छद्मविज्ञान चळवळ: भूमिका आणि मार्ग

Submitted by हर्षल वैद्य on 25 March, 2019 - 14:23

छद्मविज्ञान किंवा pseudoscience हा गेल्या काही वर्षांतील एक परवलीचा शब्द झाला आहे. विज्ञानाच्या प्रचलित परिघाबाहेर चालणारे कित्येक उपक्रम हे कसे शास्त्रीय आहेत याचे दावे आपण समाजमाध्यमांतून पाहत वाचत असतो. त्याचवेळी काही विशिष्ट गट हेच उपक्रम कसे अशास्त्रीय आणि म्हणून छद्मविज्ञान आहेत असा हिरीरीने प्रचार करत असतात. सर्वसामान्य व्यक्तींसाठी हे वरवर पाहता खरे ठरणारे दावे जेव्हा महनीय व्यक्ती जेव्हा छद्मविज्ञान म्हणून नाकारतात तेव्हा मनाचा गोंधळ होणे साहजिक आहे. अन्य विषयांमध्ये जेव्हा पारंपरिक माध्यमांची विश्वासार्हता फारशी उरलेली नाही तेव्हा या विषयात त्यांना प्रमाण मानावे काय हा संभ्रमही साहजिकच. त्यामुळे छद्मविज्ञान म्हणजे काय? त्यात आणि खऱ्या विज्ञानात फरक काय? सध्या जो छद्मविज्ञानाविरोधात प्रचार चालू आहे त्यातला खरेपणा किती आणि संधिसाधूपणा किती हे जोखायचे कसे? या विषयासंबंधात काही विवेचन करण्याचा आणि काही प्राथमिक मार्गनिश्चितीचा शक्य तितक्या वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही विचार या लेखाद्वारे आपण करण्याचा प्रयत्न करू.

विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न एका सर्वसामान्य व्यक्तीसाठी एका अर्थी फार सोपा आहे. शाळेत विज्ञानाचा म्हणून जो तास असतो त्या तासाला शिकवतात ते विज्ञान. विज्ञान विषयासाठी असलेल्या शालेय पुस्तकांमध्ये जे लिहिलेले असते ते विज्ञान.विज्ञानाची आवड असलेली मुले मग पुढे जाऊन अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र किंवा तत्सम विषय शिकतात. तेव्हा या सर्व शाखा - उपशाखा म्हणजे विज्ञानच.

असे काही विषय असतात जे विज्ञानाचे रूप घेऊन येतात. त्यात सूत्रे असतात, आकडेमोड असते, ठोकताळे असतात आणि कधी कधी त्यांचे प्रमाणही मिळते. मग असे सर्व विषय विज्ञानाच्या अंतर्गत येतात काय? उदाहरणार्थ अर्थशास्त्र हे विज्ञान म्हणून गणले जावे असे अनेक अर्थशास्त्री आणि तत्त्ववेत्त्यांचे मत होते. त्यात वरील सर्व गुणधर्म आहेत. त्याची विषयवस्तू निश्चित आहे. अभ्यासाचे मार्ग आणि साधनेही सुनिश्चित आहेत. पण मग अर्थशास्त्र हे विज्ञान का नाही? कारण अर्थशास्त्राची विषयवस्तू मुळात काल्पनिक आहे. ती आहे ‘ईकॉन’ नावाचा काल्पनिक तर्कजीव. हा प्राणी कायम फक्त तर्कसंगत विचार करतो. त्यावरच आधारित निर्णय घेतो. ईकॉन समाजात परस्पर व्यवहार हे फक्त तर्काधारित असतात. माणूस आणि मानवी समाज हा बराचसा या ईकॉन सारखा आहे. पण पूर्णपणे नाही. तो पूर्ण तर्कजीव नाही. मानवी निर्णय बरेचदा भावनेवर आधारित असतात, विशेषतः समूहामध्ये. अर्थशास्त्रास शेवटी उपयोजन महत्वाचे असल्याने ते मानवी स्वभावाच्या या पैलूस सुद्धा आपल्या परिघात सामावण्याचा प्रयत्न करते. आणि इथेच त्याचा विज्ञान म्हणून दावा बाद ठरतो.

फलज्योतिष या विवेचनात कुठे बसते? फलज्योतिषात कुंडली बनवण्याचे नियम आहेत. त्या नियमानुसार आडाखे बांधण्याची विशिष्ट सूत्रे आहेत. आणि वर्तवलेल्या भाकितांचा काही वेळेस प्रत्यय येतो. मग फलज्योतिष हे विज्ञान आहे काय? पाश्चात्य जगात विज्ञानाचे तत्वज्ञान या शाखेत विज्ञान म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा सतत ऊहापोह होत असतो. अर्वाचीन काळात कार्ल पॉपर या तत्वज्ञाने विज्ञान कशाला म्हणावे याविषयी काही नियम, सूत्रे सांगितली आहेत. तर या बाबतीत पॉपरचा एका नियम असे सांगतो की जे खोडता येण्याजोगे आहे ते विज्ञान. या कसोटीनुसार फलज्योतिष हे विज्ञानच, पण खोटे सिद्ध झालेले. मात्र त्यासाठी सूत्रे स्थिर हवीत, ज्योतिषीसापेक्ष नाहीत. प्रत्येक कसोटीसाठी सूत्रे बदलत राहिले तर ते विज्ञान नव्हे.

