घड्याळकाका : आ आSSSछू ! अरे ऊठ ना. कधीपासून हाका मारतोय तुला. शुद्धीवर आलास ना मघाशीच.
जागा हो आता.
मोबाईल :(आळस देत )हो हो काका उठतोय आता. जरा डोळा लागला होता.
घड्याळकाका : एवढा वेळ कसा झोपून राहिलास ?
मोबाईल : काय करणार ! हि बया दिवसभर मला आराम करायला देतच नाही. दिवसभर माझ्या पोटावर
टिचक्या मारत असते. माझ्या अंगातील सर्व ऊर्जा संपवून टाकते. घरी यायच्या आधीच मी बेशुद्ध
होतो.
घड्याळकाका : पण मघाशी तिने तुला ऊर्जास्रोताबरोबर जोडल्यावर शुद्धीत आलास ना ?
मोबाईल : हो पण जरा डोळे बंद करून पडून होतो. कारण हि आता परत रात्रभर घुबडासारखी जागी
राहील आणि मलाही झोपू देणार नाही. तसेही मला शुद्धीतून बाहेर येऊच नये असे वाटत होते.
घड्याळकाका : अरे असे नको बोलूस. एकाच जागी बसून राहून माझे सगळे अंग जड झालेय. माझी जागा हि पाल आणि झुरळे लपाछपी खेळण्यासाठी वापरतात. टी. व्ही. वरील टुकार मालिका दिवसभर
नाईलाजाने बघाव्या लागतात. आधी माझी लहान भावंडं घरातल्यांच्या मनगटावर विराजमान
होऊन बाहेर फेरफटका मारून यायची. त्यांच्याकडून मला बाहेर काय चाललेय ते कळायचेय.
तू आल्यापासून त्यांनासुद्धा आता कोण विचारात नाही. त्यामुळे मी धृतराष्ट्र आणि तू माझा संजय
बनून बाहेर काय चालले आहे ते सांग.
मोबाईल : नका विचारु काका. सध्याची परिस्थिती बघता खऱ्याखुऱ्या संजयने सुद्धा व्यासमुनींकडे
धृतराष्ट्रासारखे नेत्रहीन असण्याचा वर मागून घेतला असता.
घड्याळकाका : असे काय चालू आहे सध्या. तुमच्या पिढीची तर दिवसेंदिवस प्रगतीच होत आहे.
मोबाईल : प्रगतीचे दुष्परिणाम, दुसरे काय .आमचे पणजोबा एकाच जागी बसून असायचे आणि त्यांना
फक्त बोलायचे आणि ऐकायचेच काम असायचे. आम्ही थोडे जास्त शिकलो आणि आम्हाला
घराबाहेर पडायची संधी मिळाली. सुरुवातीला थोडे हरखून गेलो पण नंतर नंतर आमचा एवढ्या
मोठ्या प्रमाणात आणि अशाप्रकारे उपयोग केला जाऊ लागला कि आमची पूर्वीचीच पिढी खूप
सुखी होती असे वाटू लागलेय.
घड्याळकाका : अरे असे का बोलतोयस. तुमच्या पिढीला तर मी खूप अगोदरपासून पाहत आलोय. दूर गावी
शिक्षणासाठी गेलेल्या आपल्या मुलाबरोबर बोलताना आईला झालेला आनंद, आपली नोकरी
निश्चित झाली हे फोनवरुन कळल्यावर तिच्या मुलाने आनंदाने मारलेली उडी, आपल्या मुलाचा
पहिला परदेशी जाण्यासाठीचा विमानप्रवास सुखरूप झाला हे फोनवरून कळल्यावर आनंदापेक्षा
असणारी मिटलेली काळजी, आपल्या प्रेयसीशी फोनवरुन बोलताना घरच्यांना कळू नये म्हणून
मित्राशी बोलतोय असे दाखवताना होणारी धांदल हे सर्व बघून तर मला खूप समाधान मिळायचे आणि
आता तर तुमच्यामधल्या प्रगतीमुळे तर तू ह्या गोष्टी कितीतरी पटीने अनुभवत असशील.
