संदर्भ – १. न सांगण्या जोगी गोष्ट – मेजर जनरल(नि.) शशिकांत पित्रे
२. An Era of Darkness: The British Empire in India- Shashi Tharoor
३. 1962: The War That Wasn't - Shiv Kunal Verma
४. ‘ माओचे लष्करी आव्हान’, - दि. वि. गोखले
५. वालॉंग ..एका युद्ध कैद्याची बखर – ले. क. शाम चव्हाण
६. ब्रिटीश गुप्तचर संघटना – पंकज कालुवाला
आणि इतर अनेक लेख, documentaries, मुलखती.
विषयप्रवेश
पराभवाचे इतिहास फारसे कुणला वाचायला आवडत नाहीत. गतकाळातील देदीप्यमान, लखलखीत विजयगाथा सगळ्यांनाच भुरळ घालतात. कुणी स्वपराभवाचा इतिहास लिहिला तरी त्यातील पराभूत नायकांचे शौर्य, बलिदान, सर्वस्व त्यागाची भावना आणि सर्वस्वाचा खरोखरच केलेला त्याग ह्यावर जास्त भर दिला जातो. एका मर्यादे पर्यंत ते ठीकच असते. इतिहास हा नेहेमी जेत्यांनी लिहिलेला असतो ( म्हणजे त्यात जिंकलेल्यांच्या बाजूने पक्षपात होतो.अशी एक म्हण आहे) त्यामुळे त्यावर प्रत्युत्तर म्हणून असे होणे हि स्वाभाविक आहे. पण पराभावाच्या इतिहासाचे निष्पक्ष आणि परखड विश्लेषण, चिकित्सा ही अशा करता महत्वाची कि त्यातून घडल्या गेलेल्या स्वकीयांच्या चुका, अंगभूत तृटी, दोष, इ. व्यवस्थित ओळखून भविष्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उपाय योजना करता येईल. इतिहासापासून लोक शिकत नाहीत, इतिहासाची पुनरावृत्ती नेहेमी होत राहते हे वाक्य अशा अर्थाने खरे आहे कि बऱ्याचदा पराभवाच्या इतिहाआसांचे परखड विश्लेषण केले जात नाही, पराभवाबद्दल हळहळ आणि त्यातील लोकांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूनच आपण थांबतो. १९६२ चे भारत चीन युद्ध ह्याला अपवाद कसे असेल! ह्या युद्धात आपला दारुण पराभव झाला.का झाला हा पराभव? हे जवळपास सगळ्याना माहिती आहे.पण कसा झाला हा पराभव? नक्की काय घडल त्यासुमारास किंवा त्या आधी? हे मात्र सगळ्याना नाही पण बहुतेकांना माहिती नसते. दुखरी नस असेल म्हणून असेल कदाचित पण ह्या विषयावर फारशी पुस्तकं मराठीत उपलब्ध नाहीत. मलातरी तीनच माहिती अहेत. १ दि. वि. गोखले ह्यांचे ‘ माओचे लष्करी आव्हान’, २. ले. क. श्याम चव्हाण ह्यांचे वालॉंग ...एका युद्धकैद्याची बखर, आणि हल्ली हल्ली(२०१५) प्रसिद्ध झालेले ३. न सांगण्याजोगी गोष्ट हे मे. ज. शशिकांत पित्रे ह्यांचे पुस्तक.
एक भारतीय म्हणून आपल्याला ह्या विषयावर तटस्थपणे विचार करणे आणि ह्या पराभवाची चिकित्सा करणे अत्यंत अवघड काम(भावनात्मक दृष्ट्या) आहे. आणि ते आपण सर्वानी केलेच पाहिजे असे ही काही नाही पण ज्याना खरोखर काय घडले हे समजून घ्यायचे त्यांच्या करता ह्या कालखंडात घडलेल्या घटना कोणतेही अभिनिवेश मनात न बाळगता, त्रोटकपणे आणि जशा घडल्या तशा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. (हे मला अत्यंत कठीण आहे आणि ठीक ठिकाणी माझा तोल गेलेला आहे तरी पण तुम्ही समजून घेऊन उदारपणे त्याकडे दुर्लक्ष्य कराल अशी आशा करतो ) बऱ्याचदा घटना तुटक वाटतील पण हे पुस्तक नसून एक लेख आहे त्यामुळे महत्वाच्या घटनांचा परामर्श फक्त घेतला आहे. मोठा ग्रंथ ह्याविषयावर लिहायचा विचार नाही आणि माझी ती पात्रता ही नाही.
