श्रीम्प एतूफी

Submitted by स्वाती२ on 13 April, 2018 - 15:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२१-२५ मध्यम आकाराच्या सोलून साफ केलेल्या कोलंब्या (मी ५१-६०/पाउंड साईजच्या वापरते.)
१/२ कप कांदा, बारीक चिरुन
१/२ कप सेलरी, बारीक चिरुन
१/२ कप ढोबळी मिरची, बारीक चिरुन
३/४ कप टोमॅटो बारीक चिरुन (मी झेस्टी चिली स्टाईल कॅन्ड टोमॅटो साधारण ४-५औस वापरते)
२ टे. स्पून कणिक
१ टे. स्पून बटर
१ टे स्पून + २ टीस्पून तेल
१/२ टी स्पून वुस्टर्शायर सॉस
मीठ चवीप्रमाणे
२ टी स्पून + १/२ टीस्पून क्रिओल मसाला ( कृती देत आहे पण विकतचा मसाला वापरु शकता)
साधरण दीड ते पावणे दोन कप पाणी किंवा चिकन स्टॉक (मी दोन्ही निम्मे निम्मे घेते )

वरुन घालण्यासाठी-
थोडी कांद्याची पात
हॉट सॉस - अधिक तिखट हवे असल्यास
सोबत वाढायला
ब्राउन राईस किंवा साध्या तांदळाचा भात

क्रिओल मसाला
१ टे स्पून गार्लिक पावडर, उपलब्ध नसेल तर २ -३ लसणीच्या पाकळ्या किसून त्या कांद्यासोबत वापरा
१ टे स्पून ओनियन पावडर, उपलब्ध नसल्यास चालेल, आपण कांदा वापरणार आहोत..
१ टेस्पून वाळवलेली ओरॅगानो
१ टेस्पून वाळवलेली थाईम
१ टेस्पून तिखट
१ टेस्पून मिरे पावडर
२ टेस्पून पाप्रिका
सर्व एकत्र करुन छोट्या बरणीत भरुन ठेवा.

क्रमवार पाककृती: 

साफ केलेल्या कोलंबीला अर्धा चमचा मसाला लावून बाजूला ठेवा.
या पदार्थातील महत्वाचा एक घटक म्हणजे रु. त्यासाठी एका जाड बुडाच्या लहान पातेल्यात कणिक घालून मध्यम आचेवर ठेवा. लाकडी कालथ्याने रवा भाजतो तसे ३-४ मिनिटे कोरडेच भाजा. आच मंद करुन आता त्यात १ टे स्पून बटर आणि १ टे स्पून तेल घाला आणि कालथ्याने सतत हलवत भाजत रहा. गरज वाटल्यास अजून थोडे तेल किंवा बटर घालू शकता. लाडवासाठी बेसन भाजतो साधारण तसाच प्रकार आहे. फिकट बदामी रंगाचा रु तयार झाला की आचेवरुन उतरवा.( मला एटूफीत डार्क रु आवडत नाही पण तुम्हाला आवडणार असेल तर अजून काही वेळ न करपवता भाजू शकता)
आता मोठ्या पॅनमधे १ टीस्पून तेल मध्यम आचेवर तापत ठेवा. तेल तापले की त्यात कांदा घालून २ मिनिटे परता. चिरलेली सेलरी आणि बेलपेपर आणि वापरणार असल्यास लसूण घालून परता. खाली लागू नये म्हणून २-३ चमचे पाणी घालायला हरकत नाही. कांदा मऊ झाला की त्यात टोमॅटो घालून परता. मसाला घालून परता आणि अर्धा कप पाणी घाला. आता बाजूला ठेवलेल्या रु मधे पाव कप पाणी किंवा स्टॉक घालून जरा सरसरीत करुन घ्या आणि हे मिश्रण शिजत ठेवलेल्या कांद्या टोमॅटोच्या मिश्रणात घाला. नीट ढवळून गुठळ्या रहाणार नाहीत ना ते पहा. गरजेनुसार अजून पाऊण ते एक कप पाणी घाला. वुस्टरशायर सॉस घाला. उकळी आली की त्यात बाजूला ठेवलेल्या कोलंब्या घालून आच मंद करा. ३-४ मिनिटात कोलंब्या शिजतात. शिजल्या की चव बघून मीठ घाला. अजून मसाला हवा असल्यास १/४ चमचा मसाला घाला.
वाढताना खोलगट डीशमधे भाताची मूद घालून सोबत श्रीम्प एटूफी वाढा. असल्यास वरुन थोडी कांद्याची पात घाला. जास्त तिखट हवे असल्यास सोबत हॉट सॉस द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

