संगीत संशयकल्लोळ - राहुल देशपांडे यांचे मनोगत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 5 June, 2017 - 10:59

संगीत संशयकल्लोळ हे अवघ्या एकशे एक वर्षांचं तरुण, बहारदार नाटक. गोविंद बल्लाळ देवलांनी लिहिलेलं. या नाटकाच्या शताब्दीच्या निमित्तानं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणावं असं श्री. प्रशांत दामले यांना वाटलं आणि या नाटकाचे प्रयोग प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे यांनी सुरू केले. तत्पूर्वी राहुल देशपांडे यांनी ’कट्यार काळजात घुसली’ आणि ’सं. मानापमान’ या दोन नाटकांच्या जोडीनं ’सं. संशयकल्लोळ’ही रंगभूमीवर आणलं होतं. निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शन केलेल्या या नाटकात राहुल देशपांडे यांच्या जोडीला अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन हे कलाकार असत. या नाटकाचे चाळिसेक प्रयोग झाले.

sanshaykallol.jpg

यंदाच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे ’संशयकल्लोळ’ हे नाटक सादर करणार आहेत. या निमित्तानं राहुल देशपांडे यांनी सांगितलेला त्यांचा संगीत-रंगभूमीवरचा प्रवास.

माझे आजोबा म्हणजे पं. वसंतराव देशपांडे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’वसंतोत्सव’ या नावानं संगीतमहोत्सव दरवर्षी आयोजित करण्यास मी सुरुवात केली. पहिल्या वर्षी उत्सव सुरू झाल्यानंतरचा हा प्रसंग आहे. ’वसंतोत्सवा’निमित्त आयोजित केलेल्या एका पत्रकारपरीषदेत मी आणि नाना (नाना पाटेकर) असे उपस्थित होतो. एका पत्रकारानं मला प्रश्न विचारला, "वसंतरावांनी संगीत नाटकासाठी प्रचंड योगदान दिलं, तर त्यांचे नातू म्हणून तुम्ही काय करणार आहात?" मी त्याक्षणी उत्तर दिलं की, मी पण दरवर्षी एक संगीतनाटक करेन. मग पुढचा स्वाभाविक प्रश्न होता, "कोणतं?" यावर आपसूकच उत्तर आलं - "कट्यार काळजात घुसली".

संगीतनाटक हा आमच्या कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय. नाट्यसंगीताचे संस्कार माझ्यावर लहानपणापासूनच झाले. माझे आजोबा गेल्यानंतर दरवर्षी वडील त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादा कार्यक्रम आयोजित करायचे. आजोबांचं संगीतनाटकातलं योगदान लक्षात घेता संगीतनाटकही आयोजित करत असत. त्यावेळी शिलेदार मंडळींची नाटककंपनी प्रसिद्ध होती. मी त्यांचं 'संगीत सौभद्र' पाहिलं होतं. तसंच माझ्या लहानपणी 'संगीत संशयकल्लोळ', 'संगीत मानापमान' ही नाटकंही पाहिली होती. मी लहान असताना भरत नाट्यमंदिराच्या नाटकांमध्ये कामही करायचो. आठदहा वर्षांचा असेन तेव्हा ’कट्यार काळजात घुसली’मध्ये छोट्या सदाशिवाची भूमिका केली होती. त्या नाटकात मी गायलोही होतो. मला दिग्दर्शकानं सांगितलं, तसं मी त्यावेळी काम केलं होतं. भूमिकेचा विचार वगैरे त्या वयात काही कळत नव्हतं. पद्माकर कुलकर्णी त्यावेळी खांसाहेबांची भूमिका करत असत. त्यांचं शिक्षण माझ्या आजोबांकडेच झालं होतं. 'कट्यारच्या' निमित्तानं त्यावेळी मी नाटकाचे दौरेही केले. मला आवडायचं या नाटकात काम करायला. पण झालं असं की, या दौर्‍यानंतर माझ्यावर काही नको ते संस्कार झाले. माझी भाषा बिघडली. मी सगळ्यांना एकेरीनं संबोधायला लागलो. बोलताना शिव्यांचा वापर होऊ लागला, मोठ्यांची चेष्टा करायला लागलो, अनादराने बोलायला लागलो. हे बदल माझ्या आजीला अजिबातच आवडले नाहीत. घरात माझं असं वागणं कोणी सहन करणं अशक्यच होतं. मग माझं नाटकात काम करणं तेव्हा थांबलं. नाटक पाहणंही अगदीच कमी झालं. नंतर मी काही मोजकीच संगीत नाटकं पाहिली असतील. ’मृच्छकटीक’ हे त्यातलं एक.