पण मग पदार्थरचनाशास्त्राचे काय? पंचमहाभूतांची भारतीय संकल्पना आणि चार एलिमेंट्सचा ग्रीक विचार इथपासून आजच्या स्टॅंडर्ड मॉडेल पर्यंत आपल्या पदार्थरचनेच्या आकलनात बराच फरक पडला आहे. आणि आजही आपले ज्ञान पूर्ण आहे असे नाहीच. मग खरे विज्ञान कुठले?आधीचे सर्वच चूक हे म्हणणे जरासे धार्ष्ट्याचेच ठरेल. सोने-तांबे-लोह असे काही नसतेच, क्वार्क आणि लेप्टॉन एका विशिष्ट स्थितीत आले की लोहाचा भास होतो आणि दुसऱ्या स्थितीत सोन्याचा. हे एका अर्थी कितीही जरी खरे असले तरी व्यवहारात इतक्या टोकाच्या अचूकतेचा काही उपयोग नाही. इथे आपण पॉपरचा नियम वापरून असत्य सिद्धांतांची फोलकटे टाकून दिली की सत्य सिद्धांतांचा एका प्रवाह आपणास दिसतो. सिद्धांत - भाकिते - प्रयोग - पुनः सिद्धांत असा विकासाचा क्रम इथे निर्माण झाला आहे. अगदी सुरुवातीची नागमोडी वळणे सोडल्यास गेल्या शतका - दीडशतकात विज्ञानाच्या जवळपास सर्व शाखांचा प्रवास असाच झालेला आपल्याला दिसतो. प्रचलित निरीक्षणांच्या आधारे सिद्धांत मांडायचा, त्या निरीक्षणांच्या मर्यादेपलीकडली भाकिते करायची, या भाकितांच्या सत्यासत्यतेविषयी अधिक अचूक निरीक्षणे करून पडताळा करायचा आणि तो चुकला तर सुधारित सिद्धांत मांडायचा. या मार्गाचे वैशिष्ट्य हे की तो तो सिद्धांत त्या त्या वेळच्या निरीक्षणांना साधारणपणे लागू असतोच. पूर्ण अचूकपणे नसू दे, पण त्या निरीक्षणांच्या आणि त्यांच्या उपयोजनांच्या मर्यादेत तो बरोबर असतो. त्यामुळे सुधारित सिद्धांतामुळे तो टाकाऊ होत नाही. मूलद्रव्ये आणि संयुगे रसायनशास्त्रासाठी पुरेशी असतात. भौतिकशास्त्राच्या कित्येक शाखा अणुसंरचनेच्या मर्यादेत आपले संशोधन करतात. आणि मूलभूत कणांच्या भौतिकीसारखी एखादीच शाखा स्टॅंडर्ड मॉडेलचा विचार करते.

या सर्व विवेचनामागचा मूळ उद्देश आधी म्हटल्याप्रमाणे विज्ञान आणि छद्मविज्ञान यातील भेद स्पष्ट करण्यासाठी पूर्वपीठिका आणि परिप्रेक्ष्य निर्माण करणे. विज्ञानाच्या विकासाचा हा प्रवाह लक्षात घेतला की छद्मविज्ञानाचा उगम लक्षात घेणे सोपे होईल. अन्यथा पृथ्वी सपाट आहे, गोमयापासून बनलेले किरणोत्सर्गविरोधी कवच, जीवोत्पत्ती ईश्वराने सहा दिवसात केली आणि सातवा रविवार त्याचा आरामाचा दिवस हे छद्मविज्ञान का आणि आईन्स्टाईनने चूक ठरवलेला असला तरी न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत योग्य विज्ञान का याचे विवेचन करणे कठीण आहे.

जरी बिनचूक, कोणतीही फट नसणारी व्याख्या करणे इथे अशक्य असले तरी सर्वसामान्य तर्कबुद्धीला पटतील असे निकष आपण या प्रश्नाला लावू शकतो. विज्ञानाच्या प्रगतीची एका रूढ वाट गेल्या अदमासे दीडशे वर्षांत रुळली आहे. या वाटेने मार्गक्रमण करताना एखाद्या वस्तुविषयाचे मानवी आकलन टप्प्याटप्प्याने विस्तारत गेले आहे. या मार्गावरील टप्पे म्हणजे आधीच्या सिद्धांतांची, ज्ञानाची सुधारित आवृत्ती आहे. याचाच अर्थ असा की मागचा सिद्धांत पूर्णपणे टाकाऊ नाही तर फक्त किंचित अपूर्ण आहे. त्या त्या टप्प्यावरील उपयोजनासाठी तो पूर्णपणे लागू आहे. अशा अपूर्ण सिद्धांतास छद्मविज्ञान म्हणणे योग्य नाही. म्हणून मूलद्रव्ये आणि संयुगांचा अभ्यास म्हणजे विज्ञान, अणुसंरचनेचा अभ्यास म्हणजे विज्ञान आणि मूलकणांचा अभ्यासही विज्ञानच.

