कथनशास्त्रातील मालिका गुंफण्याच्या प्रकाराला Serialization म्हणतात. म्हणजे एका कथेतून दुसरी कथा निघत जाते. तसा प्रकार थोड्या प्रमाणात खांडववन कथेत आढळतो. खांडनवनात शांर्गी पक्ष्याची आणि मंदपाल ऋषींची एक उपकथा येऊन जाते. त्याचबरोबर मयासूराला अभयदान दिल्याने मयसभेच्या बांधणीचा संकल्प तेथेच निश्चित होतो. नागराज तक्षक वाचतो मात्र नाग लोकांचे पांडवांशी हाडवैर सुरु होते त्याचीही ठिणगी येथेच पडते. खांडववनात वाचलेला तक्षकाचा मुलगा अश्वसेन हा पुढे महाभारतयुद्धात अर्जुनाला मारण्याचा निकराचा परंतू अयशस्वी प्रयत्न करतो त्याची सुरुवातदेखिल खांडववन दाह कथेतच आहे. ज्या दुर्योधनाला द्रौपदीने मयसभेत पडल्यावरून हसल्याने महाभारत घडले असे म्हणतात ती मयसभा खांडववन दाहनातून निर्माण झाली आहे. कदाचित ती त्या जागीदेखिल बांधली गेली असेल. पुढे तक्षकाकडून घडलेला परीक्षिताचा मृत्युदेखिल खांडववन कथेशी जोडलेला आहे. त्यामुळे Serialization बरोबरच Cyclical कथनाचा प्रकार खांडववन कथेशी निगडीत असलेला दिसतो. महाभारताच्या अगदी सुरुवातीला घडणारे जनमेजयाचे सर्पसत्र, जेथे सर्पांचा संहार सुरु झाला आहे त्याचे बीज खांडववन दाह कथेत दडलेले दिसते.
Spacialization आणि Elasticity of Time हे कथनाचे दोन आणखि घटक या कथेत दिसतात. खांडववनदाहाची घटना यमुना किनार्यावर घडते. कारण हे वन यमुनाकिनार्यावर असल्याचा उल्लेख महाभारतात आहे. किंबहुना पांडवांना राज्याचा जो भाग मिळाला तोच यमुनेच्या आसपासचा प्रदेश होता असे म्हणतात. प्रदेशाच्या स्पष्ट उल्लेखामुळे कथेबद्दल विश्वसनीयता निर्माण होते. मात्र हा काल कुठला होता याबद्दल कसलिच माहिती मिळत नाही. इंद्र, वरुण आणि अग्नि या वेदातील देवतांचा सहभाग या कथेत आहे मात्र या देवता वेदातील आपले सामर्थ्य घेऊन उभ्या राहिलेल्या दिसत नाहीत तर त्यांचे जुने सामर्थ्य ओसरून त्यांना पुराणामध्ये आकार आणि देह प्राप्त झाले, त्यांना निरनिराळ्या कथा चिकटल्या त्यानंतरच्या काळातील या देवता दिसतात. त्यामुळे कालाचा अंदाज येत नाही. याचा एक परिणाम म्हणजे यांच्याशी निगडीत कथांना विशिष्ट कालाच्या मापात पारखता येत नाही. कुठल्या काळातील सामाजिक परिस्थितीत या घटना घडल्या त्याचा नक्की अंदाज येत नाही. सारे काही संदिग्ध राहते.
खर्या अर्थाने Improvisation म्हणता येईल ते रामानंद सागर यांच्या कृष्ण मालिकेत झाले. त्यात मूळात दाह दाखवलाच नाही. कृष्ण अर्जुनाला खांडववनातल्या पडक्या वास्तूत घेऊन येतो. सगळीकडे पडझड झालेली असते. वातावरण उदासवाणे असते. तेथे धन लपवलेले असते आणि त्याचे रक्षण तक्षक करीत असतो. तक्षकाचे रक्षण इंद्र करीत असतो. इंद्राचे आवाहन केल्यावर सर्व अडथळे दूर होतात. अर्जुनाला पाहून इंद्राला वडीलपणाचे भरते येते. पांडवांना अपार संपत्तीचा लाभ होतो. त्यातच अर्जुनाला रथ आणि धनुष्य प्राप्त होते. एखादा चमत्कार घडल्यासारखे पडझड झालेल्या जागेचे रुपांतर नवीन वास्तूत होते. अर्थातच ही सर्व भगवान श्रीकृष्णाची लीला असते. त्यामुळे कुणामध्येही कसलाच संघर्ष न घडता सर्वांचे भरलेले रांजण तसेच राहतात. कसलाच धक्का कुणाला लागत नाही. कसलाच संहार होत नाही त्यामुळे कुणाला दोष देण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. याला Improvisation म्हणावं की संपूर्ण नवनिर्मिती म्हणावी अशी शंका यावी अशा तर्हेचा अफाट बदल मूळ कथेत केलेला आहे. मात्र कथनशास्त्राच्या दृष्टीने हे Improvisation आहे.
रामानंद सागर जे करतात त्याचा मूळ स्रोत मला माहित नाही. आणि समजा जे कुणी ही घटना पहिल्याप्रथम पाहिल त्याला खांडववन जाळलं होतं असं काही कधीच कळणार नाही. कलाकाराच्या कलात्मक स्वातंत्र्याबद्दल बरंच बोललं जातं. या लेखाचा तो विषय नाही. पण Improvisation च्या निमित्ताने बोलावं लागेल कारण ते थेट या कलात्मक स्वातंत्र्याशी संबंधित आहे. मूळ महाभारतात जे नाहीच ते दाखवणे कितपत योग्य? या बाबत स्वातंत्र्य किती घ्यावं? कि संपूर्ण इतिहास उलटापालटा करावा? तो एपिसोड कुणी पाहिला तर असं काही हत्याकांड घडलं होतं, त्यात अत्यंत क्रौर्याने, निर्घृणपणे वनात राहणार्यांना ठार मारण्यात आलं होतं असं माहित होणारच नाही. मात्र बीआर चोप्रा यावर काही भाष्यच करीत नाहीत. त्यांचा "समय" दोन तीन वाक्यात खांडववनाची घटना गुंडाळून टाकतो. महाभारत मालिकेतील "समय" ही कल्पना मला तेव्हाही खुप आवडली होती. आजही आवडते. मात्र आपल्याला गैरसोयीच्या वाटतील अशा घटना टाळण्यासाठीदेखील त्याचा वापर करता येऊ शकतो हे त्यावेळी लक्षात आले नव्हते. वर सांगितलेले तथाकथित Improvisation चे दोन्ही प्रकार हे माझ्यामते दोषपूर्ण आहेत. एकात इतिहासच बदलून टाकला आहे तर दुसर्यात अनुल्लेखाने घटनेची धार काढून टाकली आहे. हे सारं कशासाठी? तर घडलेली घटना जशीच्यातशी सांगता येत नाही म्हणून.
Improvisation मुळे एखाद्या पात्राला काव्यगत न्याय देण्याचा प्रयत्न कवि करीत असतो. याचे अतिशय नावाजलेले उदाहरण भासाचे आहे. भासाने आपल्या नाटकांमध्ये कैकयी, कर्ण आणि दूर्योधन या साधारणपणे नकारात्मक ओळखल्या जाणार्या पात्रांना Improvisation च्या साहाय्याने न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
कथनशास्त्राच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे Interiorization ज्यामुळे कथेमागची कथा ओळखण्यास मदत होते. महाभारत कथेचा अर्थ लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. आपापली भाष्ये त्यावर लिहिली. अनेक ललित लेखकांनी त्यावर कथा, कादंबर्या, नाटके लिहिली. अजुनही लिहित आहेत आणि पुढेही लिहितील. हे सारे प्रकार Interiorization ओळखण्याचेच आहेत. दाजीशास्त्री पणशीकरांनी महाभारताचे संगती एक सूडाचा प्रवास म्हणून लावली. तर रणजीत देसाई आणि शिवाजी सावंतांसारख्या लेखकांना कर्ण हा लहानपणापासून अन्याय सहन करणारा महावीर वाटला. प्राचिन वाङमयात भासाला कर्णभार आणि उरुभंग सारख्या कृतींमधून कर्ण आणि दूर्योधनाच्या वेगळ्याबाजू मांडाव्याशा वाटल्या. Interiorization मध्ये मूळ कलाकाराने जे काही म्हटले आहे किंवा त्याच्या कलाकृतीमधून त्याला जे काही म्हणायचे आहे ते हूडकण्याची प्रक्रिया असते. हा अनेक वाटांनी सतत घडणारा प्रवास असतो. कदाचित महाभरतकारांना ते म्हणायचं असेल किंवा नसेलही मात्र जर एखाद्याला वेगळं काही वाटलं तर ते वाटण्यामागचे कारण सांगण्याची आणि आपले म्हणणे पटवून देण्यासाठी पुरावे देण्याचे नैतिक जबाबदारी Interiorization च्या निमित्ताने नवा अर्थ शोधून काढणार्याची असते.
