करायला घेतली व्हेज कोल्हापुरी अन.........

Submitted by किल्ली on 28 November, 2018 - 09:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- गाजरे २
- फ्लॉवरचे तुरे ३-४
- फ्रेंच बीन्स / फरसबीच्या शेंगा ५-६ , मी मिळाल्या नसल्यामुळे घेतल्या नाहीत
- ढोबळी मिरची २-३
- बटाटा १ , आवडत असल्यास, मी घेत नाही
- टमाटे २-३
- मटारचे दाणे छोटी अर्धी वाटी
- कांदे ४-५
- कोथिंबीर बारीक चिरून
- लाल तिखट चवीनुसार
- मीठ चवीनुसार
- धण्याची पूड चिमूटभर
- हळद चिमूटभर
- तेल फोडणीसाठी
- बटर
- आलं, लसूण ठेचुन / किंवा पेस्ट
- जिरे
- कांदा लसूण मसाला, गरम मसाला, जिरेपुड
- सुके खोबरे उभे चिरुन, २-३ तुकडे
- खडा मसाला (तमालपत्र, काळीमिरी, लाल सुक्या काश्मिरी मिरच्या, चक्रीफुल, अजुन काय अस्तं ते गोड लाकुड तेही घ्यावं आवडत असेल तर)

क्रमवार पाककृती: 

तो : "अरे वा, आज पावभाजी करणार वाटतं"
ती: "नाही हो, व्हेज कोल्हापुरी करणार आहे"
तो : "पण भाज्या तर पावभाजीसाठी लागणार्‍या आणायला लावल्यास तू मला "
ती: "मी भाज्यांबरोबर पाव आणवलेत का तुमच्याकडून?"
तो : "नाही.
ती: "मग ही पावभाजी नाही"
तो: "मग काय मिक्स व्हेज का?"
ती: खास जळजळीत कटाक्ष
एखाद्या उत्साही रविवारी घरी रेस्टोरंट श्टाईल भाजी खाण्याची हुक्की आली असताना असा सुखसंवाद करून ही भाजी करावयास घ्यावी.

मघासचा कटाक्ष आणि त्यामागची भावना डोक्यात असतानाच भाज्या चिरुन घ्याव्यात. ढोबळी मिरची, कान्दे , फ्लोवरचे तुरे थोडेसे जाडसर पाकळ्यांप्रमणे दिसतील असे चिरुन घ्यावेत. बाकीची सगळी भाजी मध्यम बारिक चिरावी. गाजरच्या उभ्या फोडी कराव्यात.

ग्रेव्ही:
१. एका कढईत फोडणीसाठी तेल तापवुन घ्यावे. त्यात जिरे टाकावेत. जिरे लालसर झाले की आलं - लसूण पेस्ट घालावी. ती जराशी परतुन, चिरलेला कान्दा घालावा.
२. हे सगळं लालसर-सोनेरी होइपर्यन्त परतुन झालं की टमाट्यान्च्या फोडी घालाव्यात.
३. ह्यात सुके खोबरे व बारिक चिरलेल्या गाजराच्या फोडी टाकाव्यात. उभ्या चिरलेल्या फोडी आताच नाही.
४. जरा परतुन प्रेमळपणे झाकण ठेवून एक वाफ काढावी
५. वाफ आल्यानन्तर थोडंसं मीठ, हळद घालून चांगलं मिक्स करावं . झाकण ठेवुन ५ मिनीटांनी आच बन्द करावी.
६. हे मिश्रण जरा थंड झालं की मिक्सरमधून बारिक वाटून घ्यावं.
वरील मिश्रण थंड होईपर्यन्त रिकामे बसू नये. अजून बरीचशी कामं शिल्लक आहेत असे पुटपुटत खालील कृती करावी.
६. अ. आपल्याला सर्व भाज्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल तापवून त्यात एक एक करून सर्व भाज्या किंचित तळून घ्याव्यात. असे केल्यामुळे भाज्यांचा रंग कायम राहतो आणि त्या थोड्या कुरकुरीत होतात. थोडक्यात काय तर, मऊ मऊ बटरी ग्रेव्ही मध्ये crunchy भाज्या असं काहीतरी साध्य करावयाचं आहे

फायनल मिक्सिन्गः
७. एका मोठ्या कढईत थोडेसे तेल व बटर तापवुन घ्यावे. त्यात वरील सर्व खडा मसाला घालून परतुन घ्यावे. मसाल्याला तेल सुटेपर्यन्त खमन्ग परतले पाहिजे.
८. ह्यात आता जाडसर पाकळ्यांप्रमाणे चिरलेला कान्दा, थोडीशी आलं लसूण पेस्ट घालून परतुन घ्यावे
९. बेससाठी तयार केलेले गाजर/टोमॅटो वाटण घालावे. ते जरासे परतून त्यावर किन्चित प्रमाणात धणेपूड, जिरेपूड, कान्दा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, मीठ घालुन हलवून घ्यावे. हे सर्व तुमच्या चवीनुसार कमी जास्त करता येईल .
९. आता आधीच शॅलो फ्राय करून ठेवलेल्या भाज्या घालाव्यात. मिश्रण व्यवस्थित हलवुन कढईवर प्रेमळपणे झाकण ठेवावे.
१०. दणदणीत वाफ आल्यानन्तर थोडीशी बारिक चिरलेली कोथिम्बीर पेरलीत की तुमची व्हेज कोल्हापुरी तयार आहे.