मात्र काही वेळा अशा सिद्धांतांचा उदय होतो ज्यांची भाकिते प्राप्त परिस्थितीशी अजिबात जुळत नाहीत. जरी बलपूर्वक जुळवली तरी त्यापुढच्या टप्प्यावरील निरीक्षणांशी फारच फारकत घेतात. कितीही अधिकची जुळवाजुळव त्या सिद्धांताच्या अडचणीत भरच घालते. काहीवेळा निरीक्षणे नोंदवण्यात त्रुटी असतात, किंवा निरीक्षणे पूर्वीच मान्य झालेल्या सिद्धान्तांनी समजून घेता येतात. अशा प्रकारच्या सिद्धांतांना छद्मविज्ञान म्हणणे योग्य ठरेल. उदाहरणार्थ पृथ्वी सपाट आहे हे प्रतिमान जेव्हा मानव नुकताच शेती करायला शिकला होता त्या प्रगतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ठीक होते. मात्र आज अनेक निर्णायक प्रयोगांनंतर पृथ्वी गोल आहे असे सिद्ध झाल्यानंतर सपाट पृथ्वीच्या सिद्धांताचा पुरस्कार करणे हे छद्मविज्ञानच. ढोबळमानाने असे म्हणू शकू की वैज्ञानिक पद्धतींनी असत्य सिद्ध झालेला पण तरीही काही विशिष्ट हेतूंनी पुनःपुन्हा पुरस्कृत केला जाणारा सिद्धांत म्हणजे छद्मविज्ञान.

ह्या विवेचनावरून कदाचित असा ग्रह होऊ शकेल की छद्मविज्ञानाला ओळखणे हे अगदीच सरळ काम आहे. तर तसे मात्र नाही. वरील विवेचनात दोन प्रमुख त्रुटी आहेत. पहिली म्हणजे आजही कित्येक विज्ञानशाखांमध्ये प्रगतीची दिशा एकरेषीय नाही. मधेच असा एखादा अकल्पित शोध लागतो जो प्रचलित सिद्धांतांना पूर्णपणे हलवून टाकतो आणि बदलण्यास भाग पाडतो. ट्रान्झिस्टर, डी.एन.ए. रचना, हबलचा विश्वप्रसरणाचा नियम, कित्येक वैद्यकीय आणि औषधविज्ञानातील संशोधने या प्रकारात मोडतात. अशा एखाद्या मूलपरिवर्ती शोधानंतर त्या ज्ञानशाखेत काही काळ एक गोंधळ माजतो आणि परस्परविरोधी अनेक सिद्धांत उदयास येतात. काही पुढील कसोट्यांना टिकतात तर काही बाद होतात. मात्र या गोंधळाच्या कालखंडात यापैकी कोणत्याही एका सिद्धांतास छद्मविज्ञान म्हणणे, विशेषतः दुसरा एखादा सिद्धांत तुमचा आवडता आहे म्हणून, हे चूक ठरेल.

दुसरी त्रुटी अशी की ही मांडणी ढोबळमानाने गृहीत धरते कि विज्ञानाच्या सर्वच शाखांमध्ये ही चक्राकार प्रक्रिया अनेक वेळा घडली असून आता त्यात बऱ्यापैकी समानपणे स्थिरावलेपण आले आहे. पण वस्तुस्थिती संपूर्णपणे याविपरीत आहे. काही शाखा प्रगतीच्या फारच पुढच्या पायरीवर आहेत आणि त्यांत मूलपरिवर्ती शोधांची शक्यता फार कमी आहे. याउलट काही ज्ञानशाखा एखाद्या विशिष्ट मूलपरिवर्ती शोधातून किंवा इतर प्रकारे इतक्या नुकत्या सुरु झाल्या आहेत की त्यांच्या प्रगतीची वाट अजूनही फारच नागमोडी आहे. अशा तौलनिकदृष्ट्या अप्रगत शाखांमध्ये छद्मविज्ञान कोणते याचा निवाडा तुलनात्मक रित्या आजघडीला कठीण आहे.