असा अतिशय यशस्वी प्रयत्न "युगान्त" या लेख संग्रहात डॉ. इरावती कर्वे यांनी केला. बाईंनी खांडववनाच्या व्युत्पत्तीपासून सुरुवात करुन या घटनेचा मागोवा घेतला आहे. खंडू म्हणजे कसलातरी गोड पदार्थ. हा मोहाच्या झाडांचा उल्लेख असण्याची शक्यता आहे असे त्या म्हणतात. म्हणजे मोहाची झाडे विपुल प्रमाणात असलेले वन. तेथे राहणारे आदिवासी. आणि ते संपूर्ण वन आपल्या राज्यात आणण्यासाठी कृष्णार्जुनाने ते जाळले आणि तेथिल रहिवाशांचा विनाश केला असे त्या सूचित करतात. हे करतानाच समाजातील जाती जमातींचे नीतिनियम कसे असतात याचाही त्या उहापोह करतात. मानवतेचे जे काही नियम असतील ते त्या त्या समाजापुरतेच मर्यादीत असतात. बाहेरच्या समाजाशी संघर्ष झाला असता ते नियम लागु होत नसावेत. त्यामुळे एरवी धर्मयुद्धाचा घोषा करणार्या क्षत्रिय समाजाच्या कृष्ण आणि अर्जुन यांनी खांडववनातील लोकांना ठार मारताना कसलेही नीतिनियम पाळलेले दिसत नाहीत यावर इरावतीबाई अचूक बोट ठेवतात. पुढे या घटनेचे पडसाद किती दूरवर उमटले याचाही ताळेबंद त्या मार्मिकपणे मांडतात. खांडववन दाह, त्यातून वाचलेला मयासूर, त्याने बांधलेली मयसभा जणु काही शापितच. कारण तेथे दुर्योधनाची फजीती झाली. त्यामुळे द्युत घडले, त्यातून द्रौपदी वस्त्रहरण झाले, त्यातून युद्ध उभे राहिले. खांडववनाचीच आग मनात ठेवून तक्षकाने पुढे परीक्षिताला ठार मारले. हस्तिनापूर काहीतरी परंपरा ठेऊन नाहीसे झाले. इंद्रप्रस्थाचे मात्र नावही राहीले नाही. एकूणच खांडववन प्रकरण पुढच्या अनेक घटनांचे कारण ठरले. इरावतीबाईंनी घेतलेला खांडववन कथेचा हा मागोवा Interiorization चे उत्कृष्ट उदाहरण आहे.
(क्रमशः)
अतुल ठाकुर
अगदी सुंदर ...
अगदी सुंदर ...
मस्त मालिका !!!
मस्त मालिका !!!
इरावतीबाईंचे पुस्तक वाचून
इरावतीबाईंचे पुस्तक वाचून बरीच वर्षे, झाली.. त्याचा थोडा आणखी गोषवारा देणार का प्लीज.
आणि हा मुद्दा खुप महत्वाचा. आजच्या नीतीनियमांच्या कल्पनेत ज्याची लाज वाटते, तो भाग टाळला जातोच.
चोप्रांनी तेच केले.
आपण भारतीय या सर्वाकडे केवळ काव्य ( आणि त्याला असलेला किंचीत इतिहासचा आधार ) एवढ्याच
मर्यादीत नजरेने बघू शकत नाही. आणि मग एकदा का त्या देव, धर्म, आदर्श या मूल्यांशी सांगड घातली कि
डोळ्यावर पट्टी बांधावीच लागते.
'युगांत ' शिवाय महाभारताचा
'युगांत ' शिवाय महाभारताचा विचार होणे अशक्य आहे. मला याचा कधी उल्लेख होतोय असे वाटत होते.
इरावती बाईंनी अतिश्य साक्षेपाने आणि अभ्यासू वृत्तीने महाभारता चा धांडोळा घेतला आहे त्यात.
पण हा भाग अगदीच छोटा झाला.
आणि चोप्रांचं महाभारत प्लीजच उदा म्हणून सारखं सारखं देऊ नका. व्हर्जन - लोकमानसातली आवृत्ती - म्हणून जरी तुम्ही त्याचा उल्लेख करीत असलात तरीही....ते अगदीच फिल्मी आहे!
आजच्या नीतीनियमांच्या कल्पनेत
आजच्या नीतीनियमांच्या कल्पनेत ज्याची लाज वाटते, तो भाग टाळला जातोच.>>> होय! असं होतं खरं!
छान आहे लेखमालिका.
छान आहे लेखमालिका.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
चौथा भाग आलाय, हे अनेक
चौथा भाग आलाय, हे अनेक जणांना माहित नाही असे दिसतेय.. म्हणुन वर काढतोय हा धागा.
खांडववनदाहाच्या ह्या
खांडववनदाहाच्या ह्या लेखांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे, तो म्हणजे अर्जुन, पांडव आणि कृष्ण यांचे नागांशी असलेले नातेसंबंध!
दुर्योधनाने जेव्हा कपटाने भीमावर विषप्रयोग करून त्याला तळ्यात फेकून दिले, तेव्हा नागांनी त्याला वाचवले, त्याप्रसंगी आर्यक नाग वासुकी या नागराजाला सांगतो, की तो भीमाचा खापरपणजोबा (कुंतीकडून - म्हणजे कुंतीच्या पित्याच्या आईचा पिता) आहे. म्हणजेच पांडव आणि कृष्ण या सर्वांचे नागांशी नातेसंबंध होते.
तसेच अर्जुनाची एक पत्नी उलूपी ही कौरव्य नागाची कन्या आणि एका नागाची (जो गरूडाकडून मारला गेला) विधवा पत्नी होती. तिला अर्जुनापासून नियोगाने इरावान हा मुलगा झाला, तो नागकुलातच वाढत होता.
तक्षक नाग आणि त्याचा परिवार हे सगळेजण वासुकीच्या आणि कौरव्य नागाच्या परिवाराचे भाऊबंदच होते. कद्रू मातेचे हे पुत्र आणि त्यांचा परिवार हे सारेजण नाग म्हणून ओळखले जात होते. नागकुलातल्या ह्या लोकांशी अर्जुन आणि कृष्ण या दोघांचेही दूरचे का होईना पण नाते होते.
महाभारत, रामायण, आणि इतर पुराणे वाचतांना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, की त्यात उल्लेख केलेले नाग, गरूड, गृध पक्षी, वानर इत्यादी हे कोणी प्राणी नसून त्या विशिष्ट प्राण्यांच्या नावाने ओळखले जाणारे व्यक्तिंचे समुदाय आहेत. मात्र त्यांनी माणूस म्हणून ओळखल्या जाणार्या सर्वसामान्य मानवांपासून स्वत:ची अशी एक वेगळी ओळख जपली आहे आणि त्यासाठी विशिष्ठ प्राण्यांची ओळखचिन्हे धारण केलेली आहेत.
हीच गोष्ट देव, राक्षस, दैत्य, दानव, असुर, गंधर्व, अप्सरा यांनाही लागू होते, हे सुद्धा व्यक्तिंचे समुदाय आहेत, मात्र या व्यक्तिंच्या समुदायाकडे स्वतःच्या अशा काही विशिष्ठ शक्ती होत्या. (उदा. या सर्वांकडे सुरा पिण्याचा अधिकार होता. तसेच देव, नाग, अप्सरा इत्यांदींकडे अमृत होते, ते जीवनमान वाढवत असे. तसेच देवांकडे, गंधर्वांकडे काही विशेष अस्त्रं होती, ती सर्वसामान्य माणसांकडे नव्हती.)
ह्या विशेष समुदायांपैकी फक्त देवांचा उल्लेख काही ठिकाणी निसर्गातल्या शक्ती किंवा दिव्य शक्ती (उदा. जमिनीवर वाहणारी गंगा नदी, आकाशातला तळपणारा सूर्य) म्हणून केलेला असतो, तर काही ठिकाणी उल्लेख केले गेलेले देवी / देव म्हणजे देवपदाचा मान मिळालेली प्रत्यक्ष एखादी व्यक्ती असते. उदा. शांतनूची पत्नी असलेली आणि देवी म्हणून ओळखली जाणारी गंगा ही विशेष स्त्री, तसेच कर्णाचा पिता सूर्य आणि पांडवांचे जन्मदाते यम, वायू, इंद्र, आश्विनीकुमार हे देवपद मिळालेले आणि त्यामुळे श्रेष्ठत्व लाभलेले विशेष पुरूष. अशा विशेष (दिव्य) दर्जा लाभलेल्या या देवसमुदायातल्या सर्व लोकांना देव म्हणून ओळखले जात असे. देवांमध्ये इंद्र, यम, वायू, अग्नी, वरूण इत्यादी देव म्हणजे देवांची पदे होती आणि वेगवेगळ्या काळात या पदांवर वेगवेगळ्या व्यक्ती विराजमान झालेल्या होत्या. त्यामुळे त्या त्या पदावर विराजमान असलेल्या देवाच्या सामर्थ्याप्रमाणे कालानुसार, व्यक्तीगणिक काही देवांचे महत्त्व कमी होत गेले, तर काही देवांना भलतेच महत्त्व आले. इंद्र, अग्नी, यम, वरूण इत्यादी देव हे लोकपाल म्हणून ओळखले जात असत, त्यांचे अधिकार एखाद्या मानव राजाच्या अधिकारापेक्षा मोठे मानले जात, मात्र ते सर्वसामान्य लोकांच्या राजांच्या राज्यकारभारात सहसा ढवळाढवळ करत नसत.
पांडव हे देवांपासून नियोगाने कुंती आणि माद्रीच्या पोटी जन्माला आले होते, तसेच द्रौपदी ही यज्ञसमयी अग्नीतून प्रकट झाली म्हणजेच ती अग्नीपदी विराजमान असलेल्या अग्नी या देवाची कन्या होती आणि त्या यज्ञात युवावस्थेत असलेल्या धृष्टद्युम्न आणि कृष्णा (द्रौपदी) या आपल्या अपत्यांचे अग्नीने द्रुपदाला दान दिले होते. त्यामुळे खांडववन जाळण्यासाठी ब्रह्मदेवाने मुद्दामच अग्नीला अर्जुन आणि कृष्ण या दोघांकडे जाण्यासाठी सांगितले होते, कारण अर्जुन जसा अग्नीचा जावई होता, तसाच तो देवांचा राजा असलेल्या इंद्राचाही पुत्र होता, त्यामुळे त्या दोघांना जोडू शकणारा तो एक महत्त्वाचा धागा होता.
खांडववनाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा झालेला होता. "राजा श्वेतकीच्या यज्ञात सतत बारा वर्षं चाललेल्या यज्ञकर्मातली आहूती घेऊन अग्नीला अपचन झाले होते आणि तो निस्तेज आणि बलहीन झाला होता," असा उल्लेख महाभारतात आहे. याचा अर्थ इतकाच की सतत यज्ञाच्या ठिकाणी उपस्थित राहून अग्नी हा देव (- व्यक्ती) कंटाळलेला होता. तेव्हा त्याला ब्रह्मदेवाने, "पूर्वी तू देवांच्या आज्ञेने देवशत्रूचे निवासस्थान, जे घोर खांडववन त्याला जाळलेस. तेथेच आता सर्व प्राणी सुखाने नांदत आहेत. त्यांच्या मेदाने तू तृप्त झालास म्हणजे पुन्हा आपल्या पूर्व स्वरूपास प्राप्त होशील. यास्तव तू आता सत्वर ते अरण्य द्ग्ध करावयास जा, म्हणजे तुझी ग्लानि नाहीशी होईल." अशी आज्ञा दिली, असा महाभारतात उल्लेख आहे. याचाच अर्थ असा होता, की याच अग्नीदेवाने पूर्वीही खांडववन जाळले होते. मात्र आता पुन्हा ते घोर अरण्यात रूपांतरीत झालेले होते. त्या अरण्यात देवांचे शत्रू असलेले राक्षस, दानव आणि नाग राहत होते. यज्ञाला कंटाळलेल्या अग्नीकडून देवांचे शत्रू मारण्याचे काम करून घ्यावे या हेतूने ब्रह्मदेवाने त्याला खांडववन दग्ध करायला तर सांगितलेच, पण त्यासोबत त्या अरण्यातले खरेखुरे प्राणी मारण्याचाही स्पष्ट आदेश दिला.
ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन देवांचे अधिकार देवांचा राजा असलेल्या इंद्रापेक्षाही जास्त होते, पण ते इंद्राच्या दैनंदिन राज्यकारभारात ढवळाढवळ करत नसत. ब्रह्मदेवाने आपल्या अधिकारात अग्नीला खांडववन दग्ध करायला तर सांगितले, पण तिथे इंद्राने त्याचा मित्र नागराज तक्षक याला आश्रय दिला होता. फक्त तक्षकच नव्हे तर तक्षकाच्या आश्रयाने तिथे देवांचे शत्रू असलेले राक्षस, दानव आणि नागही तिथे राहत होते. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनंतर अग्नीने सात वेळा खांडववन जाळण्याचा प्रयत्न केला, पण सातही वेळा वनातल्या नागांनी ती आग विझवली आणि तक्षकासाठी इंद्राने ती आग विझवण्यासाठी मदत केली आणि संरक्षणही पुरवले. म्हणजेच इंद्र ब्रह्मदेवाच्या अधिकारात हस्तक्षेप करत होता. या सर्व घटना अग्नी अर्जुनाला भेटण्याआधी घडलेल्या होत्या. म्हणजेच खांडववन जाळण्याची घटना खांडववनातल्या रहिवाशांसाठी नवी नव्हती, वन जाळण्याचा प्रकार पुन्हा होणार याची त्यांना कल्पना होती. पण इंद्र मदत करेल, या आशेवर ते निर्धास्त होते. हे सर्व पाहून अग्नी पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेला, तेव्हा त्याने योग्य वेळ आल्यावर अग्नीला अर्जुनाकडे पाठवले.
त्या काळातल्या समाजाच्या धारणांप्रमाणे व्यक्ती समाजकेंद्रीत विचार करत असत. समाज किंवा एखाद्या विशिष्ठ समुदायाचं हित लक्षात घेऊन गोष्टी केल्या जात असत, मात्र त्यात कोणा एखाद्या व्यतीचे व्यक्तिगत हित हे स्पष्टपणे दुय्यम मानले जात असे. व्यक्तीपेक्षा कुटुंबाचे हित मोठे, कुटुंबापेक्षा समुदायाचे हित मोठे मानले जात असे, त्यापायी एखाद्या व्यक्तीचा त्याग करणे किंवा वध करणे ह्यात काही आक्षेपार्ह मानले जात नसे.
उदा.
गंगेने अष्टवसुंसाठी आपल्या सात नवजात अर्भकांना नदीच्या प्रवाहात सोडून दिले.
दुर्योधनाच्या जन्माच्या वेळी अनेक अपशकुन झाल्याने भीष्म आणि इतर ज्येष्ठ सदस्यांनी धृतराष्ट्राला सल्ला दिला होता, की दुर्योधनाचा त्याग करावा.
मेनकेने शकुंतलेला सोडून दिले होते, तसेच कुंतीने कर्णाला सोडून दिले होते.
पूर्वी श्युनःश्येप नावाच्या ब्राह्मण मुलाला यज्ञात वरूणाला बळी देण्यासाठी बांधून ठेवले होते. विश्वामित्रांनी त्याला वरूणाची स्तुती करण्याचा मंत्र दिला. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन वरूणाने त्याला सोडून दिले.
पूर्वी एखाद्या नवजात अर्भकामुळे संकट येऊ शकते, असे वाटले, की त्या नवजात अर्भकाचा त्याग करत असत. तसंच यज्ञाच्या किंवा इतर काही निमित्ताने लहान मुलांचा असा बळी दिल्याच्या कथाही महाभारतातल्या उपकथानकांमध्ये आहेत.
कोणीतरी केलेल्या आकाशवाणीमुळे आतेभाऊ असलेल्या शिशुपालाने केलेल्या शंभर अपराधांनंतर श्रीकृष्णाने त्याला यज्ञप्रसंगी भर राजसभेत ठार केले. तो त्यासाठी यज्ञ संपण्याची वाट पाहत बसला नाही.
द्यूत खेळता खेळता झालेल्या वादात बलरामाने रूक्मिणीचा भाऊ असलेल्या रूक्मीचा वध केला, त्यावेळी रुक्मिणीला काय वाटेल याचा विचार त्याने केला नाही.
सगर राजाला एका राणीपासून साठ हजार पुत्र झाले, तर दुसर्या राणीपासून असमंजस नावाचा एकच मुलगा झाला. हा असमंजस लहान मुलांना नदीत बुडवून त्रास देतो हे ऐकल्यावर सगर राजाने त्याचा त्याग करून त्याला हद्दपार केले. मग सगर राजाचे साठ हजार पुत्र कपिल ऋषींच्या आश्रमात जळून भस्म झाल्यावर त्याने असमंजसाच्या अंशुमान नावाच्या मुलाला राज्यावर बसवले, पण असमंजसाला राजगादीचा अधिकार दिला नाही.
जिथे वेळप्रसंगी समाजासाठी / समुदायासाठी कुटुंबातल्या व्यक्तीला मारणे किंवा तिचा त्याग करणे निषेधार्ह मानले जात नव्हते, तिथे अग्नीने दान मागितल्यावर दूरचे का असेना पण नातेसंबंध असलेल्या नागांना अग्नीला आहूती देण्यासाठी बळी म्हणून ठार करण्यात अर्जुनाला काहीही वावगे वाटले नाही, यात नवल नाही. त्याकाळी स्त्री आणि अपत्यं ही पुरूषांची संपत्ती आहे असे मानले जात असे, तो पुरूष त्याच्या कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या आदेशाप्रमाणे वागत असे, कुटुंबातल्या लोकांच्या व्यक्तिगत इच्छेपेक्षा राजाने दिलेली आज्ञा जास्त महत्त्वाची असे, राजापेक्षाही लोकपाल असलेल्या देवांचा अधिकार मोठा होता आणि ब्रह्मा, विष्णु, महेश या देवत्रयीचा अधिकार त्यापेक्षाही जास्त मानला गेला होता. अशा समाजधारणांमध्ये वाढलेल्या अर्जुनाकडे अग्नीने खांडववन जाळण्याचे दान मागितल्यावर अर्जुनाला ते नाकारता येणं शक्य नव्हतं. ते जाळतांना फक्त त्यातल्या देवांच्या शत्रूंनाच नव्हे, तर इतर प्राण्यांना मारण्याची ब्रह्मदेवांची आज्ञा होती, म्हणून अर्जुनाने त्यातल्या कोणत्याही प्राण्यावर दया दाखवली नाही, याचा दोष संपूर्णपणे अर्जुनाला देता येणार नाही. खांडववन दग्ध करणे म्हणजे तिथल्या रहिवाशांशी युद्ध करणे नव्हते, तर ते बळी देणे होते त्यामुळे तिथल्या रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नव्हती. नंतर मदतीला आलेल्या इंद्राने युद्ध सुरू केले आणि स्वतःच्या पुत्राचा पराक्रम पाहून माघारही घेतली. (अर्जुनाऐवजी अग्नीने जर दुर्योधन किंवा शिशुपाल किंवा बलराम किंवा शाल्व किंवा द्रुपद इत्यादीपैकी कोणाकडेही मदत मागितली असती, तर त्यांनी अर्जुनाने जे केले, त्यापेक्षा वेगळे काही केले असते, असे तकालीन प्रथांचा विचार करता मला तरी वाटत नाही.)
