गाठ
लहानपणी, खरंतर बरंच मोठं झाल्यावरही, मला धड गाठ मारता येत नसे. मारलीच तर आयत्यावेळी सहज सोडता येईल याची खात्री नसे. त्यामुळे लग्नाबिग्नात लेंगा टाईप काही घातलं की धावपळ ठरलेली. ‘तुमची बुटाची नाडी सुटल्येय’ हे अजूनही दिवसभरात २-४ वेळा ऐकायला लागतच, कुठे सगळ्यांना सांगत बसणार! नंतर एन.सी.सी. मध्ये गेल्यावर झाडाला बांधायची, कड्यावर चढताना बांधायची, हिच् आणि अशा शंभर गाठी शिकवल्या. त्या गाठी मारताना आणि कुणी मारत असलेलं बघताना मात्र जाम मजा यायची. त्या दिसायला ही इतक्या सुंदर दिसत की बघत राहाव्या वाटत (चुकून बांधत बसव्या वाटत लिहिणार होतो). माणसाने या गाठीचा कुठे कुठे वापर केलाय याचा विचार केला तरी उत्तेजित व्हायला होतं आणि गंमत वाटते.
पूवी आजी टाईप बायका काही लक्षात ठेवायचं असेल तर पदराला गाठ बांधून ठेवत असं वाचलेलं/ चित्रपटात पाहिलेलं आहे. अती प्राचीन काळी याच गाठी हे माहिती साठवण्याचं साधन होत. दक्षिण अमेरिका, चीन, इंका आणि इतर संस्कृतींमध्ये ते किती कर भरायचा, कुणाकडे किती जनावरं आहेत इ. साठी वापरलं जायचं. वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी, त्यामध्ये ठेवलेलं अंतर इत्यादी निदर्शक ठरवून दशमान पद्धतीनुसार घात (पॉवर) मिळून संख्या ठरवल्या जात असतं. त्या संख्या वाचायला काही विशेष यंत्र वापरली जात.

किपू दोऱ्याचं चित्र साभार: https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/cc/Quipu.png
हे एका अशा दोराचं चित्र. काही शतकांपूर्वी याचा उपयोग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कर वसुली, जनगणना आणि जीडीपी ही ठरण्यात होत असे.
गणितात तर गाठी शास्त्र (नॉट थेअरी) अशी एक शाखाच आहे, अर्थात गणितातल्या गाठीच्या दोऱ्याची दोन्ही टोकं एकमेकांना जोडलेली असतात. विविध नवीन गाठी शोधून काढताना, आपण शोधलेली गाठ आणखी सोपी केली तर आपल्याला पूर्वी माहित असलेलीच एखादी गाठ तयार होत्येय का संपूर्णतः नवीन गाठ शोधलेली आहे हे पडताळणे फार महत्त्वाचे ठरते. हे शोधणे शक्य आहे आणि त्याचे अनेक प्रयत्नही झाले आहेत. हा गाठ सोडवण्याचा प्रश्न किती ‘कठीण’ आहे ते पडताळणे म्हणजेच ते करणं पॉलिनॉमिअल वेळात (P) शक्य आहे? का त्याचं उत्तर एन.पी. म्हणजेच तसं शक्य नाही ते ठरवणे यावर तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. आज अशा ६ बिलियन (सहाशे कोटी) प्राईम नॉटस अस्तित्वात आहेत. प्राईम कारण प्राईम नंबरची जशी आणखी फोड करता येत नाही तसच.
