विजेचा मनमानी वापर

Submitted by तोमीन on 8 May, 2018 - 02:59

एखादा सुटीचा दिवस असतो. योगायोगाने त्या दिवशी आपली आवडती क्रिकेट म्याच टीव्हीवर चालू असते. ती अगदी रंगात आलेली असते आणि आपण ती एन्जॉय करत असतो आणि अचानक ते प्रक्षेपण बंद पडते. कारण? अर्थातच विजेचे भारनियमन. मग आपली प्रचण्ड चिडचिड होते आणि नकळत आपल्या तोंडून “आय* त्या वीज ***च्या”, असे उद्गार बाहेर पडतात.

अशा प्रकारे रंगाचा बेरंग करणारे आणि आपल्या कामाचे वेळापत्रकही बिघडवून टाकणारे भारनियमन आपल्याला उन्हाळ्यात छळते. मेट्रो आणि मोठ्या शहरांत याची झळ फार नाही बसत. पण बाकी गावांत विजेच्या नावाने शंख होत असतो. विजेच्या अपुर्या उत्पादनाबाबत आपण सरकारच्या नावाने बोंब मारून मोकळे होतो. पण उपलब्ध विजेचा वापर आपण काळजीपूर्वक व काटकसरीने करतो का?

अंघोळीसाठी (अगदी उन्हाळ्यात पण) बरेच गरम पाणी तापवण्याच्या नादात आपण बाथरूममधील गिझर हे घरातील सर्वाधिक वीज वापरणारे उपकरण आहे हे विसरून जातो. काही घरांत तसेच कार्यालयांत विजेचा मनमानी वापर चालू असतो. दिवसा सर्व पडदे लावून घ्यायचे, अंधार करायचा आणि मग ट्यूबलाईटी जळत ठेवायच्या. हा सगळा उफराटा प्रकार आहे. आपल्या खोलीतून बाहेर पडताना दिवे व पंखे खुशाल चालू ठेवणे, फरश्या पाण्याने धुतल्यावर त्या वाळण्यासाठी फुलस्पीडमध्ये पंखे लावणे, ४० C तापमान असताना ड्रायरने कपडे वाळवणे.... ही सर्व विजेच्या उधळपट्टीची लक्षणे आहेत.

आता रात्री बाहेर पडून बघा काय दिसते ते. कितीतरी ऑफिसेसच्या पाट्या रात्रभर neon signs मध्ये झळकत असतात. हॉस्पिटल व अत्यावश्यक सेवांच्या बाबतीत हे योग्य आहे. पण, जे उद्योग रात्री कायम बंद असत्तात त्यांनी अशी वीज जाळावी काय?
‘एसी’ चा वापर पण खूप काळजीपूर्वक व्हायला पाहिजे. काही घरांत तो २४ तास चालू असतो. अहो निदान पहाटे तरी बंद करा ना राव. अजून ती उत्सवांची डोळे दिपवणारी रोषनाई तर काय वर्णावी? अन ते रस्त्यावरचे सार्वजनिक दिवे सकाळी ८ पर्यंत चालू दिसले की पण फार राग येतो.

वीज उत्पादन ही खर्चिक बाब आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरण यामुळे विजेची मागणी कायम वाढतीच राहते. सोलरचा वापर आपल्याकडे तसा कमीच आहे. वीजनिर्मितीचे नियोजन हा तज्ञांचा विषय आहे. पण नागरिक म्हणून विजेचा काळजीपूर्वक वापर ही तर आपलीच जबाबदारी आहे. आधीच उन्हाळ्याने लाही लाही होत असते आणि त्यात कुठे विजेची नासाडी होताना दिसली की मग डोके अगदी सटकते बघा.

बस्स, सर्वांना वीज जपून वापरायचे आवाहन करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नागरिकांना पुरेशी वीज उपलब्ध करून देणं हे सरकारचे कर्तव्य आहे, ज्यात ते कमी पडत आहे. पहाटेच्या वेळी वीज वाचवून काय फायदा? कोण वापरणार ही वीज? उलट पहाटेच्या वीज वापरामुळे महामंडळाला जे चार पैसे मिळतात तेही मिळणार नाहीत , मग कुठल्यातरी रूपाने आपल्या वीजबिलातून झालेला तोटा करतील वसूल.

जिथे जिथे शक्य आहे तिथे लोकांना घरून काल्म ( Wink ) करू द्यावे. इन्फ्रा कॉस्ट, इलेक्ट्र्रिसिटी इ बरेच खर्च वाचतील.

सहमत आहे
या गर्मीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणार्‍यांचे मला कौतुक वाटते.
त्यात थोडे उन वरती आले की सौरशक्ती आपला प्रताप दाखवत स्वत:हून पाईपातील पाणी गरम करते. लोकं त्यावर गिझर कसा वापरतात कमाल आहे.
त्यात गरम पाण्याचा शॉवर घेणे म्हणजे वीज आणि पाणी दोघांचा अतिरीक्त वापर..

