नाशिक विमानतळ :- (जाणूनबुजून तयार केलेल्या) समस्यांचे तळ
सुमारे ३० वर्षे आधी नाशिक (गांधीनगर) येथून विमानांचे घरगुती (डोमेस्टीक) उड्डाणे होत होती. मी लहान असतांना एनडीसीसी बँकेच्या जुन्या इमारतीत (सीबीएस जवळील) इंडीअन एअरलाईन्स चे बुकींग काउंटर बघीतले होते. गांधीनगर धावपट्टी ही इंडीयन आर्मीच्या ताब्यात होती आणि अजूनही (२०१८) वापरात आहे. मी स्वतः कंपनीच्या कामानिमीत्त तेथे भेटी दिलेल्या आहेत. ही धावपट्टी कमी आसनी विमान उतरण्यायोग्य आहे. गांधीनगर विमानतळ हा नाशिक शहरातच आहे. त्यासाठी फार लांब जावे लागत नाही. अगदी शेअर रिक्षानेदेखील जाता येथे. गांधीनगर हे नाशिक पुणे रस्त्यालगतच आहे.
जुन्या काळी - जेआरडीच्यां काळात - किंवा जेआरडींंनी त्यांनी उडवलेली विमाने कोणतीही धावपट्टी नसतांना त्यांनी लहान विमाने एखाद्या मोकळ्या शेतात तसेच समुद्र किनार्यावर विनासायास आणि नेहमी उतरवलेली आहे किंवा उडवलेली आहेत. (त्यांच्यावरील पुस्तकात असा स्पष्ट उल्लेख आहे.)
ओझर - नाशिक विमानतळाची हवाईपट्टी देखील सैन्याच्याच (किंवा एच ए एल कंपनी - तपशील तपासावा लागेल -) जागेवर आणि ताब्यात आहे. ओझर विमानतळ नाशिकपासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे थेट जाण्यासाठी नाशिकमधून स्वतंत्र वाहनाची सोय करावी लागते.
काही कारणामुळे गांधीनगर येथील विमानउड्डाणे बंद झाली. बहूदा कमी प्रवासी किंवा एअर इंडीयाने बंद केल्यामुळे बंद झाली असावी. पण तो काळ तीस वर्षांपुर्वीचा होता. सामान्य माणसाला विमानप्रवास हा मौजेखातर केला गेलेला प्रवास वाटायचा. आता ३० वर्षांनंतर हवाई वाहतूकीत अमुलाग्र बदल झालेत. सामान्यांना विमानप्रवास गरजेचा वाटू लागला आणि तो त्यांच्या आवाक्यातही आला.
वरील पार्श्वभुमी लक्षात घेता कुणीही सामान्य माणूस विचार करेल की असे असतांना विमानसेवेसाठी नाशिकहून ओझर विमानतळावर का जावे?
भारतीय सैन्य, एच ए एल कंपनी, एअरपोर्ट अॅथोरटी ऑफ इंडीया आणि सार्वजनिक बांधकाम खाते या सर्वांमध्ये हवाई धावपट्टीबाबत कोणताही समन्वय करार नसतांना सन २०१२ च्या दरम्यान ओझर येथे विमानतळाची इमारत बांधायला घेतली. नाशकातील एक मोठे मंत्री आणि सार्वजनीक बांधकाम खात्यातर्फे ही विमानतळाची इमारत बांधायला सुरूवात झाली. मोठा विचित्र प्रसंग आहे पहा. म्हणजे तुमच्या घराजवळ येण्यासाठी कोणतीही सुविधा नाही - रस्तादेखील नाही आणि लांबच्या रस्त्यावर देखील येण्याजाण्याची परवानगी नाही अन तुम्ही घर बांधतात असा प्रकार झाला हा. त्यात सार्वजनीक बांधकाम खाते अन मोठे मंत्री. मोठा योग होता. कसेही करून हवाई वाहतूक नाशिकसाठी चालू करायचीच हा अट्टहास चांगलाच होता. अरे पण मग गांधीनगर हवाई धावपट्टी उपलब्ध होतीच की! आणि तसेही ओझर येथून विमानउड्डांनासाठी हवाई धावपट्टी भारतीय सैन्याने लगेच उपलब्ध करून दिली असे नाही. त्यासाठी मोठ्या मिनतवार्या कराव्या लागल्या. मग त्याच मिनतवार्या गांधीनगर धावपट्टीसाठी का नाही केल्या गेल्या? दोन्ही धावपट्या तर सैन्याच्याच ताब्यात आहेत ना? आणि जी काही विमाने उडवायची होती ती कमी आसनीच होती. अगदी जंबो विमानांची गरज नव्हती. तेवढे प्रवासी देखील उपलब्ध नव्हते.