प्रकाशचित्रे:
ही तयारी (ह्या फोटोत उभे चिरलेले गाजराचे काप शोधू नये):
vktay.jpg

कढईतली व्हेज कोल्हापुरी: (भाजी लाल्बुन्द रन्गाच्या तिसर्‍या शेड मधली आहे हे मान्य करावे.)
vkk.jpg

या जेवायला:
vk.jpg

भाजी करण्याच्या उत्साहात (खरे तर एकीकडे गप्पा सुरु होत्या) ह्यावेळेस फोटोझ खास आले नाहीत, स्टेप बाय स्टेप घ्यायचे राहुन गेले.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

- ग्रेव्हीसाठी टोमॅटो प्युरी बेस म्हणून वापरतात. टोमॅटो प्युरी बनवताना त्यात गाजरे, खोबरे घालणे हे माझे व्हर्जन आहे. असे केल्याने केवळ टोमॅटोची टिपिकल आंबट चव न येता वेगळी व गोडूस चव येते. शिवाय टेक्श्चर छान येते. रंग ही लाल येतो. ह्या भाजीला तो लालबुंद रंग असेल तर बहार येते.
- लालबुंद रंग येण्यासाठी काश्मिरी तिखटाची पूड वापरावी. अथवा लाल सुक्या मिरच्या गरम पाण्यात भिजवून मग फोडणीत टाकाव्यात.
- झणझणीतपणासाठी वाटणात तिखट हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता.
- तळून झालेल्या भाज्यांवर थोडीशी जिरेपूड, गरम मसाला भुरभुरवुन मुरवत (marination साठी)ठेवावे.
- फ्रोझन वापरणार असाल तर मटारचे दाणे शॅलो फ्राय करू नयेत. थेट वापरावेत.
- शेवटच्या ग्रेव्हीत भाज्या ऍड करण्याच्या स्टेपमध्ये पॅन टॉस करून भाज्या मिक्स केल्या जातात. हे जमत असेल तर नक्कीच करा

माहितीचा स्रोत: 
तुनळी वरचा संजीव कपूरचा व्हीडीओ आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

लिहीलयं चांगले पण मला ही व्हेज कोल्हापुरी न वाटता मिक्स व्हेज वाटतेय. >> +११११११११११११११११११११११११११११११११११

मिक्स व्हेज आणि व्हेज कोल्हापुरी निराळं का? आणि व्हेज जाल्फ्रेजी? मला वाटलं होतं एकच भाजी या वेगवेगळ्या नावांनी सर्व्ह करतात. माखनी म्हटलं की क्रीम!
काय फरक असतो या प्रकारांमध्ये ते प्लीज लिहा कोणीतरी. Happy

व्हेज कोल्हापुरी थोडी लाल आणि तेल जास्त हवे होते.
व्हेज कोल्हापुरी : बेसः कांदा,टोमॅटो आल लसुण या सगळ्याची पेस्ट. लाल तिखट थोड तेलात घालुन. म्हणजे रंग लाल येतो.

व्हेज जालफ्रेजी: सगळ्या भाज्या मोठ्या मोठ्या चिरून (टोमॅटो सुद्धा मोठे चिरून) गरम मसाला आणि कसुरी मेथी ,अक्खी लाल सुकी मिरची
आणि भरडलेले धने मस्ट . (बेसः टोमॅटो पेस्ट हवी असेल तर . मी घालत नाही. टोमॅटोचा थोडा फार रस सुटतो त्यात परतते)

व्हेज मिक्स : अक्खे मसाले, बेसः काजु+कांदा+टोमॅटो+आल+लसून पेस्ट

जाल्फ्रेजी या शब्दाचा उगम कुण्या ब्रिटिश सायबाला खानसाम्याने "झालं फ्राय जी" सांगितलं असा आहे म्हणे.

झाल परहेजी आहे म्हणे ते.
बाकी व्हेज कोल्हापुरी, व्हेज जयपुरी या हाटेलवाल्यांनी बनवलेल्या डिशेस असाव्यात.; कोल्हापुरात किंवा जयपुरात बनणार्‍या नव्हे.

शीर्षकावरून, करायला घेतलं व्हेज कोल्हापुरी आणि झालं दुसरंच काही की काय? असं वाटलं. छान लिहिलंय.

सर्वान्चे खुप खुप आभार Happy Happy
खाणार्‍यापैकी भाजी मिक्स व्हेज सारखी झालीये असं एकाच मत होतं, तर रन्गाच सोड पण चव एक्दम authentic व्हेज कोल्हापुरी सारखी जम्लीये असं दोघांच मत होतं, मी कन्फुज होते, भाजी बरी लागतेय ना, मग नाव काही का असेन म्हणून खात होते.. त्यामुळे शिर्षक तसे दिले आहे.
करून बघा आणि तुम्हीच ठरवा काय नाव ते Happy

झाल परहेजी
<<
सो झाल (बंगाली) = स्पायसी/मसालेदार. अन परहेजी म्हणजे उपवासाला/डाएटला चालणारे?

नाह. झालंफ्रायजी जास्त चांगलं वाट्टंय. Wink

ती डिश खाल्लेल्यांना Frey's syndrome होण्याचे प्रमाण खूप होते. म्हणून "जहाल फ्रे जी" असे नाव पडले, त्याचे जाल्फ्रेजी झाले.

Pages