लग्नाचा क्लास -४ ले. मंगला मराठे
पालकांची भूमिका कठीण आहे.(१)
एक गृहस्थ एका वधूवर मेळाव्याचा अनुभव सांगत होते. “ हॉल भरलेला होता. पण त्यात तरुणाई कमीच दिसत होती. तरुण मुलामुलीं पेक्षा पालकांची संख्या खूपच जास्त होती असे वाटले की हा वधूवर मेळावा आहे की पालक सभा?”
कार्यक्रमाचे स्वरूप असे होते. – आयोजकांनी मंचावरून एकेका फॉर्ममधली माहिती वाचून दाखवली. फॉर्ममधे वय, ऊंची, शिक्षण, पगार याबरोबर तुमचे छंद, आवडी, खास गुण, खोडी, घरातल्या व्यक्तींबद्दल माहिती, जोडीदाराबद्दल अपेक्षा असे रकाने होते. पण ते कोणी फारसे भरलेले नव्हते. ज्यांनी भरले होते त्यांनी ते अगदीच वरवर भरले होते. म्हणजे अनुरूप, मनमिळाऊ, निर्व्यसनी असे. फॉर्म भरण्याचे काम पूर्ण केले होते इतकेच. आयोजकांनी प्रत्येक मुलाची मुलीची वय, ऊंची, शिक्षण, जात, रास, गोत्र वाचून दाखवले. जमलेल्या पालकांनी आपल्या मुलांना ‘चालू शकतील’ अशी स्थळे लिहून घेतली. जी मोजकी मुले आली होती त्यांनी पुढे येऊन स्वत:ची ओळख करून दिली. पण त्यांनीही आपले नाव गोत्र, ऊंची, पगार, अशीच वरवरची माहिती सांगितली. पालकांनी ती लिहून घेतली. नोंदणी झालेली बहुतेक स्थळे सुशिक्षित, सुस्थित होती. त्यातली अनेक मुले उच्चशिक्षितही होती. मनात सहज एक विचार डोकावला ‘ जनरेशन गॅप! जनरेशन गॅप! म्हणून आरडाओरडा करतात. इकडे बघा कुठे आहे जनरेशन गॅप(?) दोघांची पद्धत सेम टु सेम आहे!.’
वधूवर मेळावे आयोजित करणाऱ्या प्रत्येकाला नेहेमी पालकांकडून काही ठराविक प्रश्न येतातच. ‘फक्त आम्हीच आलो तर चालेल का?’ ‘आम्ही दोघेही येणार आम्हाला नको का स्थळ बघायला.’ ‘मुलाला/मुलीला एकटे कस पाठविणार?’ इ. जणू काही मेळाव्याचे आयोजक तिथल्या तिथे मुलांची लग्ने लावून टाकणार आहेत.
गंमत सोडा. पण या संवादामुळे विवाहेच्छुक मुलामुलींबद्दलआणि त्यांच्या पालकांबद्दल मनात अनेक प्रश्न उभे राहिले.
• पालकांना आपली मुलं अजून लहान आहेत अस वाटत का?
• पालकांना मुलांचा विश्वास वाटत नाही? मुलं पटकन काहीतरी निर्णय घेऊन टाकतील असे वाटतेका?
• पालकांना निर्णय स्वत:च्या हातात ठेवायचा आहे?
• ज्या मुलांना रुमाल सुद्धा स्वतःच्या चॉइसचा लागतो. ती आयुष्याच्या जोडीदराबाबत इतकी उदासीन कशी?
• साध्या साध्या गोष्टीत असच पाहिजे तसच पाहिजे असा आग्रह धरणारी ही मुले. ह्यांच्या आयुष्याच्या जोडीदारबद्दल काहीच अपेक्षा नाहीत?
• ह्या मुलांचा पालकांच्या निवडीवर खरच 100% विश्वास आहे?
• या मुलांना स्वतः निर्णय घेण्याची भीती वाटते का?
• आपली निवड पालकांच्या पसंतीस आली नाही तर पुढे ते मदतीचा हात आखडता घेतील आणि आपल्या शिरावरची जबाबदारी वाढेल असे वाटते का?
• आपण स्वतः पुढे येणे, निवड करणे आगाऊपणा केल्यासारखे दिसेल. आपल्याबद्दल लोकांचे मत वाईट होईल अशी भीती या मुलांना वाटते का?
