पराग कुळकर्णी हे सिअॅटल महाराष्ट्र मंडळाच्या समितीवर आहेत. त्यांच्या नजरेतून कार्यक्रम कसा झाला याचे बोलके वर्णन.
------------------------------------------------------------------------------------------------------------
तुमच्यातल्या ज्या ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात एकदातरी व्यासपीठावर कार्यक्रम केला असेल त्यांना नक्की माहीत असणार की विंगेतून दिसणारे जग हे सभागृहात बसून अनुभवलेल्या कार्यक्रमांपेक्षा फारच वेगळे दिसते. जेव्हा तुम्ही स्टेज समोर बसता तेव्हा तुम्हाला दिसतो तो हिरोचा कडक सूट किंवा हिरॉईनची भरजरी पैठणी, पण विंगेतल्या लोकांना दिसतात ती त्या वेशभूषेच्या मागील बाजूला लावलेली ठिगळं आणि पलीकडल्या विंगेतून सतत संवाद "प्रॉम्प्ट" करणारे सहचारी. तर नुकत्याच सुपरहिट झालेल्या SMM सिल्व्हर ज्युबिली कार्यक्रमाचा हा पडद्यापलीकडचा एक संक्षिप्त आढावा. हेतू एवढाच की तुम्हालादेखील कळाव्यात पडदद्यामागच्या या "घडा आणि मोडी"
अभुतपूर्व गोंधळ….
गोंधळ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी उभ्या राहतात. काही लोकांसाठी गोंधळ म्हणजे लग्न, मुंज, बारसे अशा समारंभाच्यावेळी साजरा केलेला एक रंगाविष्कार असेल, काही लोकांसाठी शाळा, कॉलेज, वधू/वर परीक्षा, इंटरव्यू इत्यादी वेळी झालेला लोचा असेल, तर काही लोकांसाठी बहुतांशी देशातील राजकारणी किंवा ऑफिसमधली "बॉस" मंडळी जी कार्यसिद्धीसाठी प्रक्रिया करतात ती असेल. पण शेवटी काय तर गोंधळ म्हणजे गोंधळ आणि SMM रौप्यमहोत्सव हे काही या सर्व व्याख्यांना विसंगत नव्हते. हा तर होता एक अभूतपूर्व गोंधळ आणि मग त्याची तयारी म्हटली की आलेच की सगळे एखाद्या सुपरहिट बॉलीवूड मुव्हीचे इन्ग्रेडिएंट्स.... इसमे ड्रामा, ट्रॅजेडी, सस्पेंस, रोमांस (I mean मंडळाच्या सभासदांमधील एकमेकांबद्दल असलेले प्रेम हो, दुसरे काही नाही), थ्रिलर वगैरे वगैरे सगळे काही होते आणि कलाकार पण तसेच, काही नामांकित - अगदी पुलंच्या नारायण, अंतू बरवा, नंदा प्रधान, मंजुळा आणि बेबी प्रमाणे, तर काही नवीन चेहरे आणि काही गेस्ट अँपिअरन्सेस. निर्मिती काळ साधारण एक वर्ष आणि बजेट भारतातल्या बसच्या तिकिटामागे मावेल एव्हडे तोकडे. हे सगळे जरी कमी, जास्ती प्रमाणात असले तरी एका गोष्टीची बिलकुल कमतरता नव्हती आणि ती म्हणजे "आपल्या मंडळात काही मजा नाही" असे म्हणणाऱ्या सर्व निराशावादी लोकांच्या नाकावर टिच्चून काहीतरी करून दाखवायची मराठी उमेद. एक सकारात्मकता एकजुटीने धडपडण्याची. समाजाला काहीतरी चांगले देण्याची!!
विकतचे श्राद्ध….
असे ‘महा’कार्यक्रम घडत असतांना काही गोष्टींची अजिबात त्रुटी नव्हती. उदाहरणार्थ - भरभरून येणाऱ्या कल्पना आणि मिनिटा-मिनिटाला मिळणारे उपदेश. कमतरता होती ती फक्त अमर्यादित आर्थिक बळाची आणि मनुष्य बळाची. पण शेवटी काय, संत तुकाराम म्हणून गेल्याप्रमाणे "आलीया भोगासी असावे सादर" असे म्हणत मंडळी लागली कामाला.