या सर्व चर्चेला एका अधिकचा आयाम निर्माण होतो तो म्हणजे मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान किंवा तंत्रज्ञान यातील फरकाचा. जरी दोन्ही विज्ञानच तरी दोन्हीची विकासरेषा आणि त्यामागची कारणे भिन्न असतात. मूलभूत विज्ञानशाखांचा विकास हा बरेचदा ज्ञानलालसेतून होतो. एखादी विषयवस्तू अधिक खोलात जाणून घ्यायची आहे एवढेच कारण त्यासाठी पुरेसे असते. उपयोजित विज्ञानाला मात्र नावाप्रमाणे काही मानवी उपयोजन असते. ते उपयोजन अधिकाधिक अचूकपणे, सहजगत्या, कमी खर्चात इत्यादी गुणांसहित करता यावे हीच त्या विज्ञानशाखेची दिशा असते. उपयोजित विज्ञान हे एक किंवा अधिक मूलभूत विज्ञानांची उपशाखा असते. असेही बरेचदा घडते की ही शाखा मूलभूत विज्ञानाच्या एखाद्या मागच्या टप्प्यापासून सुरु होते कारण तिच्या उपयोजनाचे क्षेत्र हे त्या टप्प्याच्या क्षेत्राइतकेच मर्यादित असते. कित्येक अभियांत्रिकी शाखा न्यूटनचे गतीचे नियम वापरतात, पण भौतिकशास्त्र मात्र सापेक्षता सिद्धांताचा वापर गेली शंभर वर्षे करत आहे. उपयोजित विज्ञानाचे लक्ष्य हे दिलेल्या मर्यादेत असल्याने तिथे तार्किक विसंगती वगैरेची अडचण जाणवत नाही. फ्रिजच्या आतील तापमान आणि त्याच्या वीजवापराची कार्यक्षमता यांच्या संबंधांचे सूत्र -२१० अंश सेल्सिअस तापमानात, जिथे नायट्रोजन गोठतो, तिथे लागू आहे काय हा प्रश्नच गैरलागू आहे. उपयोजित विज्ञानाच्या उपयोगित्वाच्या कसोटीमुळे इथे छद्मविज्ञानाचा प्रश्न वास्तविक तितक्या गंभीरतेने उद्भवू नये. पण तो उद्भवतो तो मूलतः मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान यांचा परस्परसंबंधातून. कधीकधी मूलभूत विज्ञानाच्या विविध टप्प्यांवरील सिद्धान्तांतून निर्माण झालेले प्रवाह एकाच उपयोजित विज्ञानशाखेत समांतरपणे वाहू लागतात. त्यातील एखादा कालांतराने तत्कालीन कसोट्यांनुसार अधिक कार्यक्षम ठरतो. अशा वेळी असा समज पसरायचा धोका असतो की दुसरे इतर प्रवाह म्हणजे छद्मविज्ञान. ही समजूत चुकीची असू शकते. कमी कार्यक्षमता हा छद्मविज्ञानाचा निकष नव्हे. मुख्य म्हणजे उपयोजित विज्ञानाबाबतीत ‘हा सूर्य हा जयद्रथ’ अशी उपयोगित्वाची कसोटी लावता येत असल्याने त्याचा निवाडा सहज करता येतो. वेदांतील विमानविद्येचा कितीही बोलबाला केला तरी कुठला तंत्रज्ञ त्यानुसार विमान बनवायला जात नाही. आणि गेलाच तर जाऊ दे. ते विमान प्रत्यक्ष उडवून दाखवल्याशिवाय त्यात कोणी बसणार आहे थोडेच?

मूलभूत विज्ञानाचे मात्र इतके सोपे नाही. प्रत्यक्ष प्रयोगाची कसोटी तिथेही असली तरी ती सर्वसामान्यांना करून बघण्यास सहज उपलब्ध नाही. दीर्घ सिद्धांतावलीनंतर येणारा एखादा निष्कर्ष चुकला की नेमकी कोणत्या पायरीवर चूक झाली हे ठरवण्याचा मापदंड त्यांच्याकडे नाही. ही परिस्थिती छद्मविज्ञानाच्या निर्मितीकरिता फारच पोषक आणि समाजास फारच घातक. कारण मुळात सांगितले जाणारे विज्ञान हे छद्मविज्ञान आहे हे कळण्याचा त्यांच्याकडे काही मार्गच नाही. एकदा अशा चुकीच्या समजुती समाजात घट्ट झाल्या की किती भीषण प्रकार ओढवू शकतात हे पाहायचे असेल तर मध्ययुगीन युरोपातील चेटकीण जळीत प्रकरण पहा. किंवा आजघडीच्या अमेरिकेतील उत्क्रांतीवादाऐवजी बायबलमधील जेनेसिस शाळेत शिकवायची मागणी. या अशा छद्मविज्ञानांनी समाजाची जी दीर्घकालीन हानी होईल तिचे आजघडीला साधे मोजमापही अशक्य.

याउलट उपयोजित विज्ञानाचे. अनेक सद्य प्रचलित प्रवाहांपैकी उद्या कोणता छद्म ठरेल हे सांगणे अवघड. पण पडताळणे अगदी सोपे. जे चालते ते बरोबर. म्हणजे मूलभूत विज्ञानाच्या अगदी विपरीत परिस्थिती. तिथे सांगणे सोपे पण पडताळणे अवघड. दुसरे असे कि उपयोजित विज्ञानामध्ये इतक्या मूलभूत ज्ञानशाखांचा संगम असतो की त्यातील छद्म ओळखण्यास तसा बहुआयामी तज्ज्ञ मिळणे अवघड. दुर्दैवाने गेल्या शतकाचा इतिहास असे सांगतो की हे आडाखे नेहमीच बरोबर ठरलेले नाहीत. दीर्घकालीन उपयोजनासाठी उपयोजित विज्ञानाचा कोणता प्रवाह अधिक कार्यक्षम ठरेल याचे निकष जर चुकले तर सर्वच गणिते कोलमडतात. मात्र अशा वेळी दुसरा एखादा जुना प्रवाह पुन्हा मुख्य प्रवाह म्हणून स्थिरपद होण्याइतका सक्षम राहिलेला नसतो. आपण बघतो की रासायनिक शेतीचे दुष्परिणाम ढळढळीत दिसत असले तरी सेंद्रिय शेतीकडे एक समाज म्हणून एकसंधपणे वळणे आपणास किती कठीण जात आहे.