मग करायची सुरुवात!
कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम्
इति ते संशयो मा भूत् राजा कालस्य कारणं ।
संस्कृत मध्ये असलेल्या ह्या सुभाषिताचा अर्थ असा कि एखाद्या राष्ट्राच्या,समाजाच्या, देशाच्या प्रगतीला किंवा अवनतीला जबाबदार कोण? त्याचा राजा (नेता) कि काळ? असा संभ्रम उत्पन्न होईल, तेव्हा मनात शंका येऊ देऊ नका राजा हाच कारण.
हे सुभाषित समजून देण्यासाठी म्हणून जर उदाहरणच द्यायचे झाले तर १९६२ च्या चीन भारत युद्धाइतके दुसरे समर्पक उदाहरण सापडणे कठीण.
‘माओचे लष्करी आव्हान’ ह्या दि. वि. गोखले लिखित छोटेखानी पुस्तकाला पु. ल. देशपांडे ह्यांची प्रस्तावना आहे, त्यात ते लिहितात “ हा लहानसा ग्रंथ म्हणजे आमच्या नेत्यांच्या नाकर्तेपणाची, नामुष्कीची आणि राजकीय न्युनगंडाने पीडित अशा लोकांची केविलवाणी कथा आहे. घराच्या म्हातारीलाच काळ ठरलेल्या महापुरुषांच्या महापतनाचा हा ताजा इतिहास आहे.आपल्या राजकारण पांडीत्याने दुष्टातल्या दुष्टाचे देखील हृदयपरिवर्तन करू म्हणणाऱ्या अहंकाराच्या पराजयाची ही विलापिका आहे. ‘रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति’ ह्या षंढ सूत्राला मानवतेचे महन्मंगल स्तोत्र समजणाऱ्या वाचिवीरांच्या भ्रमनिरासाची ही मर्म भेदक कहाणी आहे. शत्रू दाराशी धडका देत असताना जगाला शांतीचे पाठ देत हिंडणाऱ्या आणि स्वत:चे घर पेटत असताना दुसर्यांच्या घरातली कोळीष्टके झाडायला धावून जाणारया आमच्या वांझोट्या नेतृत्वाचे जगभर जे हसे झाले त्याचा हा प्रथमोध्याय आहे. दुबळ्यांची अहिंसा आणि नपुंसकांचे शील ह्याला जगात कवडीचीही किंमत नसते. हा जगाच्या इतिहासानेच लाख वेळा शिकवलेला धडा विसरल्याची ही शिक्षा आहे. शिवरायांचे प्रताप आठवायचे तिथे अहिंसेचा खुळखुळा वाजवत बसण्याच्या पापाचे हे प्रायश्चित्त आहे.....”
लक्षात घ्या पु. ल. हे काही आक्रमक, जहाल लिहिणारे नव्हते. त्वेषाने कुणाच्या अंगावर धावून जाणारे तर नव्हतेच नव्हते. तरी पण त्यांनी हे जे पोट तिडकीने लिहिले आहे ते पं. नेहरुना, संरक्षणमंत्री (तत्कालीन)कृष्ण मेनन ह्याना आणि त्यांच्या पायी ओढवलेल्या नामुष्कीला उद्देशूनच लिहिले आहे.
पहिले महायुद्ध संपले तेव्हा फ्रेंच पंतप्रधान क्लेमेनौ ह्याने म्हटले होते कि युद्धासारखी गंभीर बाब सेनापतींच्या भरवशावर सोडता कामा नये. पण १९६२ च्या युद्धाकडे पाहता युद्ध ही राजकारण्यांच्या भरवशावर सोडण्याची देखील बाब नव्हे हे समजून चुकते.
