बॅड पॅच अर्थात वाईट काळ
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. खरंच किती सार्थ ओळी आहेत नाही? जीवन, आयुष्य, जगणे माणसाला एकदाच लाभतं. जसं आहे तसे स्वीकारून जगण्यातला आनंद आपण लुटला पाहिजे. तरीही जीवनाचा आनंद न घेता काही मंडळी रडत खडत जीवन जगत असतात. जीवन कसं जगायचं रडत खडत की हसत हसत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याला कोणी बंधन घालू शकणार नाही. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर जीवनातील यशापयश बरंचसं अवलंबून असत. काही जण सकारात्मक भूमिकेतून जगतात तर काहींची सतत नकारघंटा वाजत असते. मानव, प्राणी, पशू, पक्षी सर्वाना जगण्याचा अधिकार आहे मात्र त्यांच्या जगण्याच्या पद्धती भिन्न आहेत. तुम्ही मानवाच्या जन्माला का आलात? याचे उत्तर बहुतेक मंडळी ठामपणे देऊ शकत नाहीत.
आयुष्य सुख दुःखाने युक्त आहे. सर्वच सुखी प्रसंग आपल्या आयुष्यात येतील असे मुळीच नाही. ते आले तरी जीवनाला काही अर्थ उरणार नाही. परमेश्वर सुखद जीवनात एखादा दुःखद प्रसंग आणतोच. त्यातून आपण निभावून कसे निघतो हा खरा प्रश्न आहे. प्रत्येकाला जीवनात सुखी प्रसंग हवे असतात. एखादे संकट जरी कोसळले तरी माणसे लगेच खचून जातात. त्यांना जीवनात रस वाटत नाही. जीवनातील सारे काही संपले अशा स्थितीत ही मंडळी उर्वरित आयुष्य जगतात. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन लगेच बदलतो. हे असे का घडते? छोट्या छोट्या घटनांनी आपण एवढे खचून का जातो?
मनुष्य म्हटले की प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येणारच. त्यासाठी संघर्ष असतोच. जन्मापासून शांत सुरळीत आयुष्य जगत असताना त्यात कधीतरी बिघाड होतो. नियती तसे घडवून आणते. नाते, व्यवहार, पैसा यातून आयुष्याची घडी नकळत बिघडते. क्षणार्धात जीवन बदलून जाते.
रमेश व नीता चे असेच काल्पनिक उदाहरण विचारात घेऊ. सुखवस्तू कुटूंबातील दोन व्यक्ती. कॉलेजपासून एकमेकांवर प्रेम. त्याचे रूपांतर प्रेमविवाहात. संसाराची काही वर्षे दृष्ट लागण्यासारखी. अचानक जीवनात बॅड पॅच. गैरसमजातून दोघांत वाद तो इतका विकोपास की त्यातून घटस्फोट. त्यांच्या जीवनात ही घडणारी घटना होती. विधिलिखित होती. प्रयत्न केला असता तर ते टाळू शकले असते. मात्र गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी संघर्षाची कास धरली नाही. परिणामी जीवनात आमूलाग्र बदल घडून आला.
एखाद्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो. त्याच्या कठीण प्रसंगात आपण धावून जातो. मात्र तो व्यवहार पाळत नाही. बघता बघता मैत्रीचे रूपांतर शत्रुत्वात होते. एखाद्या माणसाकडे बक्कळ पैसे असतात. त्याला कोणतीच विवंचना नसते. अचानक एका रात्री त्याच्या घरावर दरोडा पडतो. त्याच्यावर भीक मागण्याची पाळी येते. हे दुसरं तिसरं काही नसून जीवनातील बॅड पॅच मानावे लागेल. त्याला पर्याय संघर्ष होय.
बॅड पॅच ला विशिष्ट कालावधी नसतो. तो माणसाच्या जीवनात काही महिने काही वर्षे असतो. तो नकोसा वाटला त्रासदायक वाटला तरी भोगावाच लागतो. तो कोणालाही टाळता येत नाही. माणसाचे अंतर्बाह्य आयुष्य तो हलवून टाकतो. जीवन नकोसे करून सोडतो. तो अनुभवल्याशिवाय गत्यंतर नसते.
बॅड पॅच बाबतीतील काही घटना मी पहिल्या आहेत. एका मुलीचे लग्न होऊन जेमतेम वर्ष दोन वर्षांचा कालावधी लोटला. नवरा व्यवसायिक. घरात छोटे बाळ नुकतेच जन्माला आलेले. एके दिवशी नवरा नेहमीप्रमाणे दुकानात गेला. तेथेच त्याला अर्धांगवायूचा झटका आला. दोन्ही पायातील अवसान गेले. त्यांच्या आयुष्यातील हा बॅड पॅच. मात्र त्याचे परिणाम आयुष्यभर त्यांना जाणवत राहणार. त्या मुलीला जिवंत असेपर्यंत संघर्ष करावा लागणार. त्याला इलाज नाही.
