दर्याकिनारी एक दिवस
प्रदीप जोशी, विटा.
जीवनातील निखळ आनंदाचा क्षण म्हणजे ट्रिप. त्यात जोडून सुट्टी आली तर दुधात साखरच. अशी संधी कोण सोडणार? मी तर आता सेवानिवृत्त असल्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतो. अशीच संधी गेल्या महिन्यात चालून आली. माझा एक पुतण्या कणकवली येथे नोकरीस आहे. त्याच्याकडे जाण्याचा योग आला. एक दिवसाची दर्याकिनारी ट्रिप झाली.
एक महिना झाला त्या प्रवासाला. मी माझे दोन पुतणे त्यांचे मित्र असे सर्वजण एक दिवसाच्या दर्या किनारी सफरीसाठी गेलो होतो. सकाळची वेळ होती. स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला होता. कणकवलीत इडली सांबारचा नाष्टा करून आम्ही मालवणच्या दिशेने निघालो. फार धावपळ न करता मालवण परिसरातील चार मोजक्या ठिकाणाना भेट देण्याचे आम्ही मनोमन ठरवले होते. दिवसभरासाठी आम्ही एक वाहन ठरविले. सुमारे तास दीड तास प्रवास केल्यानंतर आम्ही मालवणात पोहचलो. रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी, झाडीमध्ये टुमदार बंगले, सुरमई, बांगडा, पापलेट माशाचा दरवळणारा वास क्षणा क्षणाला कोकणाबाबतची आमची उत्सुकता ताणत होता. परिसराचे अधिकच आकर्षण जाणवत होते.
समुद्री पर्यटनात ज्या बीचने जागतिक नकाशावर स्थान मिळवले आहे त्या तारकर्ली बीचवर आम्ही पोहचलो. समुद्री लाटा शांतपणे किनाऱ्यावर थडकत होत्या. या संपूर्ण किनाऱ्यावर वीजप्रकाशाची व्यवस्था केली आहे. पर्यटन विकास महामंडळाने येथे मुक्काम करण्यासाठी तंबूची व्यवस्था केली आहे. मालवण पासून अरुंद रस्त्याने सहा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही तारकर्लीला पोहचलो. वल्हवणाऱ्या बोटी, यांत्रिक बोटी समुद्राच्या किनाऱ्यावर जणू काही आमची वाटच पहात होत्या. छोटे छोटे शिंपले आम्ही जमा केले. येथे आम्ही उंट सफारीचा आनंदही लुटला.
येथून चार किलोमीटरवर असलेल्या देवबाग येथे आम्ही आलो. बोटींगचा आनंद आम्हास मनसोक्तपणे लुटायचा होता. यांत्रीक बोट होती. एका बोटीसाठी एक तास फिरण्यासाठी आम्ही 1200 रूपये मोजले. पैसे गेले असले तरी बोटीने समुद्रात प्रवास करण्याचा आनंद हा अवर्णनीय होता. फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा बोटीचे हेलकावे गाईडने दिलेली माहिती सारे कसे आनंददायी होते. त्सुनामी मुळे तयार झालेले पठार एक प्रकारचे आकर्षण होते. सेल्फी काढण्यासाठी समुद्र द्रुश्य टिपण्यासाठी आमचे मोबाईल, कँमेरे सरसावले होते. एका बाजूला पाण्याची भीती तर दुसऱ्या बाजूला निसर्गरम्य वातावरणाचा आनंद अशा द्विधा स्थितीत आम्ही होतो.
हाऊस बोट व स्पीड बोटी देखील येथे पहावयास मिळाल्या. माडा पोफळीच्या बागानी परिसराचे सौंदर्य अधिकाधिक खुलून दिसत होते. सुमारे अर्धा तास बोटीचा प्रवास केल्यानंतर आम्ही संगमाजवळ आलो. अरबी समुद्र व कर्ली नदीचा हा संगम आहे. कर्ली नदीचे पाणी व समुद्राचे पाणी यातील फरक आम्हाला स्पष्टपणे जाणवला. तारकर्ली खाडी व अरबी समुद्र यांचा सुरेख संगम नजरेसमोरून आजही हटत नाही. नदीचे विस्तीर्ण रूंद पात्र, नदीचा संथ, शांत, सुरक्षित प्रवास, नदीपात्रातील लहान मोठी बेटे, कोकणी घरकुले तुळशी व्रंदावने सारे काही आनंददायक असे चित्र पहावयास मिळाले.
बोटींग नंतर आम्हाला वेध लागले ते जेवणाचे. कोकणात जायचे अन मच्छी न खाता यायचे हे कसे शक्य आहे. त्यामुळे आम्ही मच्छी चांगली कोठे मिळेल याची चौकशी करू लागलो. चिवळा बीच जवळ बांबू हाटेलचे नाव आम्हांला सांगितले गेले. तेथे पोहचताच खवैय्यांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. वाट काढत आम्ही आत प्रवेश केला. मच्छी चे सुमारे 25 प्रकार फलकावर होते. मच्छी चा वास सर्वत्र दरवळत होता. सुरमई ताटाची आँर्डर देवून आम्ही प्रतिक्षा करू लागलो. थोड्याच वेळात जेवण आले. सोलकढीची सुरमई ची चव अप्रतिम होती. यथेच्छ जेवण करुन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
जवळच असलेल्या राँक गार्डन मध्ये आम्ही गेलो. वनराई पक्ष्यांचा किलबिलाट गवताळ जमीन यामुळे आमची अर्धा तास चांगली विश्रांती झाली. छायाचित्रणासाठी ही सर्वात चांगली जागा त्यामुळे पुन्हा आमचा सेल्फी कार्यक्रम झाला. त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी निघालो. बोटीतून पुन्हा प्रवास सुरु झाला. किल्ल्यातील शिवमंदिर पाहिले. परतीचा प्रवास सुरू झाला. मालवण परिसरातून आमचा पाय निघता निघेना. एक दिवसाच्या पर्यटनाचा आम्हाला सुखद असा अनुभव आला.आजही ते दृश्य नजरेपासून दूर जात नाही.
अरे वा मालवणात जाऊन आलात..
अरे वा मालवणात जाऊन आलात.. मस्त!
खाडी अन समुद्राचा संगम खरच छान आहे.. देवबाग ला संध्याकाळी समुद्रकिनार्यावर खुपच छान वाटत.. सुर्यास्त बघतांना.. ते तुंम्ही रॉक गार्डन च्या इथुन समुद्राचे फोटो घेतले आहेत हे ठिकाण म्हणजे आमच्या इथली कचेरी. पर्यटकांसाठी रॉक गार्डनची निर्मिती झालीय. किल्ल्यावर पण जाउन आलात.. खुप छान!
छान फोटो आले आहेत
छान फोटो आले आहेत
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.