प्राचीन, प्राचीनच कशाला अगदी १८-१९व्या शतकापर्यंत तरी भारतीय उपखंडात देशाच्या, आपल्या आधिपत्याखालील प्रदेशाच्या सीमा व्यवस्थित आखून त्याबरहुकूम नकाशे तयार करणे ते आपल्या शेजारील राज्यांबरोबर वाटाघाटी करून निश्चित करून घेणे त्यासंबंधी करार मदार करणे हे प्रकारच नव्हते. आजही इतिहास संशोधकाना जुनी ऐतिहासिक कागदपत्रे धुंडाळताना असे नकाशे सापडत नाहीत.मौर्य साम्राज्य असो वा मुघल, त्यांनी जरी भारतीय उपखंडाच्या बाहेर जाऊन साम्राज्य विस्तार केला तरी त्यांनी आपल्या साम्राज्याच्या सीमांच्या आखणी बाबत उदासीनता तशीच ठेवली.भारतीय स्वातंत्र्य लढा अगदी बहरात असतानाही ह्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नव्हता हे खेदाने इथे नमूद करावे लागते. फक्त चीन नव्हे तर अफगाणिस्तान, रशिया ब्रह्मदेश, नेपाळ अशा आपल्या शेजारी प्रदेशांशी आपले(म्हणजे ब्रिटिश-भारत सरकारचे ) सीमाबाबत काय करार मदार आहेत ह्याबाबत आपल्या तत्कालीन नेत्यांनी कोणतेही स्वारस्य दाखवलेले नाही. आजही आपण भारत आणि चीन बद्दल बोलताना नक्की आपल्या सीमा कुठे कुठे पर्यंत आहेत , कशा आहेत कुठे वाद आहेत ह्याबद्दल अनभिज्ञच असतो. ते कशाला असेच अज्ञान आपल्या पैकी अनेक जणांचे काश्मीर बद्दल ही असते.तेव्हा भारत चीन युद्धाबद्दल काही माहिती घेण्या आधी सीमावादाचा थोडासा धांडोळा घेणे अगदीच अप्रस्तुत होणार नाही.
सीमावाद आणि त्याचा संक्षिप्त इतिहास.
१९६२ पर्यंत तरी भारत चीन संघर्ष हा मुख्यत्वे करून सीमावादच होता आणि आजही त्याचे जाहीर स्वरूप तसेच आहे फक्त अंतर्गत प्रेरणा बदललेल्या आहे. १८५७ साली भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य समर मोडून काढल्यावर ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी कडून भारताची सत्ता ब्रिटीश सरकारच्याकडे गेली. विस्तारवादि साम्राज्यांचा एक सिद्धांत असा आहे कि जर त्याना तुल्यबळ प्रतिस्पर्धी, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती सामोरी येत नाही किंवा त्यांचे स्वत:चेच सामर्थ्य कमी पडत नाही तोपर्यंत ते साम्राज्य विस्तार चालूच ठेवतात. भारतामध्ये सत्ता दृढमूल झाल्यावर ब्रिटिशांच्या लक्षात आले कि त्यांच्या साम्राज्याला महत्वाकांक्षी रशियाकडून धोका आहे.पण असे वाटणारे ते एकटे नव्हते. रशिया बद्दल असा धोका वाटणारा चीन ही होता. पण गम्मत अशी कि चीनला ब्रिटीशांचाही धोका वाटत होता.१७व्या शतकापर्यंत चीनचा रेशीम, चहा आणि पोर्सिलीनच्या व्यापारात एकाधिकार होता. हा व्यापार आणि त्यातून मिळणारा नफा ही मांचू साम्राज्याची जीवन वाहिनी असल्याने त्यावर त्यांची पोलादी पकड होती. त्याला शह देण्यासाठी म्हणून ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने अफूचा व्यापार चीन मध्ये करायला सुरुवात करून चीनी युवकांची जवळपास अख्खी पिढी व्यसनी बनवली. हा जो कुटील डाव इंग्रज आणि इतर पाश्चात्त्य सत्तांनी खेळला त्याला चीनी