शिक्षणाचा 'उद्योग’ ..!
गेल्या काही दिवसापासून शैक्षणिक धोरणांचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यात शिक्षक बदल्यांचे काहूर मध्यंतरी उठविण्यात आले होते. त्यानंतर १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शिक्षणाच्या खासगीकरणाला चालना देणाऱ्या या निर्णयाच्या आदेशाची शाई वाळते ना वळते तोच शिक्षण क्षेत्रावर पुन्हा एक नवा प्रयोग करण्याचा घाट सरकारने घातला आहे. शिक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांना एंट्री देण्यासाठी महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुधारणा विधेयक आणण्यात आले असून, बुधवारी ते विधानसभेत संमत देखील करण्यात आले आहे. यामुळे, आता खासगी कंपन्यांना राज्यात कोठेही आणि कोणत्याही माध्यमाची शाळा सुरू करण्यास परवानगी असणार असून, रिलायन्स, टाटा, बिर्ला, अदानी यांसारख्या कंपन्यांनाही राज्यात शिक्षणसंस्था सुरू करण्याची कवाडे खुली झाली आहेत. त्यामुळे शिक्षणाचा ‘उद्योग’ करण्याचे हे धोरण शिक्षणाला कुठे घेऊन जाणार याबाबत चिंता व्यक्त केल्या जातेय.. अर्थातच, कंपन्यांच्या शाळा शिक्षणावर कसा परिणाम करतील याचे मूल्यमापन काळाच्या कसोटीवर केल्या जाईलच..परंतु, कंपन्यांना शिक्षक क्षेत्रात उतरवून सरकारी शाळा बंद करण्याचा तर सरकारचा मानस नाही ना ? यावर मंथन करावे लागेल.
‘महाराष्ट्र स्वयंअर्थसहायित शाळा अधिनियम, २०१२’ सुधारणा विधेयकानुसार कंपनीस ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्वयंअर्थसहायित शाळा सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. या नव्या निर्णयामुळे कंपन्या आपल्या निधीचा उपयोग शिक्षण क्षेत्रात करू शकतील. खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाल्यास तेथे शुल्कवाढीला मोकळे रान मिळेल.. हा पहिला आक्षेप या निर्णयावर ऐकायला मिळतोय. त्यातील तथ्य नाकारता येणार नाही. कुठलीही कंपनी ही नफा कमविण्याच्या उद्देशानेच बाजरात भांडवल गुंतवत असते. त्यामुळे कंपन्यांच्या शाळांमध्ये सामाजिक दृष्टिकोन वैगरे राहील, ही अपेक्षा भाबडीपणाची ठरू शकेल. अर्थात, कंपन्यांच्या शाळांवर शिक्षण शुल्क कायद्यान्वये नियंत्रण राहणार असून या कायद्यातही सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत २० पालक आणि १० शिक्षकांचा समावेश असलेली पालक- शिक्षक समिती गठीत केली जाईल आणि त्यातील ७५ टक्के सभासदांनी मान्यता दिल्यावरच शुल्क वाढ करता येईल. अशी तरतूद करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यानी केली आहे. परंतु सध्याही अशा समित्या अस्तित्वात आहेत. खासगी शाळा या समित्यांचे मत किती विचारात घेतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे कायद्याने शुल्कवाढीवर नियंत्रन मिळवता येईल, हे न पटण्यासारखेच आहे. दुसरे म्हणजे कंपनी शाळा आल्यानंतर त्यांच्या स्पर्धेत सध्याच्या शाळा टिकतील का ? कमी पटसंख्येअभावी अगोदरच शासन शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. त्यातच कंपनी शाळा आल्या आणि या शाळेत प्रवेश घेण्यासाठी कंपन्यांनी पालकांना अमिशांचे पॅंकेज दिले तर सहाजिकच सरकारी शाळांचे कंबरडे मोडेल.. आणि, सरकारला या शाळा बंद करण्याचा मार्ग खुला होईल. त्यामुळे गोरगरीब आणि दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकेल. कंपन्या काही दिवस ना नफा ना तोटा तत्वावर काम करतीलही. पण ते सर्वकाळ या तत्वाला बांधील राहतील, याची काय शास्वती?
आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. कारण, शिक्षण हे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक व मानसिक परिवर्तनाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. मानवी जीवनाच्या विकासाचा तो पाया आहे.चांगली सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न व सृजनशील पिढी फक्त शिक्षणातूनच घडविता येते. मग ही पिढी घडविण्याची जबाबदारी सरकार कंपन्यांवर देणार आहे का ? यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळ होऊन ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचीत राहिली तर हा शिक्षण हक्क कायद्याचा भंग ठरणार नाही का? २०१५ मध्ये शालेय शिक्षण विभागाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अभियान सुरु केले होते. या अभियानाचाचे यश आज रोजी दृष्टीक्षेपात येत आहे. अनेक हरहुन्नरी शिक्षकांनी आपल्या स्वखर्चातून, लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा परिषदेच्या शाळेत नवशैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास सुरवात झाली असताना शिक्षणाच्या बाजरीकरणाचा घाट कशासाठी. राज्यातील मुलांना मोफत शिक्षण पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे.. शासन ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने प्रश्न सुटणार नाही तर अजून बिकट होणार आहेत.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सर्वसामान्याना शिक्षणाचे दारे खुली करून देण्यासाठी अंगावर शेणाचे गोळे झेलले. राजश्री शाहू महाराजानी शिक्षण सार्वत्रिक आणि मोफत करण्यासाठी आपली हयात अर्पण केली. अनेक दृष्टी नेते समाजसुधारकांनी शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा संवैधानिक अधिकार मिळाला. शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती करण्यात आली. शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यापासून ते वाड्या वस्त्यांवर पोहचु लागली असताना तिला खासगीकरणाच्या ताब्यात देणे कितपत योग्य? हा प्रश्न साहजिकपणे उपस्थित होतो. तसे खासगीकरणाच्या धोरणाचा आणि शिक्षणक्षेत्राचा फार जुना संबंध आहे. शिक्षणाला जोवर खासगीकरणाचा स्पर्श झाला नव्हता तोवर शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारची होती. परंतु शिक्षण हा सुद्धा पैसे कमविण्याचा राजमार्ग होऊ शकतो हे काही राजकारण्यांच्या लक्षात आल्यानंतर खासगी शाळांची संकल्पना पुढे आली. स्थानिक प्राधिकरण, नोंदणीकृत संस्था, न्यास आदींना नवीन शाळा काढण्याची परवानगी देण्याचा कायदा आली आणि राज्यात खासगी शाळां-महाविद्यालयांचे जाळे तयार झाले. यातील काहींनी इमाने इतबारे शिक्षणाचे पावित्र्य जपले, परंतु, काहींनी शिक्षणाचा धंदा करून मोठी माया जमा केली.अवास्तव फी, डोनेशन, देणग्या यामुळे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले. त्यातच आता कंपन्यांच्या शाळा येण्याचा मार्ग खुला झाल्याने हा विषय गंभीर बनला आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात शिक्षण महागडे होत असताना सरकारचे शिक्षणातून जबाबदारी झटकणारे धोरण भविष्यात वंचितांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण करणारे ठरण्याची श्यक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे यावर साधक बाधक चर्चा व्हावी, यासाठीच हा लेख प्रपंच..!!!
-अँड. हरिदास
रिलायन्सची शाळा गेले काही
रिलायन्सची शाळा गेले काही वर्षे मुंबईत सुरू आहे. बाकी डिपीएस, रायन, झेविर्स या शाळाही सुरू आहेत.
नव्या शासकीय निर्णयाने यांच्या स्टेटसमधते काय फरक पडणार?
आणि खाजगी नको म्हणताय तर स्टेट बोर्ड आणि मुंबई विद्यापीठ काय वेगळे दिवे लावून आहे? एम ए च्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात...
प्रायव्हेट कंपन्या जिथे
प्रायव्हेट कंपन्या जिथे ग्राहक आहेत तिथेच असणारेत. माझया गावढ्या गावात 1 पब्लिक स्कुल, 1 मिलिटरी स्कुल व 1 इंग्रजी माध्यम स्कुल आहे. ज्यांना जमतंय ते जाताहेत, बाकीचे झेड पीत जातात.
आणि खाजगी नको म्हणताय तर
आणि खाजगी नको म्हणताय तर स्टेट बोर्ड आणि मुंबई विद्यापीठ काय वेगळे दिवे लावून आहे? <<
>>खासगी शिक्षणाचा मुद्दा कधीचाच मागे पडला आहे.. शिक्षणाचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया काही वर्षाआधीच सुरु झाली आहे.. आता केवळ या प्रक्रियांच्या अंमलबजावणीसाठी धोरणे ठरविण्याचे काम सुरु आहे. मुळात मुद्दा खासगीकरणाचा नसून शिक्षणाच्या बाजारीकरणाचा आहे. शिक्षणाचे खासगीकरण झाले असताना खासगी शाळांच्या नियमावलीपुढे पालक त्रस्त आहेत. मग आता शिक्षणाचे बाजारीकरण झाले म्हणजे पालकांचे काय होईल हा विचार करण्याची गरज आहे. एकदा कायदा जेंव्हा केला जातो तेंव्हा तो संपूर्ण राज्यासाठी अमलात येत असतो. त्यामुळे एकाद्या विशिष्ठ शाळेचा किंव्हा ठिकाणचा संदर्भ देऊन त्याचे मूल्यमापन करता येणार नाही. राज्यातील इतरही ठिकाणचा संदर्भ त्यासाठी जोडावा लागेल. कांपनी शाळा प्रत्यक्षात आल्यानंतर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा काय राहिलं, शिक्षणाचा मूळ उद्देश पूर्ण केला जाईल का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येतात.
