. विश्वाची निर्मिती, विश्वाच्या प्रसरणाचा वेग अशा खगोलभौतिकशास्त्रातल्या ( astrophysics) अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर या निरीक्षणांद्वारे संशोधन केले जाते. त्याचबरोबर, परग्रहावर जर कुठे प्रगत जीवसृष्टी असेलच, तर तिचा वेधही रेडिओ दुर्बिणींमार्फत घेतला जाण्याची शक्यता आहे.
आता आपण दुर्बिणींचा आकार ठरवताना कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात ते पाहू.
दुर्बीण ऑप्टिकल असो किंवा रेडिओ किंवा एक्स-रे, भिंग वापरून तयार केलेली असो वा परावर्तक वापरून, तिची बारकावे दाखवण्याची क्षमता ( resolution) प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट म्हणजे दुर्बिणीच्या ग्राहकाचा, म्हणजे दुर्बिणीच्या भिंगाचा/ परावर्तकाचा (लहानमोठा) आकार ( याला आपण D म्हणू) आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्बिणीवर पडणार्या लहरींची तरंगलांबी ( Lambda). या दोन्हींमधलं गुणोत्तर ( D/lambda) हे जितकं जास्त, तितकी दुर्बिणीची बारकावे टिपण्याची क्षमता जास्त. तरंगलांबी सारखीच असेल, तर दुर्बिणीचा व्यास जितका जास्त, तितकी बारकावे टिपण्याची क्षमता जास्त. ( मूळ सूत्रात D हा व्यास या अर्थाने नाही, तर आकार मोजण्याचा एक निकष म्हणून घेतलेला आहे. पण आपण सोपेपणासाठी इथे व्यास म्हणतोय) म्हणूनच, डोळ्यांनी जे बारकावे दिसत नाहीत, ते ४ इंच व्यासाचा आरसा किंवा भिंग असलेल्या ऑप्टिकल दुर्बिणीतून अतिशय स्पष्ट दिसतात. ( उदा. डोळ्यांनी आपल्याला शनीची कडी किंवा गुरूचे उपग्रह दिसत नाहीत, पण ४ इंची दुर्बिणीतून दिसतात) कारण डोळा आणि ऑप्टिकल दुर्बीण, दोन्ही दृश्य प्रकाशाचा वापर करतात. म्हणजेच, तरंगलांबी तीच, पण व्यास वाढला, त्यामुळे रिझोल्यूशन वाढलं. रेडिओ दुर्बीण तयार करायची असेल, तर मात्र २ किंवा ४ इंच व्यासाचा अँटेना पुरणार नाही. असं का बरं?
याचं उत्तर शोधण्यासाठी आता आपण परत मगाचच्या वर्णपटाकडे जाऊया. दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा रेडिओ लहरींची तरंगलांबी लाखो-करोडो पटीने जास्त असते. त्यामुळे उत्तम resolution मिळवण्यासाठी दुर्बीणही लाखो-करोडो पटीने मोठी हवी, महाकाय असायला हवी.
अशा महाकाय रेडिओ दुर्बिणी जगात अनेक ठिकाणी बांधल्या गेल्या आहेत ( उदा. अमेरिकेतील अरेसिबो येथील तब्बल ३०५ मीटर व्यासाची एकच डिश असणारी रेडिओ दुर्बीण). परंतु दुर्बीण आकाराने जितकी मोठी, तितकी ती फिरवायला (ऑपरेट करायला) अवघड. यावर उपाय म्हणून अनेक दुर्बिणींचा एक समूह बनवला जातो आणि त्यांनी घेतलेल्या वेधांचा एकमेकांशी समन्वय साधून त्यातून निष्कर्ष काढले जातात. या तंत्राला Interferometry असं म्हणतात.