ही कृती माझ्या लेकाच्या सोईने बदल केलेली आहे .
मसाला लावलेली कोलंबी सवतवळून घेतल्यास चव अधिक खुलते पण लेक एक पॅन घासायला कमी पडावे म्हणून तसे करत नाही.
मी कांदा परतल्यावर त्यातच पीठ, बटर, तेल घालून रु करते आणि हव्या त्या रंगाचा रु झाला की सेलरी वगैरे घालते. लेकाला रु सेपरेट तयार करणे सोपे पडते. तसेच कांदा-टोमॅटो बेसची स्वतंत्र डबल बॅच करुन ठेवल्यास त्यातील निम्मा भाग दुसर्‍या पदार्थात वापरता येतो.
कोलंबी ऐवजी मसाला लावलेला कॅट फीश ब्रॉईल करुन किंवा कॉर्नमिल लावून पॅनमधे तळून याच पद्ध्तीने मस्त कॅटफीश एटूफी करता येतो.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक रेस्टॉरंट, माझी वही , टिवी प्रोग्रॅम्स आणि माझा लेक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅटफिश वापरला तर तो मोडत नाही का?>>नाही . कॅटफिशला थोडा लिंबाचा रस लावून त्यावर कोरडा मसाला दोन्ही बाजूनी लावायचा आणि फॉईलवर ठेवून ओवनमधे ब्रॉइल करायचा . ब्रॉईल केलेले तुकडे डिशमधे ठेवून त्यावर तयार सॉस गरमच घालायचे. सेंट ऑगस्टीनला एका रेस्टॉरंटमधे असे कॅटफिश एटूफी खाल्ले होते.

आहाहा! तोंपासू.. रविवारी येण्याचं सार्थक झालं म्हणायचं Lol
छान रेसीपि (पुर्वानुभव लक्षात घेऊन जाणकारांनी तुम्हीही ट्राय करा म्हणून उगाचा सल्ला देऊ नये! Wink )
कोलंबी माझ्या अगदी आवडती आहे, आत काटा नसतो नं Wink

रेसिपी एकदम यम्मी आहे. राइस आणि प्रॉन्स ( in any form) हे माझ आवडतं कॉम्बिनेशन आहे. क्रिओल मसाला अ‍ॅमेझॉन.in वर नाही दिसत. या वेळेस मला नवर्‍याला USहुन आणायला सांगणं शक्य आहे तर स्टॉक करुन ठेवावा का?

सशल. मी देखील तसाच उच्चार करत असे पण एका फळ्यावर मेनू टाईप हाटेलात ऑर्डर घेणार्‍या बाईने वेगळा उच्चार केला त्यामुळे ...
नक्की उच्चार कसा करायचा कुणाला माहित असल्यास इथे सांगा प्लीज.

मनिमाऊ, युस हुन क्रिओल्/केजुन सिझनिंग आणायला सांगणार असल्यास त्या जोडीला ड्राईड ओरॅगानो, थाईम, पाप्रिका वगैरे देखील मागवल्यास नंतर त्या चवीशी मिळता जुळता घरगुती मसाला करता येइल. दुकानातल्या मसाल्यात बरेचदा मीठ असते त्यामुळे मी घरगुती मसालाच वापरते.

सर्व प्रतिसादकांना आणि वाचकांना धन्यवाद.

धन्यवाद त्रिशंकू. तो सोर्स मला माहित आहे. पण मला इथे कुणी मायबोलीकर त्या भागात रहात असल्यास, स्थानिक नक्की कसा उच्चार करतात ते हवे होते. कारण मी जिथे हा दुसरा उच्चार ऐकला ते एकदम मॉम अ‍ॅन्ड पॉप टाईप फॅमिली रेस्टॉरंट होते.

तिलापिया चांगला लागतो. बे स्कॅलप्सही छान लागतात.
सामनचा फ्लेवर माईल्ड नसतो त्यामुळे मला स्वतःला सामन या पद्धतीने नाही आवडणार. मी फक्त तेरियाकि ग्लेझ वाला नाहीतर उदिडमेथीवाला सामन खाते.

मनिमाऊ, युस हुन क्रिओल्/केजुन सिझनिंग आणायला सांगणार असल्यास त्या जोडीला ड्राईड ओरॅगानो, थाईम, पाप्रिका वगैरे देखील मागवल्यास नंतर त्या चवीशी मिळता जुळता घरगुती मसाला करता येइल. >>> स्वाती थँक्यु ! ड्राईड ओरॅगानो, थाईम, पाप्रिका इथे अगदी सहज उपलब्घ आहेत. आणि बर्‍याच ठिकाणी मिळतात. गार्लिक पावडर पण सहज मिळते. पण तयार क्रिओल मात्र दोराबजीत कधीच पाहिला नाही. आणि तिथे नाही तर इतर ठिकाणी नक्कीच मिळणार नाही. खरं तर अ‍ॅमेझॉन.in वर नाही आश्चर्य आहे.