। ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नमः ।
भाग ३ अध्याय १, ओवी ४३ ते ७७
जेवणाअखेरी आपण जसे डेझर्ट घेतो तसा गुरुमहिम्याचा गोड घास हेमाडपंतांनी मंगलाचारणाच्या शेवटी ठेवला आहे. गुरुकृपेचा नवलावा वर्णन करताना त्यांच्या वाणीला अधिकच गोडवा आला आहे. 'मै तेरा तू मेरा, भाव यही दृढ हो' हे हेमाडपंतानी आचरणात उतरवलं आहे.
हेमाडपंत म्हणतात की सद्गुरु आपल्याला मोक्षाकडे कसा नेईल तर 'ढकलत नेईल'. आई जशी लेकराचं कल्याण करणारच मग लेकराची इच्छा असो किंवा नसो! साईमाऊलीसुद्धा आपल्या लेकरांना ढकलत मोक्षाकडे नेईल.
परमात्मसुख परमात्मप्राप्ती । ब्रम्हानंद स्वरूपस्थिती ।
इत्यादि ही शब्दजाळाची गुंती । आनंदवृत्ति पाहिजे ॥६४॥
भक्तीचं एक साधंसोपं परिमाणही हेमाडपंतांनी आपल्याला दिलं आहे. कधी आपल्याला वाटतं की आपण कित्ती भक्ती करतो, पोथ्या पुराणं वाचतो, स्तोत्रपठण, व्रतवैकल्य, उपासतापास, पूजाअर्चा करतो. पण आपल्याला खरोखरीच आपली भक्ती मोजायची असेल तर आपण किती वेळ किंवा शक्ती या सार्या गोष्टींमध्ये घालवतो ते मोजण्यापेक्षा आपण असं पाहिलं पाहिजे की आपण किती आनंदात असतो? अमुक एक गोष्ट झाली म्हणून होणारा आनंद नव्हे तर मनाची सहजस्थिती म्हणून असणारा आनंद! अशा आनंदात आपण किती असतो, प्रपंचातील अडचणींमध्ये आपण ही आतली आनंदाची, विश्वासाची स्थिती टिकवून ठेऊ शकतो का, किंवा अडचणीच्या वेळी ही स्थिती ढळली तरी पुन्हा पटकन आपण या मूळ आनंद स्थितीत येतो का ही भक्तीच्या मोजमापाची खरी फूटपट्टी आहे.
असं म्हणण्याला अर्थ नाही की आमच्या आयुष्यात ही कटकट आहे म्हणून आनंद नाही. 'माझा सद्गुरुराया साईनाथ सदैव माझ्याबरोबर आहे, प्रत्येक क्षणी तो मला बघतो आहे, सांभाळतो आहे, माझ्यावर त्याचं किती प्रेम आहे' अशी आठवण जर आपल्याला सतत राहिली तर मला वाटतं की आपल्या मनातली भीती, निराशा ही आपोआप दूर होत जाईल आणि सतत आनंदाची स्थितीसुद्धा आपल्याला हळूहळू गाठता येईल.