Interferometry चं तत्त्व वापरणारी अशीच एक अक्षरश: महाकाय, जायंट दुर्बीण आपल्या पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यात खोडद या ठिकाणी आहे. तिचं नाव जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT), म्हणजेच मीटर तरंगलांबी असणार्या लहरींचा वापर करणारी महाकाय दुर्बीण. साधारणपणे २० सेमी ते २ मीटर तरंगलांबी असलेल्या रेडिओ लहरींचा अभ्यास येथे केला जातो. जीएमआरटीमध्ये ४५ मीटर्स व्यास असणारे, ३० डिश अँटेना आहेत. त्यापैकी १४ अँटेना केंद्रस्थानी असलेल्या १ चौरस किमी क्षेत्रफळात ( central square मध्ये) आहेत,तर Y अक्षराच्या आकारात पसरलेल्या ३ भुजांवर एकूण १६ अँटेना आहेत. या भुजा साधारणपणे प्रत्येकी १४ किमी लांब आहेत. अशा प्रकारे या अँटेना बसवण्याचे कारण Aperture synthesis या संकल्पनेत आहे. याच्या फार खोलात न जाता आपण एवढेच लक्षात घेऊ, की एकमेकांपासून क्ष अंतरावर असलेल्या २ किंवा अधिक रेडिओ अँटेनांनी एखाद्या रेडिओ स्त्रोताची, तो स्त्रोत उगवल्यापासून मावळेपर्यंत पुरेशी जास्त निरीक्षणे घेतली, तर त्या निरीक्षणांमधून मिळणारा एकत्रित निष्कर्ष वापरून, त्यावर गणिती प्रक्रिया करून त्या रेडिओ स्त्रोताची जी प्रतिमा तयार होते, ती जवळजवळ क्ष व्यासाच्या एकाच मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षण घेऊन तयार केलेल्या प्रतिमेइतकी चांगली करता येते.
जीएमआरटीच्या डिश अँटेना कशा प्रकारे उभारलेल्या आहेत त्याचे एक प्रतिरूप
वरच्या फोटोमध्ये आपल्याला जीएमआरटीचा एक डिश अँटेना दिसतोय. या अँटेनाची जी खोलगट डिश आहे, ती परावर्तक किंवा आरसा म्हणून काम करते. अवकाशातल्या रेडिओ स्त्रोतांकडून येणार्या लहरी या परावर्तकावर आदळतात आणि परावर्तित होऊन त्या परावर्तकाच्या नाभीवर ( focal point) एकत्र येतात. या ठिकाणी या लहरी झेलण्यासाठी दुसरा एक अँटेना बसवलेला असतो. हा दुसरा अँटेना या विद्युच्चुंबकीय लहरी पकडतो आणि त्यांचे विद्युतप्रवाहात रूपांतर करतो. हा विद्युतप्रवाह अगदी क्षीण असतो. त्यामुळे तो विविध टप्प्यांवर वर्धित ( amplify) करून, त्यावर योग्य त्या गणिती प्रक्रिया करून त्याचा अभ्यास केला जातो.
हे एवढे मोठे अँटेना बनवताना त्यात व्यावहारिक अडचणी अर्थातच बर्याच असतात. शिवाय भारतासारख्या विकसनशील देशात खर्चावरही मर्यादा येतात. अमेरिकेतील व्हेरी लार्ज अॅरे ( VLA) या रेडिओ दुर्बिणीच्या धर्तीवर जीएमआरटीची Y आकाराची रचना केली गेली आहे, पण VLA मधील डिश अँटेना या रेलवर सरकू शकणार्र्या आहेत. त्यामुळे त्यांच्यातील अंतर आवश्यकतेप्रमाणे कमीजास्त करता येते. ही खर्चिक सुविधा GMRT मध्ये नसली, तरी केंद्रस्थानी एकमेकींजवळ असलेल्या १४ दुर्बिणी आणि तीन भुजांमध्ये लांबवर पसरलेल्या एकूण १६ दुर्बिणी ही ( कमीजास्त अंतरांची ) कसर भरून काढतात. परावर्तकाच्या नाभीवर असलेले, लहरी ’झेलणारे' अँटेना ( feed antennas) तयार करतानाही कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त परिणामकारक आणि उत्कृष्ट परिणाम कसे मिळवता येतील याचा विचार केला गेलेला आहे. डिशचे एकूण वजन आणि वार्यामुळे होणारा अवरोध कमी करण्यासाठी SMART ( Stretched mesh attached to rope trusses) हे नवीन तंत्रज्ञान शोधून काढण्यात आले. म्हणजेच, एक सलग डिश न बांधता जाळी वापरून, तिला योग्य आकारात ताणून धरून हे अँटेना तयार करण्यात आले.
जीएमआरटीच्या भव्यतेची कल्पना यावी म्हणून हे प्रकाशचित्र.
