वणी - दिंडोरी च्या वाटेवरील झालेल्या संघर्षांत मुघल सेनेच्या वाताहतीमुळे महाराज उत्साहित झाले असावेत. मुघलांच्या सैन्याला पुन्हा जोमाने लढायला तयार करायला नंतर तीन ते चार महिन्याचा कालखंड लागला असावा. त्या दरम्यानच्या वेगवान घडामोडींच्या तपशीलातून महाराजांच्या आधीच्या समरापेक्षा ह्या मोहिमा बदलत्या रणतंत्रामुळे जास्त धीट, प्रहारशील आणि मुघलांच्या संघर्षाची मानसिकता (विल टू फाईट) नष्ट करायला कारणीभूत झाल्या असाव्यात हे जाणवते. खुद्द महाराजांच्या आणि प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंद राव मकाजींच्या सारख्या धडाडीच्या सेनानायकांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने वेगवेगळ्या दिशांनी केलेल्या चढाया, जिंकलेले किल्ले आणि ४३० किमी अंतरावर कारंजा (लाड) या बाजारपेठेतजाऊन कदाचित सुरतपेक्षा जास्त मौल्यवान वस्तू हस्तगत करता आल्या असाव्यात. इतक्या लांब पल्ल्याची मोहीम हाती घेण्याचे धाडस उत्पन्न व्हायला काय तात्कालिक घटना घडल्या असाव्यात.
महाराजांनी मुगलांच्या सैनिकी संचलनाची, लढाईच्या तंत्राची बारीक माहिती करून घेऊन आपले रण तंत्र बनवले असावे. प्रथम मुघलांच्या सैनिकी संचलनाची ओळख करून घेतली तर कांचनबारीतील हुलकावणी व नंतर झालेल्या चकमकीतून झालेल्या त्यांच्या जबरदस्त हानीची कारणे समजून घ्यायला सोईचे होईल.
मुघलांच्याकडून लढाईची सुरवात तोफा, बंदुका आणि दारूचे बाण यांच्या माऱ्याने होत असे. काही वेळा नंतर कोणीतरी एका फौजेतील एखादी तुकडी पुढे चालून जात असे. घोडेस्वारांजवळ बाण असत आणि पुढे दौडत असताना ते बाण सोडत असत पण मुख्य भार धक्का तंत्रावर असे. त्या बाणांचा उद्देश समोरच्या सैनिकांचे घाबरवून मनोबल खच्ची करणे असा असावा. मात्र नेम लागून सैनिक मेला किंवा जखमी असे होत नसल्याने या हत्याराचा फारसा परिणाम होत नसावा, दहापैकी नऊ बाण शत्रूच्या सैनिकांच्या डोक्यावरून जात किंवा अलिकडे पडत असत. सामूगड लढाईतील वर्णनातून हे पटकन लक्षात येते.
काही वेळानंतर जरांधार किंवा बरांधार पैकी कोणत्यातरी बाजूची एखादी तुकडी पुढे चालून जात असे. पण मुख्य भर धक्कातंत्रावर असे. स्वार शत्रूला भिडताच तलवारी, भाले,इत्यादी शस्त्रांनी हातघाईची लढाई सुरू होई. एका तुकडीपाठोपाठ इतरही तुकड्या हातघाईत सामील होत. या हातघाईवरच लढाईचा अखेरचा निर्णय होत असे. हरणाऱ्या फौजेत पळ सुरू होई आणि तिची छावणी विजयी फौजे कडून लुटली जाई.
समोरासमोर उभे ठाकून केलेल्या लढायांमध्ये अदिलशाही आणि कुत्ब फौजांचे रणतंत्र मुघल फौजांसारखेच सारखेच होते. पण मुघल फौजेविरुद्ध - बहुधा मुघलांकडे संख्याधिक्य असल्यामुळे आणि त्यांचा तोफखाना व त्यांचे घोडे सरस असल्यामुळे - निजामशाही, आदिलशाही व कुत्बशाही फौजा सहसा समोर उभ्या ठाकून लढाई करत नसत. मुघलांशी समोरासमोर लढाई करावयाची नाही आणि त्यांची दमछाक करून त्यांना जेरीस आणायचे अशी त्यांची युद्धनीती असे. या युध्दनीतीस अनुसरून त्यांचे रणतंत्र बनलेले होते.
मग महाराजांनी अमलात आणलेले तंत्र काय होते? ते नंतर समजून येईल...
पुढे चालू ....
बोजड तोफा हत्ती किंवा बैलांना कामाला लावून कशा वाहून नेत असत याचे प्रातिनिघिक चित्र