वयाच्या सहाव्या वर्षी मी पिंपळखरेबुवांकडे गाणं शिकायला सुरुवात केली. सातव्या वर्षी मी गुरुपौर्णिमेला पहिल्यांदा राग दुर्गा गायलो. सगळ्यांनी फार कौतुक केलं होतं तेव्हा. मला मात्र गाणं शिकण्याची आवडच नव्हती. सामान्यपणे जसा लहान मुलांना शास्त्रीय गायनाचा कंटाळा असतो तसा मलाही होता. मला तबला आवडायचा. त्यातूनच मी पुढे दोन वर्षं गाणं बंद केलं. शास्त्रीय गायनाशी संबंध त्या काळात फारसा आला नाही. १९९२ साली १२ जानेवारीला कुमारजींचं (पं. कुमार गंधर्व) निधन झालं. तेव्हा बाबांनी इंदौरहून त्यांची निर्गुणी भजनांची कॅसेट आणली होती. सहज कधीतरी ती भजनं मी ऐकली, आणि गायनाशी हरवलेलं ते कनेक्शन मला सापडलं. मी अगदी वेडापिसा झालो कुमारजींचा आवाज, त्यांचं गाणं ऐकून. ती सगळी भजनं मी दोनतीन दिवसांत बसवली. तिथून पुन्हा माझा शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू झाला. मी तेव्हा बारा वर्षांचा होतो.

माझे आजोबा गेले तेव्हा मी फार लहान होतो. त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, संगीताचा प्रभाव माझ्यावर नव्हता. आजी त्यांच्याबद्दल बोलायची, त्यांच्या गाण्याबद्दल सांगायची. पण तेव्हा माझं मत ’गाणं म्हणजे कुमार गंधर्व’ हे इतकं पक्क होतं की, जगात कुमारजींइतका उत्तम गवई दुसरा कोणी नाहीच, अशी माझी धारणा होती. भाईकाका (पु. ल. देशपांडे) तेव्हा समोरच राहायचे. आजोबांच्या स्मृतिदिनी दरवर्षी घरी यायचे. आले की, ’राहुल, मला तुझं गाणं ऐकायचं आहे’, असं म्हणायचे. मग पहिल्या वेळी मी कुमारजींच्या काही बंदिशी गायल्या. आजोबांची एकदोन गाणीही म्हटली. एका वर्षी भाईकाका आले तेव्हा आजी त्यांना म्हणाली की, हा कुमारांचं गाणं गातो याचा आम्हांला आनंदच आहे, पण तो त्याच्या आजोबांसारखं गात नाही, याचं मला वाईट वाटतं. भाईकाका तेव्हा म्हणाले की, अगं, आत्ता हा कुमारसारखं गातोय ना, तू फक्त दोन वर्ष थांब. आवाज फुटू देत त्याचा, तो बरोब्बर वसंताची गाणी गाईल. आणि झालंही तसंच. माझ्या आवाज फुटला, आणि तो इतका आजोबांसारखा झाला की, मी जर काळी दोनमध्ये गायलो तर आजोबाच गात आहेत, असं वाटावं. भाईकाकांना याचा फार आनंद झाला होता. नंतर माझी गाण्यातली प्रगती कुठवर झाली आहे, याची ते नियमितपणे चौकशी करत. ’वसंतरावांचा नातू आहे, त्यांच्यासारखाच गातो, त्याच्याकडे स्वत:चं गाणं नाही’, अशा काही प्रतिक्रिया सुरुवातीला ऐकू यायच्या. त्यावेळी भाईकाकांनी दिलेला पाठिंबा फार मोलाचा होता. प्रत्येक हळव्या क्षणी त्यांनी मला साथ दिली. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाचं ते रेकॉर्डींग मागून घ्यायचे. एकदा माझं गाणं ऐकून झाल्यावर ते माझ्या वडिलांना म्हणाले, "राहुल वसंतासारखाही गात नाही आणि कुमारसारखाही गात नाही. तो त्याच्या बुद्धीने गातो. हे जे गाणं आहे ते राहुलचं स्वत:चं आहे". त्यांच्याकडून अशी पावती मिळाल्यावर मला फार बरं वाटलं होतं. त्याच वेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, "तुला मी आत्ता जो गुरुमंत्र देतोय तो तुला कुणीही देणार नाही. वसंता गेला, कुमार गेला. तुला ज्यांचं गाणं हवंय ती माणसं आज हयात नाहीत, पण त्यांचं रेकॉर्डींग आहे. तू कॅसेटलाच आपला गुरु मान. तू त्यांचं गाणं ऐक म्हणजे तुला तुझं गाणं सापडत जाईल".