प्रथमच बघत असू, तर अँटेनाजवळ गेल्यावर त्याच्या आकारामुळे आणि उंचीमुळे आपल्याला दडपून जायला होतं. शिवाय, ऑप्टिकल दुर्बिणीतून जसे आपल्याला तारे, ग्रह ’दिसतात’ तसे या दुर्बिणीतून थेट ’दिसत’ नाहीत. अनेक किचकट गणिती प्रक्रियांनंतर रेडिओ स्त्रोताची ’ प्रतिमा’ मिळते.
दर शुक्रवारी जीएमआरटी सर्वसामान्यांना भेट देण्यासाठी खुली असते. अर्थातच आधी परवानगी घेऊन. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तिथे मोठे विज्ञान प्रदर्शनही भरवले जाते.
तांत्रिकदृष्ट्या बराच गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक असणार्या या संशोधनक्षेत्रात प्रा. गोविंद स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांनी बरीच मोठी कामगिरी केली आहे. प्रा. गोविंद स्वरूप हे भारतातल्या रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते. स्टॅनफर्ड विद्यापीठातून १९६० साली पीएचडी केल्यानंतर ते १९६३ मध्ये भारतात परत आले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) रुजू झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली १९७० साली उटी येथील रेडिओ दुर्बीण आणि २००० साली खोडद येथील जीएमआरटी या भारताला अभिमानास्पद असलेल्या रेडिओ दुर्बिणी बांधल्या गेल्या. आज एक्क्याण्णवाव्या वर्षीही प्रा. स्वरूपांना रेडिओ खगोलशास्त्राबद्दल आणि विज्ञानप्रसाराबद्दल तितकीच आस्था आणि तितकाच उत्साह आहे.
प्रा. गोविंद स्वरूप
संदर्भ: http://www.eso.org
http://www.gmrt.ncra.tifr.res.in
http://www.ncra.tifr.res.in
https://www.miniphysics.com
https://en.wikipedia.org
आकाशाशी जडले नाते - प्रा. जयंत नारळीकर
प्रा. गोविंद स्वरूप सरांना
प्रा. गोविंद स्वरूप सरांना विनम्र आदरांजली _/\_
लोकसत्ता मधला लेख प्रेरणादाई आहे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
हा ही लेख आवडला. जुन्नरला
हा ही लेख आवडला. जुन्नरला जाताना यातल्या काही दुर्बिणी बघितल्याचे लक्षात आहे. मला आठवते त्यावरून याआधीही तेथे एक की दोन अशा दुर्बिणी होत्या. या लेखात लिहील्याप्रमाणे Y आकारात ज्या बनवल्या त्या बहुधा नंतर बनवल्या. पुणे विद्यापीठात असताना आमची ट्रीप जीएमआरटीला गेली होती तेव्हा बरीच माहिती मिळाली होती.
यात उल्लेख केलेली ती अरेसिबोची दुर्बिण नुकतीच कोसळली. जेम्स बॉण्डचा गोल्डन आय पाहिलेल्यांना त्यातील तो सीन लक्षात असेल.
सुंदर माहिती दिली आहे या लेखात. चित्रेही आवडली. ते वेव्हलेंथ, फ्रिक्वेंसी वगैरे कॉलेजात शिकलो त्यानंतर पुन्हा इतक्या डीटेल मधे पाहिले नव्हते. ती आकृती एकदम सोपे करून दाखवते ते.
जीएमआरटीच्या उद्घाटनाला आज
जीएमआरटीच्या उद्घाटनाला आज वीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त दोन दिवसांचा कार्यक्रम आज आणि उद्या आहे.
https://youtu.be/1DXRpMUX2v0
रेडिओ खगोलशास्त्राची ओळख या
रेडिओ खगोलशास्त्राची ओळख या विषयावर मी एक यूट्यूब व्हिडिओ तयार केला आहे. विज्ञान शाखेची फारशी पार्श्वभूमी नसणाऱ्या लोकांनाही या विषयाची ओळख व्हावी असा उद्देश आहे.
https://youtu.be/OUqk-DQ4ni0
अजून दोन तीन भाग करणार आहे.
थँक्यू वावे. आधी हा लेख वाचला
थँक्यू वावे. आधी हा लेख वाचला होता पण यूट्यूबमध्ये का कुणास ठाऊक जरा जास्त कळलं
तुझी समजावण्याची शैली छानच आहे आणि माझ्यासारख्या "लेट करंट"ला यूट्यूब रिवाईंड करून परत बघता येतं. 