या गाठीनी आपल्या कपड्यांपासून गगनचुंबी इमारतींना बांधून ठेवलंय. निसर्गतः डीएनए, आरएनए, प्रोटीन्स इत्यादी ठिकाणी गाठी मारलेल्या ही दिसतात, पण हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे गेल्या आठवड्यात शास्त्रज्ञांनी एक वेगळी गाठ बांधण्यात यश मिळालंय. (ते पब्लिश गेल्या आठवड्यात केलंय). ती आहे रेणूंची गाठ (मोलेक्युलर नॉट). यात रसायनशात्रज्ञानी परीक्षानळीमध्ये विविध रासायनिक अभिक्रिया एकामागोमाग एक करून सूक्ष्म अणूंचे एकमेकात बंध तयार करून एक साखळी-रेणू तयार केलाय. आजवर या ६ बिलियन माहित असलेल्या प्राईम गाठींपैकी फक्त ३ _तीन _ गाठी मारण्यात मानवाला यश आलेलं. यातली पहिली गाठ शोधाली ती Jean-Pierre Sauvage यांनी. त्यांना गेल्याच वर्षीचा (२०१५) रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार विभागून मिळाला होता; भविष्यातील मोलेक्युलर मशीनचे काही भाग निर्माण केल्याबद्दल. त्यागाठीला ट्रीफोईल किंवा पत्यातील किल्वर सारखे ३ लूप होते. त्यानंतर तब्बल २५ वर्षे शास्त्रज्ञांना आणखी कुठलीच गाठ मारण्यात यश आलं न्हवतं. गेल्या काही वर्षांत शास्त्रज्ञांना आणखी काही गाठी मारण्यात यश आलं आहे जसं आठच्या आकड्याची गाठ आणि किल्वर सारखीच पण पाच तुरे असलेली गाठ.

पेंटा फॉईल गाठ. सौजन्य: https://www.newscientist.com/article/dn21132-single-molecule-ties-itself... साभार.
आता त्यात चौथ्या गाठीची भर पडली ती आहे केल्टिक नॉट, आणि ती शोधली आहे डेव्हिड लीह (David Leigh) आणि इतर मँचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी.
फोटो एनपीआर वरून साभार. http://www.npr.org/sections/thetwo-way/2017/01/12/509353074/scientists-h...
आपण नेहेमी गाठी मारतो तशा या गाठी अर्थातच मोलेक्युलचे धागे ओढून मारता येत नाहीत तर त्या मारायला रासायनिक प्रक्रिया करून बरोबर त्या जागी ते अणू येऊन त्यात बंध निर्माण व्हावे लागतात. ही गाठ असे ३ बंध एकमेकांत गुंतून तयार झाली आहे, शाळेतल्या मुली तिपेडी वेणी घालतात तशी. हे शक्य झाल्याने आता यापुढे आणखी नवनवीन प्रकारच्या एकमेकांत ओवलेल्या गाठी, आणि पुढेमागे कदाचित रासायनिक बंध तयार करून विणकाम इत्यादी करण्याची शक्यता प्रत्यक्षात येण्याची कवाडं खुली झाली आहेत. ही नवीन गाठ आजवरची सगळ्यात घट्ट गाठ आहे, कारण कमीत कमी लांबीचा दोरा वापरून जास्तीत जास्त वेळा त्याचे पीळ एकमेकांवरून गेले आहेत. यात दोऱ्याची लांबी आहे १९२ अणू, २० नॅनोमीटर आणि या नव्या गाठीत आठ ठिकाणी धागे एकमेकांवरून गेले आहेत, जे आजवर फक्त ३ वेळा करणे शक्य होते. क्लोरीन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि इतर मूलद्रव्यांचे आयन्स ठराविक प्रमाणात आणि निर्धारित प्रक्रियेने एकत्रकरून ही एकसंध बहुपेडीय रचना तयार करण्यात आली आहे.
खालील युट्युब लिंकवर त्रिमितीय व्हीडीओ बघता येईल.
ही नवी गाठ बांधून जो काही पदार्थ निर्माण होईल त्याचे मूलभूत गुणधर्म काय असू शकतील हे त्याची टेन्साईल स्ट्रेन्थ, आकार, घनता, तन्यता आणि अनेक बाबीवर आणखी संशोधन झालं की समजतीलच. हे संशोधन आणखी अनेक मानव निर्मित पदार्थ तयार करण्यात रसायनशास्त्राने घेतलेली झेप ठरेल यात शंका नाही. यातून कदाचित एकदम दणकट पण कमी वजनाचे आणि छोटी घडी करून ठेवता येईल असे कापड तयार करता येईल जे कदाचित बुलेट प्रुफ जॅकेटमध्ये वापरलं जाईल. किंवा नवीन प्रकारचं प्लास्टिक तयार होईल,कदाचित इलेक्ट्रोनिक्स चिप तयार करण्याच्या प्रक्रियेत याचा उपयोग होईल किंवा ... कदाचित याचा काहीच उपयोग आज लगेच सापडणार नाही. उपयोग सापडो न सापडो एक गाठीची नवनिर्मिती तीही इतक्या सुंदर गाठीची झालेली आहे.
