मलयाळी फिश मोळी

Submitted by मेधा on 18 July, 2017 - 12:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

बांगडे, पापलेट, सुरमई, या पैकी कुठल्याही माशाचे तुकडे साधारण ५०० ग्रॅम

भारताबाहेर असाल तर थिन स्टेक्स कट मागा. बोनलेस फिले पीसेस वापरले तर या रेसिपीमधे तितके खास लागणार नाहीत. भारतात असाल तर कर्ली , रावस, मुडदुशा यांचे पीसेस पण चालतील.

छोटे लाल कांदे किंवा शॅलट्स , उभे चिरुन - अर्धी वाटी
एक मध्यम रोमा टॉमेटो बारीक चिरून
३-४ काड्या कढीपत्ता
२-३ हिरव्या मिरच्या
लसूण पाकळ्या बारीक चिरुन २ टीस्पून
आले बारीक चिरून २ टी स्पून
नारळाचे दूध - एक कॅन किंवा एकेक वाटी घट्ट दूध + पातळ दूध
मीठ, हळद, खोबरेल तेल , मिरची पावडर

क्रमवार पाककृती: 

माशाचे तुकडे स्वच्छ धूऊन , निथळून त्यांना हळद ( जरा जास्त) तिखट आणि थोडे मीठ लावून १० मिनिटे ठेवावे.
एका पसरट ( शॅलो पॅन) भांड्यात खोबरेल तेल तापवून माशांचे तुकडे दोन्ही बाजूंनी १-२ मिनिटे परतून घ्यावेत.
माशाचे तुकडे एका ताटात काढुन घ्यावे.
अजून थोडे खोबरेल तेल टाकून, ते तापल्यावर हिरवी मिरची,कढीपत्ता, आले लसूण आणि कांदे घालून परतावे.
कांदा पारदर्शक झाला की टॉमेटो घालून परतावे.
टॉमेटो शिजत आले की फिशचे तुकडे परत पॅन मधे घालावेत. शक्यतो एकाच थरात सर्व तुकडे मावले पाहिजेत.
नारळाचे पातळ दूध ( किंवा कॅन मधले दूध एक वाटी + थोडे पाणी) घालून मंद आचेवर शिजू द्यावे. एकदम रटरट उकळी येऊ देवू नये ( जेंटल सिमर, बुडबुडे जेमतेम फुटतील इतपत). चव घेऊन लागल्यास थोडे मीठ घालावे. पॅन मधून मधून हलवावा पण फिश चे तुकडे ढवळू नये.
फिश शिजत आले की दाट दूध घालून सारखे करावे. पण फिश चे तुकडे ढवळू नये. परत एकदा बारीक उकळी फुटली की गॅस बंद करावा.

आवडत / चालत असल्यास वरुन परत चमचाभर खोबरेल तेल घालावे.
गरम भाताबरोबर, केरळी परोठा किंवा आप्पम बरोबर वाढावे.

काही अट्टल मासे खाऊ मंडळी consomme bowl मधे नुसतेच ही करी घेउन हादडतात

वाढणी/प्रमाण: 
२-३ लोक
अधिक टिपा: 
माहितीचा स्रोत: 
लतिका जॉर्ज यांचे Suriani Kitchen पुस्तक आणि स्वतःचे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपले ते हे चालतील का >> श्रिंप, क्लॅम्स, सॉफ्ट शेल क्रॅब चालतील. ऑक्टोपस आणि स्क्विड शिजायला फार वेळ लागतो. त्यामुळे बहुतेक चालणार नाहीत . स्कॅलप्स फार सौम्य चवीचे असतात आणि १-२ मिनिटात शिजतात त्यामुळे असल्या करी मधे ते पण चालणार नाहीत.

बाकी नेहमीचे यशस्वी ब्याडवर्ड ते हे आपापल्या आवडी प्रमाणे घाला Happy

मी विचारणार होतोच पण टन्नू हानला अस्ता म्हून...
तर नेहेमीचे यशस्वी कल्लाकार घालून करून पाहाणेत यील. आपले हे ते पण चालवून पायला हरकत नसावी पण नकोच.

साधना, एका पेक्षा जास्त प्रकारचे तुकडे घालून करा. जास्त छान चव येते . मी भारतात जेंव्हा हा पदार्थ खाल्लाय त्यात तीन - चार प्रकारचे मासे होते.

देवकी - माशाबरोबर कढीपत्ता वाचून मला पण कसेसेच झाले होते . पण कढीपत्ता, नारळाचे दूध आणि नारळाचे तेल यांचा एकत्र स्वाद एकदम मस्त लागतो. एकदा करुन पहा.

मस्त दिसतेय.
मसाला असा काही नाही वाटतं आल्या-लसणाव्यतिरिक्त?

मस्तच जमलेली दिसतेय.
छान लागते ही डिश. केरळ मध्ये गेलो की खात असतो अधून मधून.

मस्त पाकृ आणि फोटो.

खोबरेल तेलातील मासे अजून खाल्ले नाहीयेत. मला वाटत तो या रेसिपीचा युएसपी असावा .

कढीपत्ता, नारळाचे दूध आणि नारळाचे तेल यांचा एकत्र स्वाद एकदम मस्त लागतो.>>>>> नारळाचे दूध आणि खोबरेल तेल मस्त लागते.आमच्याकडे काही मासे खोबरेल तेलात तळतात.नारळाशिवाय जेवण होत नाही.पण टोमॅटो नाही वापरला कधी.आता थोड्या प्रमाणात करून पाहीन.