मेथी मसाला (भाजी)

Submitted by योकु on 10 April, 2017 - 13:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- दोन जुड्या मेथी
- दोन मध्यम कांदे
- दोन मध्यम आकाराचे, पिकलेले पण फर्म टोमॅटो
- ७/८ पाकळ्या लसूण
- तिखट
- हळद
- धणा-जिरा पावडर (दोन्ही मिळून अर्धा ते पाऊण चमचा)
- मीठ
- तेल
- थोडं मोहोरी + जिरं
- आवडत असतील तर दोन सुक्या लाल मिरच्या
- चिमूटभर हिंग

क्रमवार पाककृती: 

- मेथी नीट निवडून, जाड देठं काढून टाकावीत. नंतर धूवून सुकवून बारीक चिरावी. (निवडणे, धुणे आणि सुकवण्याचा वेळ कृतीत धरलेला नाही).
- कांदे चौकोनी मध्यम चिरावे
- टोमॅटो धूवून बारीक चिरून घ्यावे
- लसणी सोलून घ्यावी
- लसणीच्या पाकळ्या + हवं तितकं तिखट + चिमटीभर जिरं + चिमटीभर मीठ हे बारीक वाटून घ्यावं
- जाड बुडाच्या भांड्यात तेल तापत ठेवावं
- तेल तापलं की त्यात मोहोरी + जिरे, हिंग, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालून खमंग फोडणी करावी. यात कांदा घालावा.
- कांदा गुलबट सोनेरी रंगावर आला की टोमॅटो घालावा
- या मसाल्याला तेल सुटलं की कोरडे मसाले घालावे - लसणीचं तिखट, हळद, धणा-जिरा पावडर
- हे सगळं नीट परतून घ्याव म्हणजे हळद, तिखटाचा कच्चेपणा जाईल
- यात आता मेथी घालावी आणि परतावं
- मीठ घालावं, चव घातलेली आवडत असेल तर चिमटीभर साखर घालता येते
- मीठ घातल्यावर मेथीला पाणी सुटतं त्यात ती शिजते. झाकण घालून एक वाफ काढावी. पाणी असेल तर आटवून भाजी सुकी करावी.
- गरम भाजी ताजे फुलके, वरण-भात, भाकरी यांसोबत मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तसं
अधिक टिपा: 

ही भाजी शिजून कमी होते
अगदी हिरवी अशी शिजल्यावर राहात नाही पण चवीला मस्त लागते
सेम अश्याच पद्धतीनी चवळीच्या पानांची, तांदूळजाची भाजी होते
लसणीचं तिखट उरलंच तर वरण, उसळींमध्ये वापरता येते
लसणीच्या तिखटानी एक वेगळी मस्त चव येते त्यामुळे ते करावंच
मसाला भाजीच्या प्रमाणात असेल तर लय भारी भाजी होते Happy

माहितीचा स्रोत: 
बायडी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.. ( इथे मेथी नाहीच मिळायची, इतर भाज्यांवर प्रयोग करीन ) मेथीची पालेभाजी, चिरली नाही तरी चालते.
फक्त पाने खुडून घ्यायची.