इथे ली(ह) ग्रुपच्या संशोधनाबद्दल आणखी वाचता येईल.
शेवटी पुलं सारखं काहीतरी चमकदार (आणि क्लिशे) वाक्य लिहायचं तर आपण या जगात पाउल टाकतो ते नाळेची गाठ सोडवून आणि या जगातून जातो ते तिरडीवर बांधलेल्या करकचून गाठीतून. आणि त्या मध्ये जन्मभर पुरातील असे विविध नात्यांचे पाश, अनेक तर गुंतेच. काही सहज सुटणारे, काही अणुकुचीदार हत्याराने शल्यकर्म केल्याशिवाय न विरघळणारे, काही सोडवूनही बोच कायम ठेवणारे, काही कधी सुटूच नये असे वाटणारे, आणि काही हे 'होते’ असं सुटल्यावरच जाणवणारे. त्यातच आणखी एका गाठीची भर!
सुरेख लेख! आत्ताच फेसबुकवर
सुरेख लेख! आत्ताच फेसबुकवर यासंदर्भात वाचलं! आता व्हिडिओ बघते.
खुपच इंटरेस्टींग टॉपिक आणि
खुपच इंटरेस्टींग टॉपिक आणि त्यावरचा माहितीपूर्ण लेख. शेवट खूप आवडला (तोपर्यंत लेख पर्सनेबल(?) वाटत नव्हता. शेवटच्या पॅराग्राफ ने अचानक कनेक्ट व्हायला झालं.
ह्या विषयात अज्ञान असल्यामुळे लेख वाचून १-२ प्रश्न पडले.
१. >> ते पडताळणे म्हणजेच ते करणं पॉलिनॉमिअल वेळात (P) शक्य आहे?
हे थोडं उलगडून सांगणार का? तू दिलेली लिंक वाचली नाही. त्यात असेल का ह्याचं स्पष्टीकरण?
२. >> फक्त ३ _तीन _ गाठी
ही टायपो नसेल तर असं का लिहीलं आहे?
३. >> ज्या तीन गाठींचा शोध ह्याआधी लागला होता त्या तीन गाठी अशाप्रमाणे का? आठच्या आकड्याची, ट्रिफॉईल (किलवर आकार) आणि पेंटा फॉईल?
सशल,
सशल,
१. P वि. NP हा संगणक शास्त्रातला (आणि गणितातला) अजूनही न सोडवला गेलेला प्रश्न आहे. जो हा प्रश्न सोडवेल त्याला मिलियन डॉलर बक्षीस क्ले इंस्टीट्युट देणार आहे. इतर मिलेनियम प्रश्न इथे बघता येतील. https://en.wikipedia.org/wiki/Millennium_Prize_Problems.
थोडक्यात सांगायचं तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर संगणकाला पडताळायला ठराविक वेळ लागणार असेल तर तो प्रश्न सोडवायला ही ठराविक (पोलिनोमिअल) वेळ लागेल का? https://en.wikipedia.org/wiki/P_versus_NP_problem
२. _तीन_ असं ६बिलियन मधून फक्त तीन हे ठसवण्यासाठी लिहिलंय.
३. हो.
धन्यवाद.
>> ते पडताळणे म्हणजेच ते करणं
>> ते पडताळणे म्हणजेच ते करणं पॉलिनॉमिअल वेळात (P) शक्य आहे?
हे थोडं उलगडून सांगणार का? तू दिलेली लिंक वाचली नाही. त्यात असेल का ह्याचं स्पष्टीकरण? >>>
सशल, ``दिलेल्या दोन गाठी ही एकाच गाठीची वेगवेगळी रूपे आहेत किंवा नाही, हे (गाठीचा `साईझ' पॅरामीटर धरला तर त्या पॅरामीटरमध्ये) पॉलिनॉमिअल टाईममध्ये सांगता येईल का?'' असा प्रश्न आहे. तो अजून होकारार्थी किंवा नकारार्थी सोडवता आलेला नाही. अधिक माहितीसाठी माझा `नॉट थिअरी'वरचा लेख मदत करू शकेल.