शरण आलेल्या मयासुराला मात्र अर्जुनाने जीवनदान दिलं, तसे बाकीचे नाग, दानव, राक्षस अर्जुनाला शरण का आले नाहीत? असा प्रश्न पडतो. खांडववन काही एका दिवसात जळाले नाही. पंधरा दिवस ते जळत होते. त्याकाळात तिथल्या रहिवाशांना वनातून सुटकेचा एकही मार्ग मिळाला नाही, हे रहस्यमय वाटते. कारण जंगलात आग लागते, तेव्हा जंगलातले ओले लाकूड असलेले सदाहरित वृक्ष लगेच पेट घेत नाहीत. प्रथम जंगलातल्या वृक्षांच्या सुकलेल्या फांद्या एकमेकींना घासून त्यांची ठिणगी वाळलेल्या गवत किंवा पालापाचोळ्यावर पडते आणि गवत, पालापाचोळा पेट घेतो. आगीने उग्र स्वरूप धारण केल्यावर मग झाडांची कोवळी पाने आणि नवीन कोवळ्या फांद्या पेट घेतात. वार्याने आग पसरल्यास मग अतिउग्र आगीत हिरवे वृक्ष जळायला लागतात. अर्जुनाने बाणांनी वनाला आग लावली असा उल्लेख आहे, इतक्या मोठ्या वनाला बाहेरून सर्व बाजूंनी अशी आग लावायची की, त्यात कोणीही प्राणी बचावणार नाही, हे मदतीला जास्त लोक असल्याशिवाय शक्य नाही. एकतर यात जंगल जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माणसांचा सहभाग होता किंवा कदाचित अर्जुनाचा वंशज असलेल्या जनमेजयाला अर्जुनाचा पराक्रम सांगतांना तो अतिशयोक्तिने फुगवून सांगितला गेला असावा, ह्याची शक्यता जास्त आहे.
काहीही असलं, तरी खांडववन जाळण्याचा निर्णय राजकीय नव्हता हे निश्चित! हा निर्णय राजा असलेल्या युधिष्ठीराने घेतलेला नव्हता, तर तो फक्त अर्जुन आणि कृष्ण यांचा अग्नीला त्याचं दान देण्यासाठी घेतलेला निर्णय होता. युधिष्ठीराला खांडववन दग्ध करण्याचा निर्णय नेमका कधी कळला, ते वन द्ग्ध करण्याआधी की वन दग्ध केल्यावर, ह्याबद्दल निश्चित काहीही सांगितलेलं नाही, याचा अर्थ युधिष्ठीराचा या घटनेत थेट सहभाग नसावा असंच सूचित होतं. खांडवप्रस्थाचं राज्य मिळाल्यानंतर आहे त्या सपाट जमिनीवर पांडवांनी नगर वसवलं होतं. त्यानंतर इतक्या वर्षांनी खांडववन जाळण्याचा निर्णय पांडवांनी मिळून घेतला असता, तर इतरांचाही त्यात सहभाग दिसला असता. तसंच युधिष्ठीराने जंगलातल्या रहिवाशांचे बळी न जाऊ देता त्यांच्यासाठीही निवासाची काही सोय केली असती, निदान महाभारतातला युधिष्ठीर तितका न्यायप्रिय नक्कीच होता.
एक आश्चर्याची गोष्ट अशी, की खांडवदहनानंतर अश्वसेन अर्जुनाचा सूड घेण्यासाठी टपला होता, तक्षकही चिडलेला होता, पण नागकुलातले इतर नाग मात्र पांडवांना थेट दोष देतांना दिसत नाहीत, कारण हे काम देवांच्या आज्ञेने केल्यामुळे पांडवांना त्याचा थेट दोष लागत नव्हता. काही नागांनी अर्जुनाचा नागपुत्र इरावान ह्याला वाळीत टाकलं होतं, पण कौरव पांडवांच्या युद्धात बरेचसे नाग पांडवांच्या बाजूने इरावानाबरोबर कौरवसेनेशी लढले होते.
अजून एक -
काहीजणांना युधिष्ठीराचा राज्यावर अधिकार कसा हा प्रश्न पडला आहे, त्याचे मला झालेले आकलन खाली देत आहे.
आता प्रथम त्याकाळी राजा कसा निवडला जात असे ते पाहू,
१. राजाने कोणत्याही राजपुत्राला यौवराज्याभिषेक केलेला नसेल, तर त्याच्यानंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र हा त्याचा नैसर्गिक वारस मानला जात असे आणि त्या ज्येष्ठ पुत्राला राजगादीचा अधिकार मिळत असे.
२. काही विशेष कारणाने राजा त्याला योग्य वाटेल अशा कोणत्याही पुत्राला यौवराज्याभिषेक करून राजगादीचा अधिकार देत असे. (उदा.१ ह्याच अधिकारात कैकेयीने भरतला राज्य देण्याची मागणी दशरथाकडे केली होती. उदा.२ कौरव पांडवांचा पूर्वज असलेल्या ययाति राजाला यदु, अनु, द्रुह्यु, तुर्वसु, पुरू हे पाच पुत्र होते. ययातिने त्याच्या सर्वात कनिष्ठ पुत्राला पुरूला हस्तिनापुरच्या गादीवर बसवले आणि इतर चार ज्येष्ठ पुत्रांना इतर प्रदेशांची उपराज्ये दिली.)
३. एखादा राजपुत्र जन्माने ज्येष्ठ असला, तरी त्याला एखादे व्यंग असेल, तर अशा राजपुत्राला राजगादीवरचा हक्क नाकारला जात असे. (उदा. राजा शांतनूचा मोठा भाऊ देवापि याच्या अंगावर कोड असल्याने त्याला प्रजेने राजा म्हणून नाकारले. देवापि हिमालयात निघून गेला. देवापिचा धाकटा भाऊ बाल्हिक याने "मोठा भाऊ जिवित असतांना हस्तिनापूरच्या गादीवर बसणे योग्य वाटत नाही" असे सांगून राजगादीवरचा हक्क सोडला आणि मामाकडून मिळालेल्या राज्याचा राजा बनून तो हस्तिनापूरच्या राजसभेत मांडलिक राजा (उपराजा) म्हणून बसत होता. त्यामुळे बाल्हिकापेक्षाही वयाने कनिष्ठ असलेला शांतनू हस्तिनापूरचा राजा झाला.)
४. एखाद्या राजपुत्राला काही कारणाने प्रजेनेच राजा म्हणून नाकारले, तर त्याचा धाकटा भाऊ राजगादीचा हक्कदार ठरत असे.
५. जर काही कारणाने एकाच राजाचे दोन राजपुत्र राजगादीवर बसले, तर ह्या दोन्ही राजपुत्रांच्या मुलांचा राजगादीवर हक्क निर्माण होत असे. अशा वेळी ह्या चुलतभावांपैकी जो जन्माने ज्येष्ठ असे त्याला मुख्य राजगादीवर बसवले जाई व जो कनिष्ठ असे त्याला एखादे उपराज्य किंवा शक्य असेल, तर स्वतंत्र राज्य निर्माण करून ते दिले जाई. (उदा.१ राम वनवासात असतांना भरत अयोध्येचा राज्यकारभार पाहत होता. त्यामुळे राजगादीवर त्याचाही हक्क निर्माण झाला होता. पुढे रामाने भरताला तक्षशिलेचे स्वतंत्र राज्य दिले. उदा. २ वाली आणि सुग्रीव ह्या दोघांनाही किंकिष्धेवर राज्य करण्याची संधी मिळाली. पुढे सुग्रीव राजा झाला तरी किंकिष्धेचे युवराजपद मात्र वालीपुत्र अंगदालाच दिले गेले.)
ह्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते, की आधी पांडूचा आणि नंतर धृतराष्ट्राचा राजगादीवर हक्क प्रस्थापित झाल्याने युधिष्ठीर आणि दुर्योधन ह्या दोघांचाही राजगादीवर हक्क निर्माण झाला होता.
मात्र आधी धृतराष्ट्र हा अंध असल्याने राजा या पदासाठी अपात्र ठरला. त्याचा राजगादीवर कोणताही हक्क उरला नव्हता. त्यामुळे पांडू हा राजगादीचा एकमेव हक्कदार होता, त्या न्यायाने त्याला राजा करण्यात आले. पांडू हा धृतराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून राजगादीवर बसलेला नव्हता किंवा तो कार्यकारी राजाही नव्हता. पांडू हा राजपदासाठी असलेल्या नियमांनुसार राजगादीसाठी असलेला एकमेव हक्कदार होता. पण पांडूला मिळालेल्या शापानंतर उद्विग्न होऊन त्याने (केवळ राजगादीवर दुसरा कोणताही हक्कदार वारस नव्हता म्हणून) धृतराष्ट्राला राज्य दिले. राज्याचा त्याग करतांना त्या राजाचे हे कर्तव्य असते, की राजेपदावर नवीन योग्य राजाला बसवायचे, पण पांडू हे कर्तव्य पार पाडू शकला नाही त्यामुळे धृतराष्ट्र हा केवळ पांडूचा प्रतिनिधी असलेला कार्यकारी राजा राहिला आणि पांडूचे राजेपद अबाधित राहिले. त्यातूनही धृतराष्ट्राला आधी पुत्र झाला असता, तर राजपदावरचा त्याचा दावा त्या अव्यंग पुत्राच्या वतीने पक्का झाला असता. पण असे झाले असते, तरी पांडूने राज्यत्याग केल्यानंतरही त्याच्या पुत्रांचा राजगादीवरचा हक्क संपत नव्हता, कारण पांडूही काहीकाळ राजा होता, अशा परिस्थितीत धृतराष्ट्राला त्याला अर्ध्या राज्याचा वाटा द्यायला लागला असता. (उदा. युवराज झालेल्या भीष्माने राजगादीवरचा आपला हक्क सोडल्यानंतरही धीवरराजाने शंका काढली, की तुझे पुत्र राज्यावर अधिकार सांगतील, कारण युवराजपद म्हणजे भविष्यात राजेपद मिळण्याचा थेट हक्क असतो.) पण अशा काही पद्धतीने धृतराष्ट्राचा राज्यावर हक्क सिद्ध होऊ शकला नाही, कारण पांडू हा राजा जिवंत असतांना तत्कालीन समाजमान्य पद्धतीप्रमाणे औरस संतती मानले गेलेले त्याचे पुत्र पांडव जन्माला आले आणि त्यातला ज्येष्ठ पुत्र युधिष्ठीर हा दुर्योधनाआधी जन्माला आल्याने पांडूचा राजपदाचा आणि पर्यायाने पांडवांचाही हस्तिनापूरच्या मुख्य राजपदाचा हक्क अबाधित राहिला.