ही आनंदस्थिती प्राप्त झाली की आपल्यावर संकटं, दुःख येणं बंद होईल असं नाही तर संकट आलं तरीही, चांदोरकरांच्या अडलेल्या मुलीसाठी गोसाव्याच्या हाती उदी पाठवणारे बाबा, आपल्या संकटाचा उपायही वेळीच पाठवतील, संकटाशी लढण्याची ताकद पुरवतील. संत कबीरांनी सांगितलंच आहे
"कबीरा क्या मैं चिंतऊ, मन चिंते क्या होय
मेरी चिंता हरि करे, चिंता मोहि न कोय"
तत्त्वद्दष्टया जो तुळे निराळा । भक्तिसुखार्थ राही जो वेगळा ।
करी देवभक्तांच्या लीला । तया प्रेमळा प्रणिपात ॥७२॥
या ओळींवर सद्गुरु श्रीअनिरुध्द बापूंनी एक अतिशय सुंदर प्रवचन दिलं होतं त्यातील काही भाग इथे उद्धृत करते. हा परमेश्वर तर खूप मोठा, सर्वशक्तिमान आहे. मग हा कशाला साई बनून, राम बनून, कृष्ण बनून येतो? कशाला गुरं राखतो, वनवासाला जातो, भिक्षा मागतो? श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता आजही तत्वज्ञानाचा सर्वोत्तम खजिना समजली जाते, अभ्यासली जाते. मर्यादापुरुषोत्तम श्रीराम, मनुष्याच्या सार्या मर्यादा पाळूनही आदर्श आयुष्य कसं जगता येऊ शकतं हे दाखवून देतो आणि साईबाबा 'फकिरी अव्वल बादशाही' हे आपल्याला त्यांच्या संपूर्ण आयुष्यातून दाखवून देतात, पाण्याचे दिवे रात्रभर लावून दाखवतात, वादळी पाऊस थांबवतात, जमिनीतून अग्नी काढतात , हस्तस्पर्शाने लोकांचे आजार दूर करतात आणि तरीही स्वतःला फक्त 'यादे हक्क' म्हणजेच अल्लाचा बंदा म्हणवतात. ही परमेश्वराची लीला असते ज्यायोगें ‘तो’ आपल्यासारख्या अनेकांना त्याचा लळा लावतो, त्याच्याकडे आकर्षून घेतो आणि कसं वागावं याची शिकवण देतो.
अशा या साईनाथांना हेमाडपंत 'प्रणिपात' करतात. नमस्कार नाही, साष्टांग नमस्कार नाही, प्रणिपात..... माझे प्राण मी तुझ्या चरणी समर्पित केले हा भाव मनात ठेऊन केलेला नमस्कार म्हणजे प्रणिपात. बाबा, मी शिर्डीला येते, तुम्हाला पाहाते, नमस्कार तर नेहेमीच करते पण माझ्याकडून प्रणिपात घडू दे. जसं समर्पण हेमाडपंतांनी तुमच्या चरणी केलं, हनुमंताने श्रीरामाच्या चरणी केलं, अर्जुनाने श्रीकृष्णाच्या चरणी केलं, तो समर्पणभाव मला द्या, तशी भक्ती माझ्याकडून करून घ्या.
याहूनि काय मागू आता | सद्गुरुराया साईनाथा |
करूनि घ्यावे प्राणिपाता | याचि जन्मी |
डॉ. माधुरी ठाकुर
ओवी ४३ ते ७७ सरलार्थ
ओवी ४३ ते ५०
आतां करूं सद्नुरुस्मरण । प्रेमें वंदूं तयाचे चरण ।
जाऊं कायावाचामनें शरण । बुद्धिस्फुरणदाता जो ॥४३॥
जेवणार बैसतां जेवावयास । अंतीं ठेवितो गोड घांस ।
तैसाचि गुरुवंदन - सुग्रास । घेऊनि नमनास संपवूं ॥४४॥
ॐ नमो सद्नुरुराया । चराचराच्या विसाविया ।
अधिष्ठान विश्वा अवघिया । अससी सदया तूं एक ॥४५॥
पृथ्वी सप्तद्वीप नवखंड । सप्तस्वर्ग पाताळ अखंड ।
यांतें प्रसवी जें हिरण्यगर्भांड । तेंचि ब्रम्हांड प्रसिद्ध ॥४६॥