पण शेवटी कसं आहे, ज्याच्याकडे ते मुबलक आहे त्याला याची किंमत कधीच समजणार नाही.
एखाद्या गडगंज श्रीमंत माणसाला तुम्ही सांगितले की तांब्याबादलीन आंघोळ कर, एसीचा वापर कमी कर, एका रूममधून दुसर्‍या रूममध्ये जाताना लाईट फॅन बंद करून जा... तर तो हे कसे ऐकणार, आणि का ऐकणार? त्याच्या लाईफस्टाईलला तो साजेशेच वागणार.

वीज व पाणी वापर ह्या दोन गोष्टी तुम्ही वाया घालवल्या नाहीत तर कुणी दुसरा वापरू शकतो हे एक व आज तुमच्याकडे अमर्याद संपत्ती आहे म्हणून तुम्ही वीज व पाण्याची अमर्याद उधळपट्टी केली तर अशी वेळ येईल की अमर्याद संपत्ती वापरूनही या दोन गोष्टी, विशेषतः पाणी मिळणार नाही हे दुसरे, हे घरात व बाहेर दोन्हीकडे कित्येक वेळा सांगून मी वैतागलेय आता. परिणाम शून्य.

वीज व पाणी वापर ह्या दोन गोष्टी तुम्ही वाया घालवल्या नाहीत तर कुणी दुसरा वापरू शकतो हे एक व आज तुमच्याकडे अमर्याद संपत्ती आहे म्हणून तुम्ही वीज व पाण्याची अमर्याद उधळपट्टी केली तर अशी वेळ येईल की अमर्याद संपत्ती वापरूनही या दोन गोष्टी, विशेषतः पाणी मिळणार नाही हे दुसरे, हे घरात व बाहेर दोन्हीकडे कित्येक वेळा सांगून मी वैतागलेय आता. परिणाम शून्य.>>>मी पण आहे तुमच्याबरोबर Sad असा संताप येतो ना अशावेळी.

या गर्मीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणार्‍यांचे मला कौतुक वाटते.....
आमच्या एका परिचित व्यक्तीला एक विचित्र सवय आहे. आंघोळीच्या वेळी गिझर (गॅॅस) पूर्ण क्षमतेने चालवून कडकडीत पाण्याने आंघोळ करायची. (ती बाहेर येते , तेव्हा बाथरूम पूर्ण वाफेने भरलेला असतो!) आणि मग बाहेर आल्यावर गरम होतं म्हणून फुल स्पीडमध्ये पंखा लावून त्याखाली बसायचं!!!

पण कोमट पाण्याने आंघोळ कर म्हटलं तर पटत नाही!!!

या गर्मीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करणार्‍यांचे मला कौतुक वाटते..... >>> मला लागतं गरम पाणी .
पण मग मी गीझर फक्त २-३ मिन. चालू ठेवते . पाण्याची धार एक्दम बारीक ठेवते , पाणी कडकडीत येतं एक्दम. मग गीझर बन्द करून टाकते .
नंतर मग पाण्याची धार मोठी केली तरी बादलीभर कोमट पाणी मिळतं.

<< वीज व पाणी वापर ह्या दोन गोष्टी तुम्ही वाया घालवल्या नाहीत तर कुणी दुसरा वापरू शकतो >>
पाण्याच्या बाबतीत खरे आहे, पण विजेच्या बाबतीत ते तितकेसे बरोबर नाही कारण वीज साठवून ठेवणे खर्चिक आहे. एकदा वीज ग्रिडमध्ये सोडली की ती वापरावीच लागते. त्यामुळे मुळात किती वीज ग्रिडमध्ये सोडायची हे खरे कौशल्याचे काम आहे आणि उपलब्ध विजेपेक्षा जर डिमांड जास्त असेल तर भारनियमन करावे लागते.

जरा ग्रिड म्हणजे काय ते सांगणार का ?>>>>

ग्रिड म्हणजे वीज वहन जाळे. विद्युत निर्मिती केंद्रापासून आपल्या घरापर्यंत वीज वाहून आणण्यासाठी जी वहन व्यवस्था असते त्याला 'ग्रिड' असे म्हणतात. (माझ्या माहितीनुसार, मी काही यातील तज्ञ नाही.)

विजेच्या बाबतीत ते तितकेसे बरोबर नाही कारण वीज साठवून ठेवणे खर्चिक आहे. एकदा वीज ग्रिडमध्ये सोडली की ती वापरावीच लागते. त्यामुळे मुळात किती वीज ग्रिडमध्ये सोडायची हे खरे कौशल्याचे काम आहे>>>>>

हो, बरोबर, अशा वेळी शहरात दिवसाही दिवे लावावे लागण्यासारख्या बिल्डिंगी बांधण्यापेक्षा सूर्याचा जास्तीत जास्त उपयोग करून ही वाचलेली वीज शेताला देता येते. मी मागे एका शेतकरी कुटुंबात गेले होते 2 दिवस राहायला, ते लोक रात्री 2 वाजता उठून पाणी द्यायचे कारण तेव्हा लाईट असायची, बाकी संध्याकाळपासून इन्व्हर्टरवर कारभार चालवायचे. हे असे सर्वत्रच असते असे ऐकलंय. ही विषम विभागणी सम करता का येणार नाही.