युधिष्ठीर जन्माने ज्येष्ठ असल्याने प्रथेप्रमाणे त्याला हस्तिनापूरची मुख्य राजगादी मिळावी असे भीष्माचे, कृपाचार्यांचे आणि द्रोणाचार्यांचे मत होते. (बाल्हिक (शांतनूचा मोठा भाऊ), बाल्हिकपुत्र सोमदत्त, सोमदत्ताचे शल, भूरिश्रवा इत्यादी तीन पुत्र हे सुद्धा त्याच मताचे होते. पण हस्तिनापूरचे मांडलिक असल्याने ते पुढे दुर्योधनाच्या बाजूने युद्धात लढले.) धृतराष्ट्रालाही ते दुर्योधनाचा जन्म झाला त्यावेळी मान्य होते, म्हणूनच त्याने दुर्योधनाच्या जन्माच्यावेळी राजसभेतल्या ज्येष्ठांना विचारले होते, की "युधिष्ठीरानंतर तरी माझा हा ज्येष्ठ पुत्र राजा होईल ना?"
युधिष्ठीर सरळ मनाचा असल्याने तो दुर्योधनाला त्याच्या हक्काचे उपराज्य किंवा एखादे स्वतंत्र राज्य देईल याची राजसभेतल्या ज्येष्ठांना खात्री होती, मात्र दुर्योधनाला हस्तिनापूरचा युवराज केले असते तर त्याच्या इर्ष्याळू स्वभावामुळे त्याने पांडवांना त्यांचा हक्क मिळू दिला नसता ह्याचीही ह्या ज्येष्ठांना खात्री होती. म्हणून गांधारीला कुंतीच्या आधी दिवस गेले असतांनाही युधिष्ठीर हा जन्माने ज्येष्ठ आहे, हे कारण पुढे करून त्यांनी युधिष्ठीराला यौवराज्याभिषेक करवून घेतला होता. प्रजेतही युधिष्ठीराची लोकप्रियता वाढत होती, हे पाहून दुर्योधन अस्वस्थ झाला होता, म्हणून त्याने लाक्षागृहात पांडवांना जाळून ठार करण्याचा कट रचला.
"पांडव हे कुंतीला नियोगाने झालेले पुत्र आहेत, म्हणून त्यांचा राजगादीवरचा हक्क मान्य नाही," हा दुर्योधनाचा दावा पोकळ होता. शिवाय दुर्योधनाचा हा दावा मान्य केल्यास राजगादीवरचा त्याच्या पित्याचाही हक्क संपुष्टात येऊन ती बाल्हिकपुत्र सोमदत्ताकडे आली असती.
पांडू राजा असतांना भीष्माने वंशपरंपरागत चालत आलेले जे राज्य टिकवले होते, त्या राज्यात स्वतःच्या पराक्रमाने भर घातली होती. त्याने आजूबाजूच्या राजांकडून जिंकलेली जमीन हस्तिनापूरच्या राज्यात समाविष्ट केली होती. धृतराष्ट्राला जरी मनातून युधिष्ठीराला राज्य द्यायचे नव्हते, तरी किमान पांडूने जिंकलेली जमीन तरी पांडवांचा पैतृक हक्क म्हणून त्याला द्यावीच लागली असती. युधिष्ठीराला यौवराज्याभिषेक झाल्यानंतर भीम आणि अर्जुनाने पुन्हा आजूबाजूच्या राज्यांवर विजय मिळवून त्यांची जमीन हस्तिनापूरच्या राज्यात समाविष्ट करत राज्यात भर घातली होती. इतके असूनही लाक्षागृह प्रकरणानंतर भीष्माने मध्यस्थी केल्यानंतर धृतराष्ट्राने नाईलाजाने खांडवप्रस्थाची पडीक, खडकाळ, जंगलयुक्त भूमी पांडवांना राज्य करण्यासाठी दिली होती. हा सरळसरळ पांडवांचा हक्क नाकारण्याचाच प्रकार होता. पण त्यातूनही पांडवांनी कष्ट करत, तत्कालीन प्रथांप्रमाणे राज्य करत राजसूय यज्ञ केला, हे त्यांचे यश कौरवांना बघवले नाही, म्हणूनच पुढे महाभारताचे युद्ध झाले.
@ दीपगृह, बापरे!! किती सुंदर
@ दीपगृह, बापरे!! किती सुंदर विवेचन केलेय आपण!! आपणांकडे असलेल्या ज्ञानास माझा शिरसाष्टांग नमस्कार.
दीपगृह......सुंदर आणि अभ्यासू
दीपगृह......सुंदर आणि अभ्यासू विवेचन.
परंतु, आपले, " धृतराष्ट्र हा केवळ पांडूचा प्रतिनिधी असलेला कार्यकारी राजा राहिला आणि पांडूचे राजेपद अबाधित राहिले. .." हे वाक्य थोडे पटले नाही. जेव्हा पांडूने राज्य त्याग केला व तो दोन भार्यांसह वनात जाऊन राहिला तेव्हा धृतराष्ट्र राजा झाला. त्याला तरी तो निर्विवाद पणे राजा झाला असेच वाटत होते. त्याने स्वतःला कधीही पांडूचा प्रतिनिधी असलेला कार्यकारी राजा (जसे पेशवे स्वतःला छत्रपतींचे सेवक समजत व त्याच भावनेने राज्य करीत!) समजले असे वाटत नाही! त्यामुळे त्याची तर राज्य हे दुर्योधनालाच मिळावे अशी स्वाभाविक इच्छा होती.
मुळ लेख व दीपगृह यांचे विवेचन
मुळ लेख व दीपगृह यांचे विवेचन सुरेख !!
दीपगृह फारच सुरेख विवेचन
दीपगृह फारच सुरेख विवेचन
पांडू राजा असतांना भीष्माने
पांडू राजा असतांना भीष्माने वंशपरंपरागत चालत आलेले जे राज्य टिकवले होते, त्या राज्यात स्वतःच्या पराक्रमाने भर घातली होती. त्याने आजूबाजूच्या राजांकडून जिंकलेली जमीन हस्तिनापूरच्या राज्यात समाविष्ट केली होती. धृतराष्ट्राला जरी मनातून युधिष्ठीराला राज्य द्यायचे नव्हते, तरी किमान पांडूने जिंकलेली जमीन तरी पांडवांचा पैतृक हक्क म्हणून त्याला द्यावीच लागली असती.
.................
हे पटले नाही... पराक्रम गाजवणे हे त्या पदाचे कर्तव्यच होते. मग ते करुन भविष्यात पुन्हा ते त्यागून त्याचा फायदा मागणे , हे चुकीचे आहे. शिवाय राज्यासाठी केलेले युद्ध हे टीमवर्क असते. एकटा पांडु गेला होता का लढायला ? हस्तिनापूरची सेना नव्हती ?
पैत्रक हक्क मागायचाच होता , तर लगेच का नाही मागितला ? विधवा बायको मुले घेऊन दीनवाणे तोंड करुन परतली, तेंव्हाच तो हक्क का नाही मागितला ? म्हणजे मुले मोठी होईस्तोवर मुले व तो भूभाग धृतराष्ट्राला सांभाळायला लावला , अन मग नंतर अचानक लचका तोडला ? अमका प्रांत माझ्या पराक्रमाने आणला, मी त्याचा राजा होणार , असे जो तो म्हणू लागला तर अखंड राष्ट्र राहू शकेल का?
ही मालिका मस्त आहे.
ही मालिका मस्त आहे.
दिपगृह ची पोस्ट ही छान
आणि पांडवांचा पैतृक हक्क...?
आणि पांडवांचा पैतृक हक्क...? पांडू कडे तर त्यांचे पितृत्वच नव्हते.
तसेच पांडू हा किती वर्षे राज्यावर राहीला असा? मुलं होण्या आधीच तर तो वनात गेला ना?
दीपगृह, अत्यंत सुंदर विवेचन!
दीपगृह, अत्यंत सुंदर विवेचन!
आणि पांडवांचा पैतृक हक्क...?
आणि पांडवांचा पैतृक हक्क...? पांडू कडे तर त्यांचे पितृत्वच नव्हते.>> त्या काळातील प्रथेप्रमाणे पांडव हे पांडूचे पुत्रच मानले जात होते.
तसेच पांडू हा किती वर्षे राज्यावर राहीला असा? मुलं होण्या आधीच तर तो वनात गेला ना?>>
मुलं झाली नाहीत, कधीच होणार नाहीत हे लक्षात आल्यावर तो हिमालयात गेला. पण तत्पूर्वी त्याने पराक्रमी राजा म्हणून कीर्ती मिळवली होती.
दीपगृह, दुसरी बाजू समर्थपणे
दीपगृह, दुसरी बाजू समर्थपणे मांडल्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन.
शक्य झाल्यास स्वतंत्र धाग्यांची मालिका लिहावी ही विनंती.
दीपगृह.. फार छान विवेचन.
दीपगृह.. फार छान विवेचन.
मूळात देव हि पदे, त्यांचे कार्यक्षेत्र.. त्या पदावर अनेक व्यक्ती येत असत का ?