राजसत्तेने विरोध केल्यानंतर हे पाश्चात्त्य व्यापारी आणि चीन ह्यांच्यात १८३९-४२ व १८५६-६० मध्ये दोन युद्धे करून त्यात चीनचा निर्णायक पराभव केला व तहात चीन मध्ये मुक्त व्यापार करण्यचे अधिकार त्यानी मिळवले. ह्याच्या कटू आठवणी चीनच्या मनात अजून ताज्या होत्या. ( इथे हे सांगणे अगदीच अप्रस्तुत होणार नाही कि टाटा सारखे आजचे भारतातले आघाडीचे ओउद्योगिक घराणे हे ह्या अफूच्या व्यापारात बक्कळ पैसा कमवून श्रीमंत झाले होते तसेच इंग्रजांच्या मर्जीतही आले होते – अर्थात ते म्हणजे जमशेटजी टाटांचे पण आजोबा...) त्यामुळे त्यांच्या आणि ब्रिटीशांच्यात साशंकतेचे धुरकट वातावरण नेहमीच होते. रशिया आणि भारतामध्ये एक बफरझोन हवे म्हणून भारताच्या वायव्वेकडे असलेल्या अफगानिस्तानाशी करार करून ब्रिटीशांनी त्यांच्या व आपल्या सीमा निश्चित करून घेतल्या हा करार ड्युरंड सीमा करार म्हणून ओळखला जातो.(ब्रिटीश अधिकारी सर ड्युरंड ह्यांच्या नावावरून ड्युरंड करार) साधारणपणे २३०० कि.मी. लांबीची ही सीमा रेषा आहे.तर ब्रिटीश भारत आणि चीन मध्ये तिबेटचा भाग होता जो दोघा करताही बफर झोन म्हणून उपयोगी होता.पण एक तर तिबेट मध्ये अफगानिस्तान प्रमाणे राजकीय सृष्ट्या स्थिर सरकार/ राजवट नव्हती आणि तो इतिहासात बऱ्याच वेळा चीनच्या अधिपत्याखाली आलेला होता. शिवाय १९व्या शतकात हा भाग चीनच्या अधिक्षेत्रात( सुझरेंटी) येत होता. त्यामुळे चीनला डावलून एकतर्फी केलल्या तिबेटच्या कराराला काही अर्थ नव्हता. आपल्याहून सशक्त साम्राज्यावादि शक्तींशी केलेले करार शेवटी त्यांच्याच फायद्याचे आणि आपल्या तोट्याचे असतात ह्या कन्फ्युशियसच्या तत्वाचा चीनला तेव्हाही विसर पडलेला नव्हता आणि आजही नाही(....आणि आपला तर कन्फुशियसशी काय संबंध!...असो ).ह्यावेळी चीन मध्ये चिंग घराण्याचे राज्य होते त्यालाच मांचू साम्राज्य म्हणूनही ओळखतात. ते आधीच अंतर्गत तंटे बखेडे आणि छोट्यामोठ्या बंडाळ्यानी त्रासलेले होते त्यामुळे त्यांच्या कडून ब्रिटीशाना मोठा धोका जाणवत नव्हता. शिवाय इतिहास काळात चीन ने कधीही दुर्गम असां हिमालय ओलांडून भारताच्या प्रदेशावर हल्ला केलेला नव्हता.त्यामुळे तिबेट सारख्या अत्यंत दुर्गम, ओसाड आणि लांबलचक भूभागावर अधिपत्य मिळवून फायदा काय? असा ही विचार त्यांनी केला असेल कदाचित. ते काय असेल ते असो पण चीन बरोबर सीमा निश्चित करण्यात ब्रिटीशानी तितकासा उत्साह दाखवून ते काम तडीस नेले नाही हे मात्र खरे. त्यातून १९११ मध्ये हे चीन मधले मांचू साम्राज्य अचानक कोसळले तर १९१७ साली रशियातली झार राजवटही लयाला गेली आणि मग तर इंग्रजांचा सीमानिर्धारणाताला उत्साहच मावळला
चीन आणि भारतातली सीमा ही काश्मीर च्या वायव्वेला असलेल्या काराकोरम पर्वतराजी पासून सुरु होते ती पूर्वेला तालु खिंडीजवळ भारत म्यानमार आणि चीन-तिबेटच्या तिठ्यावर येऊन संपते.ही एकूण ४०५७ कि. मी. लांब सीमा रेषा आहे. तिचे तीन मुख्य भाग पडतात.