दोन एक वर्षात विमानतळाची इमारत उभी राहीली. तिचा वापर सुरू झाला नव्हता. कारण धावपट्टी सैन्य वापरू देत नव्हते. देखणी इमारत धुळ खात राहीली. HAL ही इमारत ताब्यात घेत नव्हते. का घ्यावी? त्या इमारतीपासून काही उत्पन्न नसेल तर कुणी ताब्यात का घ्यावी? सर्वसामान्य माणूस इतका विचार करू शकतो तर ज्यांनी विमानतळाची इमारत बांधली ते असा विचार का करू शकले नाही? तुम्ही जर इंटरनेटवर "खराब विमानतळे worst airport terminal" असे शोधल्यास अनेक विमानतळे अशी सापडतील की तेथे इमारत नाही किंवा आहे ती इमारत बस स्थानकापेक्षा जास्त चांगली नाही. म्हणजेच सार्वजनीक बांधकाम खात्याला आणि शासनाला विमानतळ म्हणजेच विमानसेवा असे वाटू लागले होते. प्रवासी विमानसेवेचा लाभ घेतो. ते त्याला महत्वाचे असते. इमारतीत तो काही मुक्कामाला थांबलेला नसतो. म्हणजेच विमानसेवा महत्वाची विमानतळाची इमारत नव्हे.
याच दरम्यान सार्वजनीक बांधकाम खात्याचा मोठा इंजिनिअर हुद्याचा अधिकारी निवृत्त झाला. अन त्याच्या निरोपसमारंभाची पार्टी या इमारतीत झाली. मोठे डीजे वैगेरे लावले गेले. शेजारच्या गावातल्या लोकांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. अजूनही धावपट्टी उपलब्ध झाली नव्हती. मग HAL ने ही इमारत वार्षीक रू. १/- भाड्याने त्याब्यात घेण्याचा सोपस्कार पार पडला. धावपट्टी उपलब्ध झाली. पण विमानांचे काय? कारण कोणतीही विमाने उड्डाण कंपनी ओझरला विमानसेवा द्यायला उत्सूक नव्हती. पुरेशी प्रवासी उपलब्ध नव्हते. ओझर विमानतळ अडचणीचे होते. तेथे जाण्यासाठी नाशिकहून अर्धा ते पाऊण तास लागतो. कारण हायवेपासून आत आहे. तेथे जाण्यासाठी सार्वजनीक प्रवास सेवा उपलब्ध नाही. त्यानंतर मग मुंबई पुणे येथे उड्डान. मुंबईला गेल्यास डोमेस्टीक एअरपोर्ट मुख्य कामाच्या ठिकाणापासून दुर आहे. सामान्यतः मुंबईला काम हे सचिवालय, फोर्ट चर्चगेट, विधानभवन आदी ठिकाणी असते. म्हणजे मुंबईला पोहोचल्यावरही पुन्हा खाजगी प्रवास आहेच. मग नाशिकहून मुंबईचा विमानप्रवास हा अडचणीचा ठरू लागला. रस्तेवाहतूकीने उलट लवकर पोहोचू अशी परिस्थिती आहे.
त्यात परत शासनाचा उडान योजनेने ओझर विमानतळ जोडले गेले. पण उड्डाणे काही निट सुरू झाली नाही. ओझरहून मुंबई, पुणे उड्डाणे झाली पण ती काही टिकली नाही. सातत्य राहीले नाही. ओझरहून पुणे, मुंबई सोडले तर इतर ठिकाणी जास्त प्रवासी उपलब्ध होणार नाही. आणि ओझर विमानतळावर जाणे अडचणीचे आहे.