या कार्यक्रमाच्या संपूर्ण कालखण्डात बऱ्याच कमिटी मेम्बर्सना एकदा तरी नक्कीच वाटले असणार की 'घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे' आणि मग काही जणांनी हे 'विकतचे श्राद्ध' टाळण्याचा प्रयत्न पण केला असेल पण शेवटी घोडं अडलं ते त्या न मोडणाऱ्या मराठी बाण्यासमोर. मग अश्या अनंत संकटांना खंबीरपणे तोंड देत प्रयोगाच्या दिवसाकडे वाटचाल सुरु झाली.
मला माहीत आहे की तुमच्यातल्या बऱ्याचश्या “शब्दशः रसिक” वाचकांना जास्त उत्सुकता असणार ती ही तयारी चालू असतांना झालेल्या मतभेद, रुसवे-फुगवे आणि इतर अनेक राड्यांबद्धल माहिती करून घेण्याची पण माफ करा, ते सगळे एका स्वतंत्र नाटकाला पुरेल एवढे कन्टेन्ट आहे तेव्हा ते 'सिक्वल' साठी जपून ठेवलंय.
आत्ता एव्हडेच सांगेन की कुंपणापलीकडले हिरवे गवत फक्त गुरा-ढोरांनाच आवडते असे नाही आणि एकदा का कुंपणापलीकडे उडी मारली की चिखल कितीही असह्य झाला तरी ती मुलतानी माती आहे असे समजून स्वीकारावे लागते. मग हळूहळू त्याची सवय झाली आणि जाणीव व्हायला लागली ती त्या चिखलातून कलाकलाने उमलणाऱ्या कमळांची. कधी ही कमळे स्पॉन्सरशिपची होती, कधी soldout तिकिटांची, कधी दिवसा दिवसाला सुधारत जाणाऱ्या उद्घाटन सोहळ्याची आणि नाटकाच्या तयारीची, तर कधी भोजनाचे कंत्राट घेणार्या मंडळींनी दिलेली सूट, सह्या होऊन दोन्ही बाजूंनी करार केलेल्या MOU’s ची तर कधी मंडळाच्या असंख्य प्रसिद्ध हितचिंतकांकडून आलेल्या शुभेच्छा संदेशांची. त्या कमळांच्या कळ्या दिसायला लागल्या आणि लगेच कानात वाजू लागले ते शिवकालीन तुतारीचे सूर. मग काय हो, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव!
जस्ट one शो….
शेवटच्या आठवड्यात समिती सभासदांच्या, कार्यकर्त्यांच्या तयारीला, उत्साहाला जसा उत आला होता त्याचप्रमाणात सामोऱ्या येत होत्या अडचणी आणि शंका. अगदी लग्न घराची आठवण व्हावी तशी परिस्थिती होती. कुठे वधूचा ड्रेस घट्ट झाला म्हणून काळजी तर कुठे वराचे केस ऐनवेळी गळायला लागले याची चिंता पण अश्या वेळी लग्न निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठीच जन्माला आलेल्या पुलं च्या 'व्यक्ती आणि वल्ली' मधल्या अजून काही 'नारायण' आणि ‘नारायणी’ गोळा झाल्या आणि वधु-वर एकदाचे चढले बोहल्यावर.
एकीकडे पंचारती ओवाळल्या जात होत्या, सनई, चौघडे वाजत होते, हत्ती, घोडे स्टेज वर चढवण्याचा आणि वेळेत उतरवण्याचा प्रयत्न चालला होता, रुखवत सजत होते आणि उरल्या सुरल्या सर्व ऑर्गनायझर्सचा तांडा पाहुण्यांच्या उदरभरणाची सोय करण्यासाठी सज्ज होत होता. आणि ते पण एकदा नाही तर दिवसातून तीन तीन वेळा - पुरणावरणाच्या मेजवानीचा.