प्रसवे जी ब्रम्हांडा यया । जी नामें ‘अव्यक्त’ वा ‘माया’ ।
तया मायेचियाही पैल ठाया । सद्नुरुराया निजवसती ॥४७॥
तयाचें वानावया महिमान । वेदशास्त्रीं धरिलें मौन ।
युक्तिजुक्तीचें प्रमाण । तेथें जाण चालेना ॥४८॥
ज्या ज्या दुज्या तुज उपमावें । तो तो आहेस तूंचि स्वभावें ।
जें जें कांहीं द्दष्टि पडावें । तें तें नटावें त्वां स्वयें ॥४९॥
ऐसिया श्रीसाईनाथा । करुणार्णवा सद्नुरु समर्था ।
स्वसंवेद्या सर्वातीता । अनाद्यनंता तुज नमो ॥५०॥
सरलार्थ: आता सद्गुरुंचे स्मरण करूया. प्रेमाने त्यांच्या चरणी वंदन करूया. हे शरीर (काया), वाणी (वाणी) आणि मन सार्यान्सकट बुद्धीला स्फुरण देणार्या अशा सद्गुरुना शरण जाऊया. ॥४३॥
जेवण संपविताना खाण्यासाठी जसा गोड घास ठेवला जातो, तसाच अंती गुरुवन्दनाचा हा गोड घास घेऊन हे नमन संपवूया.॥४४॥
ॐकाररूपी सद्गुरुराया हे समस्त चराचर विश्व तुझ्याच ठायी विसावतं, हे दायामूर्ती सद्गुरुराया ह्या सार्या विश्वाचं अधिष्ठान (मांडणी/स्थापना) तुझंच आहे ॥४५॥
सुवर्णाच्या रंगाचं अंड ज्यातून सात द्वीपांची (बेटांची) पृथ्वी, नऊ खंड, सात स्वर्ग आणि पाताळ निर्माण झाले ते अंड म्हणजेच ब्रम्हांड ॥४६॥
हे ब्रम्हांड जिच्यापासून उत्पन्न झालं तीच माया किंवा अव्यक्त. आणि सद्गुरू तर या मायेच्यांही पलीकडे ॥४७॥
सद्गुरुरायचं वर्णन करणं वेदानाही जमलं नाही. त्यांनी ‘नेति नेति’ (न इति, न इति), असा नाही आणि असाही नाही (म्हणजे शब्दातीत आहे) म्हणून मौन धरलं. इथे कोणतीही युक्ती चालत नाही. ॥४८॥
ज्या कशाची उपमा तुला द्यावी ते सर्व तूच तर आहेस. जे जे नजरेसमोर येतं आहे, ते सारं तुझच रूप आहे. ते रूप घेऊन तूच नटला आहेस. ॥४९॥
अश्या हे साईनाथा, दयासागरा, समर्था, सर्वांच्या अतीत असा तू, स्वसंवेद्य म्हणजे जो फक्त स्वतःच स्वतःला पूर्णपणे जाणू शकतो असा आहेस. तू अनादि (अन + आदि) ज्याला सुरुवात नाही असा, आणि अनंत ज्याला अंत नाही असा आहेस. ॥५०॥
ओवी ५१ ते ६०
प्रणाम तूतें सर्वोत्तमा । नित्यानंदा पूर्णकामा ।
स्वप्रकाशा मंगलधामा । आत्मारामा गुरुवर्या ॥५१॥
करूं जातां तुझें स्तवन । वेदश्रुतीही धरिती मौन ।
तेथें माझें कोण ज्ञान । तुज आकलन कराया ॥५२॥
जय जय सद्नुरु करुणागारा । जय जय गोदातीरविहारा ।
जय जय ब्रम्होश रमावरा । दत्तावतारा तुज नमो ॥५३॥
ब्रम्हासी जें ब्रम्हापण । तें नाहीं सद्नुरुवीण ।
कुरवंडावे पंचप्राण । अनन्यशरण रिघावें ॥५४॥
करावें मस्तकें अभिवंदन । तैसेंचि हस्तांहीं चरणसंवाहन ।
नयनीं पाहत असावें वदन । घ्राणें अवघ्राणन तीर्थाचें ॥५५॥
श्रवणें साईगुणश्रवण । मनें साईमूर्तीचें ध्यान ।
चित्तें अखंड साईचिंतन । संसारबंधन तुटेल ॥५६॥
तन-मन-धन सर्व भावें । सद्नुरुपायीं समर्पावें ।
अखंड आयुष्य वेंचावें । गुरुसेवेलागुनी ॥५७॥