विमानप्रवास आता चैनीची बाब न राहता गरज बनली आहे. एखाद्या राजधानी रेल्वेच्या भाड्यापेक्षा कमी भाड्यात विमानप्रवास होवू शकतो. नाशिक- मुंबई, पुणे, शिर्डी, सुरत, इंदूर या कमी अंतर विमानसेवेच्या दरम्यान खाणे पिणे शक्य नाही - गरजही नाही. विमानाला लागणारे इंधन हे रॉकेलच्या दरात भेटते. छोटी विमाने, आवश्यक सेवा असणारी विमानतळे भले मग ती ए.सी. नसेना का किंवा एखाद्या बस स्थानकासारखी दिसली तरी चालतील. दक्षिण आफ्रिकेतील अनेक अविकसीत देशांत विमानसेवा चांगली आहे. लोकं अगदी लुंग्या घालून प्रवास करतात, बाजारहाटातल्या पिशव्या घेवून डोमेस्टीक विमानात प्रवास करतात. थोडक्यात आपल्याकडे प्रवाशांना कमी पैशात विमानसेवा देवून विमानसेवेची सवय लावायला हवी. वरील ओव्हरहेड टाळता येवून कमी पैशात विमानप्रवास शक्य आहे.
प्रवाश्यांना प्रवास महत्वाचा असतो. इमारती, सेवा, सुविधा त्यांचा दर्जा ही बाब दुय्यम आहे हे सत्य आहे. प्रवासी सेवेबाबत एकदा तक्रार करतील अन उडून निघून जातील. पण विमान उड्डाणे महत्वाची आहेत. शेवटच्या परिच्छेदातील मागण्या आणि पुन्हा गांधीनगर - नाशिक येथील धावपट्टी वापरात आणणे जोपर्यंत पुर्ण होत नाही तो पर्यंत नाशिकहून विमानउड्डाणे शक्य नाही असे माझे ठाम मत आहे. शासकीय व्यक्ती, पुढारी यांनी प्रत्येक कामात - केवळ विमानतळ-विमानसेवा नव्हे - थोडी कल्पकता, सामान्यांचा विचार आदी गोष्टी केल्यास कोणतेही काम कठीण नाही.
- पाषाणभेद
दुखरी नस आहे ही नाशिक करांची
दुखरी नस आहे ही नाशिक करांची
अरेरे....
अरेरे....
पण हल्ली नाशिक ओझर मधलं अंतर कमी झालं आहे ना उड्डाणपूल झाल्यामुळे? पूर्वी 40 ते 45 मिनिटं लागायची. ते ही बसने. ओझर चे विमानतळ हाय वे पासून 10 मिनिट अंतरावर असावे. म्हणजे ओझर विमानतळ ते नाशिक अंतर 30 ते 35 मीनीट असावे आता (माझा अंदाज). तसही मुंबई किंवा इतर शहरातील विमानतळ ते त्या शहरात इतर ठिकाणी जायला किमान 30 ते 45 मिनिटं लागतात.
पाषाणभेद-
पाषाणभेद-
बऱ्याच मुद्द्यांची सरमिसळ झाली आहे या लेखात.
1) कोणत्याही शहराला त्यातील इंडस्ट्री/ पर्यटन / धार्मिक ठिकाण ट्राफिक मिळवून देते. नाशिक सारख्याच स्केल वर असणारे औरंगाबाद हे चांगले उदाहरण ठरेल. औरंगाबाद मध्ये होणारा फूट फॉल वाढवण्यासाठी अजंठा एलोरा चा हात आहे, इंडस्ट्री मुळे निर्माण होणारा ट्रॅफिक त्यामानाने कमी आहे.
त्यामुळे केवळ इंडस्ट्री आहेत म्हणून नाशिक चा विमानतळ तग धरेल ही अपेक्षा चूक आहे. आजूबाजूला धार्मिक क्षेत्रे आहेत पण प्रचंड ट्राफिक जनरेंट करेल असे शिर्डी सोडता दुसरे ठिकाण नाही.