प्रायव्हेट कंपन्या जिथे
प्रायव्हेट कंपन्या जिथे ग्राहक आहेत तिथेच असणारेत<<
>>मुद्दा हाच आहे आता शिक्षणाच्या कंपन्या सूर करायच्या का?? कंपनी विध्यार्थ्यांना ग्राहक समजत असतील तर शिक्षणाचा बाजार भरणार नाही का? आणि या शिक्षणाच्या बाजरातून जे काहि प्रोडक्टशन बाहेर येईल, ती किती उपयुक्त राहील ?शिक्षणचे काही 'मूल्य' नसावे का??/
केजरीवाल कडे बघा जरा
केजरीवाल कडे बघा जरा
सरकारी शाळा इतक्या टापटीप बनवल्या आहे की लोक आश्चर्यचकित होतात
एक काम करा पुढची 1-2 वर्ष फक्त त्या 1300 बंद झालेल्या शाळेच्या जागेवर नेमके काय उभे राहते याकडे लक्ष द्या.. सगळा खेळ लक्षात येईल
किती शाळेच्या जागा खाजगी कंपनी लोक इत्यादींना वाटल्या .. किती जागा सरकार वापरात आहे सगळी माहिती घ्या
रिलायन्स नाव ऐकूनच अंगाला
रिलायन्स नाव ऐकूनच अंगाला कापरे भरते.
किती अजून कायद्याच्या चौकटीला आपल्या सोयीने एडजस्ट करून हे लोकं देशाला लुटणार आहेत समजत नाही.
सरकारी वा अल्पकिंमतीत शिक्षण मिळू शकणारया शाळांचा दर्जाच ईतका खालावून टाकायचा की लोकांपुढे पर्यायच उरला नाही पाहिजे.
आणि मग बिचारी लोकं स्वत:च बोलणार, की चार पैसे जास्त घेताहेत पण किमान शिक्षण तरी चांगले देताहेत.
संघटित लूट आहे ही !
आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय समाज हे सर्वात मोठे सावज आहे. हे लोकं चार जास्तीचे पैसे देऊन मोठेपणा मिरवण्यात खूश असतात.
कालाय तस्मै नमः!
कालाय तस्मै नमः!
कुण्या एका काळी खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजेस सुरू झाले तेंव्हा आम्हा 'शासकीय संस्थेतून' उत्तीर्ण झालेल्यांची मिरासदारी संपेल असे अम्हालाही वाटत होते. ते तसे झालेच. भरमसाठ इंजिनीअर्समुळे आता नव्यांन्ना रोजंदारी वर काम करायची पाळी आलीय! दर्जा बद्दल बोलायलाच नको.
पण काळ पुढे जातो तसतसे नवनवीन येत राहते. आपण चालत राहायचे..!!
मी गेली काही वर्ष ऐकून आहे
मी गेली काही वर्ष ऐकून आहे त्याप्रमाणे माझ्या वर्तुळातील लोकांच्या मुलांना चाम्गल्या शाळेत प्रवेशच मिळत नाही ही तक्रार आहे. बॉंमबे स्कॉटिश किंवा अंबानी शाळा आवाक्याबाहेर. आणि उरलेल्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळणं म्हणजे रात्रीपासून १८ तास रांगेत उभं राहावं लागतंय. भरपूर पैसे सतत द्यावे लागतातच. एका मैत्रिणीचा मुलगा खूप नावाजलेल्या शाळेत जातो. तिथे एन्ट्री मिळणं अवघड असतं. पण आता म्हणते की शिक्षक चांगले नाहीत, क्राऊड खराब आहे, मुलगा घाणेरड्या शिव्या शिकून येतो, पुढे त्याला व्यसनं लागतील. को-एड असेल तर मुलीना लैंगिक छेडछाड (मुलग्यानाही याला तोंड द्यावं लागतंय). शाळा यातील दोषी शिक्षक, विद्यार्थी यांना हात लावायला घाबरते. बरं मुलाला इथून काढुन टाकून पुन्हा दुसरा पर्याय काय?
थोडक्यात- demand supply मध्ये मोठी gap आहे. जर खाजगी शाळांमध्ये स्पर्धा निर्माण झाली तर पालक विद्यार्थी यांचा फायदाच होईल.
बाकी नवले(सिंहगड), पतंगराव कदम, डी वाय पाटील, भुजबळ , घोडावत हे आधीपासूनच शिक्षण सम्राट आहेत की. शरद पवारांच्या पण शाळा आहेत ना. हे लोक यातून इतकी वर्ष काही पैसा कमवत नाहीत? यांना जमिनी कशा मिळाल्या होत्या?
त्याउलट corporates आले, फॉरेन शाळा आल्या तर चांगलं होईल. पारपत्र प्रोसेस खाजगी झाला तेव्हा टीसीएसने उत्तम काम केलं. आज एक दिवसात पारपत्र घरी येतं. जर टाटांनी शाळा काढल्या तर दर्जा उत्तमच असेल.
In any case, demand supply gap has to be addressed so this seems like good move to me.