ज्या तीन गाठींचा शोध ह्याआधी लागला होता त्या तीन गाठी अशाप्रमाणे का? आठच्या आकड्याची, ट्रिफॉईल (किलवर आकार) आणि पेंटा फॉईल? >>>>>
मला वाटतं अमितने लेखात हे थोडं जास्त क्लीअर केलं पाहिजे. त्याला बहुधा `रसायनशास्त्रातील रेणूंनी मारलेल्या' गाठींबद्दल म्हणायचे आहे. साध्या दोर्याने ३ पेक्षा जास्त गाठी सहज मारता येतील.
लेख मस्त झाला आहे, अमित. एकदम
लेख मस्त झाला आहे, अमित. एकदम रोचक आणि रंजक. धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल.
छान लेख !
छान लेख !
अमित आणि भास्कराचार्य,
अमित आणि भास्कराचार्य, धन्यवाद!
इन्टरेस्टिंग! हे मोलेक्युलर
इन्टरेस्टिंग! हे मोलेक्युलर गाठ प्रकरण माहित नव्हतं!
इंटरेस्टींग विषय. लेख नीट
इंटरेस्टींग विषय. लेख नीट समजण्यासाठी परत एकदा वाचावा लागेल.
ते जरा केल्टीक गाठ करणार का?? Celtic चा उच्च्चार केल्टीक असा आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
सुमुक्ता, बदल केला आहे.
मस्त लेख, अमितव.
मस्त लेख, अमितव.
बापरे, हाच का तो केमिकल
बापरे, हाच का तो केमिकल लोच्या. नीट समजायला उद्या फ्रेश मूडमध्ये पुन्हा वाचायला लागणार. आता थोडेथोडेसेच समजले. ते आठ वेळा धागा एकमेकांवरून मोजूनही पाहिले
छान लेख.
छान लेख.
मस्त लिहलयं ! माहितीपूर्ण लेख
मस्त लिहलयं ! माहितीपूर्ण लेख. शेवटचा पॅराही आवडला.
छान लेख. तसा कठीण विषय, पण
छान लेख. तसा कठीण विषय, पण छान सांगितलाय्त.
लेख मस्त झाला आहे, अमित. एकदम
लेख मस्त झाला आहे, अमित. एकदम रोचक आणि रंजक. धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल. >>> +१
नवीन (ताजी ताजी) माहिती
नवीन (ताजी ताजी) माहिती दिल्याबद्दल आभार.
शेवट सुंदर!
मस्तय माहिती. मोलेक्युलर गाठ
मस्तय माहिती. मोलेक्युलर गाठ हे प्रकरण मलाही माहिती नव्हतं.
माहीती पुर्ण लेख...
माहीती पुर्ण लेख...
छान लेख, माहितीपूर्ण आणि रंजक
छान लेख, माहितीपूर्ण आणि रंजक शैली.
Mazya tai chya ghara shejaril
Mazya tai chya ghara shejaril ek bai kadhi kadhi ek naral jalat aste tichya darasmor kdhi kdhi ek naral (coconut) ardh jaltana thevlel ast he kay ahe te naral continously jalat ast bghun khup awkward vatt....kahi karni vgere ahe ka
माहीती पुर्ण लेख
माहीती पुर्ण लेख
नाविन्यपुर्ण लेख. शेवटही
नाविन्यपुर्ण लेख. शेवटही क्लिशे काय कायसा झालाय.
लेख वाचुन मेंदुला गाठी आल्या.
लेख वाचुन मेंदुला गाठी आल्या.
मोलेक्युलर गाठ इंटरेस्टिंग वाटलं वाचायला.
खूपच माहितीपूर्ण लेख . आवडला
खूपच माहितीपूर्ण लेख . आवडला.
सुरेख लेख!
सुरेख लेख!
छान माहिती.... लेख आवडला.
छान माहिती.... लेख आवडला.
भयंकर इंटरेस्टिंग! आवडला लेख.
भयंकर इंटरेस्टिंग! आवडला लेख. तीन गाठींबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर भास्कराचार्यांच्या खुलाशाने मिळाले.