दुसरी घटना एका लहानशा बाळाची. बाळ जन्माला आले त्यावेळीच त्याच्या ह्रदयाला एक छिद्र होते. डॉक्टर त्याच्या आई वडिलांना बाळ मोठे झाल्यावर त्याच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. ह्रदयाला छिद्र हा त्या मुलाच्या जीवनातील बॅड पॅच मात्र त्यासाठीचा संघर्ष खूप काळाचा.
एका दृष्टीने माणसाच्या आयुष्यात बॅड पॅच असावेत. ते त्रासदायक असले तरी संकट काळात आपले कोण आहे कोण नाही हे समजते. स्वतःची स्वतःला ओळख होते. केवळ वरवर चोकशी करणारे व आत्मीयतेने विचारपूस करणारे यांच्यातील फरक आपणास समजतो.
आपल्याला खऱ्या अर्थाने धीर देणारे व आपल्या माघारी आपली कुचेष्टा करणारे आपण ओळखू शकतो. घरातील एखादी व्यक्ती मरणाच्या दाढेत असेल तर रात्रंदिवस तिच्याजवळ बसून संघर्ष करणारे आई वडील बहीण भाऊ पती पत्नी मुलगा मुलगी ही रक्ताच्या नात्यातील माणसेच असतात. मित्र शेजारी केवळ विचारपूस करतात. अर्थात याला काही अपवादही असतील.
बॅड पॅच मध्ये आपण घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही हे समजते. निर्णय क्षमता वाढीस लागते. पत्नी खूप आजारी असेल मोठी धोकादायक शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल तर डॉकटर पतीला विचारणा करतात. तो इतरांचा सल्ला घेऊ शकतो मात्र निर्णय त्यालाच घ्यावा लागतो.
बॅड पॅच मध्ये आपणास आपल्या शक्तीस्थळांची जाणीव होते. बॅड पॅच म्हणजे थोडक्यात वाईट काळ. तो आपणास बरेच काही शिकवून जातो. वाईट काळ आपल्या हातात नसतो तो टाळू म्हणून टाळता येत नाही. आपण त्याला प्रतिसाद कसा देतो हेच या कसोटीच्या काळात महत्वाचे ठरते.
नकारात्मक दृष्टिकोन सोडून सकारात्मक विचारसरणीचा अंगीकार करणे गरजेचे आहे. वयाच्या पन्नाशी नंतर लोक मी काय आज आहे उद्या नाही या भूमिकेतून जगत असतात. ही झाली नकारात्मक विचारसरणी. जीवन जरी बालपण, तरुणपण, म्हातारपण या तीन तासाच्या नाटकात लेखकांनी बसवले असले तरी या तीन तासाच्या नाटकाला रंग कसा भरायचा हे आपल्या हातात आहे.
संघर्षातच जीवनाची खरी मजा आहे. संघर्ष याचा अर्थ घरातील भांडण नव्हे. आज घराघरात टी. व्ही. पोहचला आहे. त्यावरील मालिकेसारखे आपले जीवन असावे अशी बहुतेक लोकांची धारणा आहे. ते जग काल्पनिक असते याचा आपणास विसर पडतो. संघर्ष व हास्य वाईट काळ कमी करतो. ज्या घरात आनंदी वातावरण असेल तेथे खऱ्या अर्थाने लोक जीवन जगतात. काही माणसे सगळ्या जगाचे ओझे आपल्या शिरावर असल्यासारखी सतत गंभीर असतात.
मान, सन्मान, राग, अहंकार, मोठेपणा या बाबी टाळल्या तर जीवनात आनंदच आनंद आहे. संकटे अडीअडचणी येणारच. ध्येय बाळगा. संकटावर मात करा. चांगले छंद जोपासा. संघर्ष करायला शिका मग बघा जीवन किती सुंदर आहे. आपले आयुष्य आपणच बदलले पाहिजे.
प्रदीप जोशी( उंडरी )पुणे
मोबा- 9881157709
बॅड पॅच अर्थात वाईट काळ
Submitted by Pradipbhau on 4 March, 2018 - 08:41
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान वैचारिक लेख आहे.
छान वैचारिक लेख आहे.
पण हा वैचारिक लेख विनोदी लेखन मध्ये आलाय हाच विनोद समजावा का?
छान वैचारिक लेख आहे.>>
छान वैचारिक लेख आहे.>>+१११११११११११११११११११
वैचारिक लेख विनोदी गटात
वैचारिक लेख विनोदी गटात टाकल्याने 'वै' 'वि' ध्यपुर्ण झाला!
छान लिहलयं!