अशा विविध आयामांमुळे छद्मविज्ञानाविरुद्ध चळवळ उभारताना काळजी घ्यायला हवी. मुळात हे मान्य करू की कोणतेही छद्मविज्ञान चूकच. कोणत्याही विज्ञानशाखेशी संबंध सांगणारे छद्मविज्ञान अशा चळवळीच्या कक्षेत यायला तत्वतः काहीच हरकत नाही. पण व्यवहारात हे पहायला हवे की ती विज्ञानशाखा किंवा प्रवाह निर्विवादपणे छद्मविज्ञान सिद्ध झाले आहे काय? दुर्दैवाने जगात असे अनेक गट आहेत जे आर्थिक, सामाजिक वा वैचारिक भूमिकेच्या भिन्नत्वामुळे विशेषतः उपयोजित विज्ञानातील विरुद्ध प्रवाहांना छद्मविज्ञान घोषित करण्याची धडपड करतात. एकीकडे आयुर्वेदावर टीका करतात तर दुसरीकडे हळदीचे पेटंट घ्यायचा प्रयत्न करतात. अशा छद्मतज्ञांच्या आणि छद्मविचारकांच्या दाव्यांकडे फार बारकाईने पाहिले पाहिजे.

मात्र हा विवेक करायचा कशाच्या आधारावर? सर्वसामान्यांसाठी सर्वच तज्ज्ञ. अशा वेळी निर्णय करण्यासाठी वेगळ्याच कसोट्या वापरल्या पाहिजेत. आणि अशी कसोटी असू शकते समाजावरील प्रभावाची किंवा दूरगामी परिणामांची. मुळात एखादे सर्वांना मान्य असेल किंवा निर्विवादपणे सिद्ध झालेले असेल असे छद्मविज्ञान छद्म आहे यासाठी पुन्हा कोणत्याही चाचणीची गरजच नाही. आधी पाहिल्यानुसार मूलभूत विज्ञानात अशी परिस्थिती अधिक प्रमाणात उद्भवते. कुठल्याही समाजगटाद्वारे असे कोणतेही छद्मविज्ञान प्रमाणभूत करण्याचा, विशेषतः शिक्षणात अन्तर्भूत करण्याचा प्रयत्न छद्मविज्ञानविरोधी चळवळीचे मुख्य लक्ष्य हवे.

पण उपयोजित विज्ञानात असे दावे असतील, किंवा विद्वानांत दुमत असेल तर त्यासाठी वेगळा विचार हवा. अशी परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली जायला हवी. पहिले तर अशा विचाराला प्रत्यक्ष प्रमाणाची संधी देऊन छद्म-सत्य सिद्धतेची कसोटी घ्यायला हवी. प्रा. नारळीकरांनी केलेल्या फलज्योतिषविषयक प्रयोगांचे उदाहरण येथे बघता येईल. पण असे छद्मत्व सिद्ध न झाल्यास आपल्या मताविरोधी दुसरा प्रवाह हाही खरा असू शकतो हे मान्य करणे हाच खरा वैज्ञानिक दृष्टीकोण. आपला मार्ग आपल्या मते श्रेष्ठ असू शकतो, पण त्याचा अर्थ (आपल्या मते) दुसरा मार्ग कनिष्ठ आहे, असत्य नाही. तेव्हा आपली भूमिका एकदा मांडून विषय तिथेच सोडणे श्रेयस्कर. विशेषतः आपणास चांगले व्यासपीठ उपलब्ध आहे म्हणून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत रहाणे हे नुसते चूकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या गर्हणीयसुद्धा आहे. असे करताना आपण एखादा नवीन विचार, विशेषतः उपयोजित विज्ञानातला, कदाचित मुळातच खुडून टाकत आहोत याची जाणीव ठेवायला हवी. आपल्या कृतीने आपण कदाचित जे अपुऱ्या साधनांनिशी अगदी प्राथमिक संशोधने करतात त्यांना नाउमेद करू शकतो. आज आपल्याला दिसणारा विज्ञानाचा डोलारा हा अगणित छोट्या प्रवाहांनी हजारो वर्षे समृद्ध होत आला आहे याचे भान ठेवायला हवे.

सारांश हा की छद्मविज्ञानविरोधी चळवळ चालवताना फार सजग राहायला हवे. कुठलेही छद्मविज्ञान चूकच, पण आपण कोणत्याही अभिनिवेशाच्या प्रभावाखाली एका सत्य विचाराला विरोध करत नाही ना हे सतत तपासायला हवे, विशेषतः उपयोजित विज्ञानांसाठी. चळवळ उभारताना तरतमभाव पाळायला हवा. त्यात समाजावरील सर्वांगीण दूरगामी परिणामाचे तत्व कायम दंडक म्हणून वापरायला हवे. चळवळ मूळ ध्येयापासून भरकटत नाही ना याविषयी सजग राहायला हवे. अंतिमतः तथ्याधारित भूमिका हाच कोणत्याही विज्ञानविषयक चळवळीचा एकमेव पाया हवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लेख. योग्य वेळी (समायोचित?) लिहिला आहे.
लेख पूर्णपणे मराठीत असूनदेखील क्लिष्ट नाही वाटत, उपयोजित शब्द ओढून ताणून मराठीकरण केलेले नाही वाटत. कौतुक आहे लेखकाचे!

सर्वांना धन्यवाद.

समयोचित म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे ते कळले नाही. पण लेख विज्ञानदिनानिमित्त लिहिला होता. काही कारणांनी टाकण्यास उशीर झाला.

या विषयावर दिलेली मागील एक प्रतिक्रिया-
खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो.
जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही लोक मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत.