गुरुनाम आणि गुरुसहवास । गुरुकृपा आणि गुरुचरण पायस ॥
गुरुमंत्र आणि गुरुगृहवास । महत्प्रयास प्राप्ती ही ॥५८॥
प्रचंड शक्ति यया पोटीं । अनन्य भक्तीं घेतली कसवटी ।
भक्तांसी मोक्षद्वारवंटीं । नेतील लोटीत नकळतां ॥५९॥
गुरुसंसगति गंगाजळ । क्षाळिते मळ करिते निर्मळ ।
मनासम दुजें काय चंचळ । करिते निश्चळ हरिचरणीं ॥६०॥
सरलार्थ: सर्वोत्तम अशा तुला वंदन असो. आनंद हेच तुझं नित्य स्वरूप आहे. तू पूर्णकाम आहेस. तू स्वयंप्रकाशी आहेस. मांगल्याच धाम (निवास) आहेस. आत्म्याच मूळ शुद्ध स्वरूप म्हणजेच राम तूच आहेस. ॥५१॥
जिथे तुझी स्तुती करू जाता वेद आणि श्रुतीसुद्धा मौन धारण करतात तिथे मी अल्पज्ञानी तुला काय जाणणार ॥५२॥
करुणेचे भांडार असलेल्या सद्गुरुनाथा, गोदावरीच्या तीरी विहार करणार्या ब्रम्ह, ईश (शंकर), विष्णू आणि दत्तगुरूंच्या साक्षात अवतारा तुझा जयजयकार असो. ॥५३॥
ब्रम्हदेवाला जे ब्रम्हपद (सृष्टीरचना करण्याचं पद) आहे ते सद्गुरुमुळेच. अशा सदगुरुवरून पंचप्राण ओवाळावे, त्याला अनन्यभावाने (अन + अन्य , तू सोडून अन्य काहीही नाही) शरण जावे ॥५४॥
मस्तक नमवून गुरुना नमस्कार करावा. हातानी गुरूंचे पाय दाबावे, डोळ्यांनी गुरुंचा चेहरा पहावा. नाकाने तीर्थाचा वास घ्यावा. (सारी इंद्रिय गुरुच्याच दिशेला वळवावी)॥५५॥
कानांनी साईन्च्या गुणांचे श्रावण करावे. मनाने साईमूर्तीचे ध्यान करावे. चित्ताने अखंड साईंचे चिंतन करावे. असे केल्याने संसाराचे हे बंधन विरून जाईल. ॥५६॥
आपले तन (सेवा), मन आणि धन सर्व काही, भावपूर्वक सद्गुरुचरणी अर्पण करावे. संपूर्ण आयुष्य गुरुसेवेकारिता वेचावे ॥५७॥
गुरुच नाम, गुरुचा सहवास, गुरुची कृपा, गुरु चरण रूपी पक्वान्न, गुरुमंत्र आणि गुरुंगृही निवास ही सर्व महत प्रयासानी होणारी प्राप्ती आहे.॥५८॥
या (वरील ६) गोष्टींमध्ये प्रचंड शक्ती आहे. अनन्य भक्तिभावाने या गोष्टी केल्या तर (त्यांचं पुण्यफळ) भक्तांना त्यांच्याही नकळत, ढकलत मोक्षाच्या द्वारी घेऊन जाईल. ॥५९॥
गुरुंचां सहवास हा गंगाजळासारखा आहे. वाईट ते काढून टाकून आपल्याला निर्मल करतो. सर्वांत चंचल अस जे मन, त्यालासुद्धा गुरुची संगत परमेश्वराच्या चरणी स्थिर करते. ॥६०॥
ओवी ६१ ते ६६
आमुचें वेदशास्त्रपुराण । श्रीसद्नुरुचरणसेवन ।
आम्हां योगयागतपसाधन । लोटांगण गुरुपायीं ॥६१॥
श्रीसद्नुरुनाम पवित्र । हेंचि आमुचें वेदशास्त्र ।
‘साईसमर्थ’ आमुचा मंत्र । यंत्रतंत्रही तें एक ॥६२॥
‘ब्रम्हा सत्य’ हे निजप्रतीती । ‘जगन्मिथ्या’ हे नित्य जागृती ।
ऐसी ही परमप्राप्तीची स्थिती । साई अर्पिती निजभक्तां ॥६३॥
परमात्मसुख परमात्मप्राप्ती । ब्रम्हानंद स्वरू पस्थिती ।
इत्यादि ही शब्दजाळाची गुंती । आनंदवृत्ति पाहिजे ॥६४॥
जयासी बाणली ही एक वृत्ती । सदा सर्वदा ही एक स्थिती ।
