गीतकार ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके
यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकार झालेली, गेली ६२ वर्षे मराठी मनावर अधिराज्य गाजवणारी अजरामर कलाकृती
गीत रामायण
संगीत, नृत्य व नाट्य यांचा महाविष्कार!
“अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी |
बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी ||
छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली |
कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली ||
देव वाणीतले ओज शीतळले माझ्या ओठी |
वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी ||
झंकारती कंठ वीणा, येती चांदण्याला सूर |
भाव माधुर्याला येई, महाराष्ट्री महापूर ||
चंद्र भारल्या जीवाला, नाही कशाचीच चाड |
मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड ||
अशी भारलेली मंत्रमुग्ध अवस्था बे एरियातील रसिकांनी गेल्या वर्षी अनुभवली.
ज्याने गीत रामायण ऐकले नाही असा मराठी माणूस मिळणे अतिशयच विरळा. १९५५ पासून आता पर्यंत किमान पाच पिढ्या तरी गीत रामायणाची गाणी ऐकत मोठ्या झाल्या. गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला.
महाकवी ग. दि. माडगुळकर यांच्या अलौकिक प्रतिभेने सजलेला आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या अवीट गोडीच्या गाण्यांनी अजरामर झालेला "गीत रामायण - संगीत, नृत्य व नाट्य यांचा महाविष्कार!" हा कार्यक्रम ईस्ट बे आणि साउथ बे च्या ९० उत्साही आणि मानवंत कलाकारांनी एप्रिल ९, २०१६ आणि लोकाग्रहास्तव पुन्हा एकदा ११ जून, २०१६ रोजी सादर केला. एव्हढंच नाही तर या वर्षी १७ जून, २०१७ रोजी देखील या कार्यक्रमाचा तिसरा प्रयोग झाला. बे एरियातील साधारणतः१५०० लोकांनी हा कार्यक्रम बघितला आहे. गीत रामायणातील गुणवंत गायकांनी गायलेली निवडक गाणी, त्याला समर्थ वादकांची साथ आणि त्यावर मुद्राभिनय, शास्त्रीय व उपशात्रीय नृत्यांतून प्रसंग निर्मिती आणि या सर्वांना पूरक चेन्नई, अहमदाबाद, मुंबई , पुणे इथून खास बनवून आणलेले सुंदर पोशाख, कथेच्या पार्श्वभूमीला साजेशी पडद्यावरील चित्रे या सर्वांमुळे हा अत्युच्य निर्मितीमूल्ये असलेला कार्यक्रम रसिकांनी डोक्यावर घेतला. या कार्यक्रमाची संगीत संयोजनाची बाजू मनोज ताम्हनकर आणि सतीश तारे यांनी सांभाळली. सेजल पोरवाल यांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडली. श्रद्धा जोगळेकर, हेमालिका गोंधळेकर, राधिका अधिकारी, तृप्ती भालेराव, प्रतिमा शहा, आणि वृषाली मुंढे यांनी नृत्य दिग्दर्शनाचं धनुष्य लीलया पेललं. दिग्दर्शन आणि तंत्रज्ञान यांची बाजू माधव कऱ्हाडे यांनी सांभाळली होती तर निर्मितीची धुरा डॉ. स्मिता कऱ्हाडे यांनी पेलली होती.
आणि आता हा अत्यंत दिमाखदार, देखणा आणि नयनमनोहर असा हा कार्यक्रम बृहन महाराष्ट्र मंडळाच्या २०१७ सालच्या ग्रँड रॅपिड्स येथल्या अधिवेशनात होत आहे. अनेक तांत्रिक करामती, देखणे नेपथ्य, कल्पक रंगभूषा आणि वेशभूषा तसेच अनेक गुणी गायक-वादकांनी चढवलेला स्वरसाज आणि त्याला अत्यंत अनुरूप आणि डौलदार नृत्यांची आणि अभिनयाची साथ यांनी हा कार्यक्रम एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती देतो. या नृत्यनाटिकेत रंगमंचावर रामायणातल्या ८० पेक्षा अधिक व्यक्तिरेखा साकार करण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील काही प्रतिथयश कलाकार यात भाग घेणार आहेत. श्री. पुष्कर श्रोत्री यात भरताचे काम करणार आहेत तर कीबोर्डवर महाराष्ट्राचे पेटीचे जादूगार श्री. सत्यजित प्रभू तर व्हायोलिन वर श्री. महेश खानोलकर असणार आहेत.
“गदिमा आणि बाबुजीच्या गीत-रामायणाने आमचे कान तृप्त केले, तुमच्या गीत-रामायणाने आमचे डोळेही तृप्त केले.”, “गीत रामायणाची एकसष्ठी झाली परंतु भारतातही इतक्या मोठ्या तोलामोलाचा कार्यक्रम तोही अशा प्रकारे करण्याचा विचारही कोणाच्या मनातही आला नाही”, “यात नाट्य आहे, मनमोहक नृत्ये आहेत, संगीत आहे, गाणे आहे, अतीव सुंदर वेशभूषा आणि रंगभूषा आहे, आणि कळस म्हणजे तंत्रज्ञानाचा कमालीचा सुंदर वापर आहे. हा तर भारतीय बॅले आहे!” अशा प्रकारचे अनेक अभिप्राय आम्हाला मिळाले.