भाईकाकांच्या ऐंशीव्या वाढदिवसाला आम्ही त्यांच्या घरी गेलो होता. त्या दिवशी मी भाईकाकांसाठी छायानट गायलो. तेव्हा मी सीए होण्यासाठी आर्टिकलशीप करत होतो. भाईकाकांना ते कळल्यावर त्यांनी मला रियाजाबद्दल विचारलं. मला रियाजाला वेळ मिळत नाही, असं सांगितल्यावर भाईकाका म्हणाले, "तू स्टेशनहून घरी येतोस तेव्हा तुला डॉक्टर, वकील अशा किती पाट्या दिसतात?" मी म्हटलं, "बर्‍याच दिसतात. असं का विचारताय?"
"गवयाची पाटी दिसते का?"
"भाईकाका, ’गवई’ अशी पाटी कोणी लावतं का?"
"तुला तुझ्या घराच्या बाहेर अशी पाटी लावायची आहे. डॉक्टरकी, वकिली करणारे लाखो आहेत. तुझं काम दोन तंबोर्‍यांमध्ये बसून गाणं आहे. सोडून दे बाकीचं सगळं."
माझी आजी म्हणाली, "आजोबांची खूप इच्छा होती की तू त्यांची गादी चालवावीस". मग मी सीएची तयारी सोडून दिली आणि पूर्णपणे गाण्यावर लक्ष केंद्रित केलं.

’मी संगीतनाटक करेन’, असं जाहीर केल्यानंतर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. सुबोध भावेनं तिथं ’मैतर’ या कार्यक्रमात ’नटसम्राट’मधलं एक स्वगत सादर केलं होतं. मला अतिशय आवडलं ते. संगीतनाटक करायचं डोक्यात होतंच. मग मी त्याला ’कट्यार’चं दिग्दर्शन आणि त्यातली कविराज ही भूमिका करण्याविषयी विचारलं. हे मोठंच जबाबदारीचं काम होतं. त्यानं महिनाभर विचार केला आणि मग होकार कळवला. आमचा ’कट्यार काळजात घुसली’चा प्रवास सुरू झाला.

संगीतनाटकांच्या उतरत्या काळात चाललेलं एकमेव संगीतनाटक म्हणजे 'कट्यार काळजात घुसली'. तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर 'कट्यार..' हे काही संगीतनाटक नव्हे. संगीतावर आधारित असं हे नाटक आहे. ज्या नाटकाचं कथानक संगीतातून पुढे सरकतं ते संगीतनाटक. संगीतनाटकात पद किंवा गाणं हे तो प्रसंग साजरा करण्यापुरतंच असतं आणि ते तसं राहिलं तरच नाटक उठून दिसतं. गाण्यानं नाटकावर कुरघोडी करता कामा नये. गाण्यामुळं नाटकाची गती बिघडली तर नाटक फसतं. एकंदरीतच संगीतनाटकाची गतिमानता टिकवणं फार गरजेचं असतं. आजच्या तरुण प्रेक्षकांचा विचार करता हे फार मोठं आव्हान आमच्या समोर होतं. खांसाहेबांची भूमिका मी करणार होतो. माझ्या आजोबांनी ही भूमिका अजरामर करून ठेवली आहे. या नाटकातली त्यांची गाणी अजूनही कोणी विसरू शकलेलं नाही, आणि म्हणूनच मी धास्तावलो होतो. अभिनय हा माझा प्रांत नव्हे. अभिनयाशी तोपर्यंत माझा काही संबंधच आला नव्हता. सुबोध हाच माझा गुरू होता. तो सांगेल तसं मी करायचो. त्यानं मला मशिदीमध्ये जाऊन निरीक्षण करण्याचा सल्ला दिला. मी बर्‍याच गायकांची चरित्रंही त्या काळात तयारीचा भाग म्हणून वाचली. अब्दुल करीम खांसाहेब, अल्लादियां खांसाहेब यांच्या चरित्रांतून त्यांची सांगीतिक जडणघडण कशी झाली ते समजून घेतलं. यातून मला काय मिळालं ते असं शब्दांत सांगता येणार नाही, पण ती एकूण प्रक्रिया मला फार आवडली. आजोबांनी केलेल्या ’कट्यार’ची ध्वनिफीत घरी होती, ती मी परत एकदा ऐकली. सुबोधला ते कळल्यावर तो म्हणाला, "तू शक्यतो आजोबांची गाणी सध्या ऐकू नकोस. तू नकळत त्यांची नक्कल करशील. खांसाहेब तुला तुझे वेगळे कळू देत". खरं म्हणजे लहानपणापासून जे काही आजोबांचं ऐकलं होतं ते पुसणं हे माझ्यासाठी फार कठीण होतं, पण तरीही मी माझ्या परीनं प्रयत्न केला. सुबोधनं त्याचं म्हणणं आमच्यावर कधीच लादलं नाही. "संवादांबद्दल मी तुला काहीही सांगणार नाही. खांसाहेब खानदानी आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा लहेजा वेगळा असेल, हे लक्षात घेऊन तू तुझे संवाद म्हण", एवढंच त्यानं सांगितलं होतं. सुबोधनं मला मोकळीक दिली असली तरी तो लहेजा पकडणं काही सोपं नव्हतं. 'उस्मान, क्या हो रहा है', या पहिल्याच वाक्याला माझी गाडी अडली. त्यानं शंभरेक वेळा ते माझ्याकडून घोटून घेतलं. तरीही मला हवं तसं ते म्हणता येत नव्हतं. हे नाटक सोडून पळून जावं, असं मला वाटत होतं. एकदा तर मी इतका वैतागलो होतो की, मी सरळ सुबोधला फोन केला आणि सांगितलं की आपण हे नाटक नको करायला. सुबोधनं माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं, आणि दुसर्‍या दिवशी आम्ही पुन्हा तालमीला सुरुवात केली. मी व्यवस्थित काम करू शकेन, हा आत्मविश्वासच मला नव्हता. आपलं हसं तर होणार नाही, ही धास्ती सतत वाटत असे. सुबोध मात्र कायम शांत असायचा. तालमी नीट होत आहेत की नाहीत, याकडे त्याचं बारीक लक्ष असायचं. ’जर नाटक पडलं तर सर्वस्वी माझी जबाबदारी आणि नाटक चाललं तर तुमच्यामुळे’, हे त्यानं आधीच सांगून ठवलं होतं.