१.उत्तर विभाग- काराकोरम-डेमचोक –लदाख
हा उत्तर विभाग म्हणजे काश्मीरच्या भूभागाला खेटून असलेला भूभाग त्यामुळे ह्या भागातल्या सीमेची जरा खोलात जाऊन माहिती घेणे अप्रस्तुत ठरणार नाही
१९४७ पासून आजपर्यंत सतत धगधगत असलेला काश्मीरचा प्रश्न हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील (आणि कदाचित जगाच्या ही)सगळ्यात जास्त लांबलेला प्रश्न आहे आणि आजमितीला देखील ह्या प्रश्नाचे समाधान दृष्टीक्षेपात नाही. भारतातल्या विशेषत: काश्मीर बाहेर राहणार्या प्रत्येक माणसाला काश्मीर बद्दल आणि काश्मीर प्रश्नाबद्दल माहिती (जुजबी किंवा साद्यंत) असतेच पण बहुसंख्य लोकाना काश्मीर म्हणजे नक्की कोणता भूभाग ह्या बाबत मात्र भरपूर गैरसमज असल्याचे दिसून येते.त्याकरता म्हणून हा नकाशा वर दिलेला आहे.
आपण ह्या नकाशात दाखवलेल्या संपूर्ण भूभागाला जम्मू आणि काश्मीर राज्य म्हणून ओळखतो. पण त्यातला फक्त जांभळ्या रंगाने दाखवलेला भूभाग हे काश्मीर खोरे आहे तर त्याच्या दक्षिणेला फिक्कट निळ्या रंगाने दाखवलेला भूभाग हे जम्मू आहे.हे दोन भूभाग ह्या सगळ्या प्रदेशातले सगळ्यात महत्वाचे, प्रसिद्ध म्हणून आपण ह्या संपूर्ण भूभागाला जम्मू आणि काश्मीर म्हणून ओळखतो. ह्या जम्मू आणि काश्मीरच्या पश्चिमेला जे लाल आणि हिरव्या रंगाचे भाग दाखवले आहेत ते पाकिस्तान ने कब्जा केलेले भूभाग आहेत. त्या दोन्ही भागाला मिळून आझाद काश्मीर(त्यांनीच दिलेले) हे नाव आहे. त्यांच्या उत्तरेला असलेले हिरव्या रंगाचे भूभाग Northern areas(उत्तरेकडील भूभाग) म्हणून ओळखले जातात त्यात गिलगीट, बाल्टीस्तान, स्कर्दू असे प्रदेश येतात. हा सगळा लाल आणि हिरव्या रंगाने दाखवलेला भाग पाकिस्तानने बळकावलेला आहे आणि ह्या भागाच्या सीमारेषेला LOC( Line Of Control) म्हणून ओळखतात.काश्मीर प्रांताची राजधानी श्रीनगर, तर जम्मूची राजधानी जम्मू ही आहे. (संस्थान काळात जम्मू ही काश्मीरच्या राजाची शीत कालीन( हिवाळ्यातली राजधानी असे.)
फिक्कट गुलाबी रंगाने दाखवलेला भूभाग हा लदाख आहे.हा आकाराने जम्मू आणि काश्मीर राज्यातला(भारताच्या ताब्यातील) सगळ्यात मोठा भूभाग आहे हा भूभाग काश्मीरच्या डोगरा राजा गुलाब सिंगने १८४२ मध्ये जिंकून आपल्या राज्याला जोडला. ह्यात पिवळ्या रंगाने दाखवलेला भूभाग १९६२ साली चीनने आक्रमण करून पादाक्रांत केला. त्याला अक्साई चीन असे नामभिधान असून त्याची सीमारेषा हि आज LAC( Line of Actual Control ) म्हणून ओळखली जाते. लेह ही लडाखची राजधानी असून तिथले लोक मुख्यत्वे बौद्धआहेत. काश्मीर प्रांत मुस्लीम बहुल प्रांत असून तेथे त्यांचे प्रमाण ९७% आहे. तर जम्मू मध्ये हिंदू बहुसंख्य असून त्यांचे प्रमाण ६३% आहे. लदाख मध्ये मुस्लिमांचे प्रमाण ४६.४% आहे तर तेथे हिंदू (१३%), शीख(०.७) आणि बौद्धांचे(४०%) मिळून साधारण ५३% आहेत.