त्यांची निवड कशी होते असे ?. अग्नी, वरुण यांचे नेमके सामर्थ्य काय होते ?
या सगळ्याच बाबतीत आपण फारच कमी जाणतो. नाही का ?
मजा येतेय ही मलिका वाचयला.
मजा येतेय ही मलिका वाचयला.
पुलेशु
दिपगृह, अतिशय सुरेख विवेचन.
दिपगृह, अतिशय सुरेख विवेचन. स्वतंत्र लेख होईल असं. अशा लेखनाने धाग्याला श्रीमंत येते. खुप खुप आभार.
गंगेने अष्टवसुंसाठी आपल्या सात नवजात अर्भकांना नदीच्या प्रवाहात सोडून दिले.
दुर्योधनाच्या जन्माच्या वेळी अनेक अपशकुन झाल्याने भीष्म आणि इतर ज्येष्ठ सदस्यांनी धृतराष्ट्राला सल्ला दिला होता, की दुर्योधनाचा त्याग करावा.
मेनकेने शकुंतलेला सोडून दिले होते, तसेच कुंतीने कर्णाला सोडून दिले होते.
पूर्वी श्युनःश्येप नावाच्या ब्राह्मण मुलाला यज्ञात वरूणाला बळी देण्यासाठी बांधून ठेवले होते. विश्वामित्रांनी त्याला वरूणाची स्तुती करण्याचा मंत्र दिला. त्या स्तुतीने प्रसन्न होऊन वरूणाने त्याला सोडून दिले.
पूर्वी एखाद्या नवजात अर्भकामुळे संकट येऊ शकते, असे वाटले, की त्या नवजात अर्भकाचा त्याग करत असत. तसंच यज्ञाच्या किंवा इतर काही निमित्ताने लहान मुलांचा असा बळी दिल्याच्या कथाही महाभारतातल्या उपकथानकांमध्ये आहेत.
मात्र वरील प्रतिपादनाबद्दल काही शंका आहेत.
अष्टवसूंनी स्वतःचं जन्म घेतल्यावर आपल्याला मारावे त्यामुळे पृथ्वीवर राहण्याची वेळ येणार नाही असे गंगेला सांगितले होते अशी कथा मी वाचल्याचे आठवते. भीष्माच्यावेळी शंतनुला अगदी राहावलेच नाही म्हणुन त्याने हटकले आणि गंगा त्या पुत्राला त्याच्या स्वाधीन करुन निघुन गेली. त्यामुळे येथे झालेल्या हत्यांना वेगळा संदर्भ आहे असे मला वाटते.
मेनकेने शकुंतलेला सोडणे आणि कुंतीने कर्णाला सोडणे यात मेनकेला विश्वामित्रांचे तप भंग करायला पाठवले होते आणि कुंतीला मंत्राविषयी औत्सुक्य होते या कथा आहेत. यात कर्णाचा किंवा शकुंतलेचा काहीही दोष नव्हता. या दोन्ही घटना कारस्थान आणि बेजबाबदारपणाच्या द्योतक आहेत अशी माझी समजूत आहे.
शुनश्येपावर तर मला अगदी स्वतंत्र लिहिण्याची इच्छा आहे. मूळ कथा ऐतरेय ब्राह्मणातली आहे. त्यातला लबाड हरिच्छन्द्र राजा नंतर पुराणांमध्ये सत्यवादी हरिच्छन्द्र झाला. यात खरं तर त्याचा मुलगा रोहित बळी जायचा पण एका दरिद्री ब्राह्मणाने बदली बळी म्हणून शंभर गायींच्या बदल्यात आपला मुलगा शुनश्येप दिला.
त्याला मारायला ऋषींनी नकार दिला तेव्हा आणखी शंभर गायींच्या बदल्यात बापच मारायला तयार झाला होता.
हे सर्व विवेचन करण्याचे कारण एखादी रुढी असल्याप्रमाणे किंवा नियम असल्याप्रमाणे अर्भकाचे बळी देणे किंवा हत्या करणे ही गोष्ट त्याकाळी सामान्य असावी असे वाटत नाही. अन्यथा ऋषींनी बळीसाठी नकार दिलाच नसता. मेनकेने शकुंतलेला सोडणे यात मला विश्वामित्राचा दोषच जाणवतो. आणि कुंतीचा दोष तर स्पष्टच दिसतो. त्यामुळे "जिथे वेळप्रसंगी समाजासाठी / समुदायासाठी कुटुंबातल्या व्यक्तीला मारणे किंवा तिचा त्याग करणे निषेधार्ह मानले जात नव्हते, तिथे अग्नीने दान मागितल्यावर दूरचे का असेना पण नातेसंबंध असलेल्या नागांना अग्नीला आहूती देण्यासाठी बळी म्हणून ठार करण्यात अर्जुनाला काहीही वावगे वाटले नाही, यात नवल नाही. " हे आपले प्रतिपादन पटणे कठीण आहे.
कारण वरील उदाहरणांमध्ये मोहवश झाल्यामुळे, स्वार्थामुळे ज्यांचा दोष नाही त्यांचा त्याग झाला आहे किंवा त्यांच्यावर मरण्याची पाळी आली आहे.
गंगेने ते पुत्र तिच्या
गंगेने ते पुत्र तिच्या पितृकुळाच्या स्वाधीन केले, असेही ऐकले आहे.
>>जिथे वेळप्रसंगी समाजासाठी /
>>जिथे वेळप्रसंगी समाजासाठी / समुदायासाठी कुटुंबातल्या व्यक्तीला मारणे किंवा तिचा त्याग करणे निषेधार्ह मानले जात नव्हते,<<
मला वाटतं कि वर उल्लेख आलेला आहे - त्या काळात असले प्रकार/प्रथा निषिद्ध न्हवते.
हे एक उदाहरण पहा - मायन्/इंका संस्क्रुतीत एक फुट्बॉल सारखा खेळ खेळला जाई. त्या खेळातल्या विजेत्याला आत्मबलिदान करावं लागे आणि ते तसं करत असत. प्रश्न असा उठतो कि जिंकलो तर मरावं लागणार, मग जिंका कशाला? (कॅन यु इमॅजीन हरायचंच ठरवलं तर कसला रटाळ खेळ होइल) पण तसला विचार त्यावेळेला कोणी करत असेल का हा संशोधनाचा विषय आहे. थोडक्यात खांडववनात हि समाज्/समुदाय (फॉर ए लार्जर कॉज) च्या भल्यासाठी त्याग करण्याला मान्यता/सन्मान दिला जात असे, असं मानायला हरकत नाहि...
थोडक्यात खांडववनात हि समाज्
थोडक्यात खांडववनात हि समाज्/समुदाय (फॉर ए लार्जर कॉज) च्या भल्यासाठी त्याग करण्याला मान्यता/सन्मान दिला जात असे, असं मानायला हरकत नाहि...
हे "लर्जर कॉज" काय होतं हेच माझ्या लक्षात आलेले नाही.
>>हे "लर्जर कॉज" काय होतं हेच
>>हे "लर्जर कॉज" काय होतं हेच माझ्या लक्षात आलेले नाही.<<
आताच्या काँटेक्स्ट मध्ये काहिहि नसावं. रुढी/परंपरा मुळे झालेल्या "ब्रेनवॉशिंग" चा त्यात महत्वाचा भाग असावा...
छान सुरु आहे ही मालिका.
छान सुरु आहे ही मालिका. बर्याच नवीन गोष्टी कळताहेत.
मोहाच्या झाडांचं जंगल आणि तिथे रहाणारे नाग लोक्/आदीवासी वगैरे वाचून एकदम नागपूर आठवलंच. आणि जवळच असलेलं खंडवा (मप्र) देखील. तसा संबंध नसेलही.
राज, त्या काळी आणि आजही त्या
राज, त्या काळी आणि आजही त्या संस्कृतीत मृत्यू म्हणजे काहीतरी शुभ आणि चांगले असे मानतात.
चक्क सेलेब्रेट करतात तो. इथे आफ्रिकन समाजातही मरणाचे फार दु:ख नसते.
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
------> परंतु, आपले, " धृतराष्ट्र हा केवळ पांडूचा प्रतिनिधी असलेला कार्यकारी राजा राहिला आणि पांडूचे राजेपद अबाधित राहिले. .." हे वाक्य थोडे पटले नाही. जेव्हा पांडूने राज्य त्याग केला व तो दोन भार्यांसह वनात जाऊन राहिला तेव्हा धृतराष्ट्र राजा झाला. त्याला तरी तो निर्विवाद पणे राजा झाला असेच वाटत होते. त्याने स्वतःला कधीही पांडूचा प्रतिनिधी असलेला कार्यकारी राजा (जसे पेशवे स्वतःला छत्रपतींचे सेवक समजत व त्याच भावनेने राज्य करीत!) समजले असे वाटत नाही! त्यामुळे त्याची तर राज्य हे दुर्योधनालाच मिळावे अशी स्वाभाविक इच्छा होती.