’कट्यार’चा पहिला प्रयोग ४ फेब्रुवारीला करायचं ठरलं होतं. अनेक कारणांमुळं आम्हांला रंगीत तालमीला वेळच मिळाला नाही. प्रयोगाआधी बराच ताण होता. काम जमेल की नाही, गाणं लोकांना आवडेल की नाही, या काळज्या होत्याच. शिवाय मूळ नाटकाशी आमच्या प्रयोगाची तुलना होणं अपरिहार्य होतं. आजोबांचे प्रयोग बघितलेले अनेकजण होते आणि त्यांच्या पसंतीस आमचं नाटक उतरेल की नाही, हे ठाऊक नव्हतं. आम्ही नाटकात काही बदल केले होते. नेपथ्य वेगळ्या प्रकारचं होतं. फिरत्या रंगमंचाचा वापर आम्ही केला नव्हता. संहितेची थोडी काटछाटही केली होती. त्यातच आदल्या दिवशी सुबोधनं बर्‍याच हालचालींत बदल केले होते. एकंदरीतच आम्हांला फार दडपण आलं होतं. पहिल्या प्रयोगाला बाळासाहेब मंगेशकर आणि प्रभाकर पणशीकर आले होते. प्रयोग तसा व्यवस्थित सुरू झाला. पहिला प्रवेश संपला आणि माझ्यानंतर सदाशिवचं काम करणार्‍या महेश काळेची एंट्री होती. तो मस्तपैकी शेवटच्या प्रवेशाचे कपडे घालून आला. सुबोधला आणि मला आता काय करायचं ते अजिबात कळेना. त्याला तसंच पुन्हा कपडे बदलायला आत पाठवलं. सुदैवानं त्याचा माइक सुरू होता आणि तो कपडे बदलता बदलता गात होता. मिनिटभरात हे सगळं झालं. प्रेक्षकांना आमची ही फजिती कळली नाही, पण वादक मात्र पुरते गोंधळले होते. महेश रंगमंचावरून का गात नाही, हे काही त्यांना कळेना. सुदैवानं पहिल्याच प्रयोगाला पडदा पाडण्याची वेळ आली नाही. पहिल्याच प्रयोगाचं प्रेक्षकांनी फार कौतुक केलं. सुबोधचा कविराज लोकांना आवडला, त्यानं नाटकात केलेले बदल लोकांना आवडले. प्रयोगानंतर सुबोधनं मला शाबासकी दिली. ’उत्तम काम करताय तुम्ही, मला आता हजाराव्या प्रयोगाला बोलवा’, असं प्रभाकर पणशीकर म्हणाले होते. बाळासाहेब मंगेशकरांनी तीनदा आमचं नाटक पाहिलं. गौतम राजाध्यक्ष येऊन गेले होते. लताबाईंनी मला सांगितलं की, त्यांनाही नाटक बघायचं आहे. पण अजून तो योग आलेला नाही.

’कट्यार’च्या प्रयोगाच्या आणि रसिकांच्या बर्‍याच आठवणी आहेत. दुसर्‍याच प्रयोगाच्या वेळी मी एका ठिकाणी संवाद विसरलो. मी पूर्ण ब्लँक झालो होतो. दहापंधरा सेकंदं स्टेजवर काहीच आवाज नव्हता. मला काही आठवंतच नव्हतं. दरदरून घाम फुटला होता. प्रॉम्प्टिंगचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. काहीतरी चुकलं आहे, हे प्रेक्षकांच्याही लक्षात आलं. वेदश्री, म्हणजे आशाताईंची (आशा खाडीलकरांची) मुलगी, उमेचं काम करते. तिनं माईकवर हात ठेवून हळूच मला संवाद सांगितला आणि मग मी एकदाचा तो संवाद घडाघडा म्हटला. हा प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, कारण मी पहिल्यांदाच असा ब्लँक झालो होतो. अजूनही त्या संवादाच्या वेळी मला जरा क्षणभर भीती वाटते. मी काही सरावलेला अभिनेता नाही. तो माझा प्रांत नाही. शिवाय नाटकात प्रत्यक्ष गाणं हे खरोखर फार कठीण आहे. त्यातून खांसाहेबांची भूमिका अतिशय गुंतागुंतीची. इतके प्रयोग झाल्यानंतर आता कुठं मला असं वाटतंय की, खांसाहेबांच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेलं संगीतातलं आणि विचारांमधलं स्थैर्य माझ्यात आलंय. आता कुठं मला खांसाहेब सापडत आहेत. पण तरीही काम नीट होतं आहे की नाही, अशी धाकधुक सतत असतेच. अजूनही मला बरा अभिनय जमतो, असं वाटत नाही. ’तू जी भूमिका करतो आहेस, त्या भूमिकेत शीर, म्हणजे सगळं व्यवस्थित जमतं’, असा सल्ला मला नानानं दिला होता. हे ऐकायला छान वाटतं, पण आचरणात आणणं कठीण. अजूनही तिसरी घंटा झाली की माझे हातपाय गार पडतात.