2) पुण्या मुंबई बरोबर सुधारलेली बायरोड कनेक्टिव्हिटी पण या विमानतळाच्या मुळावर येईल. मुंबई मधून अगदी साफ दक्षिण मुंबईतून नाशिक ला यायला खाजगी वाहनाने 5 तास खूप होतात , ओला आउट स्टॅशन 3000 पर्यंत घेते, जर 2 किंवा जास्त माणसांना जायचे असेल तर दर डोई 1500 किंवा कमीच खर्च येईल. कोणतीही विमान कम्पनी इतक्या कमी दरात तिकीट देणार नाही.
उद्या जर पनवेल वरून उड्डाणे सुरू झाली तर हे अंतर अजून कमी होईल.
3)>>>>>>वरील ओव्हरहेड टाळता येवून कमी पैशात विमानप्रवास शक्य आहे.>>>>>>>
तुम्ही म्हणता ते कमी होणारे ओव्हरहेडस (फॅन्सी सुविधा आणि बिल्डिंग) AAi चे असतील. विमान कम्पनी चे ओवरहेड्स उलट वाढतील कारण त्यांना कमी प्रवाशांसाठी स्टाफ मेंटेन करावा लागेल.
4) तुम्ही म्हणता तशी 10 सीटर विमानांची सर्विस MP मध्ये जबलपूर, कान्हा, खजुराहो वगैरे ठिकाणची आहे. पण तिकीट मजबूत आहे 2014 मध्ये मी 6000/- च्या आसपास एका तिकीट साठी मोजले आहेत. तिकडे अंतर जास्त असल्याने हा खर्च थोडातरी जस्टीफाईड वाटतो, नाशिक मध्ये तसे वाटणार नाही.
५) नाशिक-मुंबई-XX विमानांच्या वेळा,
से जयपूर किंवा चंदिगढ ला जाणारे कनेकटिंग विमान पकडायला प्रवाशाला मुंबई ला बराच वेळ थांबावे लागणार असेल तर तो रोड ने जाणे पसंत करेल.
या सगळ्या कारणांमुळे नाशकात कुठेही विमानतळ असला तरी नाशिक मध्ये हवाई ट्राफिक वाढेल असे मला वाटत नाही.
प्रश्ण योग्य आहे पण गंगा थोडी
प्रश्ण योग्य आहे पण गंगा थोडी ऊलटी वाहते आहे आणि तेही नाशीक च्या बाबतीत, दुर्दैव! खरे तर नाशिक काय किंवा नवी मुंबई, चाकण काहिही असो.. आपल्याकडे प्रगती आणि प्लॅनिंग चे मॉडेल बहुतांशी खाली डोके वर पाय असे आहे. तरिही विमानतळे हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने सवडीने लिहीन.
सॅन डीयेगो, लॉस एंजेलिस, दुबई, अबू धाबी, बहारीन या विमानतळ बांधणी कामातील तब्बल २ दशके अनुभवातून काही खूप शिकायला मिळाले त्या अनुशंगाने एक लेख (माला) लिहायचे मनात होते... म्हणजे एकूणात विमानतळ, वाहतूक, प्रवासी, चलन यंत्रणा, पर्यावरण, प्रस्थापन,तंत्रद्यान, सेवा, आर्थिक मॉडेल, अशा अनेक अंगाने या विषयाकडे पहावे लागते. या सर्वच गोष्टि एकेमेकाशी संलग्न आहेत.. त्यातही आपल्याकडे 'राजकीय' व 'लोकल' फॅक्टर खूप जास्त प्रभाव टाकणारे आहेत. त्यामूळे पेपर वर जरी विमानतळ व विमाने थोडीफार सारखीच दिसली तरी विमानतळ ऊभारणे आणि तिथे विमान प्रत्यक्षात ऊतरणे हाच एक मोठ्ठा प्रवास आहे.
असो.
@ योग,
@ योग,
.....विमानतळ बांधणी कामातील तब्बल २ दशके अनुभवातून काही खूप शिकायला मिळाले त्या अनुशंगाने एक लेख (माला) लिहायचे मनात होते........