मुद्दा हाच आहे आता
मुद्दा हाच आहे आता शिक्षणाच्या कंपन्या सूर करायच्या का?? कंपनी विध्यार्थ्यांना ग्राहक समजत असतील तर शिक्षणाचा बाजार भरणार नाही का? आणि या शिक्षणाच्या बाजरातून जे काहि प्रोडक्टशन बाहेर येईल, ती किती उपयुक्त राहील ?शिक्षणचे काही 'मूल्य' नसावे का??/>>>>>>>
हे केव्हाच झालंय हे तुम्हाला माहीत नाही काय? तुमच्या ओळखीत कोणाचीच मुले आता शाळेत जायच्या वयाची राहिली नाहीत काय? सध्या असलेल्या शिक्षणाच्या बाजारातून किती उपयुकट प्रॉडक्ट्स बाहेर येताहेत हे चाचपून पाहिले का जरा?
खासगीकरणाचे फायदे तोटे दोन्ही आहेत. आमच्या नव्या मुंबईत माजलेल्या मस्तवालांच्या शाळा आहेत जिथे अधून मधून पालक अचानक वाढलेल्या फी विरोधी आंदोलने करत असतात. तशाच शासकीय अभ्यासक्रम बाजूला ठेऊन मुलांना वेगळ्या दृष्टीने शिकवणाऱ्या शाळाही आहेत.
मुंबई सारख्या शहरात आता सरकारी शाळा किती चालतात काहींचं कल्पना नाही. नमूमध्ये म्युन्सीपालती शाळा आहेत पण खर्च होत असतानाही माझ्या बाईने तिच्या मुलांना सारकरीतून काढून खाजगी मध्ये घातले, करण सरकारीत मुलांकडे लक्ष अजिबात दिले जात नाही.
विद्यापीठांचे म्हणाल तर माझी मुलगी एम ए ला कालिना कॅम्पस मध्ये ऍडमिशन घेऊन फसलीय. विद्यापीठाच्या कासवाला लाजवेल अशा गतीमुळे यंदा सगळीकडे एम ए चे पहिले सत्र सप्टेंबरत सुरू झाले. दीड महिना झाल्यावर दिवाळी सुट्टी जाहीर झाली व परीक्षा डिसेंबरात. आता आधीच्या टर्मची परिक्षा झाली नाही म्हणून पुढच्या टर्मचा अभ्यास सुरू झालेला नाही. परीक्षा तोंडावर आलेली असताना खाजगी कॉलेजनी अजून अभ्यास शिकवून झाला नाहीय म्हणून परीक्षा पुढे ढकला ही मागणी केली व परीक्षा 1 महिना पुढे गेली. पण कालिना कॅम्पसमध्ये मात्र त्या दीड महिन्यात जे काय शिकवून झाले तेच फायनल, डिसेंबर पासून आम्ही नवीन टर्म घेणार म्हणत शिक्षक बसून आहेत. विद्यार्थी पुढच्या टर्मचे शिकायला तयार नाहीत. ह्या असल्या फालतू सरकारी गोंधळापुढे खासगी गोंधळ परवडला.
सरकारी वा अल्पकिंमतीत शिक्षण
सरकारी वा अल्पकिंमतीत शिक्षण मिळू शकणारया शाळांचा दर्जाच ईतका खालावून टाकायचा की लोकांपुढे पर्यायच उरला नाही पाहिजे.>>>>>>>
दर्जा कसा खालावला जातो? सरकार म्हणजे कोणी माणूस आहे का जो सरकारी शाळेत येऊन तिथल्या शिक्षकाचे तोंड बांधतो, पाय बांधतो जेणेकरून तो शिक्षक वर्गात येऊन शिकवू शकणार नाही? मग ज्या कामाचा पगार मिळतो ते काम हे शिक्षक का नाही करत?
सर्व सरकारी शिक्षकांवर शिकवण्याव्यतिरिक्त अन्य सरकारी कामांचे बोझे असतात, ते सगळे बोझे हे लोक निमूट सहन करतात करण तिथे ते काम केले नाही तर दिसून येते व त्याचा फटका बसतो.
पण शिकवणे हे असे काम आहे जे केले नाही तरी दिसून येत नाही. आम्ही शिकवले पण विद्यार्थी उनाड व ढ आहेत म्हणत नापास विद्यार्थ्यांची जबाबदारी टाळता येते. सरकारी शिक्षक ही जबाबदारी टाळतात.
सगळीकडे जनता शेवटी भारतीयच आहे. सरकारी नोकरी म्हणजे आराम हे गृहीतक मनाशी धरून लोक सरकारी नोकरी पकडतात. आणि ह्याच लोकांचे नातलग सरकारी क्षेत्रात कामाचा दर्जा खालावलाय म्हणून बोंब मारतात. सगळ्याच भारतीयांनी जरा आत्मपरीक्षण करा.
साधना, चांगल्या पोस्ट्स.
साधना, चांगल्या पोस्ट्स.