यातल्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरे होय अशीच येतील. इतकी शिकलेली, जगात स्मार्टली वावरणारी ही मुले लग्नाच्या बाबतीत अशी कोशात कां जातात? की पालक त्यांना सहभागी करून घेत नाहीत?
मुळात पालकांची कल्पना अशी असते की मुल तीन वर्षांचे झाले की त्याला बोट धरून बालवाडीत न्यायचे तसे त्यानंतर पंचवीस तीस वर्षांनी बोहल्यावर न्यायचे. मुलाचं लग्न करून त्यांचा संसार मांडून देणे हे पालकांना आपली सांसारिक जबाबदारी वाटते. मुलांच्या लग्नाचा निर्णय मुलांवर सोडणे त्यांना धोक्याचे वाटते आणि त्याहून पचनी पडत नाही.
लग्न मुलांचे, पुढे संसार त्यांना करायचा आहे मग बघून पसंत करण्यापलीकडे त्यांना काहीच सहभाग कां देत नाहीत? पालकांना वाटते की मुलं विचार करणार नाहीत, वरवरच्या दिखाऊ गोष्टींना भुलून निर्णय घेतील. पण प्रत्यक्षात असे दिसते की संसाराचा अनुभव असणाऱ्या पालकांचा पहिला निकष असतो -मुलासाठी गोरी सुस्वरूप मुलगी हवी; मुलीसाठी उच्चशिक्षित आणि सधन मुलगा हवा. वधूवर मंडळांचे फॉर्म भरायला काही अगदी मोजके अपवाद सोडल्यास फक्त पालकच येतात आणि तिथल्या तिथे फॉर्म भरून देतात. ‘आता स्थळ बघूया’ या खेरीज त्याचं मुलांशी काही बोलणे, संवाद झालेला नसतो. फॉर्म भरताना नाव पत्ता, जात, उंची शिक्षण अशी माहिती जी आपल्या परिचयाची कोणतीही व्यक्ती भरु शकते ती पटापट लिहितात आणि ‘स्वत:विषयी अधिक माहिती’ आणि ‘जोडीदाराबाबत अपेक्षा’ हे दोन कॉलम भरताना हमखास थबकतात. मग मुलगी समंजस, मिळून मिसळून राहणारी असावी. मुलगा समजून घेणारा, निर्व्यसनी असावा असे लिहून मोकळे होतात.
शहरी भागात आता मुलं एकमेकांना भेटतात,बोलतात त्यानंतर निर्णय घेतात हे खरे असले तरी पालकांच्या फिल्टर्स मधून उरलेल्यांनाच भेटतात. पालकांचे फिल्टर्स आजही जात,गोत्र, उंची पगार, पदव्या हेच आहेत. मुलासाठी गोरी सुस्वरुप समंजस मुलगी आणि मुलीसाठी सुस्थित समजून घेणारा मुलगा ह्या प्राथमिकता आहेत. किंबहुना एव्हढ्याच बाबींचा विचार होतो. आपल्या मुलाला अगदी शांत स्वभावाची सगळ जुळवून घेणारी मुलगी मिळाली पाहिजे. आणि मुलीला - तिला जपणारा, तिला स्वातंत्र्य देणारा मुलगा मिळावा असे प्रत्येक पालकाला वाटते.. प्रत्येक आईवडिलांना वाटते की आपण आपल्या मुलांची मन जशी जपली तशी ती पुढेही जपली जावीत. त्यांना लग्नानंतर फारशा तडजोडी कराव्या लागू नयेत एकुलते एक मूल असणाऱ्या पालकांची मनस्थिती तर खूपच गुंतागुंतीची झाली आहे. एकुलती एक मुलगी असेल तर तिची पाठवणी पालकांना खूपच त्रासदायक वाटते. आणि मुलगा असेल तर त्याच्या बाबतीतले पझेशन त्रास देते. पालक स्वत:च्या नजरेतून मुलांचा संसार मांडतात. आपल्याला जे मिळाले नाही ते मुलांना सहज मिळावे; आपण जे कष्ट केले दगदग केली ती मुलांच्या वाट्याला येऊ नये असे प्रत्येक पालकाला वाटते. . ह्यामागचे ममत्व १००% खरे आहे. तरीही काही बाबतीत पालकांनी तटस्थपणे विचार करणे गरजेचे ठरते. मुलांना नेमके काय हवे आहे त्यांच्या प्राथमिकता काय आहेत याची त्यांना अनेकदा कल्पना नसते, कारण ह्यावर बोलणे झालेले नसते. आपल्याला काय योग्य वाटत हे महत्वाचे नाही मुलांना काय योग्य वाटत हे महत्वाचे आहे. मुलसुद्धा विचार करतात. त्यांच्या विचारात त्रुटी असतीलही. त्या पालकांच्या विचारात सुद्धा आहेत. ( प्रत्येक माणसाच्या विचारात आहेत.) संवाद, चर्चा होत राहिल्या तर त्या कमी होतील. पुढे त्यांना जुळवून घ्यायचे आहेच. फक्त जुळवून घेतलं की सगळं जुळतं असे म्हणण्यापेक्षा आपल्या मुलाला/ मुलीला काय चालवून घेता येईल, काय नाही हे त्यांचे त्यांनी ठरविण्याचा विचार, ही प्रगल्भता मुलांना देणे गरजेचे आहे.