तुमचे लवासाबद्दलचे अभ्यासपूर्ण आणि अभिनिवेशरहित लेखन वाचले आहे. त्यामुळे विमानतळ-हवाई वाहतूक ह्या विषयावर तुमचे लेखन वाचायला आवडेल.
अवश्य लिहा.
अनिंद्य
@ पाषाणभेद,
@ पाषाणभेद,
तुम्ही लेखात उल्लेख केलेली ती विमानतळाची इमारत ताब्यात घेतल्यानंतर HAL आणि अन्य प्रकल्प-भागधारकांनी ४-५ वर्षांपूर्वी एक भव्य परिषद भरवली होती - देशी-विदेशी विमान कंपन्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विमानसेवा सुरु कराव्यात असा उद्देश.
भाषणादि कार्यक्रमानंतर जेंव्हा धावपट्टी, उपलब्ध उड्डाणसोयी, विमानश्रयासाठी हँगर्स / पार्किंग वगैरे सोयींबद्दल विचारणा झाली तेंव्हा फजिती झाली होती आयोजकांची - सोयी अर्थातच पुरेश्या नव्हत्या.
आजही परिस्थिती फार बदलली असेल असे वाटत नाही.
विमानतळ म्हणजे फक्त यात्री टर्मिनलची इमारत नाही हे आपल्याला समजेल तो सुदिन
नाशिक सारख्या विमानतळाची
नाशिक सारख्या विमानतळाची उपयुक्तता तेव्हा वाढेल जेव्हा ट्रान्झिट सोपे होईल. मला भारतात एका विमानातून उतरून दुसर्यात ट्रान्झिशन करण्याचा फारसा अनुभव नाही. जो थोडाफार आहे तो खूप सोयीचा वाटला नाही. उदा. पुणे चंदीगढ प्रवासात दिल्लीत ट्रान्झिट होते. एका गेट पासून दुसर्या गेटला जाताना मध्येच सिक्युरिटी, अंतर खूप जास्त होते. थोडक्यात मला जर ३०/४० मिनिटात ट्रान्झिट करायचे असेल ते सोयीचे वाटले नाही. याउलट अमेरिकेत वा युरोपात तुम्ही ट्रान्स्झिट करत असाल (डोमेस्टिक वा शेन्गेन देशांतर्गत ट्रान्झिट) तर ते फार झटकन होते. भारतात जर अश्या पटापट कनेकिटंग विमाने मिळणार नसतील तर नाशिकहून मुंबईला आधी विमानाने, मग तिथे ताटकळणे, मग पुढले विमान, अजून एक ट्रान्झिट असेल तर अजून ताटकळणे हे होणार. त्यापेक्षा गाडीने मुंबईच्या विमानाच्या थोडच आधी विमानतळावर पोचणे लोक पसंद करतात.
भारतात यात लोकसंख्या, ट्रॅफिक
भारतात यात लोकसंख्या, ट्रॅफिक, सुरक्षितता, गरिब इन्फ्रा असे बरेच इश्यु एकत्र आहेत.
साधारण १५ किंवा २० वर्षांनी तोवर राजकीय इच्छाशक्ती(कोणताही पक्ष येऊदे आय डोन्ट केअर) असली तर आपल्या इथे प्रमुख शहरं अशी जोडलेली असतील असं स्वप्न आपण नक्की बघू शकतो.
मी लहानपणी मोबाईल्स नसताना एसटी आणि लोकल ने मध्ये अनेक कनेक्शन्स असलेले वेडेबिद्रे प्रवास करायचे.कधीकधी आईबाबांबरोबर चुकामूक व्हायची, तसं झालं तर काय करायचं याचे प्रोटोकोल्स ठरलेले असायचे. (बहुधा 'कुठेही जाऊ नको आहे तिथेच उभी रहा' हा एकमेव फॉर्म्युला )
आता माझ्याकडे इंटरनेट, ओला, उबर, मेकमाय्ट्रिप, जी पी एस आहे.आय हॅव पॉवर(हिमॅन सारखं ओरडून.)
२० वर्षात तोवर काही मेजर नैसर्गिक अपघात्/युद्ध झाले नाहीत तर आयुष्य अजून सोपं असेल.