>>जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही लोक मांडत असतात.<<
इथे वैज्ञानिक ऐवजी विज्ञानवादि हवं. विज्ञानवादि व्हायला वैज्ञानिक होणं जसं जरुरी नाहि, तसंच वैज्ञानिकांनी विज्ञानवादि असणं हे बर्‍याचदा पहाण्यात येत नाहि. थोडक्यात वैज्ञानिक आस्तिक असो वा नसो, विज्ञानवादि मात्र नास्तिक असतोच...

या लेखातल्या काही बाबी खटकल्या. लेखही विस्कळीत आणि गोंधळलेला वाटला. आणि काही बाबी कळल्या नाहीत.

वेळ मिळेल तसे मुद्दे लिहितो.

१. ट्रान्झिस्टर, हबलचा सिद्धांत हे 'शोध' अकल्पित कसे? मुळात कोणताही शोध 'अकल्पित' कसा असतो?

२. आयुर्वेदाला विरोध आणि हळदीचं पेटंट हे उदाहरण गंमतशीर आहे. बहुसंख्यांचा विरोध हा आयुर्वेदाचा वापर वैज्ञानिक कसोट्यांवर आधारलेला नाही, या बाबतीत आहे. त्याचा हळदीचे पेटंट घेण्याशी नक्की काय संबंध? भारतातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये आयुर्वेदिय ग्रंथांमधल्या माहितीचा वापर करून औषधं किंवा नवी संयुगं तयार करण्याचं काम अनेक वर्षं सुरू आहे. ज्या सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी हळदीचे पेटंट घेण्यासाठी पुढाकार घेतला, त्याच सीएसआयआरच्या या प्रयोगशाळा आहेत. बाकी हळदीचे पेटंट ही एक निराळीच गंमत होती. या लेखात तिचा उल्लेख झालेला बघून मजा वाटली.

३. <आपली भूमिका एकदा मांडून विषय तिथेच सोडणे श्रेयस्कर. विशेषतः आपणास चांगले व्यासपीठ उपलब्ध आहे म्हणून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत रहाणे हे नुसते चूकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या गर्हणीयसुद्धा आहे.> हे गर्हणीय का? प्रत्येकाने आपल्याला काय करायचे आहे, हे ठरवावे. एकदा बोलून गप्प बसावे की दोनदा बोलावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न.

आणि असे केल्याने <असे करताना आपण एखादा नवीन विचार, विशेषतः उपयोजित विज्ञानातला, कदाचित मुळातच खुडून टाकत आहोत याची जाणीव ठेवायला हवी. आपल्या कृतीने आपण कदाचित जे अपुऱ्या साधनांनिशी अगदी प्राथमिक संशोधने करतात त्यांना नाउमेद करू शकतो. आज आपल्याला दिसणारा विज्ञानाचा डोलारा हा अगणित छोट्या प्रवाहांनी हजारो वर्षे समृद्ध होत आला आहे याचे भान ठेवायला हवे.> हे कसे होईल, हे कळले नाही.

४. <पूर्ण अचूकपणे नसू दे, पण त्या निरीक्षणांच्या आणि त्यांच्या उपयोजनांच्या मर्यादेत तो बरोबर असतो. त्यामुळे सुधारित सिद्धांतामुळे तो टाकाऊ होत नाही. मूलद्रव्ये आणि संयुगे रसायनशास्त्रासाठी पुरेशी असतात. > हेही कळले नाही.

सूडोसायन्स

लेख जरा क्लिष्ट वाटला. (समजायला कठीण). उपयोजित विज्ञान म्हणजे काय? इंग्रजीत सांगू शकाल का?

<<< आईन्स्टाईनने चूक ठरवलेला असला तरी न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत >>>
न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत चूक ठरवला गेला नाही, त्याच्या मर्यादा होत्या त्या सुस्पष्ट केल्या. मर्क्युरीच्या भ्रमणकक्षेतील चूक न्यूटनच्या सिद्धांताने सांगता येत न्हवती, ती आईन्स्टाईनने स्पष्ट करून दिली.

तसेच वस्तूचा वेग सूर्यप्रकाशाच्या वेगाच्या जितका जवळ जाईल, तेव्हा न्यूटनचा वस्तुमानाचा सिद्धांत काम करत नाही म्हणून त्याची सुधारित आवृत्ती आईन्स्टाईनने दिली. सूर्यप्रकाशाच्या वेगापेक्षा अतिशय-कमी वेग असेल तर न्यूटनचा सिद्धांत बरोबर उत्तरे देतो.

चिनुक्स, लेखातल्या ज्या प्रमुख बाबी खटकल्या त्या स्पष्ट लिहिल्यात ते बरे झाले. अशा टीकेतूनच माझे विचार मलाच अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल. जमतील तशी आक्षेपांची उत्तरे देतो.

१. अकल्पित शोध यात असे अभिप्रेत आहे की मूळ प्रयोगाच्या उद्दीष्टापेक्षा अगदी भलती निरीक्षणे मिळाल्याने लागलेले शोध. ज्याला ईंग्रजीत सेरेंडिपिटी म्हणता येइल. असेही शोध अभिप्रेत आहेत ज्यांचे सैद्धांतिक स्पष्टीकरण प्रचलित सिद्धांताची व्याप्ती वाढवून शक्य नाही. (कदाचित एखाददुसरे उदाहरण चुकले असेल)

२. हळदीच्या पेटंटच्या निराळ्याच गमतीबद्दल ऐकायला आवडेल. उदाहरणाचा रोख पाश्चात्य देशांतून केल्या गेलेल्या प्रयत्नांविषयी होता. तुम्ही म्हणता ती गंमत माहीत नसल्याने उदाहरण गंडलेले असू शकेल.

