अविरत
खरं तर बहुआयामी अशी बरीच मंडळी भोवताली आहेत ; पण काही वेळा नातेसंबंध वा हितसंबंध यांच्या पार्श्वभूमीवर त्या त्या व्यक्तीबाबत तेवढ्या नितळपणे लिहिता येत नाही. ह्या दोन्ही निकषांशिवाय जेव्हा विचार करू लागले तेव्हा पटकन एक नाव समोर आले – लेले काकू!
लेले काकूंची मी पुतणी नसले तरी त्या मात्र माझ्या, नव्हे, आमच्या सार्यांच्याच काकू होत्या. आम्ही सारे म्हणजे गेला बाजार २० मुले व त्यांचे पालकदेखील लेले काकू म्हणूनच ओळखत..
आता फार न घोळवता सांगायला हवं की लेले काकू म्हणजे घरगुती पाळणाघर चालवणारी एक मध्यमवयीन स्त्री. माझे आई वडील दोघेही मुंबै ला (त्या काळचे व्ही.टी) नोकरीनिमित्त जात असल्याने साहजिकच दिवसाचे १०-१२ तास (शाळेचे धरून) माझा मुक्काम लेले काकूंकडे ठरलेला. माझ्या आठवणीतल्या लेले काकू – उंच, गोर्या, सुडौल बांध्याच्या, नीटसपणे नऊवारी नेसणार्या, माझ्या आईच्या शब्दांत पद्मा चव्हाण (आकर्षक).. त्यांनी वेणी घातलेली मी कधी पाहिली नाही.. अंबाडा घातलेला असे. म्हशेरीमुळे थोडे काळसरसे दात, मात्र रेखीव जिवणी.., थोडा खर्जातील पण खणखणीत आवाज आणि अगदी गप्पिष्ट,
त्यांच्या घरी माझ्यासकट जी १५-२० मुले बागडत असत, त्यांची वयानुसार श्रेणी ६ महिने ते १० वर्षे एवढी असे. आधी त्यांचे स्वत:चे बैठे घर, मग त्याजागी झालेल्या दुमजली इमारतीमधील जागा अशा स्थित्यंतराची मीही साक्षीदार होते; कारण मी त्यांच्या पाळणाघरातील सर्वांत जुन्या अशा तीन जणांपैकी दुसरी असेन.. काकूंचं वय कळण्याएवढं माझं वय नव्हतं.
त्यांचे पती – सगळे त्यांस नाना म्हणत – मिल बंद पडल्यामुळे घरीच असत. तीन मुलांपैकी एक मुलगा दुर्दैवाने भरकटलेला ( म्हणजे काय ते तेव्हा कळले नाही पण मोठ्यांच्या संभाषणातून कानी पडले असावे) एक मुलगी देखणी व सुस्वभावी नि दुसरा मुलगा महाविद्यालयात शिकत असलेला.. असं कुटुंब..
सकाळी आमच्यापैकी काहींना शाळेत सोडण्यापासून लेले काकूंचा दिवस बहुधा सुरू होत असावा.. शाळेतून मुलांना घरी आणणे, शाळेत जाणार्या तुकडीला जेवायला वाढणे, शाळारुपी रणांगणावरून परतलेल्या तुकडीस त्यानंतर उदरभरण करविणे (स्वत: रांधलेल्या आमटीभाताने), मधुनच लहानग्या पिलांची शी शू वगैरे उस्तवार.. आणि स्वत:च्या संसारातील कामे (जी न संपणारी असतात !) क्वचितच नाना वा त्यांची मुलं त्यांना कामांत हातभार लावत.. असं सारं उरकून दुपारी काकू जराशा निवांत व्हायच्या.. आमची अर्धा दिवस शाळा असली तर यातही बदल होई. पण या अवकाशात त्या कधी निजत नसत. त्यांना पोहे व बटाटयाचे पापडाच्या ऑर्डर्स असत.. डांगर कुटणे, पापड आधी सावलीत व नंतर गच्चीत वाळत टाकणे, नंतर मोजून पिशवीत भरणे ही कामे (अभ्यास नसेल तर) आमच्या ज्येष्ठ फळीची असत. लाट्या करणे व पापड लाटणे मात्र काकूंची एकाधिकारशाही ! खरं तर खूप कंटाळा यायचा असं सारखं काम करण्याचा आम्हांला ! त्यांतूनही अस्मादिकांचा बावळटपणाकडे झुकणारा भिडस्तपणा असल्यामुळे काम नाकारण्याचे धैर्य होत नसे.. माझे इतर सोबती मात्र नुसते ज्येष्ठच नव्हे तर जाणते देखील असल्याने काम अंगाबाहेर टाकण्याचं कसब त्यांना अगदी साधलेलं होतं!
शिवाय बाळगोपाळांचं खानपान.. आम्ही आमचे घरचे डबे खाऊन संपवणं, आम्हांला अभ्यासाला बसवणं, संध्याकाळी पालक यायच्या वेळेस आम्हांला – विशेषत: दिवसभर काहीही कारणाने अश्रूविमोचन करणार्या बालकांना – टामटूम तयार करणं .. असं काकूंचं चक्र चालत असे.