मोबाईल :काय सांगू आता काका आता तुम्हाला. असा संवाद आता फारच कमी होत चाललाय. जो तो
एकमेकांशी मेसेजच्या माध्यमातूनच बोलतोय. सकाळपासून रात्रीपर्यंत गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवले
जातात. एखाद्या जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून सोशल मीडियावर त्याचे पोस्टमार्टम केले जाते तर
मृत व्यक्तींवर राजकारण सुरु होते. एखाद्या चांगल्या गोष्टींवरसुद्धा अश्लील विनोद केले जातात आणि
अफवा पसरवण्यासाठी तर आमचा सर्रास वापर केला जातो. आजचीच गोष्ट बघा ना. सकाळी ऑफिस
मध्ये जात असताना एका घरात एक आई तिच्या मुलीची वेणी बांधून देत होती. हे बघून ह्या बयेला
वाटले कि एक बाई दुसरीचे केस ओढतेय. हे बघून तिला लगेच राग आला आणि तिने लगेच माझ्या
कॅमेऱ्यातून फोटो काढला आणि एक सासू आपल्या सुनेचे केस ओढून छळ करतेय असा मेसेज
वेगवेगळ्या ग्रुप मध्ये शेअर केला.
घड्याळकाका : काय बोलतोस. तिला जर का एवढाच राग आला होता तर आत जाऊन त्या मुलीची म्हणजेच तिला वाटणाऱ्या सुनेची सुटका का नाही केली?
मोबाईल :असे मेसेज लवकरात लवकर आंतरजालावर टाकणे म्हणजे मोठे सामाजिक कार्य आहे असे
हिला वाटले. पुढे तर ऐका. दुपारपर्यंत त्या मेसेजमध्ये बदल होत जाऊन त्यातील व्यक्ती
वेगवेगळ्या धर्माच्या, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आणि हि घटना कुठल्यातरी दुसऱ्याच
प्रांतामध्ये घडत असल्याचे संदेश सगळीकडे पसरू लागले. सगळे ह्या गोष्टीचा निषेध नोंदवू
लागले. संध्याकाळपर्यंत तर त्यामध्ये अजून बदल होऊन त्या कल्पनासदृश सासू सुनेच्या
चेहऱ्यावर राजकीय व्यक्तींचे, क्रिकेटवीरांचे, सिने तारकांचे चेहरे चिकटवून त्यावर विनोद होऊ
लागले. आपल्याबद्दल एवढी चर्चा होत असल्याचे त्या माय-लेकींना अजून माहित सुद्धा नसेल. हे
सगळे थांबविण्यासाठी मी काहीच करू शकत नसल्याची असहायता मला सारखी बोचत असते.
उद्यापर्यंत ह्या फोटोच्या जागी दुसरा फोटो येऊन आजच्या या फोटोबद्दल सगळे
विसरूनही गेलेले असतील.
घड्याळकाका : हे तर खूप भयानक आहे. आ आSSSछू !
मोबाईल :हो तर. या सगळ्यामुळेच तर मला आमची पुढची पिढी कशी असेल याबद्दल चिंता लागून राहिली
आहे.
घड्याळकाका : त्याची तर मग कल्पनाच न केलेली बरी. आSSSछू !
मोबाईल : काय झाले काका. का एवढे शिंकताय ?
घड्याळकाका : अरे मघाशी टी. व्ही. बघायच्या नादात आपल्या मलकिणीच्या हातातून चुकून चालू गॅसवरच थेट मिरच्या पडल्या. त्याचा धूर अजूनही माझ्या नाकात धुमसतोय.
मोबाईल : अरेरे , म्हणजे आपण दोघेही मनोरंजनाच्या अतिरेकतेचे बळी ठरत आहोत तर.
घड्याळकाका : हो रे. तरीसुद्धा सध्याच्या प्रगतिशील जगात इतकी इलेक्ट्रॉनिक्स साधने उपलब्ध असूनही माझे स्थान घराघरात अजून टिकून आहे हि माझ्यासाठी एक समाधानाची गोष्ट आहे. सकाळी घराबाहेर जाताना, तयारी करताना, कुकरच्या शिट्टीला जास्त वेळ का लागतोय,मुले अजून कशी आली नाही, टी. व्ही.वरील मालिका चालू व्हायला आणि संपायला किती वेळ आहे, हे पाहताना नेहमीच माझ्याकडे कटाक्ष टाकला जातो. अरे १०: ३० वाजत आले. आता परत मालिकांचे रिपीट टेलिकास्ट सुरू होतील. याचे व्यसन लागल्यामुळे परत बघणे भागच आहे. चला.
मोबाईल : बघा हि बया पण येतेय माझ्याकडे. आता माझी रात्रपाळी सुरु. चला काका उद्या बोलू पुढचे.
गुड नाईट.
__/\__
__/\__
व्वा... फारच सुंदर लिहलंय.
मस्त जमलयं !!!
मस्त जमलयं !!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
अतिशय चपखल लिहिलंय
अतिशय चपखल लिहिलंय
आवडलं