आजकाल जे' शिक्षक' सरकारी शाळेत नोकरी मिळवण्यासाठी डेस्परेट असतात त्यात शिक्षणाला ध्येय मानणारा एखादाच असेल नसेल बाकीच्यांना फक्त सरकारी नोकरी आणि आयुष्यभर आराम हेच ध्येय असते.
त्यापेक्षा खाजगीकरण आले तर शिक्षकांना परफॉर्म करावं लागेल आणि दर्जाही सुधारेल.
खाजगीकरण आले तर शिक्षकांना
खाजगीकरण आले तर शिक्षकांना परफॉर्म करावं लागेल आणि दर्जाही सुधारेल.
>> In your dreams...
शिक्षकाच्या सरकारी नोकरीत
शिक्षकाच्या सरकारी नोकरीत आराम असतो तर जनगणना, मतदार यादी, निवडणुका, कुटुंबनियोजन, अल्पबचत, स्वच्छता अभियान,वृक्षारोपण मोहिमा, डिजिटल मनीचा प्रसार, मुलांची आधार नोंदणी ही आणि अशीच इतर कामं कोण करतं?
एवढी सगळी कामं केल्यावर शिक्षक शिकवणार कधी?
कृपया सरसकटीकरण नको. आजही मुलांनी शाळेत भरती व्हावं इथपासून ते दांड्या मारू नयेत म्हणून झटणारे शिक्षक आहेत.
मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन पेपर चेकिंगची प्रक्रिया नोटाबंदीसारखी विचार न करता राबवली. इथेही तो एका माणसाचा हट्ट होता असे दिसते. त्याचीच फळे भोगताहेत.
महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निवडक शाळा उभारायचा चंग बांधलाय. त्यांच्या मतपेढीतल्या एका घटकासाठी हा निर्णय चांगला आहे.
पण दुसरीकडे कमी पटसंख्येच्या शाळा बंद करायचा ही निर्णय घेतलाय.
खाजगीकरणामुळे गुणवत्ता येईल असा दृढ विश्वास असणार्यांनी खाजगी इंजिनीयरिंग आणि मेडिकल कॉलेजेस कडे पाहावं. विनाअनुदानित शाळांत सरकारने ठरवलेली शैक्षणिक पात्रता नसलेल्यांनाही शिक्षकाची नोकरी मिळू शकते, याची अनेक उदाहरणे पाहण्यात आहेत.
खाजगीकरणामुळे गुणवत्ता येईल
खाजगीकरणामुळे गुणवत्ता येईल असा दृढ विश्वास असणार्यांनी खाजगी इंजिनीयरिंग आणि मेडिकल कॉलेजेस कडे पाहावं. >>>> बरोबर आहे भरत. मी मुलाखती घेतो, इंजिनियर्सचा वर्षा नु वर्षे खालावत जाणारा दर्जा बघतो आहे.
केजरीवाल जर सरकारी नोकर
केजरीवाल जर सरकारी नोकर शिक्षक यांना हाताशी धरून जर शाळा सुधारू शकतो तर भाजपाचा तावडे का करू शकत नाही?
उगाच सरकारी गोंधळ वगैरे कारणे देऊन भाजपाच्या खाजगी संस्थेला शिक्षण क्षेत्र देण्याच्या निर्णयाला बरोबर ठरवू नये.
सरकारी गोंधळ दिल्लीत पण आहे पण तिथे सिसोदिया यांनी कंट्रोल मिळवून त्यात सुधारणा आणली त्यांचे निर्णय पारदर्शक आणि स्पष्ट आहे त्यामुळे आता तिथे गोंधळ होत नाही
नाही तर इथे तो तावडे एक बोलतो खडसे एक बोलतो संघातील नेते एक बोलतात त्यावर फसवणीस तर भलतेच आदेश काढतात. आधी ही आदेश सूचना देणाऱ्यांना सुधारा.
जमत नसेल तर सिसोदिया यांना महाराष्ट्रातील शिक्षण सुधारणा करण्यास पाचारण करा. तावडेच्या तावडीतिल ही गोष्ट नाही
एवढी सगळी कामं केल्यावर
एवढी सगळी कामं केल्यावर शिक्षक शिकवणार कधी?">>>>
बाराही महिने ही कामे नसतात. शाळांना सुट्ट्या किती असतात व कामाचे तासही किती असतात ते पाहिले का? शिक्षक असे 24 तास कामाच्या दाव्याला बांधले गेले असते तर कोणीही शिक्षक होण्यासाठी उचापती केल्या नसत्या. खाजगी क्षेत्रात गुपचूप दिवसाला 10 तास काम करतातच ना लोक? मग शिक्षकांनी का करू नये? इंफॅक्ट सगळ्यांनीच का करू नये?
