चायनीज चिली ऑईल

Submitted by भास्कराचार्य on 28 July, 2018 - 03:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- सव्वा ते दीड कप तेल (शेंगदाणा तेल किंवा व्हेजीटेबल ऑईल चालेल, पटकन संपवणार असाल तर लाईट ऑलिव्ह ऑईलही चालेल)
- ३-५ स्टार अ‍ॅनिस (चक्री फूल) - हे बडीशेपचं चिनी भावंड आहे.
- १ दालचिनीचं खोड/साल काय म्हणत असतील ते (cinnamon stick)
- २ तमालपत्राची मोठी पानं
- २.५-३ चमचे सिचुआन पेपरकॉर्न (सालासकट सिचुआनची काळी मिरी) - भारतीय चवीला इतकी मिरी आवडणार नसेल, तर २ चमचे घ्या.
- पाऊण कप चिली फ्लेक्स (तेलाच्या साधारण निम्मे - चवीनुसार इकडेतिकडे)
- १-२ चमचे मीठ (चवीनुसार)

क्रमवार पाककृती: 

चायनीज चिली ऑईल ही चिनी पाकशास्त्रात लागणारी एक अत्यावश्यक गोष्ट आहे. नूडल्स, फ्राईड राईसपासून कोल्ड सॅलड, डंपलिंग्सपर्यंत अनंत गोष्टींचा स्वाद चांगल्या सुगंधी चिली ऑईलने अधिकच खुलवता येतो. उत्तम चिली ऑईल म्हणजे सुगंधी, छान लाल रंगाचं, दाट चिली ऑईल. हे बाटलीत विकतही मिळतं, पण आपण घरी करून बघावं म्हणून प्रयत्न केला. तो चांगला झाल्यासारखा वाटला, म्हणून इथे पाकृ द्याविशी वाटली.

१. तेल, स्टार अ‍ॅनिस, दालचिनी, तमालपत्र, आणि काळी मिरी एका छोट्या आकाराच्या पातेल्यात एकत्र घ्या. मी चहाच्या पातेल्याच्या आकाराच्या पातेल्यात केलं.

२. सुरवातीला बुडबुडे येईपर्यंत मध्यम आचेवर तापवा. मी गॅस अगदी कमी ठेवला होता, तरी २-३ मिनिटेच लागली. असे बुडबुडे दिसायला लागले, की उष्णता कमी करा.

३. बुडबुडे पुन्हा शून्याच्या जवळ जायला लागले, की पुन्हा अजून थोडं गरम करा. पण बुडबुडे पुन्हा आले, की पुन्हा गॅस कमी करायला विसरू नका. तेलातले मसाले अधिकाधिक गडद रंगाचे व्हायला लागतील, पण ते काळवंडायला नकोत. ते जळले, तर ऑईलमध्ये त्यांच्यातल्या सुगंधी संयुगांबरोबर काळा कार्बनही जाऊन त्याची चव तितकी चांगली लागणार नाही.

ChilliOil01.jpg

४. असं जवळपास २०-३० मिनिटे करा. मी २२-२३ मिनिटे केल्यावर मला वाटलं, की आता मसाले जळतायत, म्हणून थांबलो. सुरवातीच्या पाच मिनिटांनंतर खमंग वास किचनमध्ये पसरेल. तो वास पुढच्या अर्ध्या तासात घरभर पसरेल, आणि लोक तुम्हाला चांगलं/वाईट ह्यापैकी एक काहीतरी नक्की म्हणतील. Proud

५. तेल ५ मिनिटं थोडं थंड होऊ द्या. मग ते गाळून त्यातले सर्व मसाले काढून घ्या. मग एका भांड्यात चिली फ्लेक्स आणि मीठ एकत्र घेऊन त्यावर तेल हळूहळू ओता, आणि चांगलं मिश्रण करून घ्या. मग तेल अजून थोडं थंड झाल्यावर ते काचेच्या भांड्यात भरून घ्या. झालं चायनीज चिली ऑईल तयार!

ChilliOil02.jpg

हे तेल फ्रीजमध्ये ६ महिने टिकतं. मात्र तेल काढायला उष्टा चमचा वापरू नये.

हे तेल बर्‍याच गोष्टींमध्ये वापरता येऊ शकतं. ह्या तेलात मसालेदारपणा आणि तिखट ह्या दोघांचं मस्त मिश्रण असल्याने पदार्थांना छान चव येते. हे तेल वापरून मी हॉट पॉट स्टाईल नूडल्स घरच्या घरी केल्या. त्याची पाकृ नंतर देण्यात येईल.

वाढणी/प्रमाण: 
१ जॅमची बाटली भरून
अधिक टिपा: 

मसाले जळू देऊ नका. बाकी सगळं चवीचं मसाल्यांवर सोडा. तुमच्या आवडीनिवडीनुसार प्रमाण कमीजास्त करून ही पारंपरिक पाककृती तुम्हाला हवी तशी करता येईल.

माहितीचा स्रोत: 
आंतरजालावर पाहिलेल्या आणि मित्रांकडून ऐकलेल्या पाकृमध्ये थोडीफार मी केलेली छेडछाड
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद. Happy

शाली, साक्षी, जरूर करून बघा. ह्या तेलाच्या चवीबरोबर तो दालचिनीमिश्रित सुवास आणि दिसायला लालचुटूक रंग ह्यामुळे ते मला क्षुधावर्धक वाटते. Happy आणि नूडल्ससारख्या रेसिपीमध्ये तो रंग एकदम जान आणतो.

- २.५-३ चमचे सिचुआन पेपरकॉर्न >> हे आपल्याकडल्या मिरीसारखे नसून थोडेस तिर्फळासारखे असतात ( दिसायला, चवीत बराच फरक आहे )
Tirphal.JPG

डावीकडचे सिचुआन पेपर्स , उजवीकडची तिर्फळे

रेसिपी सोपी वाटते आहे. स्वैपाकघरातल्या खिडक्या उघड्या ठेवण्यासारखे वेदर असेल तेंव्हा करुन पाहणार

धन्यवाद भास्कराचार्य , आत्तापर्यंत खूपदा तुमची कृती वापरून चिली ऑइल केलं आहे . फोटो काढायचा मुहूर्त ह्यावेळेस होता Happy WhatsApp Image 2024-08-11 at 8.01.58 PM.jpeg