सविनय नमस्कार,
मातृभाषा शिक्षणाचं जगभर निर्विवाद सिद्ध झालेलं महत्व, महाराष्ट्रातील मराठी शाळांचं संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून, मोठ्या प्रमाणावर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळांचंही एक महासंमेलन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेलं आहे. २३-२४ डिसेंबर २०१७ रोजी, मुंबई येथे हे ऐतिहासिक महासंमेलन होईल.
या संमेलनात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई - विरार ते पालघर, डहाणू इथल्या शाळांचे मिळून जवळपास वीस हजार पालक व इतर नागरिकांची उपस्थिती असेल. या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागातील प्रयोगशील शाळा, शालोपयोगी वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्या, प्रकाशकांची ग्रंथप्रकाशने, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या विविध संस्था/संघटनांची माहिती देणारी दालने (स्टॉल्स) असे अनेक स्टॉल्स उपलब्ध असतील. महाराष्ट्राच्या विविध भागातून प्रयोगशील शिक्षणासाठी काम करणारे मान्यवर, अभ्यासक, राजकीय नेतेमंडळी, साहित्य-सिने-नाट्य-क्षेत्रातील दिग्गज इ. व्याख्याने, चर्चासत्रे यांमधून या दोन दिवसांच्या संमेलनात उपस्थिती दर्शविणार आहेत. शिवाय या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतील शाळांत शिक्षणविषयक जे प्रवाह – पद्धती राबवल्या जात आहेत, त्यांवर आधारित ‘मराठी शाळा विशेषांक’ही प्रकाशित होणार आहे.
या संमेलनाला येण्याचं तुम्हा सर्वांना, किंबहुना, प्रत्येकच मराठी माणसाला आमंत्रण आहे. मातृभाषेतून शिकण्याबद्द्ल, किंवा मराठी-इंग्रजी शाळांच्या विषयाबद्दल मतभेद असले तरीही त्याबद्दल विचरवंतांची, अभ्यासकांची, यशस्वी व्यक्तींची, शिक्षकांची, आपल्यासारख्या पालकांची, मुलांची अशी असलेली मतं ऐकून घ्यायला तरी प्रत्येकाने इथे यायची संधी साधायला हवी असं मनापासून वाटतं.
त्याचसोबत एक विनम्र आवाहन आहे. मराठी अभ्यास केंद्र ही तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी एकत्र येऊन उभी केलेली संस्था या संमेलनासाठी निधी उभारण्यासाठी प्रयत्न करतेय. अजून बरीच तूट भरून काढायची आहे. उद्योजक असाल तर प्रायोजक होऊन, आपल्या व्यवसायाची जाहिरात देऊन किंवा पालक असाल, मराठीप्रेमी नागरीक असाल तर वैयक्तिक देणगी देऊनही आपण या संमेलनाला मदत करू शकता. शिवाय आपल्या संपर्कातील व्यवसायिकांना हा संदेश जरूर पाठवा व इच्छा असल्यास जरूर मदत, संपर्क करायला सांगा.
बँक खात्याचा तपशीलः मराठी अभ्यास केंद्र, खाते क्रमांक – ६००२९९१५६७८, IFSC क्रमांक – MAHB0000110, बँक ऑफ महाराष्ट्र, नौपाडा शाखा, ठाणे. अधिक माहितीसाठी संमेलन समन्वयक आनंद भंडारे (९१६७१८१६६८), डॉ. वीणा सानेकर (९८१९३५८४५६) यांच्याशी संपर्क साधावा.
हे एक संमेलन नसून ही चळवळ आहे व तुमच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे. तेंव्हा जरूर हातभार लावा, समेलनाबद्दल सर्वांना सांगा आणि हो, संमेलनाला जरूर या!
- मराठी अभ्यास केंद्र
डॉ. दीपक पवार - अध्यक्ष (९८२०४३७६६५)
फेसबुक दुवा (www.facebook.com/events/330379617423263)
सहयोगी संस्था:
शीव शिक्षण संस्था
दि शिक्षण मंडळ, गोरेगाव
नूतन विद्यामंदिर, गोरेगाव
वंदे मातरम शिक्षण संस्था
मी मराठी चळवळ समिती
पंचतत्व सेवा संस्था, पालघर
प्रबोधक यूथ फेडरेशन
राष्ट्रज्योत, कल्याण
चित्रपतंग समूह
फेसबुक समूह : मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत
सहकार्य:
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
शिक्षक भारती
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना
बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभा
नमस्कार,
नमस्कार,
मातृभाषेतून शिकण्याचं सर्व स्तरावर सिद्ध महत्व पालकांना सांगणं, आणि मराठी शाळांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी पालकांची आघाडी उभारणं या मुख्य उद्दिष्टांना घेऊन आयोजित झालेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचं प्रत्येक सत्र आता उच्च प्रतीच्या व्हिडियोच्या रुपात यूट्यूबवर उपलब्ध आहे.
संमेलनाला येऊ न शकलेल्यांसाठी, आलेल्यांना परत ते सगळे विचार ऐकण्यासाठी, साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी.
यूट्यूब वाहिनीवर जाण्यासाठी इथे क्लिक करा
धन्यवाद
आभार हे इथे लिहील्याबद्दल.
आभार हे इथे लिहील्याबद्दल. गेले काही दिवस फेसबुक वरून माहिती मिळत होती. चांगला झालेला दिसतोय कार्यक्रम.