हो, मुलांसाठी जीव तोडून काम करणारे शिक्षक मीही पाहिलेत. मी स्वतः 7 वि पर्यंत वेगवेगळ्या सरकारी शाळांतून शिकलेय, झेड पी पासून म्युन्सीपालटीपर्यंत. आणि दोन्ही प्रकारच्या शिक्षकांचा अनुभव घेतलाय व आजही मुलांच्या शाळा कॉलेजात घेतेय. चांगले शिक्षक फार कमी आहेत.
बरेचसे शिक्षक शिकवणे हे एक नेसेसरी इविल आहे, बाकी नोकरी चांगली आहे हेच मानणारे आहेत.
खाजगीकरणामुळे गुणवत्ता येईल
खाजगीकरणामुळे गुणवत्ता येईल असा दृढ विश्वास असणार्यांनी खाजगी इंजिनीयरिंग आणि मेडिकल कॉलेजेस कडे पाहावं. विनाअनुदानित शाळांत सरकारने ठरवलेली शैक्षणिक पात्रता नसलेल्यांनाही शिक्षकाची नोकरी मिळू शकते, याची अनेक उदाहरणे पाहण्यात आहेत.>>>>>
शक्य तितका अप्रमाणिकपणा व कामचोरी करायची हे सगळ्या भारतीयांच्या हाडीमासी भिनलेय त्याला कोण काय करू शकणार? कोणी आपल्या बुडावर दांडके हणले तरच आपण काम करणार. सरकारने हा दंडुका हाणावा म्हटले तर सरकारही भारतीय लोकांचेच आहे. त्यांनीच निवडून दिलेले आहे. ते वेगळे का वागेल आणि वागायला लागले तर कोणी का ऐकेल?
अनेक खाजगी कॉलेजेस उत्तम
अनेक खाजगी कॉलेजेस उत्तम दर्जाचीही आहेतच की. डीमड युनिव्ह आहेत.
सरकारचा कमी अधिक्षेप असलेल्या शाळाही उत्तम आहेत. एकूणच, १९९१ नन्तरचा भारत पाहिला तर सरळ दिसून येतं- सरकारी बॅंक - अजिबात कोणी मदत करत नाही, खाजगी बॅंक - बसा, कॉफी घ्या, लगेच काम करून देणार. सरकारी व खाजगी मध्ये फरक पावलोपावली जाणवतो. पासपोर्ट ऑफिस म्हणजे एजन्ट, लाचखोरी हे समीकरण होतं. आता टीसीएस चे लोक बघा कसे छान काम करतात. फक्त mtnl होतं, किती फोन होते? आता दोन तासात सिम कार्ड सुरु होतं. सगळीकडे हेच आहे.
एक काम करा पुढची 1-2 वर्ष
एक काम करा पुढची 1-2 वर्ष फक्त त्या 1300 बंद झालेल्या शाळेच्या जागेवर नेमके काय उभे राहते याकडे लक्ष द्या.. सगळा खेळ लक्षात येईल <<<
>>प्रदीप जी सरकारी शाळा बंद करून शिक्षणाचे बाजरीकरणकरण्यासाठीच हा डाव आहे.. भविष्यात सरकारी शाळांच्या जागांवर कंपनी शाळा उभ्या राहिलेल्या दिसल्या तर नवल वाटायला नको.
संघटित लूट आहे ही !<<
>> ऋन्मेऽऽष जी आपले निरीक्षण अगदी बरोबर आहे.. अर्थातच त्यासाठीच हा अट्टहास केला जातोय..
पण काळ पुढे जातो तसतसे नवनवीन येत राहते. आपण चालत राहायचे..!!
>> यक्ष जी काळानुसार चालायला काही हरकत नाही.. पण काळ आल्यावर काय करणार.. आज शिक्षण क्षेत्रातील बहुंताश लोकांची धारणा आहे कि कंपनी शाळा म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण आहे. काळानुसार बदल सरकारने करायला हवेत कि, या कंपंन्या कशालाच हव्यात.
त्याउलट corporates आले, फॉरेन शाळा आल्या तर चांगलं होईल. पारपत्र प्रोसेस खाजगी झाला तेव्हा टीसीएसने उत्तम काम केलं. आज एक दिवसात पारपत्र घरी येतं. जर टाटांनी शाळा काढल्या तर दर्जा उत्तमच असेल.
>>> सणव, महानगरे सोडून सुद्धा काही भाग असा आहे कि ज्यांना टाटा च्या शाळा परवडणार नाहीत.
हे केव्हाच झालंय हे तुम्हाला माहीत नाही काय? तुमच्या ओळखीत कोणाचीच मुले आता शाळेत जायच्या वयाची राहिली नाहीत काय? सध्या असलेल्या शिक्षणाच्या बाजारातून किती उपयुकट प्रॉडक्ट्स बाहेर येताहेत हे चाचपून पाहिले का जरा?<<<
>>>प्रक्रिया सुरु आहे.. अजून संपूर्णपणे खासगीकरण झालेलं नाही. आणि माझा मुलगा ३ असल्याने प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत तितकी माहिती माझ्याकडे आहे... शिक्षणाचा बाजार अजून त्य्यांप्रमाणात झाला नसल्याने किमान सध्या तरी प्रोडक्टस बर्यापैकी समाजशील आहेत. पण कंपनीं शाळा आल्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही.