सुखशांति समाधान चित्तीं । परमप्राप्ति ती हीच ॥६५॥
साई आनंदवृत्तीची खाण । असलिया भक्त भाग्याचा जाण ।
परमानंदाची नाहीं वाण । सदैव परिपूर्ण सागरसा ॥६६॥
सरलार्थ: आमच्यासाठी वेद, शास्त्र, पुराण हे सारं काही सद्गुरुच्या चरणसेवेतच आहे. योग, याग, तप ही सारी साधनं आमच्यासाठी गुरुच्या पायांवर घातलेल्या लोटांगणातच आहेत. ॥६१॥
सद्गुरुरायाच पवित्र नाम हेच आमचे वेद आणि हेच आमचं शास्त्र. ‘साई समर्थ’ हाच आमचा मंत्र. आमचं यंत्रही तेच आणि तंत्रही तेच. ॥६२॥
‘ब्रम्ह हेच अंतिम सत्य आहे’ याची स्वतः प्रचीती घेणं आणि हे जग मिथ्या / अशाश्वत, खोटं आहे याची आठवण ठेवणं म्हणजेच परम (उच्च) स्थिती प्राप्त करणं. साईनाथ आपल्या भक्तांना अशी स्थिती प्राप्त करून देतात. ॥६३॥
परमात्मासुख , परमात्मप्राप्ती, ब्रम्हानंदस्वरूपस्थिती हा सारा अलंकारिक शब्दांचा गुंता आहे. (सार्याच सार हे की) वृत्ती सदैव आनंदी (संतुष्ट/ समाधानी) असली पाहिजे. ॥६४॥
अंगी ही समाधानी , आनंदी वृत्ती बाणण, चित्त सदैव सुख शांतीपूर्ण समाधानी स्थितीत असणं म्हणजेच परमात्मप्राप्ती ॥६५॥
साईनाथ स्वतः आनंद वृत्तीचा ठेवाच. जो भाग्यवंत भक्त असेल त्याला परमानंदाची काहीच कमी नाही. कारण हा साईनाथ परमानंदाचा जणू कधीही रिता न होणारा सागरच आहे. ॥६६॥
ओवी ६७ ते ७१
शिवशक्ति पुरुषप्रकृती । प्राणगती दीपदीप्ती ।
ही शुद्धब्रम्हाचैतन्यविकृती । एकीं कल्पिती द्वैतता ॥६७॥
‘एकाकी न रमते’ ही श्रुती । ‘बहु स्याम्’ ऐशिया प्रीती ।
आवडूं लागे दुजियाची संगती । पुनरपि मिळती एकत्वीं ॥६८॥
शुद्धब्रम्हारूप जे स्थिती । तेथें ना पुरुष ना प्रकृती ।
दिनमणीची जेथें वस्ती । दिवस वा राती कैंची ते ॥६९॥
गुणातीत मूळ निर्गुण । भक्तकल्याणालागीं सगुण ।
तो हा साई विमलगुण । अनन्य शरण तयासी ॥७०॥
शरण रिघाले साईसमर्था । त्यांहीं चुकविलें बहुतां अनर्थां ।
म्हणवूनि या मी निजस्वार्था । पायीं माथा ठेवितों ॥७१॥
सरलार्थ: शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती प्राण आणि गती, दीप आणि दीप्ती (प्रकाश) हे शुद्ध ब्रम्ह आणि चैतन्याच वेगळं रूप आहे. हे एकच असले तरी लोक हे वेगवेगळे आहेत अशी कल्पना करतात (मानतात). ॥६७॥
उपनिषदांत म्हटलं आहे की ‘एकेकट करमत नाही’ ‘मी अनेक व्हावे’ अशा इच्छेने दुसर्याची संगत आवडू लागते. आणि पुन्हा सारे एक होतात. ॥६८॥
शुद्ध ब्रम्ह स्वरूप अशा स्थितीत नपुरुष आहे न प्रकृती. जिथे सूर्य सतत राहतो तिथे कसला दिवस आणि कोणती रात्र! ॥६९॥
जो मुळातच गुणांच्या पलीकडे अस निर्गुण आहे, तो भक्तांच्या कल्याणाकरिता सगुण होऊन अवतरला आहे. अस हा जो साई ‘गुणियान्चा गुण’ आहे त्याला मी अनन्यभावे शरण आहे. ॥७०॥
जे साईनाथाना शरण गेले त्यांनी सारे अनर्थ टाळले. म्हणून या स्वतःच्या स्वार्थासाठी मी साईनाथान्च्या चरणी मस्तक ठेवतो. ॥७१॥