====> पूर्वीच्या काळी रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याची पूजा करणार्या एका भरताचा अपवाद वगळला, तर कार्यकारी राजे एखाद्या राजाप्रमाणेच सिंहासनावर बसून रोजचा राज्यकारभार करत असत, फक्त सिंहासनाचा खरा हक्कदार राजा परत आल्यावर किंवा सिंहासनाचा खरा हक्कदार वारस मोठा झाल्यावर त्याचे राज्य त्याच्या सुपूर्त करत. धृतराष्ट्राच्या बाबतीत त्याला पांडूने जेव्हा राज्यावर बसवले, तेव्हा ऋषींच्या शापामुळे (की मरणासन्न अवस्थेत असलेल्या ऋषींनी पांडू राजाची शरीरलक्षणे - पांडुरोग पाहून त्यानुसार केलेल्या भाकितामुळे?) पांडूला अपत्य होणार नाही, हे निश्चित होते. तसेच तेव्हा पांडू नियोगाच्या पर्यायाचा विचार करण्याच्या मनःस्थितीतही नव्हता. एकंदरच शारिरिक स्थितीमुळे विरक्त झालेला पांडू वनातून परत येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे धृतराष्ट्र स्वतःला निर्विवादपणे राजा मानत होता, फक्त त्याला पुत्र होण्याची खोटी होती. गांधारीला दिवसही गेले होते, पण गांधारी प्रसूत होण्याच्या आधीच कुंतीने नियोगाने युधिष्ठीराला जन्म दिल्याची बातमी आली. गांधारीलाही राज्यपदाचा मोह होताच, त्यामुळे युधिष्ठीराच्या जन्माची बातमी येताच गांधारीने स्वतःच्या पोटावर दगड मारत अपत्याला जन्म देण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने जन्माला आला तो मासाचा गोळा! त्याबद्दल व्यासांशी बोलतांना गांधारीच्या मनातली चीड, ती राज्याला खरा हक्कदार वारस देऊ शकली नाही याची खंत दिसून येते.
धृतराष्ट्र कार्यकारी राजा नसता, तर त्याचं अपत्य नंतर जन्माला आल्याने विशेष फरक पडला नसता, मग तो स्वतःच्या पुत्राला युवराजपद देऊ शकला असता आणि युधिष्ठीराला त्याने वाटणी म्हणून राज्याचा एखादा तुकडा तोडून दिला असता.
धृतराष्ट्र स्वतःला निर्विवाद राजा मानत राहिला, पण राज्यसभेतल्या सदस्यांच्या मते राज्यावर खरा अधिकार पांडूचा होता आणि धृतराष्ट्र केवळ कार्यकारी राजा होता. (जरी कार्यकारी राजा ही संज्ञा तिथे वापरली नसली तरीही!) धृतराष्ट्राने दुर्योधनाच्या जन्माच्यावेळी राजसभेतल्या ज्येष्ठांना विचारले होते, की "युधिष्ठीरानंतर तरी माझा हा ज्येष्ठ पुत्र राजा होईल ना?" हे विचारतांना त्याने नाईलाजाने का होईना स्वतःचं कार्यकारी राजा असणं मान्य केलं होतं. युवराजपदाचा निर्णय घेतांनाही त्याला राज्यसभेतल्या सर्वांशी विचारविनिमय करून त्यांच्या सल्ल्याने नाईलाजाने युधिष्ठीराला युवराज करावं लागलं. एक स्वतंत्र राजा म्हणून त्याला स्वतःच्या अधिकाराने त्याच्या मनात असलेला युवराज - दुर्योधन निवडता आला नाही, कारण तो कार्यकारी राजा होता. एकीकडे युवराजपदाचा हा निर्णय घेतल्यावर धृतराष्ट्राने गुप्तपणे दुर्योधनाच्या लाक्षागृहाच्या कटाला पाठिंबा दिला, त्यावेळी दुर्योधन त्याला सांगतो, की "मी धन देऊन काही मंत्री आपल्या बाजूने वळवून घेतले आहेत." धृतराष्ट्र जर स्वतंत्र राजा असता, तर त्याला दुर्योधनामार्फत असे धनाची लालूच दाखवून मंत्री स्वतःच्या बाजूने वळवून घ्यायची गरज पडली नसती, कारण स्वतंत्र राजा स्वतःच्या अधिकारात युवराज ठरवू शकत होता.
या घटनांवरून हे स्पष्ट होते, की धृतराष्ट्राच्या राज्यसभेतल्या मंत्रीगणांच्या दृष्टीने तो केवळ एक कार्यकारी राजा होता आणि राज्यावर हक्क युधिष्ठीराचा होता.
-----> पांडू राजा असतांना भीष्माने वंशपरंपरागत चालत आलेले जे राज्य टिकवले होते, त्या राज्यात स्वतःच्या पराक्रमाने भर घातली होती. त्याने आजूबाजूच्या राजांकडून जिंकलेली जमीन हस्तिनापूरच्या राज्यात समाविष्ट केली होती. धृतराष्ट्राला जरी मनातून युधिष्ठीराला राज्य द्यायचे नव्हते, तरी किमान पांडूने जिंकलेली जमीन तरी पांडवांचा पैतृक हक्क म्हणून त्याला द्यावीच लागली असती.
.................
हे पटले नाही... पराक्रम गाजवणे हे त्या पदाचे कर्तव्यच होते. मग ते करुन भविष्यात पुन्हा ते त्यागून त्याचा फायदा मागणे , हे चुकीचे आहे. शिवाय राज्यासाठी केलेले युद्ध हे टीमवर्क असते. एकटा पांडु गेला होता का लढायला ? हस्तिनापूरची सेना नव्हती ?
पैत्रक हक्क मागायचाच होता , तर लगेच का नाही मागितला ? विधवा बायको मुले घेऊन दीनवाणे तोंड करुन परतली, तेंव्हाच तो हक्क का नाही मागितला ? म्हणजे मुले मोठी होईस्तोवर मुले व तो भूभाग धृतराष्ट्राला सांभाळायला लावला , अन मग नंतर अचानक लचका तोडला ? अमका प्रांत माझ्या पराक्रमाने आणला, मी त्याचा राजा होणार , असे जो तो म्हणू लागला तर अखंड राष्ट्र राहू शकेल का?
====> पैतृक हक्काचे नियम त्याकाळच्या समाजात असलेल्या प्रथा आणि परंपरा, धर्मशास्त्रे इत्यादींचा विचार करून आखण्यात आलेले होते. सेनेमध्ये राजाचे स्थान हे शरीरामध्ये मेंदूच्या स्थानाइतकेच महत्त्वाचे असे. विशेष परिस्थितीत (आणीबाणी) राजाला सर्वाधिकार असत. राज्याच्या भूमीवरही राजाचाच अधिकार असे. त्यामुळे राजघराण्यात तर वेळप्रसंगी राज्याच्या वाटण्या होतच, पण राजाच्या पदरी असलेल्या इतर पराक्रमी पुरूषांनाही उपराज्ये दिली जात. (उदा. दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचे राज्य दिले, पुढे कर्णाने यज्ञासाठी अजूबाजूची सर्व राज्ये जिंकून ती दुर्योधनाला अर्पण केली, त्यामुळे राजसभेत दुर्योधन आणि कर्ण एकाच आसनावर बसल्याचाही उल्लेख आहे.) अशी उपराज्ये दिली नाहीत आणि त्या पराक्रमी पुरूषांना योग्य अंतरावर ठेवले नाही, तर विराट राजाप्रमाणे स्थिती होत असे. विराट राजा नुसता नामधारी राजा उरला होता आणि पराक्रमी कीचकापुढे तो काहीही करू शकत नव्हता. राज्य कीचकाच्या ताब्यात गेल्यासारखेच होते.
त्यामुळे एकापेक्षा जास्त पराक्रमी पुत्र असतील, तर राजा उतारवयात स्वतः राज्याची वाटणी करून त्यांना विविध राज्ये देत असे किंवा त्यांना शत्रूची राज्ये जिंकायला पाठवून त्या स्वतंत्र राज्याचे राजेपद देत असे. सर्वसाधारण परिस्थितीत ज्येष्ठ पुत्र राजा होई आणि इतर पुत्रांना त्या मोठ्या भावाच्या अधिकारातली छोटी छोटी राज्ये कालांतराने हळू हळू मिळत असत. यज्ञाच्या निमित्ताने किंवा पिढीजात वैरामुळे किंवा एखादी योग्य संधी आल्यानंतर राजांमध्ये युद्धे होत आणि मुख्य राजधानी तीच राहिली तरी राज्याच्या सीमा बदलत राहत. (राष्ट्राची संकल्पना तेव्हा वेगळी होती, आजच्यासारखा अखंड भारत डोळ्यापुढे ठेवून राजे विचार करत नसत.) त्यामुळे एकाच राजाचे दोन राजपुत्र राजगादीवर बसले, तर ह्या दोन्ही राजपुत्रांच्या मुलांचा राजगादीवर हक्क निर्माण होत असे.
पैतृक हक्क मागायचा झाला किंवा एखाद्याला युवराज बनायचे झाले, तरी त्यासाठी आवश्यक वय पार करून त्या व्यक्तीने युवावस्थेत पदार्पण केल्यानंतरच पैतृक हक्क किंवा युवराजपद मिळत असे. युधिष्ठीराने आधी कधीच धृतराष्ट्राकडे पैतृक हक्काची मागणी केली नव्हती. ती मागणी त्याच्या वतीने राज्यसभेतल्या सदस्यांनी करून त्याला युवराजपद दिले होते. द्रौपदी स्वयंवरानंतरही भीष्माने पांडवांच्या वतीने पैतृक हक्काची मागणी करत त्यांना खांडवप्रस्थाचे राज्य मिळवून दिले होते. पण द्युतानंतर अज्ञातवास पूर्ण केल्यावरही दुर्योधन राज्य परत करायला तयार नव्हता, तेव्हा पैतृक हक्क म्हणून पांडवांनी किमान पाच गावांची मागणी केली होती.
-----> आणि पांडवांचा पैतृक हक्क...? पांडू कडे तर त्यांचे पितृत्वच नव्हते.
तसेच पांडू हा किती वर्षे राज्यावर राहीला असा? मुलं होण्या आधीच तर तो वनात गेला ना?