१९४७-४८ पासून भारत आणि पाकिस्तान मधील प्रत्यक्ष सीमा LOC हीच आहे तर १९६२ पासून LAC ही भारत आणि चीन मधली प्रत्यक्ष सीमा किंवा ताबा रेषा आहे. खरे पाहू जाता अक्साई चीन हा अत्यंत दुर्गम, अत्यंत विरळ लोकसंख्येचा- म्हणजे खरे सांगायचे तर निर्मनुष्य असलेला भूभाग. हिवाळ्यात येथील तापमान उणे ४५ अंशाच्या आसपास जाते. नकाशात जरी सीमा दाखवली असली तरी प्रत्यक्षात ती तशीच ताब्यात ठेवायला म्हणून भारताने सीमेवर चौक्या वगैरे उभारून कायमस्वरूपी सैन्य असे तिथे कधीच तैनात केलेलं नव्हते.
२. मध्य विभाग- लदाख ते नेपाळ –ह्यात हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेशचा सीमावर्ती भाग येतो आणि
३. पूर्व विभाग नेपाळ-भूतान-म्यानमार
ह्यातील भूतान ते म्यानमार मधल्या भागाला तेव्हा नेफा (Noth East Frontier agency) असे नाव होते अन ह्या भागाच्या सीमेचे आखणी ड्युरंड सीमा ची आखणी करणार्या टीम मधले एक हेन्री मॅकमहॉन ह्याने केली होती. हीच ती सुप्रसिद्ध मॅकमहॉन सीमा. ह्यापैकी उत्तर आणि पूर्व विभागाच्या सीमान्बद्दल ब्रिटीश-भारत सरकार आणि चीन मध्ये सहमती होऊ शकली नाही आणि ह्याच भागातील सीमांवरून आजही भारत आणि चीन मध्ये बेबनाव आहे.
नेफा चे १९७२ साली आपण अरुणाचल प्रदेश असे नामकरण करून तो भारताचा केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित केला तर १९८७ साली त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊन ते भारतातले २९ वे राज्य म्हणून भारतीय गणराज्यात सामावले गेले.तरीही(आणि म्हणूनच) मॅकमहॉनरेषेच्या वैधतेवर शंका उपस्थित करत ह्या अरुणाचल प्रदेशावर अधून मधून चीन आपला हक्क सांगत असतो.
२०व्या शतकाच्या आरंभी चीन आणि रशियामध्ये उपरोल्लेखित ज्या घडामोडी झाल्या त्याच्या परिणामस्वरूप चीनबरोबर ब्रिटिश इंडियाच्या सीमांची आखणी करण्याचे ब्रिटिशांचे प्रयत्न तडीस गेले नाहीत. त्यामुळे‘१९१४मध्ये आखलेल्या मॅकमहॉन रेषेतही संदिग्धता निर्माण झाली. आपले पत्ते कधीच न उलगडणाऱ्या बेरकी चिनी राजनीतीच्या हे पथ्यावर पडणे स्वाभाविकच होते. १९४७ मध्ये या अधांतरी सीमा आणि तदनुषंगिक कलह स्वतंत्र भारताच्या पदरात वारसाहक्काने पडल्या.
क्रमशः
भारत - चिन विषय आहे पण १९५९
भारत - चिन विषय आहे पण १९५९ मधे दलाई लामा आणि हजारो तिबेटियन्सनी भारतात राजाश्रय घेतला... तो तेव्हा दिला नसता तर आज तिबेट, लामा, आणि त्यान्ची विचारसरणीचे अस्तित्व दिसले नसते. त्याचा कुठेच उल्लेख नाही दिसला.
पराभवाची चिकित्सा करणारा हेन्डरसन ब्रुक्स-भगत अहवाल काय आहे याचा पण उल्लेख आढळत नाही. आज ५५ वर्षा नन्तरही आपण चौकशी अहवाल (राष्ट्राच्या सुरक्षेचे, सैनिकी व्युहरचनेचे कारण देत) प्रसिद्ध करत नाही याचे काय कारण ?
भाग १ आणि क्रमश: आहे....
भाग १ आणि क्रमश: आहे.... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
वाचतोय.
वाचतोय.