मुंबई सोडूनही राज्यात बराच मोठा भाग आहे.. आणि शासनाचा प्रत्येक निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू होत असल्याने केवळ मुंबई च्या शिक्षणाशी याची तुलना करून चालनार नाही. दुर्गम भागातील ग्रामीण भागातील मुलांना आजही सरकारी शाळांचाच आधार आहे.. त्या जर बंद झाल्या तर या मुलांचे शिक्षण कायमचे बंद होऊ शकते. आपल्या राज्यात असा एक मोठा वर्ग आहे जो खासगी शाळांची फीस कितीही कमी असली तरी भरू शकत नाही.. त्यांचे काय होणार ?? दुसरे असे कि शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सर्वाना शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात आले आहे. अर्थात हीं जबाबदारी सरकारची असताना सरकार ती झटकण्याचा प्रयत्न करून कंपन्याना शिकवण्याचे कंत्राट देणार असेल तर मग या सरकारी यंत्रणेचा काय फायदा? आरोग्य शिक्षण यासारख्या प्रार्थमिक गरजा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही सरकारला नको असेल तर सरकारी यंत्रणा काय फक्त जीएसटी वसूल करण्यासाठी आहे का? कि तिचेही कंत्राट काढण्यात येणार आहे. राज्यातील एकही मूल शाळाबाह्य राहू नये यासाठी विविध धोरणे सरकारने आणली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या योजनेखाली सरकारी शाळांना आधुनिक करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले. अनेक ठिकाणी त्याचे यश दिसत आहे. मग कंपनी शाळा का??? नोदनिकृत संस्था आदींना शाळा काढण्याची परवनगी आहेच कि, त्यांच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्याचे सोडून शिक्षणात कंपनीं आणून बाजरीकरण कशासाठी ? मुद्दा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. नागरी वस्तीमध्ये महानगरणामध्ये खासगी शाळा हा पर्याय उपलब्ध असतो. पण ग्रामीण भागात तो असेलच असे नाही. आज जिकडे तिकडे कॉन्व्हेंटचा बाजार भरला असताना गोरगरीब मुलांना शिक्षित करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षक एका हातात खडू आणि दुसऱ्या हातात माउस घेऊन माहगडया शाळांशी स्पर्धा करत गावकुसातल्या मुलांना डिजिटल करत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने याला चालना देणारे धोरण ठरविण्याची गरज असताना या शाळांचं श्वास कोंडण्याचे धोरण रचल्या जात आहे.
दर्जा कसा खालावला जातो? सरकार म्हणजे कोणी माणूस आहे का जो सरकारी शाळेत येऊन तिथल्या शिक्षकाचे तोंड बांधतो, पाय बांधतो जेणेकरून तो शिक्षक वर्गात येऊन शिकवू शकणार नाही? मग ज्या कामाचा पगार मिळतो ते काम हे शिक्षक का नाही करत?<<
>>शिक्षकांचे हात पाय शब्दशा बांधल्या जात नसले तरी त्यांच्यावर शाळाबाह्य कामांची मोठी जबाबदारी असते.. तिचे प्रमाण इतके आहे कि, खुद्द शिक्षणमंत्री मोहद्यानी शाळाबाह्य कामांचा ताण कामी करण्यासाठी उपयायोजना करण्याचे आश्वासन दोन आठवड्यांपूर्वी दिले आहे.
भारतीय मानसिकतेबद्दल आपण व्यक्त केलेल्या मतांशी सहमत.. पण ज्याला माणसाची जे काम करण्यासाठी नियुक्ती झाली आहे त्यांना तेच काम करू द्या कि, मतदान याद्या बनवायलाच शिक्षकानं का पाठवता.. हजार सर्वेक्षण आणि शंभर निरीक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर का? त्यांना फक्त शिकवण्याचे काम करू द्या.. भलेही कुणी आळस किंव्हा कामचुकारपणा करत असेल तर त्याला नोकरीवरून कमी करा... आणि फक्त शिक्षक होण्यासाठीच लोक प्रयत्न करत नाहीत कुठल्याही सरकारी नोकरीसाठी चढाओढ असतेच... मग जर सगळेच कामचुकार असतील तर मग सरकारचेही खासगीकरण करावे लागेल ..
जर सगळेच कामचुकार असतील तर मग
जर सगळेच कामचुकार असतील तर मग सरकारचेही खासगीकरण करावे लागेल ..
bang on
तर मग सरकारचेही खासगीकरण
तर मग सरकारचेही खासगीकरण करावे लागेल >>> !!
भलेही कुणी आळस किंव्हा
भलेही कुणी आळस किंव्हा कामचुकारपणा करत असेल तर त्याला नोकरीवरून कमी करा.
सरकारी नोकरीत असं खाजगीप्रमाणे करता येत नाही.