====> पांडू पांडवांचा जन्मदाता पिता नव्हता, पण तत्कालीन प्रथेप्रमाणे पांडव हे पांडूचेच औरस पुत्र होते आणि त्यांना औरस पुत्रांना असलेले सर्व हक्क होते. त्यामुळे त्यांना पांडूचे पुत्र म्हणून पैतृक हक्क मिळवण्याचा पूर्ण हक्क होता. (आजच्या काळातल्या दत्तक पुत्राप्रमाणेच!)
पांडू अगदी अल्पकाळ राज्यावर राहिला, तरी त्याने पराक्रमाने इतर राज्ये जिंकली होती. तत्कालीन प्रथेनुसार राजा किती काळ, किती क्षण सिंहासनावर बसला हे महत्त्वाचे नव्हते, तर तो सिंहासनावर बसल्याने त्याच्या पुत्रांना पैतृक हक्क लाभला हे महत्त्वाचे होते.
-----> मूळात देव हि पदे, त्यांचे कार्यक्षेत्र.. त्या पदावर अनेक व्यक्ती येत असत का ?
त्यांची निवड कशी होते असे ?. अग्नी, वरुण यांचे नेमके सामर्थ्य काय होते ?
या सगळ्याच बाबतीत आपण फारच कमी जाणतो. नाही का ?
====> दुर्दैवाने याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे, पण वेगवेगळ्या मन्वंतरात वेगवेगळ्या पदांवर (उदा. इंद्रपद) बसलेल्या अनेक देवतांची नावे वाचायला मिळतात. एकेकाळी मानव असलेल्या नहुष राजाची इंद्रपदी निवड झाली होती, याची कथा वाचायला मिळते.
अग्नी, वरूण हे लोकपाल होते म्हणजे त्यांच्या ताब्यात असलेल्या अनुक्रमे आग्नेय, पश्चिम या दिशांच्या भूमीवर त्यांचे नियंत्रण असावे. त्याशिवाय अग्नी यज्ञात उपस्थित राहून देवांसाठी हवि घेत असे. अर्थात एकाच व्यक्तिला सर्व ठिकाणी यज्ञात उपस्थित राहणे शक्य नसल्याने अग्निकुळातील व्यक्ती सर्वसामान्य यज्ञात उपस्थित राहत असाव्यात आणि महत्त्वाच्या यज्ञात अग्निदेव स्वतः उपस्थित राहत असावा, असा माझा अंदाज आहे.
-----> गंगेने अष्टवसुंसाठी ......
...........मात्र वरील प्रतिपादनाबद्दल काही शंका आहेत...........
..........हे सर्व विवेचन करण्याचे कारण एखादी रुढी असल्याप्रमाणे किंवा नियम असल्याप्रमाणे अर्भकाचे बळी देणे किंवा हत्या करणे ही गोष्ट त्याकाळी सामान्य असावी असे वाटत नाही. अन्यथा ऋषींनी बळीसाठी नकार दिलाच नसता. मेनकेने शकुंतलेला सोडणे यात मला विश्वामित्राचा दोषच जाणवतो. आणि कुंतीचा दोष तर स्पष्टच दिसतो. त्यामुळे "जिथे वेळप्रसंगी समाजासाठी / समुदायासाठी कुटुंबातल्या व्यक्तीला मारणे किंवा तिचा त्याग करणे निषेधार्ह मानले जात नव्हते, तिथे अग्नीने दान मागितल्यावर दूरचे का असेना पण नातेसंबंध असलेल्या नागांना अग्नीला आहूती देण्यासाठी बळी म्हणून ठार करण्यात अर्जुनाला काहीही वावगे वाटले नाही, यात नवल नाही. " हे आपले प्रतिपादन पटणे कठीण आहे.
कारण वरील उदाहरणांमध्ये मोहवश झाल्यामुळे, स्वार्थामुळे ज्यांचा दोष नाही त्यांचा त्याग झाला आहे किंवा त्यांच्यावर मरण्याची पाळी आली आहे.
====> गंगेकडे अष्टवसुंनी विनंती केली म्हणून देवकार्यासाठी (अर्थात वसुंच्या समुदायाच्या हितासाठी) तिने तिच्या नवजात अर्भकांना मारले असे मला म्हणायचे आहे.
मेनका अप्सरा म्हणून (देवांच्या कार्यासाठीच) विश्वामित्रांचा तपोभंग करायला आली होती आणि त्यातून जन्मलेल्या शकुंतलेचा त्याग करून ती स्वर्गात निघून गेली म्हणून इथेही दूरान्वयाने देवसमुदायासाठी केलेल्या कार्याचा संबंध येतो.
कुंतीचा दोष होताच, पण तिनेही तत्कालीन समाजाच्या परंपरांचा विचार करत कर्णाचा त्याग केला होता.
श्युनःशेपाच्या बाबतीत दोष हरिश्चंद्र राजाचाच आहे.
इथे जे मेले आहेत किंवा ज्यांचा त्याग केला गेला आहे, त्यांचा काहीही दोष नव्हता हेही खरे आहे.
महाभारतातच सोमक राजाचीही कथा आहे. या राजाला शंभर राण्या होत्या, पण एकच जंतु नावाचा पुत्र होता. एकदा त्या जंतुला मुंगी चावल्यामुळे तो रडायला लागला आणि त्यामुळे त्याच्या सर्व राण्या दु:खी होऊन त्या पुत्राभोवती गोळा झाल्या. ते पाहून राजाला वाटले, की एकच पुत्र असणे हे धिक्कारार्ह आहे. त्याने शंभर पुत्रांची कामना केली, तेव्हा पुरोहिताने सांगितले, 'तुला शंभर पुत्र हवे असतील, तर त्यासाठी तुझ्या ह्या एका पुत्राला ठार करून त्याच्या चरबीचा होम कर. जितक्या राण्या त्याच्या धुराचा वास घेतील, तितके पुत्र तुला होतील. राजाने त्याप्रमाणे केले आणि त्याला शंभर राण्यांपासून शंभर पुत्र झाले.
ही कथा बहुधा वनपर्वात आहे. ही कथा प्रक्षिप्त आहे का, हे मला माहित नाही, पण या कथेत राजाच्या एका पुत्राचा बळी देण्यात आला आहे. शिवाय श्युनःश्येपाचीही कथा आहे. त्यावरून अशा प्रकारे बळी देण्याची पद्धत असावी, असे वाटते.
त्याशिवाय नागांनी तडजोड म्हणून दर दिवशी एका नागाने गरूडासाठी बळी जाणे ह्याचीही कथा आहे.
बकासुरासाठी रोज एका घरातली एक व्यक्ती बळी जात असे.
ह्या बहुतांश ठिकाणी बळी जाणार्यांचा काहीही दोष नाही, तरी ते बळी गेले आहेत. (अपवाद - श्युनःश्येप ह्याची सुटका झाली.)
खांडववनाच्या बाबतीत तिथे राहणारे ब्रह्मदेवाचे शत्रू होते आणि ब्रह्मदेवाला त्यांना मारायचेच होते. साम, दाम आदींचा उपयोग नसल्याने तिथे ब्रह्मदेवाने अग्नीला अर्जुनाकडे पाठवून दंड आणि भेद नीती अवलंबली. अर्जुनाकडे अग्नी आणि ब्रह्मदेवांनी दान म्हणून मदत मागितली होती, मदत मागितल्यावर ती करणे हे त्याचे कर्तव्य होते. जिथे लोकांना देवांकडे मदत मागावी लागते, तिथे देवांनी अर्जुनाकडे मदत मागणेअर्जुनासाठी गौरवास्पदच होते. मात्र जंगलातले खरेखुरे प्राणी जितक्या प्रचंड प्रमाणात मेले, तितक्या मोठ्या प्रमाणात तिथले रहिवासी मारले गेले नसावेत, जे देवांचे थेट शत्रू नव्हते त्यांनी तिथून यशस्वी पलायन केले असावे असा माझा अंदाज आहे, कारण इथे अर्जुनाने कोणत्या नागांना आणि राक्षसांना, दानवांना मारले त्यांची नावे कुठेही येत नाहीत. फक्त अश्वसेनाच्या आईचा उल्लेख येतो. त्यामुळे मूळच्या कथेवर अर्जुनाच्या पराक्रमाची अतिशयोक्त पुटे चढली असावीत. अर्थात हा फक्त अंदाज आहे.
-----> गंगेने ते पुत्र तिच्या पितृकुळाच्या स्वाधीन केले, असेही ऐकले आहे.
====> पितृकुळ म्हणजे जन्मलेल्या अष्टवसुपैंकी सात जण स्वर्गात त्यांच्या स्थानी परत गेले अशी कथा आहे.
------> >>हे "लर्जर कॉज" काय होतं हेच माझ्या लक्षात आलेले नाही.<<
आताच्या काँटेक्स्ट मध्ये काहिहि नसावं. रुढी/परंपरा मुळे झालेल्या "ब्रेनवॉशिंग" चा त्यात महत्वाचा भाग असावा...
====> बहुधा असेच असण्याची शक्यता आहे.
मात्र जंगलातले खरेखुरे प्राणी
मात्र जंगलातले खरेखुरे प्राणी जितक्या प्रचंड प्रमाणात मेले, तितक्या मोठ्या प्रमाणात तिथले रहिवासी मारले गेले नसावेत, जे देवांचे थेट शत्रू नव्हते त्यांनी तिथून यशस्वी पलायन केले असावे असा माझा अंदाज आहे, कारण इथे अर्जुनाने कोणत्या नागांना आणि राक्षसांना, दानवांना मारले त्यांची नावे कुठेही येत नाहीत. फक्त अश्वसेनाच्या आईचा उल्लेख येतो.
सामान्य रहिवासी मोठ्या प्रमाणात मारले गेले असतील. म्हणूनच उल्लेख नसणार.
Pages