आपले लाडके दिग्गज मा. ग. दि. माडगुळकर आणि मा. सुधीर फडके यांना आदरांजली वाहण्याची अपूर्व संधी “रंगमंच” कलाकारांना लाभली आहे. आपला आशीर्वादाचा हात आणि पाठीवरची कौतुकाची थाप आमच्यासाठी मोलाची आहे. हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी आणि या पर्वणीचा आनंद घेण्यासाठी जुलै ७ रात्री ८ वाजता Van Andel Arena येथे सर्वांसोबत जरूर या, ही आग्रहाची प्रेमळ विनंती!
थोडेसे रंगमंच बद्दल
‘रस्ता सापडत नसेल तर स्वतः:च रस्ता तयार करायचा असतो”, या शब्दांचा महिमा स्वतःच्या कृतीतून सांगताना “नाम” फौंडेशनचे संस्थापक श्री. नाना पाटेकर आणि श्री. मकरंद अनासपुरे यांनी कळत नकळत सात समुद्रांपलीकडील आमच्यासारख्या मित्र-मैत्रिणींनाही प्रोत्साहित केले. २०१५ च्या गणपतीच्या सुमारास बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन जोशी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अमेरिकेतील बे एरिया मधील माधव आणि स्मिता कऱ्हाडे यांनी सुरू केलेली “रंगमंच” सारखी सेवाभावी संस्था पुढे आली. संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार, नृत्यदिग्दर्शक, उत्साही कार्यकर्ते मदतीला धावून आले आणि निर्मिती झाली एका सोहळ्याची - ‘चला, माणुसकी पेरू या!’
या कार्यक्रमातून जमा होणारा निधी आणि देणगी रक्कम बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने “नाम” संस्थेपर्यंत पोहचवण्याची तजवीज करण्यात आली. या महान कार्यासाठीच्या आपल्या खारीच्या वाट्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले. रसिकांनी दिलेल्या भरघोस पाठींब्यामुळे ‘रंगमंच’ तर्फे तब्बल अडतीस हजार डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या “नाम” संस्थेसाठी जमवली गेली! यात सौ. अनिता कांत, जगदीश डांगी, पंढरीनाथ माने हेमंत हब्बू, लक्ष्मण आपटे आणि संजीव रेडकर यांचा खूपच महत्वाचा वाटा होता.
कलेचा आस्वाद देता-घेता कळत नकळत दुसऱ्यांच्या ही जीवनात आनंद फुलवावा हा “Rungmunch - Theater with a cause” चा साधा-सुधा पण अतिशय उदात्त हेतू आहे. आज रंगमंच संस्थेनं एक "माणुसकीचा सेतू" “सेतू बांधा रे”या Facebook campaign मधून बांधण्याचा मानस केला आहे. भारताशी आपली नाळ जपणाऱ्या, सर्व संवेदनशील मित्रांना एकत्र जमवायचं. निधी संकलन करायचं. निधी बरोबरच इतरही मदतीची आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. मग ती मदत एखादा शेतीविषयक वैज्ञानिक सल्ला असू शकतो किंवा पाणी नियोजनाविषयी मार्गदर्शन असू शकते. अनेक मान्यवरांना देखील या साखळीने जोडून, त्यांच्या ज्ञान, कर्तुत्व, मेहनत आणि पैसा यांचा योग्य विनिमय करून ही मदत गरजूंपर्यंत पोहचवण्याचा निर्धार “रंगमंच” नी केला आहे. या रामसेतूच्या बांधणीसाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा आणि आपल्याला शक्य असेल त्या परीने आपल्या शेतकरी बांधवांना मदत करावी हे मनापासून आवाहन आणि नम्र विनंती!
रंगमंच्यावर उत्तोमत्तम दर्जाचे कार्यक्रम सादर करून रसिकांना आनंद देत असताना, उन्हात भाजून निघालेल्या मातीच्या ढेकळावर आकाशातून पडणारा टपोरा थेंब जो सुगंध पसरवतो, तोच सुगंध आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनात पसरण्याचा एक अल्पसा प्रयत्न आम्ही केलेला आहे. रंगमंच च्या या आनंदयात्रेत तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर आमच्या आगामी प्रकल्पात जरूर सामील व्हा!
धन्यवाद,
“रंगमंच” प्रतिनिधी
सौ. नेहा प्रकाश कुलकर्णी
------------------------------------------------------------------------------------------------------
हा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि रंगमंच टिमला भेटण्यासाठी बीएमएम २०१७ , ६-९ जुलै ग्रँड रॅपीड्सला नक्की या.
https://www.bmm2017.org
अनेकानेक शुभेच्छा !
अनेकानेक शुभेच्छा !