रसिकांच्या प्रतिक्रियांतून त्यांचं आमच्या नाटकावरचं प्रेम जाणवतं. खूप काही दिलं आहे या प्रतिक्रियांनी मला. खरंतर नाटक संपलं की मी त्यातून बाहेर पडलेला असतो. नाटकानंतर प्रतिक्रिया द्यायला, कलाकारांना भेटायला खूप लोक आत येतात. कधीकधी ते नकोसंही वाटतं. इतकं वारेमाप कौतुक करण्याइतकं आपलं काम चांगलं झालेलं नाही, हे कळत असतं. आजोबांचं काम पाहिलेले, गाणं ऐकलेले खूप लोक भेटायला येतात. खूप भावूक झालेले असतात ते. ’वसंतरावांसारखंच काम केलंस, त्यांचा नातू शोभतोस खरा’, हे त्यांच्याकडून ऐकलं की बरंही वाटतं. एकदा एक रसिक प्रेक्षक ’कट्यार’च्या पहिल्या प्रयोगाचं तिकीट घेऊन आले होते. त्यावर अभिषेकीबुवांची सही होती, पुरुषोत्तम दारव्हेकरांची सही होती. आजोबांचीही होती. या तीन सह्यांच्या खाली त्यांनी माझी सही घेतली. मुंबईला यशवंत नाट्यमंदिरात प्रयोगानंतर एक प्रेक्षक भेटायला आले. त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. त्यांनी त्यांच्या पाकिटातून चांदीचं एक नाणं काढून दिलं, आणि म्हणाले, "हे तुम्ही ठेवा. मी जेव्हा दहावीला पहिला आलो होतो तेव्हा माझ्या आजोबांनी मला हे नाणं दिलं होतं. आज मला असं वाटतं की हे तुम्हांला द्यावं". माझ्या गाण्याला, कामाला अशी दाद मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. या अशा घटना मनाला स्पर्शून जातात. नकारात्मक प्रतिक्रिया देणारे प्रेक्षकही आहेत. आम्ही केलेले बदल आवडले नाहीत, असं काहीजण स्पष्ट सांगतात. ’तेजोनिधी लोहगोल’चं एकच कडवं आम्ही नाटकात घेतलं आहे. त्याबद्दल अनेकांनी नापसंती व्यक्त केली आहे. ’तीन अंकी नाटक दोन अंकांत बसवून तुम्ही आमच्या काळजावरच कट्यार चालवलीत’, असंही काहींनी सांगितलं आहे.

’कट्यार’नंतर 'संशयकल्लोळ' करायचं, हे मी अगोदरच ठरवलं होतं. त्यावेळी सुबोध त्याच्या नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये खूप व्यग्र होता. देवलमास्तरांनी लिहिलेल्या ’संशयकल्लोळ’कडे नव्या दृष्टिकोनातून बघू शकेल, असा तरुण दिग्दर्शक मी शोधत होतो, आणि निपुण धर्माधिकारी माझ्या डोळ्यांसमोर आला. निपुणची बरीच नाटकं मी बघितली होती. माझ्या कॉलेजमधेच होता तो. पुण्यातल्या प्रायोगिक रंगभूमीवर तो बराच सक्रीय असल्यानं जरा भीतभीतच त्याला मी ’संशयकल्लोळ’बद्दल विचारलं, पण त्यानं लगेच होकारही दिला. माझ्याकडून नाटकाचं पुस्तक तो घेऊन गेला आणि दहा दिवसांत संपादित संहिता त्यानं माझ्या हाती ठेवली. अतिशय सुरेख संपादन त्यानं केलं होतं. कथानक एकसंध होतं. संवादांचे संदर्भ हरवले नव्हते, आणि मुख्य म्हणजे कथेतला नर्मविनोद अजिबात कमी झाला नव्हता. मूळ नाटकात पासष्ट गाणी आहेत. कुठली गाणी लोकांना अधिक आवडतात, हे मी निपुणला सांगितलं, आणि मग संहितेचा विचार करून आम्ही आमच्या नाटकात त्यांपैकी सोळा गाणी वापरायचं ठरवलं. 'मृगनयना', 'कर हा करी', 'मानिनी आपुली' लोकांना अतिशय आवडणारी गाणी आम्ही वगळली नाहीत, पण विषयाशी फारकत घेऊन नाटकात मध्येच गाणं येणार नाही, याची काळजीही घेतली. या सुरुवातीच्या काळात निपुणनं घेतलेली मेहनत बघून मी थक्क झालो होतो. तो वयानं खूप लहान असला तरी अतिशय विचारी आणि शिस्तबद्ध आहे. नाटक उत्तम व्हावं यासाठी धडपडतो तो. ’संशयकल्लोळ’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादात निपुणनं केलेल्या संपादनाचा आणि त्याच्या दिग्दर्शनाचा फार मोठा वाटा आहे.