पालकांना हे पटल तरी लगेच प्रश्न येईल ‘ अहो पालक लाख बोलतील. पण मुलं कधी बोलायच्या मूडमध्ये असतात का? काही सांगायला गेल तर त्यांना वाटत आपण त्यांना शहाणपण शिकवतोय.’ प्रोब्मेम खरा आहे पण पालक म्हणून आपण हा संवाद पुढे नेला पाहिजे. ज्यांच्यात संवाद नाही त्यांच्यात या निमित्ताने संवाद सुरु होईल आणि घरात माणस क्रिकेट आणि राजकारणापेक्षा वेगळ काही बोलतील. लग्न ठरवण्यातल्या प्रत्येक पायरीवर मुलांशी बोलणे संवाद साधणे त्यांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. हा संवाद ही एका परीने त्यांच्या संसारासाठी शिदोरी असेल. हीच आई बाबांकडून मुलांना मिळालेली सर्वात मौल्यवान भेट असेल आणि आई वडिलांसाठीही हा संवाद तेव्हढाच महत्वाचा ठरतो. गेल्या काही वर्षात आपली खास करून शहरातली जीवन शैली इतक्या झपाट्याने बदलत चालली आहे त्यामुळे आज जे तरुण मुलामुलींचे पालक आहेत त्यांची पालक म्हणून भूमिका खूप कठीण झाली आहे. त्यामुळे लग्नाचा क्लास मुलांइतकाच पालकांसाठीही आवश्यक झाला आहे. मुलांशी संवाद हा या क्लासाचाच एक भाग आहे.
=======================================================
मुळात पालकांची कल्पना अशी
मुळात पालकांची कल्पना अशी असते की मुल तीन वर्षांचे झाले की त्याला बोट धरून बालवाडीत न्यायचे तसे त्यानंतर पंचवीस तीस वर्षांनी बोहल्यावर न्यायचे. मुलाचं लग्न करून त्यांचा संसार मांडून देणे हे पालकांना आपली सांसारिक जबाबदारी वाटते. मुलांच्या लग्नाचा निर्णय मुलांवर सोडणे त्यांना धोक्याचे वाटते आणि त्याहून पचनी पडत नाही.>>>> आवडलंच.
आणि मुलगा असेल तर त्याच्या बाबतीतले पझेशन त्रास देते. >>>> आताच्या बर्याच आया पाहिल्या तर तुम्ही वेगळे रहा,आम्ही वेगळे रहातो या मताच्या आहेत.अपवाद सर्व ठिकाणी आहेत.
"आपल्याला काय योग्य वाटत हे
"आपल्याला काय योग्य वाटत हे महत्वाचे नाही मुलांना काय योग्य वाटत हे महत्वाचे आहे. मुलसुद्धा विचार करतात. त्यांच्या विचारात त्रुटी असतीलही. त्या पालकांच्या विचारात सुद्धा आहेत."
हे पटतंय.
गुजराथी समाज तसा कंजरवेटीव्ह, मुला-मुलींच्या कमी वयातच लग्न लावून देण्याच्या बाबतीत पूर्वीही आग्रही होता आणि आजही आहे. पण वधूवर मेळाव्याच्या बाबतीत तो समाज आज किती पुढारला आहे हे काही महिन्यांपूर्वी समजले.