गम्मत म्हणजे लग्नाला आलेले काही पाहुणे आपण वरपक्षाकडचे असल्याप्रमाणे मानपानाची अपेक्षा ठेवून होते आणि वर्षभराच्या तणावाखालून गेल्यामुळे ऑर्गनायझिंग कमिटी ‘चला हवा येऊं द्या’च्या मनस्थितीत तेव्हा दिवसभर प्रयत्न एव्हढाच चालू होता की ह्या सौजन्य सोहळ्याचा शेवट गोड व्हावा.
नॉर्मल नाटकांना एक फायदा असतो की प्रेक्षकांच्या सुरवातीच्या प्रतिसादावरून हवे तसे बदल, सुधारणा करता येतात पण इथे तर जस्ट one शो तेव्हा सगळया गोष्टी अगदी चोख हव्यात. पण सर्वांच्या मदतीने, नशिबाच्या साथीने आणि गुढी पाडव्याच्या शुभयोगामुळे दिवस सरकत गेला, कार्यक्रम रंगात येत गेला आणि काही अनपेक्षित नायक, नायिका आपापले रोल्स मोठया हुकमतीने वठवून गेले. आयत्यावेळी काही गडबडी झाल्या पण शेवटी सर्व प्रोड्युसर्स, रायटर्स, डायरेक्टर्स, सूत्रधार, प्रॉडक्शन स्टाफ, मेकअप आर्टिस्ट्स, प्रकाश, ध्वनी, केटरिंग संचालक इत्यादी, इत्यादीन्नी वेळ मारून नेली. आणि सगळ्यात जर कोणी आपली भूमिका अगदी चोख बजावली असेल तर ती म्हणजे सर्व प्रेक्षकांनी.
सर्व आवरता आवरता त्या निरागस सुरांची नांदी लागली ती महेशच्या आगमनाने. तो आला, त्याने संवाद साधला आणि त्याने जिंकले. आतापर्यंत नाटक, सिनेमा, टेलिव्हिजन वरून लोकांनी महेश काळे ला बरेच वेळा ऐकले होते पण बहुतांशी लोक त्याला पहिल्यांदाच प्रत्यक्ष ऐकत होते आणि महेशने सुनिश्चित केलं की तो जरी त्या सभागृहातून निघून गेला तरी त्याचे गाणे, त्याचे सूर सिअॅटलच्या रसिकांच्या मनात कायमचे राहातील. गेले वर्षभर ज्या सर्व लोकांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी एवढी सगळी मेहेनत घेतली होती त्यांच्या थकव्यावर कदाचित यापेक्षा साजेसा उतारा नव्हताच कुठला .
कार्यक्रम संपला, सभागृह हळू हळू रिकामे झाले, उरलेल्या मंडळींनी उरली, सुरली कामे, साफ सफाई आटोपली आणि जड पावलांनी सभागृहातून काढता पाय घेतला. शेवटी सर्वांच्या मनात होता कार्यक्रम सुरळीत पार पडल्याचा आनंद, सुटकेचा नि:श्वास, बऱ्याच सगळ्या आठवणी आणि मनापासून पटलेले एक सत्य, याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा!
हजारो ख्वाहिशें ऐसी …
जर आम्हाला विचाराल की शेवटी हे सर्व करून या मंडळीना मिळाले तरी काय तर मी म्हणेन की एक अनोखा अनुभव, असे मोठे कार्यक्रम नियोजित करून पार पाडून दाखवण्याचा आत्मविश्वास, नक्षत्रांचे देणे काही प्रमाणात परत केल्याचे समाधान, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, खाज मिटली.
अहो शेवटी असे मेगा स्केल प्रॉडक्शन पडद्यापालिकडून अनुभवायची संधी पुन्हा पुन्हा थोडीच मिळते.
--पराग कुळकर्णी
वाह!!!
वाह!!!
खरच छान लिहीलत. एका फटक्यात झर्र्कन वाचून झालं
मस्त लिहिलंय....
मस्त लिहिलंय....