अगदी अस्खलित आणि प्रत्येक
अगदी अस्खलित आणि प्रत्येक गोष्टीची कारणमिमांसा करत लॉजिकली वन स्टेप अॅट अ टाईम झालाय व्हिडिओ.
कुठली दुर्बिण कुठे असते, आणि विविध दुर्बिंणींची मुळात गरज का आहे हे फार मस्त समजावलं आहेस. मुलाला नक्की दाखवेन. पुढेमागे या व्हिडिओ खाली इंग्रजी सबटायटल्सचा विचार कर.
पुव्हिशु!
थँक्स सीमंतिनी आणि अमितव!
थँक्स सीमंतिनी आणि अमितव!
पुव्हिशु 
अगदी अस्खलित आणि प्रत्येक
अगदी अस्खलित आणि प्रत्येक गोष्टीची कारणमिमांसा करत लॉजिकली वन स्टेप अॅट अ टाईम झालाय व्हिडिओ. >> +१ छान झाला आहे व्हिडीओ!
पुव्हिशु ला ही +१
धन्यवाद फारएण्ड!
धन्यवाद फारएण्ड!
ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांनी कृपया काही सुधारणा हव्या असतील/ काही सूचना असतील तरी इथे किंवा तिथे नक्की सांगा, जसं वर अमितवने इंग्रजी सबटायटल्सचं सुचवलं आहे, तसं काही असल्यास.
दुसरा व्हिडिओ अपलोड केला आहे.
दुसरा व्हिडिओ अपलोड केला आहे.
या भागात रेडिओ दुर्बीण आकाराने नेहमीच्या ऑप्टिकल दुर्बिणीपेक्षा खूप मोठी का असते, यावर मुख्य भर आहे.
https://youtu.be/sq4JE9tDv2I
दुसरा व्हिडीयो पाहिला नाही
छानच की अजून माहितीचा दुसरा व्हिडीयो आला. (मी लिहीलेली सूचना दुसार्या भागा आहे. म्हणून संपादित केले
)
पहिल्या भागाप्रमाणेच
पहिल्या भागाप्रमाणेच माहितीपूर्ण भाग आहे.
धन्यवाद प्राचीन!
धन्यवाद प्राचीन!
काय सूचना होती?
सीमंतिनी
छान व्हिडिओ.
छान व्हिडिओ.
काही विशेष नाही - सुरूवातीला
काही विशेष नाही - सुरूवातीला learning objectives/outline किंवा व्हिडीयोत कसली माहिती आहे ते सांगणे असे सुचवले होते. पण ते दुसर्या व्हिडीयोत आहे. थँक्यू
ओके स्पार्कल, धन्यवाद!
ओके
स्पार्कल, धन्यवाद!
वावे, खूपच छान माहिती.
वावे, खूपच छान माहिती.
मला हा विषय नवीन आहे, त्यामुळे माझा प्रश्न कदाचित बाळबोध वाटेल , पण तरी विचारतो.
अँग्युलर रेझोल्युशन हे लहरी रेकॉर्ड करणार्या सेन्सरवर अवलंबून नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यांच्या बाबतीत किंवा कॅमेराच्या बाबतीत बोलायचं झालं, तर प्रतिमा ज्या पटलावर निर्माण होते, त्याचं रेझोल्युशन जितकं जास्त (मेगापिक्सेल का काय ते) तितके जास्त जवळ-जवळचे बिंदू स्पष्टपणे वेगवेगळे दिसू शकतात, नाही का? मग ह्या अवकाश दुर्बिणींना हा नियम लागू होत नाही का?
ह.पा, पोष्ट वायला नि आऊटपोष्ट
ह.पा, पोष्ट वायला नि आऊटपोष्ट वायला...
रिझोल्यूशन वेगळं आणि अँग्युलर रिझोल्यूशन वेगळं. कॅमेऱ्याचे मेगापिक्सेल्स वाढले की त्या सेन्सरचं रिझोल्यूशन वाढेल, पण जोपर्यंत लेन्स तीच आहे, तोपर्यंत अँग्युलर रिझोल्यूशन तेवढंच राहील. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची लेन्स छोटी असते, डीएसएलआर/मिररलेसची मोठी असते. त्यामुळे त्यांचं अँग्युलर रिझोल्यूशन वेगवेगळं असतं. (त्याच्याही पुढे जाऊन, त्यांची सेन्सर साईजही वेगवेगळी असल्यामुळे जरी मेगापिक्सेल्स सारखी असतील तरी इमेजची गुणवत्ता वेगवेगळी असते.)