माझ्या बायकोच्या ऑफिस मध्ये मागच्या वर्षी एक नुकतीच बी.कॉम झालेली गुजराथी मुलगी नोकरीला लागली होती. एप्रिल महिन्यात तिच्या पालकांनी तिचे नाव एका वधूवर मेळाव्यासाठी नोंदवले. मेळावा माथेरान सारख्या रम्य ठिकाणी दोन दिवस आणि एक रात्री साठी होता. शेकडोंनी लोकं नाव नोंदवायला गेली होती पण, ४० मुले (भावी वर) आणि ४० मुली (भावी वधू) अशी मर्यादित संख्या आयोजकांनी निश्चित केली होती त्यामुळे पुढच्या लोकांना प्रतीक्षा यादीत नोंदणी मिळाली. अर्थात रात्री झोपण्याची व्यवस्था मुला-मुलींची वेगवेगळी होती पण ते २ दिवस त्यांना घरच्यांच्या किंवा ईतर कोणाच्याही लुडबुडी शिवाय एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मोकळे दिले होते.
त्या मेळाव्यात सदर मुलीने जोडीदार निवडला. पुढे दोन्हीकडच्या मंडळींची बैठक होऊन त्यांचे लग्न ठरले, जून महिन्यात साखरपुडा झाला आणि डिसेंबर मध्ये लग्न आहे. लग्नानंतर नोकरी सोडावी लागेल एवढीच होणाऱ्या सासरच्या मंडळीची अट असल्याने आता तिने राजीनामा दिला असून सध्या १ महिन्याच्या नोटीस पिरीयड वर आहे.
पण प्रत्यक्षात असे दिसते की
पण प्रत्यक्षात असे दिसते की संसाराचा अनुभव असणाऱ्या पालकांचा पहिला निकष असतो -मुलासाठी गोरी सुस्वरूप मुलगी हवी; मुलीसाठी उच्चशिक्षित आणि सधन मुलगा हवा. >> कारण त्यांचे, त्यांच्या आई वडिलांचे, आणि त्यांच्या सर्कल मधल्या ९०% लोकांचे याच निकषांवर लग्न लागलेले असते. त्यामुळे त्यांना तेच माहिती. चाकोरीबाहेर जाउन विचार करणारे पालक अशा मेळाव्यांना येतच नसणार !
ज्या मुलांना रुमाल सुद्धा स्वतःच्या चॉइसचा लागतो. ती आयुष्याच्या जोडीदराबाबत इतकी उदासीन कशी? >> पण याच मुलांच्या परिक्षांचे फॉर्म पालकांनी भरलेले असतात. रेझुमे , कव्हर लेटर पालकांनी लिहिलेले, संपादन केलेले असतात . नोकरीच्या ठिकाणी बॉण्ड आहे का ? बेनेफिट्स काय आहेत हे सर्व पालकांनी(च) बघितलेले असते. असली मुले मग रुमाल अन शूज यांच्या चॉइस मधेच अडकलेली असतात. मुलांचे लाड करणे अन त्यांना स्वावलंबी न बनू देणे यात एक फाइन लाईन आहे. कित्येक पालक ती कधी अजाणता तर कधी जाणून बूजून क्रॉस करत असतात. मग भो आ क फ !
चांगला लेख.
चांगला लेख.
) मला कधी एकदा काही तरी लिहून नेक्स्ट बटण दाबतोय असं झालेलं असतं. त्यापेक्षा जास्त टोकदार प्रश्न रादर सिच्युएशन देउन त्यावर लिहायला सांगितलं तर पार्श्वभूमी समजून त्यातून नक्की आपल्याला काय हवय नकोय त्याचा निर्णय प्रत्येक व्यक्ती घेईल.
जर फॉर्म भरताना ढोबळ माहिती भरुन आवश्यक माहितीचे रकाने त्रोटक भरले जात असतील तर मला वाटतं फॉर्म मधील प्रश्न चुकीचे आहेत. 'अपेक्षा' आणि 'अधिक माहिती' अशा हेडर खाली ऑनलाईन फॉर्म भरताना (लग्नाचे न्हवे..
तुम्ही जनरल प्रश्न विचारलेत तर तुम्हाला २१-अपेक्षित उत्तरेच मिळणार. जॉब मुलाखतीत तुम्ही टीम प्लेअर आणि फलाणे आहात लिहिलंत तरी त्या क्वालिटी दिसणार्या सिच्युएशन सांगा आणि त्यावर डिस्कस करु टाईप प्रश्न विचारतात. ते आयडिअल आहे म्हणत नाहीये पण एक स्टेप पुढे नक्कीच आहे.