ओवी ७२ ते ७४
तत्त्वद्दष्टया जो तुळे निराळा । भक्तिसुखार्थ राही जो वेगळा ।
करी देवभक्तांच्या लीला । तया प्रेमळा प्रणिपात ॥७२॥
जो सर्व जीवांची चित्कला । संवित्स्फुरणे जो अधिष्ठिला ।
जो जडचैतन्यें आकारला । तया प्रेमळा प्रणिपात ॥७३॥
तूं तंव माझी परमगती । तूंचि माझी विश्रांती ।
पुरविता मज आर्ताची आर्ती । सुखमूर्ति गुरुराया ॥७४॥
सरलार्थ : खरे पाहता जो वेगळाच आहे, आणि भक्तांच्या सुखाकरिता जो (त्याच्या मूळ रूपापेक्षा) वेगळाच (आपल्यासारखा) होऊन आला आहे, जो भक्तांकरिता नाना लीला करतो आहे, अशा या प्रेमळ साईरूपी परमेश्वराला प्रणिपात (प्रणिपात म्हणजे संपूर्ण समर्पणानिशी केलेला नमस्कार) ॥७२॥
जो सर्व जिवांमधील चैतन्य आहे, बुद्धीच जो अधिष्ठान (मूर्त स्वरूप) आहे, जो मनुष्यदेह धारण करून आला आहे, त्या प्रेमळ साईनाथांना प्रणिपात ॥७३॥
साईनाथा मला जिथे अंती पोहोचायचं आहे ते (माझं गंतव्य) तूच आहेस. माझा विसावा तूच आहेस. हे सुखमूर्ती गुरुराया, तुझ्यासाठी आसुसलेल्या माझी ही तृष्णा तूच पूर्ण कर. ॥७४॥
ओवी ७५ ते ७७
आतां या नमनाची अखेरी । भूतीं भगवंत प्रत्यंतरीं ।
जीवमात्रासी मी वंदन करीं । घ्या मज पदरीं आपुल्या ॥७५॥
नमन सकल भूतजाता । येणें सुखावो विश्वभर्ता ।
तो विश्वंभर अंतर्बाह्यता । एकात्मता अभेदें ॥७६॥
एवं परिपूर्ण झालें नमन । जें आरब्ध परिसमाप्तीचें साधन ।
हेंचि या ग्रंथाचें मंगलाचरण । आतां प्रयोजन निवेदीं ॥७७॥
सरलार्थ : सर्व जीवांमध्ये भगवंताचाच निवास आहे. म्हणून आता या नमनाच्या शेवटी सर्व जीवमात्रांना वंदन करून मी विनंती करतो की मला सांभाळून घ्या. ॥७५॥
सर्व जीवाना केलेल्या या नमनाने तो विश्वाचा चालनाकर्ता संतुष्ट होवो. कारण या विश्वात अंतर्बाह्य तोच तो एक भरून राहिला आहे. ॥७६॥
आता हे नमन पूर्ण झाले. आरंभ केलेले कार्य सुफळ संपूर्ण होण्याचे हे साधन आहे. हेच या ग्रंथाचे मंगलाचरण आहे (शुभारंभ) आहे. आता ह्या ग्रंथाचे कारण सांगतो.
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय
हरि ॐ , श्रीराम, अम्बज्ञ
डॉ. माधुरी ठाकुर
सुंदर लिहिले आहे!!!
सुंदर लिहिले आहे!!!
Khup chaan arth ulgadun
Khup chaan arth ulgadun sangitlaa ahe.Hi tumchyawar zaaleli saaikrupach ahe.
सुंदर! खूप मेहनत घेताय ही पण
सुंदर! खूप मेहनत घेताय ही पण सेवाच आहे.
हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ.
श्री सच्चिदानंद सद्गुरु
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय_/|\_
सुप्रिया , समई, अश्विनी ,
सुप्रिया , समई, अश्विनी , गीता आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभारी आहे . श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय _/\_ अंबज्ञ