पोष्ट वायला नि आऊटपोष्ट वायला
पोष्ट वायला नि आऊटपोष्ट वायला >> हा हा. आता आलं ध्यानात.
रोचक विषय आहे!
हा पण व्हिडिओ मस्त झाला आहे.
हा पण व्हिडिओ मस्त झाला आहे.
छोटे छोटे कन्सेप्ट फार छान समजावले आहेत.
जोवर भिंगाचा व्यास बदलत नाही तोवर अँग्युलर रेझोल्युशनच्या आतील गोष्टी एकाच बिंदूवर बिंब तयार करतील. मग भले त्या पटलाचं (डोळ्याचा पडदा, कॅमेराचा सेंसर इ.) रेझोल्युशन कितीही वाढवलं तरी त्या एकाच बिंदूवर बिंब तयार करत असल्याने ते वेगळं ओळखणं शक्य होणार नाही. पण भिंगाचा व्यास बदलला की ते दोन बिंदू एकमेकांपासून विलग होऊ लागतील. बरोबर ना?
बरोबर अमितव
बरोबर अमितव आणि थँक्स
इंग्रजीतून सबटायटल्स किंवा हाच व्हिडिओ इंग्रजीतूनही करण्याचा प्रयत्न करते.
छान आहे विडिओ. तो कथावाचनाचा
छान आहे विडिओ. तो कथावाचनाचा ऊपक्रम होता तेव्हाच. मला वाटलेले की मी म्हटलेले आपली शैली कार्यक्रमाचे निवेदन करणे वा असे समजावून उलगडून सांगणे या प्रकाराला सूट होते.
काही बेसिक कन्सेप्ट माहीत होते. थोडे आणखी कळले. शाळा कॉलेजमध्ये आपण बरेच काही असे शिकतो जे व्यवहारात नेमके कसे वापरले जाते हे आपल्याला माहीत नाही. शेवटी दुर्बिणी अश्या वेगवेगळ्या का असतात हे उत्सुकतेने ऐकायला गेलो तर ते पुढच्या भागात आले
लेख अजून पुर्ण वाचला नाही..
धन्यवाद ऋन्मेष.
धन्यवाद ऋन्मेष.
दुसरा भागही केलाय.
ओह ओके.. चेक करतो.. धन्यवाद
ओह ओके.. चेक करतो.. धन्यवाद
पाहिला.. समजला.. तिसऱ्याच्या प्रतीक्षेत..
बऱ्याच मराठी शब्दांचीही उजळणी झाली
अर्धा पाहिला दुसरा भाग - अकबर
अर्धा पाहिला दुसरा भाग - अकबर-बिरबल पर्यंत
अँग्युलर रिझोल्युशन खूप चांगल्या पद्धतीने समजावले आहे. छान आहे हा ही व्हिडीओ.
बाय द वे, ही भिंगे गोलाकार असतात का? चित्रात ए आणि बी या तार्यांचे किरण द्विमितीमधे आपण बघतो. पण असेच किरण त्या भिंगावर सर्व बाजूंनी पडत असतात. भिंग गोलाकार असेल तर एका तार्यातून आलेले सगळे किरण एकाच बिंदूवर एकत्र होतील बहुधा.
दुसरे म्हणजे रेडिओ लहरींच्या तरंगलांबींची सुद्धा रेंज आहे ना? मग अँग्युलर रिझोल्युशन हे त्या त्या लहरीप्रमाणे बदलेल असे दिसते. सहसा रिझोल्यूशन वगैरे गोष्टी या intrinsic असाव्यात - म्हणजे इतर गोष्टींवर अवलंबून नसणार्या. त्यामुळे हे वेगळे वाटते एकदम.
पोष्ट वायला नि आऊटपोष्ट वायला >>>
हे भारी आहे. ते शत्रूपक्ष मधे "मुदलातले घोडेच दिसत नव्हते तर त्यावर चढलेले हे व्याज कोठून दिसणार" हे ही अँग्युलर रिझोल्युशन मुळेच असावे 
हो, साध्या हौशी ऑप्टिकल
हो, साध्या हौशी ऑप्टिकल दुर्बिणीची भिंगं गोलाकार असतात.