>>तुमचे लवासाबद्दलचे
>>तुमचे लवासाबद्दलचे अभ्यासपूर्ण आणि अभिनिवेशरहित लेखन वाचले आहे. त्यामुळे विमानतळ-हवाई वाहतूक ह्या विषयावर तुमचे लेखन वाचायला आवडेल.
धन्यवाद! प्रयत्न करेन.
विमानतळ कुठे असू नये याचे ऊत्तम ऊदाहरण बेंगालुरू असावे.. बहुदा. मुख्य बेंगालुरू शहर व परिसरात काम करणार्यांसाठी कमीत कमी २ तास कधी कधी तीन ते चार तास लागतात विमानतळावर ये जा करायला!
मुंबईहून जेव्हा कधी कामानिमित्त बेंगालुरू ला जावे लागते तेव्हा अक्षरशः त्या कल्पेनेने नकोसे होते.. म्हणजे विमान प्रवास निव्वळ दोन तासाचा आणि पुढे मात्र अजून दोन तास तेही अत्यंत बेक्कार ट्रॅफीक मध्ये.
आमचे बेंगालुरू चे कार्यालय मुद्दामून आधीच्या मुख्य विमानतळापासून जो आता हवाई दलाकडे आहे, फक्त ४ किमी वर होते.. किंबहुना बर्याच आयटी कं त्या नुसार संकुले ऊभारली होती.. पण देवेगौडा महाशयांनी शहराच्या ४० किमी बाहेर शेतजमिनीवर एक ऊत्तम आंतर राष्ट्रीय (व आता आंतरदेशीय देखिल) विमानतळ बांधला पण मुळात ही स्थानिक वाहतूक समस्या तशीच आहे. त्या विमानतळापासून खरे तर मुख्य शहराला जोडणारी भुयारी ट्रेन वा मेट्रो हे सर्व बांधता येऊ शकते.. पण बेंगालुरू ची स्थानिक मेट्रो ४ वर्षे झाली अजून रखड्लीच आहे.. तिथे बाकी चे बोलणेच नको.
थोडक्यात काय तर, विमानतळ बांधणी हा एक सर्वसमावेशक प्रकल्प असावा लागतो... अन्यथा त्याचे फायदे सर्व सामांन्यांपर्यंत पोहचत नाहीत.
'सर्वसमावेशक' या शब्दातच खरी गोम आहे आणि आपले गाडे तिथेच फसते.
असो.
साफ दक्षिण मुंबईतून नाशिक ला
साफ दक्षिण मुंबईतून नाशिक ला यायला खाजगी वाहनाने 5 तास खूप होतात
<<
फुल ट्रॅफिकमधे. तेही मुंबईबाहेर पडण्यात वेळ जातो म्हणून.
अन्यथा, कल्याण भिवंडी बायपास ते नाशिक माझा स्वतःचा अधिकतम ड्रायविंग वेळ २ तास आहे. संपूर्ण ४ लेन रस्ता आहे, अन सिटी ट्रॅफिक नसल्याने शे-सव्वाशे किमी अंतर पार करायला इतका वेळ पुरेसा आहे.
बेसिकात, नाशिकच्या माणसाला मुंबई विमानतळ ३-४ तासात गाठता येतो. नाशिक मुंबई टॅक्सीज पण भरपूर आहेत. तेव्हा इथे विमानतळ व्हाएबल होईल असे वाटत नाही.
*
पण प्रचंड ट्राफिक जनरेंट करेल असे शिर्डी सोडता दुसरे ठिकाण नाही.
<<
शिर्डीला स्वतःचा विमानतळ आहे.
नाशिकजवळ त्र्यंबक आहे, पण तिथे जाण्याची युनिवर्सल फॅशन अजून आलेली नाही. थोडेफार चुकार नारायण नागबळीवाले सापडतात पण मग तो घाईत दर्शन घेऊन परतण्यासारखा कार्यक्रम नाही.
*
मिल्ट्रीच्या ताब्यात धावपट्टी असल्याने प्रॉब्लेम आहेअसे दिसते. अन्यथा, याचा वापर खासगी "विमान ड्रायविंग स्कूल"वाल्यांनी नक्कीच करून घेतला असता.