तिथे जमलेल्या पालकांपैकी किती
तिथे जमलेल्या पालकांपैकी किती जणांची मुलंमुली खरंच विवाहेच्छुक असतील अशीही शंका मनात आली. पालकांनाच घाई झालेली असण्याची शक्यता आहे का - ते मोठ्या संख्येने उपस्थित असण्यामागे? दुसरं म्हणजे मुलं अशा मेळाव्यांपेक्षा अन्य आधुनिक (उदा: वेबसाइट्स किंवा अॅप्स) पद्धतीने सहचर शोधत असतील, आणि पालक अजून वधुवरसूचक मंडळांतच अडकलेत - असं असण्याची शक्यता किती?
पालकांना हौस आणि घाई असते हे
पालकांना हौस आणि घाई असते हे खरंच, पण ओळखीत, माहितीत अशी खूप मुलं मुली बघितली आहेत ज्यांनी निदान पहिलं स्क्रीनिंग अगदी खुषीने आई वडिलांवर सोडलेलं असतं. हे मेळाव्याला जाणारे त्यांचेच आईबाप असावेत.
शिवाय काम आउअटसोर्स केल्यासारखे सोपे होते!
उदा. ऐन करियर च्या भरात असलेली अति बिझी , किंवा परदेशात राहणारी मुलं. त्यांच्या जॉब मधे त्यांना वेब साइटवरून डेटिंग वगैरे ला वेळ नाही, स्वतः जमवायची काही ना काही कारणाने शक्यता नाही पण लग्न करायचे तर आहे. हाही एक मोठ्ठा गट असतो. मग त्यांना आई वडिलांनी फिल्टर केलेल्यांपैकीच एक कुणीतरी सिलेक्ट करण्यात काहीच गैर वाटत नाही. उलट तेच जास्त सभ्य आणि प्रतिष्ठित वाटते
पण याच मुलांच्या परिक्षांचे
पण याच मुलांच्या परिक्षांचे फॉर्म पालकांनी भरलेले असतात. रेझुमे , कव्हर लेटर पालकांनी लिहिलेले, संपादन केलेले असतात . नोकरीच्या ठिकाणी बॉण्ड आहे का ? बेनेफिट्स काय आहेत हे सर्व पालकांनी(च) बघितलेले असते.
>>
हे अगदी खरंच आहे असं नाहीये मेधा. बर्याच मुलांना - 'बाहेर काही जमलं नाही, होती ती सोडून गेली' वगैरे गोष्टींमुळे पण ' आई बाबा म्हणतील तिच्याशी लग्न करायचं असतं. हे अगदी १००% असं नसलं तरी बर्यापैकी असं आहे.
तिथे जमलेल्या पालकांपैकी किती जणांची मुलंमुली खरंच विवाहेच्छुक असतील अशीही शंका मनात आली.
>>
अगदी बरोबर, बर्याचदा नसतातच. त्यात एखाद्याने घेतलाच इंटरेस्ट माझी मी शोधतो म्हणून तर आई वडिलांचं प्रेशर असतंच - किती नाकारतोयेस, कोणीच कसं आवडत नाहीये, एखादी तरी पसंद कर, थोडी अॅड्जस्ट्मेंट लागतेच आयुष्यात.. एक ना अनेक!
बर्याचदा यातुन चुकीचे जोडीदार निवडले जातात, सॅड बट ट्रू..!
खरंच या मेळाव्यांना पालकांना बंदी हवी, अगदी विवाह संस्थांनी पण फक्त मुला मुलींनाच एकमेकांना बघता / बोलता यीएल आणि त्यांनी ठरवलं तरच फॅमेली इन्वॉल्व्ह होईल असं काही तरी करायला हवं.
दुसरं म्हणजे मुलं अशा मेळाव्यांपेक्षा अन्य आधुनिक (उदा: वेबसाइट्स किंवा अॅप्स) पद्धतीने सहचर शोधत असतील
>>
यात ही पालकांची लुडबुड प्रचंड असते, माझ्याकमामाझे आणि मैत्रिणींचे मिळून एक पुस्तक लिहुन होईल असे अनुभव आहेत काही पालकांचे.
मैत्रेयीचा प्रतिसाद पटला. सभ्य आणि प्रतिष्ठीत बाबत तर अगदी अगदी
अमित, स्वाती, मैत्रेयी
अमित, स्वाती, मैत्रेयी सगळ्यांना +1
मला कधी एकदा काही तरी लिहून
मला कधी एकदा काही तरी लिहून नेक्स्ट बटण दाबतोय असं झालेलं असतं.
<<
तुम्ही बालक की पालक?