भिंगं म्हणण्यापेक्षा खरं तर परावर्तक अंतर्वक्र आरसे (concave mirrors) जास्त सर्रास वापरले जातात. पण शेवटी अँग्युलर रिझोल्यूशनचं तत्व सारखंच.
रेडिओ दुर्बिणीच्या डिश या सामान्यतः parabolic reflector या प्रकारच्या असतात. चीनमधली जी ५०० मीटर व्यासाची नवीन रेडिओ दुर्बीण आहे, ती गोल परावर्तक आहे.
रेडिओ लहरींच्या रेंजमध्येही अँग्युलर रिझोल्यूशन वेगवेगळं असणार हे बरोबर आहे. आपल्याला कुठल्या तरंगलांबीच्या लहरींमध्ये वेध घ्यायचे आहेत (अवकाशातल्या कुठल्या प्रकारच्या वस्तूंचा/घटनांचा अभ्यास करायचा आहे) त्यानुसार दुर्बिणीचा आकार ठरवावा लागतो.
मुदलावर चढलेलं व्याज
हो हे अँग्युलर रिझोल्यूशनच!
मस्त चर्चा.
मस्त चर्चा.
मुदलावर चढलेलं व्याज >> इथे अँग्युलर आणि सेन्सरचं असं दोन्ही रेझोलुशन कमी असणार.
भिंग गोलाकार असेल तर एका तार्यातून आलेले सगळे किरण एकाच बिंदूवर एकत्र होतील बहुधा.>> फा, तू गृहीत धरतो आहेस की पटल हे फोकल पॉइंटवर आहे. तसं नसतं ना? फोकल पॉइंटवर सगळेच किरण एकत्र येतील, पण पटल त्याच्याही पुढे आहे. त्या फोकल पॉइंटमधून पुढे गेल्यावर जी प्रतिमा तयार होते (व्हर्चुअल), तिथे ते किरण पुन्हा वेगळे होतील. मग भिंग गोलाकार असो, दंडगोलाकार असो की पॅरॅबोलिक.
छान माहिती.
छान माहिती.
वावे
वावे
अत्यंत मुद्देसूद विवेचन! ही पोस्ट पूर्वी वाचली होती. आज मितीस मराठीत विज्ञानावर लिखाण करणारे कमीच. किचकट विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणारे तर हाताच्या बोटावर मोजावे अशी स्थिती. त्यामुळे आपली पोस्ट उठून दिसते. खगोलशास्त्रावर अजून लिहा.
ह.पा., भिंगाच्या नाभीवरच
ह.पा., भिंगाच्या नाभीवरच (फोकल पॉईंटवर) पटल असणार ना. त्याशिवाय स्पष्ट प्रतिमा कशी मिळणार? आपण भिंग उन्हात धरून कागद किंवा कापूस जाळण्याचा प्रयोग करतो, तेव्हा तो कागद भिंगापासून विशिष्ट अंतरावर असावा लागतो. तेच त्या भिंगाचं नाभीय अंतर.
भिंग घरात एखाद्या खिडकीसमोरच्या भिंतीजवळ धरायचं. नीट मागेपुढे करत, adjust करत खिडकी आणि बाहेरच्या दृश्याची बऱ्यापैकी स्पष्ट प्रतिमा (उलटी) मिळते. त्या विशिष्ट बिंदूच्या मागे किंवा पुढे भिंग हलवलं तर प्रतिमा स्वच्छ दिसत नाही, डिस्टॉर्ट होते.
लांबचा तारा असेल, तर तो आपल्याला बिंदूसारखाच दिसतो. पण सूर्याचा किंवा चंद्राचा फोटो काढला तर तो चकतीसारखा दिसतो. कारण आपल्या कॅमेऱ्याच्या अँग्युलर रिझोल्यूशनच्या मर्यादेत तो बसतो. अशा वेळी चंद्रावरच्या विवरांचे किती डिटेल्स आपल्याला दिसतील हे आपल्या कॅमेऱ्याच्या अँग्युलर रिझोल्यूशनवर अवलंबून आहे. जे जे बिंदू रिझॉल्व होतील ते दिसतील. त्याहून जवळजवळ असतील ते एकत्र दिसतील. प्रत्येक बिंदू हा एक प्रकाशाचा स्त्रोत समजायचा. (पॉईंट सोर्स)
वीरू, केशवकूल, मनापासून आभार!
Pages