नसेल सोसत एखाद्याला गार पाण्याची अंघोळ.
>>>>>

+ 786
जसे की मी...
मला नाही जमत थंड पाणी कुठल्याही सीजनमध्ये. थंड पाण्याची आंघोळ फक्त पिकनिकलाच.
तसेच मी शॉवर आणि गरम पाणी असे दुहेरी कॉम्बिनेशनही वापरतो. मुंबईत 24 तास वीजपाणी आहे तर त्याचा फायदा उचलला जाणे साहजिकच आहे. लहानपणी चाळीत राहताना त्या शॉवर प्रकाराची फार क्रेझ होती. पण तेव्हा परवडणे शक्य नव्हते. गीझरही नव्हताच. तर ती हौस आता भागवली जातेय.

पण मी पेट्रोल मात्र वाचवतो. माझ्याकडे पेट्रोल डिझेलवर चालणारे कुठलेही वाहन नाही. मी पब्लिक ट्रान्सपोर्टनेच प्रवास करतो. तसेच जे अंतर चालत जाणे शक्य असते तिथे रिक्षा टॅक्सी वापरत नाही. अपवाद कडक उन्हाचा.

मी पण अगदी कमी वापर करते विजेचा. मॅनिअ‍ॅक म्हातारी सारखी सर्वत्र स्विचेस बंद करत राहते. लिफ्ट मधील पंखा जास्त करून लोक तसेच ठेवून जातात. ते मी बंद करत असते. गीझर वापरत नाही.

मी गेल्या वीसेक वर्षांपासून थंड पाण्यानेच अंघोळ करतोय. आवड म्हणून. तसंही मुंबईत माझ्या मते अंघोळीला गरम पाण्याची गरज नसावी. अगदी पर्यटनाला माउंट अबू, उटी वगैरे हिलस्टेशनला गेल्यावरसुद्धा मी भर गारठ्यात थंड पाण्यानेच अंघोळ केली होती. सहज एक वेगळा अनुभव म्हणून. मजा आली होती. इंधन वाचवण्याला माझाही खारीचा वाटा लागत आहे याचे मला समाधान आहे.

मॅनिअ‍ॅक म्हातारी सारखी सर्वत्र स्विचेस बंद करत राहते. >>>>> सही ! मलाही असे 'खूळ' पसंद आहे.
सचिन काळे, चांगली सवय. करते रहो !

भर गारठ्यात थंड पाण्यानेच अंघोळ केली

.. नशीब तुमचा रामानुजन झाला नाही. >>> Rofl

हो ना! मला आठवतं अहमदाबादवरून माउंट अबूला आम्ही पहाटे २ वाजता हॉटेलमध्ये पोहोचलो. थंडी मी म्हणत होती. जाड चादरीत घुसलो. तीन चार तास झोप काढली. सकाळी लवकर तयार रहायला सांगितलं होतं. लाकडाच्या इंधनावर चालणाऱ्या भल्यामोठ्या बॉयलरवर तापवलेलं गरम पाणी नळाला यायला वेळ होता. बस्! बाकीच्यांना अंघोळ न करण्याचं तेव्हढंच निमित्त मिळालं. मी आपली हुडहुडत थंड पाण्याने अंघोळ उरकून घेतली.

वास्तविक कितीही थंड पाणी असू दे, त्याने कुठलाही त्रास न होता अंघोळ करण्याची मी माझ्यापुरती एक सोप्पी पद्धत शोधून काढलीय. खरं तर थंड पाण्याची शरीराला इतकी सवय झालीय, की मी एकदा हॉटेलवर कोमट पाण्याने अंघोळ करण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर सर्व अंगाची भाजल्यासारखी बराच वेळ आग होत होती. मी अजून कुलू मनालीला गेलेलो नाहीए. तिथे बर्फ पडलेला असताना मी तिथे जाणार आहे आणि थंड पाण्याने अंघोळ करून पहाणार आहे. मला माझ्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायचीय. Happy

बरंच अवांतर झालं. त्याबद्दल क्षमस्व.

माझ्या मित्राने आईसक्रीम खायचं सोडून दिलं वीज वाचवण्यासाठी. आइस्क्रीम बनवण्यापासून खाईपर्यंत सतत डीप फ्रिजर मध्ये ठेवावं लागतं ज्यात खूप वीज खर्च होते. देशातल्या सगळ्यांनी आईस्क्रीम खाणं बंद करावं असा त्याचा आग्रह असतो.

Pages