मराठवाडी सकस धपाटे _ दुध्याचे

Submitted by किल्ली on 7 August, 2018 - 08:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- ज्वारीचे पीठ - ४ मोठे चमचे
- मध्यम आकाराचा दुधी भोपळा किसून - दुध्या कोवळा असावा,
नख लावल्यावर तेल आले तर कोवळा आहे असे समजावे
(इथे ह्यापैकी कुठलीही भाजी (बारीक चिरून, किसून) वापरू शकता. उदा: टोमॅटो, पत्ताकोबी, काकडी, पालक, मेथी, लाल माठ, बीट, गाजर, मुळा.
आवडीनुसार मिश्र भाज्या सुद्धा वापरता येतील. उरलेली शिळी भाजी असेल तरीही चालते. बारीक वाटून घ्यावी मात्र.
मला ह्या पाकृ मध्ये दुधी आवडतो.)
- कोथिंबीर बारीक चिरून (optional)
- लाल तिखट पूड किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरून - चवीनुसार
- मीठ - चवीनुसार
- जिरे - आवडीनुसार
- ओवा - चिमूटभर
- तीळ - चिमूटभर
- धण्याची पूड - चिमूटभर
- हळद - चिमूटभर
- तेल - थोडेसे
- कुठला तुमचा खास मसाला असेल तर तोही टाका चिमूटभर, नाहीतर फार विचार न करता चिमूटभर गरम मसाला द्या ढकलून
- पाणी

क्रमवार पाककृती: 

भाकरी थापता येत असेल तर हे धपाटे पण जमतील. साधारण कृती भाकरीसारखीच आहे.
- दुध्याचा कीस थोडेसे तेल टाकून परतून घ्यावा. हे करणे गरजेचे आहे.
कारण कोवळ्या भाजीला पाणी सुटते आणि धपाटे थापणे अवघड होऊन बसते.
- वाफ आल्यानंतर ज्वारीच्या पिठात तो कीस आणि इतर जिन्नस टाकून व्यवस्थित एकत्र करा.
- - आता हे पीठ छान मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकत भाकरीसाठी भिजवतो त्याप्रमाणे भिजवा.
भाकरी थापतो तसे थापायचे आहे. त्यानुसार consistency असू द्या
ह्या स्टेपला तेल शक्यतो वापरू नये, कोमट पाणी वापरा.
- गोळा झाल्यानंतर त्याची कोरड्या ज्वारीच्या पीठावर घोळवून भाकरी थापतो तसे थापून घ्या
- जाड बुडाच्या तव्यावर(लोखंडी असल्यास उत्तम, नॉनस्टिक पण चालेल) थापलेला धपाटा टाकून दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
(आधी मोठी आच ठेवा नंतर adjust करू शकता)
धपाटा उलटसुलट करण्यासाठी सराटा/ उलथनं हाताशी हवं. धपाटा भाजत असताना कडेने तेल सोडा.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

हे धपाटे ताजे घट्ट गोड दह्याबरोबर खा किंवा किंचित आंबट लोणचंही चालेल.
काहीही न घेता नुसतेही गट्टम करू शकता. ते आधीच खमंग असतात.

हे टिकतात ही भरपूर, प्रवासाला जाताना आई टोमॅटोचे धपाटे करून नेहमीच सोबत घ्यायची. लावून खायला तिखट शेंगदाणा -लसूण चटणी.
फोटो सध्या नाहीये माझ्याकडे, काही दिवसात धपाटे करेन तेव्हा टाकते

juicy भाज्या (टोमॅटो, काकडी) वापरल्या तर पीठ मळताना पाणी टाकू नये, भाज्यांच्या रसातच पीठ भिजवा.
पाणी जेवढे कमी वापरू तेवढे जास्त टिकतात धपाटे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वा भारीच! ऊरलेल्या भाजीचे, त्यातल्यात्यात फोडणीच्या वरणाचे नेहमी करतो. बाकी पदार्थ सेम. फक्त थोडा चाट मसाला किंवा आमचुर टाकतो. ताज्या भाज्यांचे किंवा भोपळ्याचे कधी केले नाहीत. लवकरच करून पाहीन. Happy

इंटरेस्टिंग. पण हे मला जमतील की नाही या बाबत साशंक आहे. थालीपीठ सरळ तव्यावर थापलं तसं हे प्रकरण वाटत नाही.

रच्याकने: मुलांना डब्यात द्यायचे असल्यास दह्या सोबतच द्यावे, म्हणजे त्यांना प्रथिने मिळतील, तरच ते सकस होतील.

दुध्याचा कीस थोडेसे तेल टाकून परतून घ्यावा. >>>>>> हे न करता ,त्याच किसात थालिपीठाचे/ ज्वारीचे पीठ मिक्स करून घेते.छान होतात.

दुध्याचा कीस थोडेसे तेल टाकून परतून घ्यावा. >>>>>> हे न करता ,त्याच किसात थालिपीठाचे/ ज्वारीचे पीठ मिक्स करून घेते.छान होतात. >>> सेम pinch थालीपीठ भाजणी मिक्स करते.

धन्स अन्जू , देवकी,मानव पृथ्वीकर , स्वाती_आंबोळे Happy
त्याच किसात थालिपीठाचे/ ज्वारीचे पीठ मिक्स करून घेते>>> पीठ पातळ पडल होत, पुन्हा बघते प्रयत्न करुन Happy

मी करून पाहिले हे धपाटे. चांगले झाले खमंग. धन्यवाद रेसिपीसाठी Happy मुलांना डब्यात द्यायला नवीन पर्याय मिळाला की बरं वाटतं Lol

फोटो काढले असतील तर टाका की मग Proud

धन्स वावे, तुम्हाला रेसीपी आवडली आणि मी धन्य झाले Happy
इथे पोस्टण्याचा हाच फायद असतो.. Happy