जसं पापडामुळे या दिनक्रमात बदल होई, तसा मंगळवारी संध्याकाळीसुदधा ! बर्याच बायका काकूंकडे येत.. मला तेव्हा एवढंच कळलं की दर मंगळवारी काकूंच्या अंगात येत असे! पण आम्ही घरी गेल्यावर हे चालायचे; त्यामुळे याबाबतच्या ज्ञानात फारशी भर पडली नाही.
थोड्या काळासाठी काकूंनी एका गाळ्यात संध्याकाळपुरते बसून बटाटेवडे बनवून विकण्याचादेखील उपक्रम केला होता. अर्थात, निरुपद्रवी असल्यामुळे असेल कदाचित, पण अस्मादिक येथेही सोबत म्हणून जात असत.
पण कधीकधी एकाएकी लेलेकाकू आम्हांला वेगळ्याच भासत.. जवळ बसवून विचारत, … दादा कधी येईल? सुखरूप असेल ना?
मला जे सुचेल ते मी उत्तर देई, उदा: २ दिवसांनी..
आज जाणवतंय की बालमुखाने देवच बोलतो, अशी त्या हतबल माऊलीची वेडी आशा असे आणि दुर्वर्तनी, व्यसनी मुलालादेखील आई विटत नसते, हेही आता लक्षात येतं !
एरव्ही अगदी सामान्य विनोद करून आपणच मोठमोठ्यानं हसणर्या काकूंच्या हास्यामागे खरोखर निखळ आनंद असे की – नानांचा संतापी स्वभाव (आमटीत मीठ कमी म्हणून वाटी फेकलेली मी पाहिली आहे); मोठ्या मुलाची हुशार असूनही झालेली परवड व बदनामी, दैनंदिन जीवनातील कष्ट, इ. सल विसरण्याचा तो एक मार्ग असे, कुणास ठाऊक..
आमची एक सहलदेखील घेऊन गेल्या होत्या त्या! पापड लाटताना त्या ठरलेली गाणी सुरात गुणगुणत.. संगमरवरी पोळपाटावर एका बाजूला लाट्या ठेवून, एका बाजूला तांदुळाचे पीठ घेऊन एकसारखे पापड लाटणारी, एक पाय दुमडून बसलेली त्यांची कार्यमग्न छबी अजुनही डोळ्यांसमोर आहे! पापडांची पोच करायला मी बरोबर असले तर न चुकता माझी- १ ला नंबर काढते, अशी ओळख करून देणार.. मग मला जरा फुलल्यासारखं वाटत असे !
विणकाम, हस्तकला यांचा उपयोग करून कधीमधी तोरण वगैरे शोभेच्या वस्तू विकण्याचे कामही त्यांचे चालत असे.
ह्या कलेचा, जिव्हाळ्याचा प्रत्यय मला माझ्या लग्नाच्या वेळी आला! एवढ्या वर्षांनंतर, स्वत:चे वय झाले असतानाही, माझ्या रुखवतासाठी त्यांनी साखरेच्या विविध वस्तू (मोदक इ.) डबाभर आणून दिल्या. नंतर सासरघरी गेल्यावर रुखवताच्या पेटार्यातून ही साखरभेट माझ्या हाती लागली अन् मन पुन्हा पाळणघरात फेरी मारून आलं !
मोरपिसार्याच्या निमित्ताने हसर्या लेलेकाकू मला पुन्हा नव्याने भेटल्या हेही खरंच!
अविरत - मोरपिसारा - १
Submitted by प्राचीन on 20 February, 2019 - 07:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान लिहिले आहे. आम्हालाही
छान लिहिले आहे. आम्हालाही भेटल्या लेले काकू.
पहिला प्रतिसाद दिला आहात
पहिला प्रतिसाद दिला आहात
धन्यवाद मनस्विता
वाह! फार सुरेख लिहिले आहे.
वाह! फार सुरेख लिहिले आहे. सहज आणि सुंदर.
सुंदर व्यक्तिचित्रण! मला
सुंदर व्यक्तिचित्रण! मला वाटतं, परिस्थितीचा रेटा असला, की माणसातले बरेच गुण प्रकट होतात.
लेख आवडला
लेख आवडला
धन्यवाद..
धन्यवाद..
खूप सुंदर!
खूप सुंदर!
खूप सुंदर लिहिलयं!
खूप सुंदर लिहिलयं!
वाह! फार सुरेख लिहिले आहे.
वाह! फार सुरेख लिहिले आहे. सहज आणि सुंदर. >>>>> + 99999
भारी लिहीलंय आवडलं
भारी लिहीलंय आवडलं
मनीमोहोर यांनी मर्मबंधातील
मनीमोहोर यांनी मर्मबंधातील नातं म्हणून पाळणाघर संबंधित गोष्टी लिहिल्या आहेत. ते वाचून मला माझेही पाळणाघरातील दिवस आठवले. म्हणून तिथे न लिहिता, हा धागा वर काढतेय.
(खरं तर माझ्याकडे आणखीन दोन पाळणाघरातील मावश्यांच्या गोष्टी आहेत. इथे लेटेस्ट वाली गोष्ट लिहिली आहे.)
हदयस्पर्शी आठवणी..!!
हदयस्पर्शी आठवणी..!!
छान लिहिलयं..!
छान लिहिलेय
छान लिहिलेय
खूप छान लिहिलं आहेस.
खूप छान लिहिलं आहेस.