*संजीवनी जोशीला* पाहिलं की, भक्ती बर्वेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ती फुलराणी नाटकातील मंजुळा आणि आमच्या संजू जोशी... काही फरक वाटत नाही. त्या फुलराणीतील मंजूचा मास्तर अशोक आणि संजू जोशीचा राजकुमार देखील अशोक... कधी काळी हा राजबिंडा राजकुमार टाप टाप करीत घोड्यावर बसून आला होता. इतका हँडसम माणूस, पिळदार दंड आणि डोळे.... बापरे ! भेदक... म्हणजे भलतेच आकर्षक. खरंतर देवांनी नाकीडोळी छान कन्यारत्न पाठविलेले पाहून फडक्यांना ही पोर उजवायला जोडे झिजवायला लागणार नाहीत. हे तेव्हा अनेकांनी म्हटले होते. सांगायचं म्हणजे तथ्यच होतं. महत्वाचं म्हणजे जिल्हे इलाही सम्राट अशोकाच्या कानावर या लावण्यवतीची वार्ता येऊन थडकली. मुळात सम्राट हा सिनेरसिक, गानरसिक.. खरं तर तिच्या लावण्यापेक्षा सुमधुर आवाजावर फिदा झाला. लगोलग हातात ती फुलमाला खास माटुंग्याच्या दुकानातून बनवून आणली होती.उभयतानी एकमेकांच्या गळ्यात घातलेला तो पुष्पहार म्हणजे लक्ष्मीला नारायण भेटला. बुद्धीजीवी फार तर विज्ञान आणि वाणिज्य ( अर्थ) यांचा संगम झाला, असेच म्हणतील. कारण अशोकराव विज्ञान शाखेचे संजू जोशी वाणिज्य शाखेतल्या. आतापर्यंत त्या टवटवीत आयुष्य जगत आहेत. त्यांच्या आयुष्यातला खरेपणा देखील जास्त आहे. संसार आणि नोकरी करताना कोठेही कांगावा करीत कधी करणार नाहीत. तुला शिकवीन एकदाचा धडा.... असा अभिनयी अंदाज कधी चुकुनही नाटकी ढंगात त्यांच्या सप्तरंगी आयुष्यात उच्चारला गेला नाही.
संजू जोशी चुकून बँकिंग क्षेत्रात प्रवेशकर्त्या झाल्या, असे मनोमन वाटते. त्या आगळ्या कलावंत... उत्तम अभिनयाबरोबर त्यांच्याकडे असलेले अप्रतिम निवेदिकेचे कौशल्य हा सुप्त गुण त्याचे वर्णन आम्ही काय करावं. आता त्यांच्या वर्णनाचे अस्तर उलगडून सांगायचे म्हणजे मध्यम बांधा,केस पिंगट काळे आणि मनाने फटकळ असली तरी मनमोकळी !! मनात किंतु आणि परंतुला स्थान नाही. वागण्यात बोलण्यात ऐट पाहिली की, आपण त्यांच्याकडून शिकावं... शिकण्यासाठी लहानथोर असा भेदभाव मनात आणीत नाही आणि जो आणतो तो शिकत नाही. मनातले गुंज कथन करायचे झाले तर उपजीविकेसाठी नोकरी करायलाच हवी. परंतु जर आपल्या छंदीपणाला पांघरून घालून नकोच. आपल्या अंगात असलेल्या कलेशी मैत्रीचे घट्ट नाते विणले गेले तर तेच आयुष्य जगायला नवीन दिशा देईल. पोहायला येते म्हणून पाण्याशी घट्ट मैत्री होते.म्हणून ते पाणी आपल्याला हवे तेवढे उचलून धरते.याबाबत संजू जोशींनी आपल्या आवडीनिवडीला एकसंघ बांधून ठेवले आहे. भोंडला असो वा रास दांडिया... अगदी नियोजन करून त्यात उतरायचे. अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणायचं नाही नाहीतर मागून कुणीतरी चढ्या आवाजात विठूचा गजर हरिनामाचा.... मराठी मनाच्या कोपऱ्यातून आलेला थेटपणा हास्याच्या उकळ्याना ऊत आणायचा.
पार्ल्याला त्यांचं घर चोरट्यांनी फोडले. ही बातमी वाऱ्यावरची वरात होऊन घराघरात पोहचली. घरात होतं ते घेऊन पोबारा केला. दुसरा कुणी असता तर नसानसातून वाहणारा त्वेष पाहून त्यासमयी चोरटा भस्मसात झाला असता. अशोकराव किंचित चमकले आणि संजू जोशीना भरून आले. आयुष्याची कमाईवर चोरट्यांनी मारलेला हात... वाईट वाटले पण मी पानवाल्याच्या गादिसमोर उभा राहून विचार करीत असताना त्या चोरट्यांना सरळ भाषेत वेडा यासाठी ठरविला की, संजू जोशीच्या डोळ्यातून टपकलेले ते मोती मौल्यवान मागे टाकून गेले. हा एक विनोदबुद्धीचा एक भाग आहे. पण आलेल्या संकटावर कशी मात करायची याचे उपजत ज्ञान असावे लागते. देवाच्या देणीतले एक ठेवनीचे देणे, जे सर्वांकडे नसते. इष्ट आणि स्पष्ट बोलण्यातून मर्यादांचे उल्लंघन झाले तर नाराजीचे सूर उमटतात. पण संजू जोशी यांच्याकडे असलेले कुणालाही न दुखावण्याचे देणे, याची गोळाबेरीज करायला नको.
मध्यंतरी त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या आप्तांनी *संजीवन* नावाचा कविता संग्रह प्रकाशात आणला. दरवर्षी त्यांचा वाढदिवस ही आमच्यासाठी एक पर्वणी असते. आनंदाच्या क्षणाची माळ गुंफत स्नेहभावनेने मित्र मैत्रिणी, ताई माई आईआजी सकाळी सकाळी बहुरंगी स्वभावाच्या रंगपेटीला ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ सूर आळवून शुभेच्छा देतात. ही मिळणारी उत्स्फूर्त दाद त्यांना शतायुषीच्या पल्याड घेऊन जावी, ही सदिच्छा व्यक्त करून या लेखन मैफिलीची सांगता करतो.
अशोक भेके
फारच दुर्मिळ असतात संजू जोशीं
फारच दुर्मिळ असतात संजू जोशीं सारखी समंजस आणि धीराची माणसं.
भाग्यवान आहात तुम्ही , तुम्हाला अशा व्यक्तींचा सहवास लाभला.
पण तुमच्या बाकी लेखांसारखाच हा लेख अप्रतिम असला तरी जरा त्रोटक वाटला.
धन्यवाद
धन्यवाद
त्रोटक नक्कीच
त्रोटक नक्कीच
धन्यवाद सर्वांना
थोडी विषयाची ओळख करून मग
थोडी विषयाची ओळख करून मग लेखाला सुरुवात झाली असती तर मडक्यात म्हणजे डोक्यात चार शब्द घुसले तरी असते. बाकी वाचायला सुरुवात करून लगेचच कमेंट वाचाव्याश्या वाटल्या.