२अ. (हा प्रश्न आहे) आयुर्वेदाला विरोध हा त्या मूळ शास्त्राला नसून त्याच्या सद्ध्याच्या काहीशा अप्रमाणित स्वरूपाला फक्त आहे असे बहुसंख्यांचे म्हणणे आहे काय? (इथे बहुसंख्य याचा अर्थ विरोध करणार्‍यांतील बहुसंख्य असा घेतला आहे. मुळात तो तुम्हाला तसाच अभिप्रेत आहे काय?)

३. कसे आहे, अनेक कारणांमुळे कधीकधी अनेक सत्य पर्यायांपैकी एखाद्या पर्यायाची भलावण एखाद्या अशा गटाकडून होते ज्यांचा जनमानसावर प्रभाव आहे. दुसर्‍या पर्यायांचा असा प्रभाव क्षीण असतो. पण म्हणून ते चुकीचे नसतात. अशा वेळी मिळेल त्या व्यासपीठावर आपलेच रेटत राहणे योग्य का सर्वांना समान संधी? जर एखादा पर्याय फारच कमकुवत असेल तर तो आपोआपच मागे पडेल. पण त्या मागे पडण्याची कारणे वैज्ञानिक हवीत, गटबाजी (लॉबिंग वगैरे) नको. आता असे एखादे ग्रामीण तंत्रज्ञान वगैरे गटबाजीत मागे पडले तर त्या संशोधकांचा काय उत्साह राहणार नाही का? जरी मूलभूत विज्ञानाचे शोध हे बहुतांश वेळा प्रथितयश संस्थांमध्येच लागत असले तरी तंत्रज्ञानाचे तसे नाही.

४. हे एक उदाहरण आहे. पुढच्या पायरीवरचे शोध हे आधीच्या शोधांचे (बहुतांशवेळा) सैद्धांतिक विस्तृतीकरण करून लावले जातात. त्यामुळे आधीचे सिद्धांत त्यांच्या उपयोजनाच्या मर्यादेत बरोबर असतात (उदा. न्यूटनचे गतीचे नियम). सामान्य भाषेत उदाहरणे आणताना कधी कधी खूप अचूकपणा राखणे कठीण जाते.

पुढचे मुद्दे नक्की लिहा. तुमच्यासारख्यांच्या प्रतिक्रिया विचार पुढे नेतात. जमेल तशी उत्तरे लिहीनच.

<<< अनेक सत्य पर्यायांपैकी एखाद्या पर्यायाची भलावण एखाद्या अशा गटाकडून होते ज्यांचा जनमानसावर प्रभाव आहे. दुसर्‍या पर्यायांचा असा प्रभाव क्षीण असतो. >>>
"अनेक पर्याय" समजू शकतो, पण "अनेक सत्य" पर्याय म्हणजे काय? एखादे उदाहरण देऊ शकाल काय?

सत्य हे ऐकच असत आणी ते 100% सत्यच असत
अर्धसत्य , चतकोर सत्य असे प्रकार नसतो .
जे अंतिम निष्कर्ष सत्य म्हणून स्वीकारलेले असेल आणि ते सत्य काही वर्षानी चुकीच ठरले तर आपण चुकीच्या गोष्टीला सत्य समजत होतो
त्या मुळे कोणत्याही शोधाचा निष्कर्ष काढतांना हेच अंतिम सत्य आहे अशी भाषा नसावी

विज्ञानवादि मात्र नास्तिक असतोच...>> म्हणजे जो विज्ञानवादी नाही तो नास्तिक नाही. संदर्भित उल्लेखातील चर्चा वैज्ञानिकां बद्दल होती म्हणून मला स्पेसिफिक वैज्ञानिक असेच म्हणायचे होते.

Nastik आस्तिक असे काही नसते नास्तिक लोकांची एक ढोबळ मत आहे देवा वर विश्वास ठेवत नाही ते नास्तिक . देव मानवी शक्तीच्या पलीकडले शक्ती आहे पण रोजच्या जीवनात काही ही हमी नसताना लोकांवर विश्वास ठेवावच लागतो .exa गाडीत बसल्यावर ड्रायव्हर वर ते सुधा आस्तिक panachach उदाहरण आहे

विज्ञानवादि मात्र नास्तिक असतोच...>> म्हणजे जो विज्ञानवादी नाही तो नास्तिक नाही.

हा निष्कर्ष का काढताय प्रकाश? खालचं वाक्य वचुन बघा बरं
ससा मात्र प्राणी असतोच...>> म्हणजे जो ससा नाही तो प्राणी नाही.

{
>>जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही लोक मांडत असतात.<<
इथे वैज्ञानिक ऐवजी विज्ञानवादि हवं. विज्ञानवादि व्हायला वैज्ञानिक होणं जसं जरुरी नाहि, तसंच वैज्ञानिकांनी विज्ञानवादि असणं हे बर्‍याचदा पहाण्यात येत नाहि. थोडक्यात वैज्ञानिक आस्तिक असो वा नसो, विज्ञानवादि मात्र नास्तिक असतोच...