निपुणप्रमाणंच नाटकावर मनापासून प्रेम करणारे तरुण कलाकार आम्ही या नाटकासाठी निवडले. अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन, सायली फाटक, प्रियंका बर्वे हे तरुण कलाकार पुण्याच्या प्रायोगिक रंगभूमीवर फार उत्साहानं काम करतात. परदेशातही त्यांच्या नाटकांचे प्रयोग झाले आहेत, आणि तिथंही त्यांच्या नाटकांना बक्षिसं मिळाली आहेत. माझी मोठी बहीण दीप्ती आणि तिचा पती भूषण (माटे) यांनाही आम्ही नाटकात काम करण्यासाठी गळ घातली. तालमींच्या वेळी आम्ही अभिनयासाठी आवश्यक / पूरक असे अनेक स्वाध्याय केले. व्यक्तिरेखेशी ओळख करून घेणं, भूमिकेत शिरणं, ती व्यक्तिरेखा कशी असेल, कशी वागेल, बोलेल, तिचं पूर्वायुष्य कसं असेल, हे सगळं लिहिणं, त्या व्यक्तिरेखेत शिरून रोज तिची डायरी लिहिणं अशा एक्सरसायझेस आम्ही केल्या. निपुण, अमेय आणि इतर सगळे हे त्यांच्या प्रत्येक नाटकासाठी करत असले तरी माझ्यासाठी हे सारं नवीन होतं. ’सं. संशयकल्लोळ’मध्ये मी आश्विनशेठची भूमिका करतो. तालमीच्या पहिल्या दिवशी आम्ही या व्यक्तिरेखेचं पूर्वायुष्य असं असेल, याचा विचार केला. ते लिहून काढलं. मग रोज मी अश्विनशेठची डायरी लिहायला सुरुवात केली. अश्विनशेठनं सकाळी उठल्यावर काय केलं असेल, तो कोणाला भेटला असेल, त्याचं आज एखाद्याशी भांडण झालं असेल का, तो रात्री मित्रांबरोबर कुठे गेला असेल, याचा विचार करून मी लिहून काढायचो. अश्विनशेठची व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी याची मला फार मदत झाली. ’भूमिकेत शिरणं’ म्हणजे काय, हे मला या निमित्तानं थोडंफार कळलं.

या नाटकाच्या वेळीही सुरुवातीला मी माझ्या अभिनयाबद्दल साशंक होतो. आपलं काम नीट होत नाही, आणि आपल्याला ही भूमिका जमणारच नाही, असं सारखं वाटत होतं. माझ्या सगळ्या संवादांवर असलेला खांसाहेबांचा प्रभाव मला जाणवत होता. पण निपुणला माझ्याबद्दल खात्री होती. त्याच्या मदतीमुळं हळूहळू मलाही आत्मविश्वास वाटू लागला. प्रियांका आणि माझे या नाटकात प्रेमात पडल्याचे प्रसंग आहेत. ती मला लहान बहीणीसारखी आहे, त्यामुळं हे प्रसंग करताना आम्हांला अवघडल्यासारखं वाटत होतं. मग त्यासाठी आम्ही काही एक्सरसाइजेस केल्या. डोळ्यांत डोळे घालून एकमेकांकडे पाहायचं, आणि एकमेकांच्या अगदी जवळ यायचं. कोणी कितीही प्रयत्न केला तरी एकाग्रता ढळू द्यायची नाही. सुरुवातीला आम्हांला दोघांनाही खूप हसू यायचं, पण हळूहळू हे जमायला लागलं. प्रेक्षकांकडं बघायचं नाही, रंगमंचाची जी सीमा आहे, त्यापलीकडे नजर जाता कामा नये, हेही मी या तालमींच्या वेळी शिकलो. या तालमींच्या निमित्तानं निपुणनं जे अभिनयाचं वर्कशॉप घेतलं, त्याचा मला फार उपयोग झाला. माझ्यातला संकोच नाहीसा झाला. प्रत्येक नटानं असा वर्कशॉप जरुर करावा, कारण त्यामुळं आपण मोकळेपणानं अभिनय करायला शिकतो. आपल्याला काय चागलं दिसतं, काय नाही याचं भान येतं. तालमींच्या सुरुवातीलाच निपुणनं सर्व प्रसंग दाखवणारा एक फ्लोचार्ट तयार केला होता. त्यानुसार त्यानं वेळापत्रक तयार केलं होतं. तालमीत रोज दोनच प्रसंग करायचे आणि तेही दोनदाच, असं वेळापत्रक होतं. ही एवढीच तालीम पुरेशी नाही, असं मला सतत वाटायचं. पण निपुणचा आत्मविश्वास जबरदस्त होता. सगळं व्यवस्थित चाललं आहे, याची त्याला खात्री होती. आणि झालंही तसंच. या नाटकाची आमची रंगीत तालीम सात वेळा झाली. प्रयोगाच्या दिवशी त्यामुळं तसं कमी दडपण होतं.