दुर्गम भागातील शाळा बंद करा असं मी म्हणत नाही. पण मी जी demand supply gap म्हणत आहे ती शहरी भागात corporates ना पुरी करू दे. लोकांना तो choice द्या.
या लोकांना चांगले शिक्षक व चांगलं क्राऊड असलेल्या शाळा हव्या आहेत. त्यांना सरकारकडून काही नको आहे. कॉर्पोरेटना पैसे द्यायची तयारी आहे. मग का विरोध आहे? तुम्हाला तुमच्या मुलांना नसेल पाठवायचं तर नका पाठवू पण या लोकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं तर तुमचं नक्की काय नुकसान होणार आहे?
क्षेत्रातील बहुंताश लोकांची
क्षेत्रातील बहुंताश लोकांची धारणा आहे कि कंपनी शाळा म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण आहे.
हसावं की रडावं कळत नाही. आज जे अनेक शिक्षणसम्राट संस्था चालावून पैसे आणि भूखंड कमवत आहेत त्यांनी पुरेसं बाजारीकरण already केलेलं नाहीये का?
उलट आता रीतसर कायदे करून या लोकांना कायद्याच्या कचाट्यात आणलं जाईल. आणि व्हाईट मध्ये व्यवसाय करू इच्छिणारे टाटांसारखे लोक या फिल्डमध्ये येऊ शकतील.
क्षेत्रातील बहुंताश लोकांची
क्षेत्रातील बहुंताश लोकांची धारणा आहे कि कंपनी शाळा म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण आहे.
हसावं की रडावं कळत नाही. आज जे अनेक शिक्षणसम्राट संस्था चालावून पैसे आणि भूखंड कमवत आहेत त्यांनी पुरेसं बाजारीकरण already केलेलं नाहीये का?
उलट आता रीतसर कायदे करून या लोकांना कायद्याच्या कचाट्यात आणलं जाईल. आणि व्हाईट मध्ये व्यवसाय करू इच्छिणारे टाटांसारखे लोक या फिल्डमध्ये येऊ शकतील.>>>>>>
सहमत.
दुर्गम भागातील शाळा बंद करा
दुर्गम भागातील शाळा बंद करा असं मी म्हणत नाही. पण मी जी demand supply gap म्हणत आहे ती शहरी भागात corporates ना पुरी करू दे. लोकांना तो choice द्या.
या लोकांना चांगले शिक्षक व चांगलं क्राऊड असलेल्या शाळा हव्या आहेत. त्यांना सरकारकडून काही नको आहे. कॉर्पोरेटना पैसे द्यायची तयारी आहे. मग का विरोध आहे? तुम्हाला तुमच्या मुलांना नसेल पाठवायचं तर नका पाठवू पण या लोकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं तर तुमचं नक्की काय नुकसान होणार आहे?<<
>> पण हा निर्णय फ़क्त शहरी भागासाठी लागू होत नाही, यात ग्रमीण भागही येतो..हजार शाळा ऑलरेडी बंद करण्यात आल्या आहेत दुसऱ्या टप्प्यात २० हजार शाळा रडार वर आहेत..आणि दर्जेदार शिक्षण पुरविन्याची जबाबदारी सरकारने घ्यायला काय हरकत आहे.. काही श्रीमंत लोकांना महगडा उपचार परवडतो किंबहुना त्यांना तोच घ्यायचा आहे.. अस म्हणुन मग उद्या सरकारी दवाखाने बंद करायचे का?? एका वर्गासाठी दुसऱ्या वर्गाला का वेठीस धरायचे.. ?
सरकारी नोकरीत असं
सरकारी नोकरीत असं खाजगीप्रमाणे करता येत नाही.<<
>> अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना कामावरन काढता येत की..
दिल्ली सारखी महाराष्ट्रातील
दिल्ली सारखी महाराष्ट्रातील एक तरी सरकारी शाळा तावडेंनी करून दाखवावी.
आता रीतसर कायदे करून या
आता रीतसर कायदे करून या लोकांना कायद्याच्या कचाट्यात आणलं जाईल. आणि व्हाईट मध्ये व्यवसाय करू इच्छिणारे टाटांसारखे लोक या फिल्डमध्ये येऊ शकतील.
>>> हे तुमचे विश्फुल थिंकिंग आहे की तुमच्याकडे याबद्दल काही अधिकृत माहिती आहे?
नाना अहो आता भाजपाचे सरकार
नाना अहो आता भाजपाचे सरकार आहे त्यामुळे ते आता जे करतात ते बरोबरच करतात असे सनव यांचे म्हणणे आहे त्यांचा लोड घेऊ नका
काय की सनवतै 'रितसर कायदे
काय की सनवतै 'रितसर कायदे करुन' वगैरे बोलत आहेत, म्हटलं तावडेंनी यांच्या कानात सांगितले की काय,
आपली काय एवढी पोहोच आणि ओळख नाही. सामान्य नागरिक आपण, माहिती मिळत असेल तर विचारुन घ्यावी, हा का ना का!
Pages