Submitted by राज on 27 March, 2019 - 21:06
} +१

प्रुथ्वी किंवा सूर्यमालेतील ग्रह आणी तारे ह्याच परिघात निरीक्षन करून बनवले ले physics चे नियम पूर्ण ब्रह्मण्डल लागू आहेत असे समजणे हे सुधा sudoscience च आहे .

  • जगात देवावर विश्वास आहेच हे छातीठोक सांगणारा म्हणजे आस्तिक ( Theism मानणारा).
  • जगात देवावर विश्वास नाहीच हे छातीठोक सांगणारा म्हणजे नास्तिक ( Atheism मानणारा).
  • जगात देव आहे की नाही, हे नक्की माहीत नाही किंवा नक्की सांगता येणार नाही असे सांगणारा म्हणजे अज्ञेय (Agnosticism मानणारा)
  • जगात देव असो किंवा नसो, कुणाला पर्वा आहे, आयुष्यात काय फरक पडणार आहे असे मत असणारा म्हणजे Apatheism मानणारा. It is more of an attitude rather than a belief, claim, or belief system.

आता विज्ञानवादी व्यक्तीला कुठे बसवायचे ते बघा.

<<< प्रुथ्वी किंवा सूर्यमालेतील ग्रह आणी तारे ह्याच परिघात निरीक्षन करून बनवले ले physics चे नियम पूर्ण ब्रह्मण्डल लागू आहेत असे समजणे हे सुधा sudoscience च आहे . >>>
खूप विनोदी वाक्य. सुडोसायन्स काय ते समजण्यासाठी मी वर दिलेला व्हिडिओ कृपया एकदा बघावा.

विज्ञानवादी कोणाला म्हणायच हाच तर खरा प्रश्न आहे. ते काही कोणी एक व्यक्ती ठरवत नाही ती संकल्पना आहे. शव्दोच्छल करुन त्याच्या छटा बदलत असतात. रिचर्द डॉकिन्स च्या गॉड डिल्युजन मधे मुग्धा कर्णिकांनी सुंदर मराठी अनुवाद करुन या छटा दाखवल्या आहेत. वर व्यत्यासाचे उदाहरण दिल आहेच. हा विषय शतकानुशतके चिवडला गेला आहे. डॉकिन्सला केवळ नास्तिक विज्ञान वादी नको आहे तर कठोर नास्तिक विज्ञानवादी हवे आहेत.तो इतरांना तुच्छ लेखतो.

उपाशी बोका नास्तिक व निरिश्वरवादी यात फरक केला गेला आहे. वेदप्रामाण्य न मानणारा तो नास्तिक व ईश्वर ही संकल्पना ( मग ती कोणत्याही स्वरुपात असो) वास्तवात आहे असे न मानणारा तो निरिश्वरवादी. अर्थात ही तत्वज्ञानातील चिरफाड आहे

उपाशी बोका: व्हिडिओसाठी धन्यवाद.

अनेक सत्य पर्याय म्हणजे काय म्हणायचे आहे ते थोडे स्पष्ट करतो. आपण विंचुदंशावरील डॉ. बावस्करांच्या कामाचे उदाहरण घेऊ. विंचुदंशावर प्रतिविष आहे आणि डॉ. बावस्करांचा रक्ताभिसरण संस्थेच्या बिघाडावर काम करणारा उपायही आहे (संदर्भः विकि). दोन्ही पर्याय वैज्ञानिक्दृष्ट्या सत्यच आहेत. त्यापैकी आपल्यासमोरील रुग्णासाठी कोणता योग्य (आणि कोणता व्यवहार्य किंवा शक्य) ते त्या डॉक्टराने ठरवायचे. पण जर बावस्करांच्या उपायाची नीट शहानिशा न करता त्यास छद्मविज्ञान ठरवले असते तर दुर्दैवाने ते संशोधन मागे पडले असते. असे प्रयत्न झाल्याचे अवचटांच्या पुस्तकात ओझरते उल्लेख आहेत. (लॅन्सेटमधे छापून आले आहे एवढे पुरेसे असतेच असे नाही).

दुसरे उदाहरण आजच सकाळमधे वाचले ते रासायनिक कीटकनाशकांबद्दलचे. रासायनिक आणि जैविक दोन्ही कीटकनाशके कीटकनाशनाचे काम करतात. म्हणजे दोन्ही पर्याय सत्यच. रासायनिक पर्याय मूळ कामात अधिक प्रभावी असेल, पण म्हणजे जैविक पर्याय चूक ठरत नाही. त्या दोन्ही पर्यायांचा सर्वांगीण विचार केल्याशिवाय त्यातील एक स्वीकारणे कठीण. आणि मुख्य म्हणजे तुम्ही कोणताही एक स्वीकारा, दुसरा खोटा ठरल्याचा प्रचार करणे गैर.

अशी अनेक सत्य पर्यायांची उदाहरणे उपयोजित विज्ञानातच अधिक प्रमाणात आढळतात असे वाटते.

पूर्ण जगात किती वर्षाच्या अनुभवातून
अगदी हवामान .दुष्काळ .जमिनी खाली पाणी आहे की नाही आरोग्य , बांधकाम शास्त्र
असे खूप माहितीचा खजिना आहे पण सिध्द करता येत नाही पण अंतिम रिज़ल्ट जवळ जवळ बरोबर असतो .
त्या कडे कोणत्या द्रुष्टीने bagnar