गाण्याच्या दृष्टीनं ’कट्यार’पेक्षा मला ’संशयकल्लोळ’ अवघड वाटतं. या नाटकातल्या गाण्यांमध्ये अभिनय करायचा असतो. बर्‍याच गाण्यांमध्ये सहकलाकार आहेत, आणि गाणं सुरू करण्याआधी अजिबात वेळ मिळत नाही. संवादानंतर लगेच गाणं सुरू करावं लागतं. ’कट्यार’मध्ये माझे शिष्य़ गाणं सुरू करतात, किंवा आलापीसाठी थोडा वेळ मिळतो. पण तरीही ’संशयकल्लोळ’चा प्रयोग करताना खूप मजा येते. प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम आहे. शिवाय नाटक अडीच तासांत संपल्यानं तरुण प्रेक्षकही नाटकाचा भरभरून आस्वाद घेतात. या नाटकाला तरुण प्रेक्षकांची होणारी गर्दी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नाट्यसंगीत त्यांना भावतं आहे, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. सादरीकरण उत्तम असेल, तर संगीतनाटकांना प्रेक्षक गर्दी करतात, याचा अनुभव आम्ही घेतला आहे. माझे आजोबा म्हणायचे की, 'शास्त्रीय संगीताचा निचोड म्हणजे संगीत नाटकातलं गाणं'. जुन्या काळच्या बंदिशींच्या चाली आज नाट्यसंगीतातून जिवंत आहेत. पूर्वीच्या काळी गुरूकडून शिष्याकडे संगीत जात असे. त्यामुळं अनेक गोष्टी काळाच्या ओघात हरवल्या. नाट्यसंगीतातून त्यांतल्या काही उत्तम चाली जिवंत राहिल्या, लोकांपर्यंत पोहोचल्या. पूर्वीही नाट्यसंगीत लोकप्रिय व्हायला काही वेळ लागला. पण बालगंधर्व, दीनानाथराव, केशवराव भोसले, छोटा गंधर्व, माझे आजोबा यांच्या उत्तम सादरीकरणामुळं नाट्यसंगीत लोकप्रिय झालं. लोकांना त्याची गोडी लागली. नंतरच्या काळात मात्र सादरीकरणापेक्षा आणि नाटकापेक्षा गाण्यामध्येच गायक जास्त रमले आणि संगीतनाटक लोकांना नकोसं व्हायला लागलं. त्याची लोकप्रियता कमी झाली. बालगंधर्व, मा. दीनानाथ हे उत्तम गायक होते. त्यामुळं नाटकातले काही संवाद इकडेतिकडे झाले तरी प्रेक्षक दुर्लक्ष करत. पुढच्या पिढीत मात्र त्यांची नक्कल करणारे गायकच जास्त होते, आणि मग लोकांनी हळूहळू संगीतनाटकाकडं पाठ फिरवली. या नाटकांची लोकप्रियता कमी होण्याचं अजून एक कारण म्हणजे या नाटकांत काम करणारे कलाकार त्या भूमिकेच्या मानानं फारच वयस्कर होते. साठ-पासष्ठ वर्षांचे अश्विनशेठ, धैर्यधर, रेवती प्रेक्षकांना कसे भावतील? म्हणूनच मी नाटक करायचं ठरवलं तेव्हा सगळे तरुण कलाकार निवडले. नाटक दोनतीन तासांत संपतं हेही तरुण प्रेक्षकांसाठी सोयीचं आहे. पूर्वी ही नाटकं कमीत कमी पाचसहा तास चालत, शिवाय एकेका गाण्याला पाचसहा वन्समोअर घेतले जायचे. आता पूर्वीइतकं मोठं नाटक करणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. भांडवल, नाट्यगृहाची उपलब्धता अशा अनेक अडचणी आहेत. महत्त्वाचं म्हणजे आजचा तरुण प्रेक्षक इतका वेळ नाटकाचा आनंद लुटू शकेल, असं अजिबात वाटत नाही. त्यामुळं तरुण प्रेक्षकांना संगीतनाटकांची गोडी लावायची असेल, तर नाटकांच्या स्वरूपात बदल करणं आवश्यकच आहे.