नेहेमीसारखा अभ्यासपुर्ण आढावा
नेहेमीसारखा अभ्यासपुर्ण आढावा. विषय स्फोटक आहे, धाग्याला अपेक्षित वळण लागण्याची संभावना आहे म्हणुन येत्या दिवसांत हा धागा उडाला का हा प्रश्न पडायच्या आधीच "चालु घडामोडी" आणि "राजकारण" हे ग्रुप जॉइन करा...
<<नेहेमीसारखा अभ्यासपुर्ण
<<नेहेमीसारखा अभ्यासपुर्ण आढावा. विषय स्फोटक आहे, धाग्याला अपेक्षित वळण लागण्याची संभावना आहे म्हणुन येत्या दिवसांत हा धागा उडाला का हा प्रश्न पडायच्या आधीच "चालु घडामोडी" आणि "राजकारण" हे ग्रुप जॉइन करा...>>
म्हणजे ? नीट कळले नाही..जरा सविस्तर सांगाल का?
>>म्हणजे ? नीट कळले नाही..जरा
>>म्हणजे ? नीट कळले नाही..जरा सविस्तर सांगाल का?<<
नविन धोरणानुसार, कोणत्याहि विषयाच्या धाग्यावर "राजकारण" आलं किंवा आणलं गेलं कि लागलीच त्या धाग्याची उचलबांगडी राजकारण किंवा चालु घडामोडी या बंदिस्त ग्रुप्स मध्ये होते. हे दोन्हि ग्रुप्स बंदिस्त (सब्स्क्रायबर्स ओन्ली) असल्याने आणि मायबोलीचा लुक अँड फिल बदललेला असल्याने त्यांचे कांटेंट (धागे) इतर नॉन-सब्स्क्रायबर्स ना दिसत नाहि. तुम्हाला त्या दिव्यातुन जावं लागु नये म्हणुन तो वरचा फुकटचा सल्ला...
लेख चांगला आहे. पुढील
लेख चांगला आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत........
हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद.
हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद.
हा भाग चांगला झालाय. पुभाप्र.
पुलन्नि एवढ लिहुन ठेवलय?
पुलन्नि एवढ लिहुन ठेवलय?
चांगला लेख. पुढील भागांच्या
चांगला लेख. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
मस्त लेख...याच युद्धावरील
मस्त लेख...याच युद्धावरील कुसुमाग्रजांची कवीता...
https://www.aathavanitli-gani.com/Song/Barfache_Tat_Petuni_Uthale
सरदार पटेलांच्या
सरदार पटेलांच्या दूरद्रूष्टीचे उदाहरण असलेले व चीनचा धोका दाखवणारे पं. नेहरुंना लिहिलेले पत्र...
http://www.friendsoftibet.org/main/sardar.html
वाचतोय ....
वाचतोय ....
हिंदी चिनी भाई भाई
पहिला भाग मस्त झाला.
पहिला भाग मस्त झाला. नेहमीप्रमाणेच तुमच्या लेखातून नवीन माहिती कळाली.
आता पुढचा भाग कधी?
आदित्य श्रीपाद, तुम्ही एक
आदित्य श्रीपाद, तुम्ही एक अत्यंत महत्वाचा संदर्भ ग्रंथ ध्यानात घेतलेला दिसत नाहिये. हिमालयन ब्लन्डर्स - ब्रि. जे. पी. दळवी.
जॉन पी. दळवी नेफा आघाडीचे कमांडिंग ऑफिसर होते (प्रत्यक्ष युद्धभुमीवरील सर्वात वरिष्ठ अधिकारी). युद्धाच्या शेवटी ते चीनचे युद्धकैदी झाले व मला वाटते ५-६ महिने युद्धकैदी होते. ते परतल्यावर त्यांना युद्धाचा अहवाल लिहायला सांगितला होता व पुढे त्यांनी त्या अहवालाचे पुस्तक रुपांतर केले. या विषयावरील हिमालयन ब्लंडर्स या पुस्तकाइतके फर्स्ट हँड व मुद्देसूद पुस्तक क्वचितच दुसरे कुठले असावे. स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल व ऑपरेशनल डिसिजन मेकिंग, चेन ऑफ कमांड, कम्युनिकेशन, राजकीय व सामरीक निर्णय आणि त्यांच्या सीमा या विविध विषयांवर पुस्तकात सविस्तर भाष्य आहे.
बहुतेक याचा मराठी अनुवाद आहे, मात्र खात्री नाही.