’संशयकल्लोळ’चे प्रयोग सध्या सुरू आहेत. प्रत्येक प्रयोगाच्या वेळी माझ्या परीनं काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न करतो. तसं नाही केलं तर मला चटकन कंटाळा येतो. म्हणून मी गाण्यात काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करतो. अभिनयातही काही नवीन सुचलं तर तसं करून बघतो. नाटकात गाताना आजोबांचं जे गाणं मी पूर्वीपासून ऐकलं आहे त्याची अपरंपार मदत होते. पण मी आजोबांसारखा गात नाही, मला त्यांच्या इतकं उत्तम गाता येत नाही. त्यांच्या गाण्यातल्या ज्या गोष्टी मला सोप्या वाटतात त्या मी माझ्या पद्धतीनं उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं मी गायलेलं आणि आजोबांनी गायलेलं कुठलंही एक गाणं ऐकलं तर त्यात जमीनआस्मानाचा फरक जाणवेल. आता काही गोष्टी माझ्यात रक्तातूनच आल्या आहेत. माझा आवाज त्यांच्यासारखा लागतो. त्यांची फिरत घेण्याची किंवा हरकती घेण्याची उपजत क्रिया माझ्यातही आहे. पण माझा गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याइतका पुढारलेला किंवा परिपक्व नाही. आजोबांना त्यांच्या आयुष्यात अनेक संघर्ष करावे लागले. त्यांची नोकरी, त्यावेळची आर्थिक परीस्थिती अशा कारणांमुळं स्वस्थपणे कधीच त्यांना गाता आलं नाही. अनेक जबाबदार्‍या असल्यामुळे त्यांना मनासारखा रियाज करता आला नाही. मी त्या बाबतीत खूप सुदैवी आहे. माझ्या आईवडिलांनी, आजीनं मला खूप मोकळीक दिली. स्वातंत्र्य दिलं. त्यामुळं मी गाण्याला हवा तितका वेळ देऊ शकतो. मी नोकरी करत नाही. त्यामुळं हवा तितका रियाज मला करता येतो. गाण्यात तोचतोचपणा कधी जाणवला, गाणं कंटाळवाणं व्हायला लागलंय, असं लक्षात आलं की मग मी आठदहा तास रियाजाला बसतो. नाटकात गाणं हे आव्हानात्मक आहे. खूप बंधनं असतात तुमच्यावर. मैफिलीत गाताना तुम्ही मनात आलं तर गाण्याची गती बदलू शकता, निवांत आलापी करु शकता. नाटकात मात्र गायकानं काही बंधनं स्वत:वर घालून घ्यावी लागतात, तरच नाटक उत्तम होतं.

संगीतनाटकांचा हा अनुभव खूप सुखद, बरंच काही शिकवणारा असला तरी एक फार मोठी खंत सतत माझ्या मनात असते. माझी नाटकं बघायला माझी आजी, भाईकाका आज हवे होते, असं सारखं वाटतं. त्यांचं नसणं मला पदोपदी जाणवतं. माझं गाणं प्रेक्षकांना आवडलं, नाटक संपल्यानंतर कोणी माझं कौतुक केलं की मला आजीची, भाईकाकांची खूप आठवण येते. मला रंगंचावर नाटकात गाताना बघून त्यांना फार आनंद झाला असता. माझं काही चुकलं तर कान पकडला असता. आज मी रंगंचावर खांसाहेबांचं गाणं गातो, किंवा दोन तंबोर्‍यांच्या मध्ये बसून बंदिश पेश करतो, तेव्हा आजी आणि भाईकाका माझं गाणं ऐकत असतील, हे मला ठाऊक असतं.

या लेखाचा काही भाग ’माहेर’ (दिवाळी - २०११)मध्ये पूर्वप्रकाशित.
टंकलेखन-साहाय्य - मीना़क्षी हर्डीकर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिहीले आहे. अगदी प्रामाणिक वाटले. पुलंचे सल्ले, इतर लहान मुलांसारखाच नाट्यसंगीताचा कंटाळा असणे व नंतर कुमार गंधर्वांचे गाणे ऐकताना कनेक्शन पुन्हा सापडणे हे सर्व वाचायला खूप आवडले.

कट्यार, संशयकल्लोळ वगैरे नावे लहानपणी खूप ऐकलेली, तेव्हा प्रचंड लोकप्रिय असलेली नावे. त्यातले कट्यार मागच्या वर्षी पुन्हा नव्याने चित्रपटरूपात आल्याने पुन्हा भेटले. संशयकल्लोळ सुद्धा पुन्हा बसवले आहे हे आवडले, आणि टेस्ट मॅच ची वन डे केली आहे ते सुद्धा. याकरता निपुण धर्माधिकारीची निवड व त्याच्या मेहनतीबद्दलची माहिती हे वाचून आश्चर्य वाटले. त्याच्या व अमेय वाघ च्या क्लिप्स पाहिल्या की तो असले गंभीर काहीतरी करेल असे अजिबात वाटले नव्हते Happy

मनोगत आवडलंं .
राहुलचं गायन आणि अभिनय दोन्ही छान आहे.
खूप खूप शुभेच्छा!