क.शाम चव्हाण यांनी लिहिले आहे
क.शाम चव्हाण यांनी लिहिले आहे की चीनबरोबरच्या युद्धात नामुष्कीची बाब म्हणजे आपले बरेच जवान युद्धापेक्षा, थंडीमुळे मेले.त्यांचे बूट तिकडच्या थंडीत चालणारे नव्हते.
तुम्ही संदर्भित केलेल्या पुस्तकात की दुसर्या पुस्तकात ते लक्षात नाही.
वाचतोय ....
वाचतोय ....
हिंदी चिनी भाई भाई
माहितीपूर्ण सुंदर विवेचन !
छान झाला आहे हा भाग. पुढील
छान झाला आहे हा भाग. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!
वाचतोय, पुढील भागाच्या
वाचतोय, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
छान लेख!
छान लेख!
कर्नल श्याम चव्हाण यांचं पुस्तक माझ्या संग्रही होतं.. मी अनेकदा वाचलं आहे, सर्वानी जरूर मिळवून वाचावं.
पुढील भाग येऊ दे लवकर.
तुमचे इतिहासावरचे लेख नेहमीच
तुमचे इतिहासावरचे लेख नेहमीच रंगतदार असतात... पुढला भाग लगोलग येऊद्या.
वाचतेय.. पु.भा.प्र.
वाचतेय..
पु.भा.प्र.
<<क.शाम चव्हाण यांनी लिहिले
<<क.शाम चव्हाण यांनी लिहिले आहे की चीनबरोबरच्या युद्धात नामुष्कीची बाब म्हणजे आपले बरेच जवान युद्धापेक्षा, थंडीमुळे मेले.त्यांचे बूट तिकडच्या थंडीत चालणारे नव्हते.
तुम्ही संदर्भित केलेल्या पुस्तकात की दुसर्या पुस्तकात ते लक्षात नाही.>>
बरोबर... त्याच पुस्तकात आहे. त्यातला अमृतांजाब बाम च्या बाटलीचा उल्लेख आठवतोय का ?
दोन्ही भागात सुरुवातीस
दोन्ही भागात सुरुवातीस एकमेकांच्या लिन्का द्या प्लीजच ( आणि येथून पुढच्याही )नाहीतर सगळे धागे स्वतंत्रपणे शोधावे लागतात
आदित्य श्रीपाद, तुम्ही एक
आदित्य श्रीपाद, तुम्ही एक अत्यंत महत्वाचा संदर्भ ग्रंथ ध्यानात घेतलेला दिसत नाहिये. हिमालयन ब्लन्डर्स - ब्रि. जे. पी. दळवी.
जॉन पी. दळवी नेफा आघाडीचे कमांडिंग ऑफिसर होते (प्रत्यक्ष युद्धभुमीवरील सर्वात वरिष्ठ अधिकारी). युद्धाच्या शेवटी ते चीनचे युद्धकैदी झाले व मला वाटते ५-६ महिने युद्धकैदी होते. ते परतल्यावर त्यांना युद्धाचा अहवाल लिहायला सांगितला होता व पुढे त्यांनी त्या अहवालाचे पुस्तक रुपांतर केले. या विषयावरील हिमालयन ब्लंडर्स या पुस्तकाइतके फर्स्ट हँड व मुद्देसूद पुस्तक क्वचितच दुसरे कुठले असावे. स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल व ऑपरेशनल डिसिजन मेकिंग, चेन ऑफ कमांड, कम्युनिकेशन, राजकीय व सामरीक निर्णय आणि त्यांच्या सीमा या विविध विषयांवर पुस्तकात सविस्तर भाष्य आहे.
बहुतेक याचा मराठी अनुवाद आहे, मात्र खात्री नाही.
ब्रि. दळवी यांच्या हिमालयन ब्लंडर्स या पुस्तकाचा मराठी अनुवाद एडवोकेट माधव कानिटकर यांनी माणूस मध्ये 'झुंड' या नावाने लेखमालेस्वरूपात प्रसिद्ध केला.
त्यानंतर अनंत भावे यांनी अनुवादित करून 'एका पराभवाची कहाणी' या नावाने पुस्तक प्रकाशित केले. राजहंस प्रकाशन 1972.