ग्रीन पपाया सॅलड / Green Papaya Salad

Submitted by अंजली on 6 December, 2016 - 15:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कच्च्या पपईचे लांबट पातळ काप (julienne) २ कप
२ गाजरांचे लांबट पातळ काप (julienne)
लांब चवळीच्या शेंगा ३-४ किंवा कोवळ्या श्रावण घेवड्याच्या शेंगा ६-७ मध्यम तुकडे करून
१ मध्यम टोमॅटो मध्यम तुकडे करून
३ लसूण पाकळ्या
२ थाई मिरच्या
३ टेबलस्पून लिंबाचा ताजा रस
४ टेबलस्पून पाम शुगर किंवा ब्राऊन शुगर किंवा गूळ
१ टेबलस्पून सोया सॉस
मीठ
३ टेबलस्पून भरड बारीक केलेले, भाजलेले शेंगदाणे
थोडी कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

एकदा थाई रेस्टॉरंटमधे कच्च्या पपईचं सॅलड खाऊन बघितलं आणि या पदार्थाच्या प्रेमातच पडले. तोपर्यंत कच्ची पपई चवीला कशी लागेल या शंकेनं कधी त्याच्या वाटेला गेले नव्हते. मग घरी प्रयोग करून बघायला सुरूवात केली. मूळ पारंपारीक कृतीत कोलंबीची पेस्ट, फिश सॉस इत्यादी घालतात. शाकाहारी असल्यानं फिश सॉसला काय पर्याय आहे, पाम शुगरला काय पर्याय आहे ते शोधत, ऑफिसमधल्या थाई मैत्रिणीला विचारत प्रयोग करत गेले. मूळ कृती अतिशय सोपी आहे आणि घरात सगळे घटक पदार्थ असतील तर १५ मिनीटांत सॅलड तयार होतं. बरोबर ग्रील्ड भाज्या (झुकिनी, मश्रूम्स, स्वीट बेल पेपर्स) आणि ब्राऊन राईस असेल तर पौष्टीक, पूर्ण जेवण होतं.

पपईचे साल काढून घ्या. पपईचे लांब, पातळ काप करण्यासाठी किसणी वापरू नका. त्याऐवजी julienne tool मिळते ते वापरावे.

गाजराचेही julienne tool वापरून काप करून घ्यावेत.

पपईचा कीस/काप १० मिनीटे बर्फाच्या पाण्यात घालून ठेवावा. त्यानं पपई छान क्रंची राहते.

पारंपारीक कृतीत लाकडाच्या मोठ्या उखळ / खलबत्ता सदृश्य भांड्यात सगळे पदार्थ घालून लाकडाच्याच बत्त्यानं हलके कांडत/कुटत एकत्र करतात. माझ्याकडे तसा खलबत्ता नसल्यानं मी दगडी खलबत्ता वापरून लिंबाचा रस, मिरच्या, पाम शुगर, लसूण, थोडी कोथिंबीर, चवळीच्या शेंगा, टोमॅटो एकत्र केलं.

एका मोठ्या बाऊल मधे सगळं मिश्रण काढून सोया सॉस घातला. नीट मिसळून घेतलं. चव बघून मीठ, सोयासॉस, पाम शुगर adjust केलं.

त्यात पपईचा कीस पाण्यातून काढून, पूर्णपणे निथळून घेऊन घातला, गाजर घालून नीट मिसळून घेतले.

वरून थोडी कोथिंबीर आणि बारीक केलेले दाणे घातले. सॅलड बरोबर झुकीनी, यलो स्क्वॉश आणि मश्रूम्स ग्रील करून घेतले.

वाढणी/प्रमाण: 
२-३ लोकांसाठी
अधिक टिपा: 

बरोबर ब्राऊन राईस घेतला तर पूर्ण जेवण होते.
Non veg कृतीसाठी सोया सॉस ऐवजी फिश सॉस घालावा. थोडे सुकवलेले श्रिंपही घालतात. तसंच ग्रील्ड भाज्यांऐवजी ग्रील्ड श्रिंप घ्यायचे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक थाई कृती / इंटरनेट/ स्वप्रयोग / थाई मैत्रिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> चवळीच्या शेंगांचं काय खास महत्त्व आहे
अशी सॅलडं का खायची त्याचं रिमाइंडर म्हणून. Proud

मस्त रेसिपी आणि फोटो. Happy

ते चवळीच्या शेंगांचं काय खास महत्त्व आहे>> चवीसाठी असावी. लाल मिरच्यांमुळे सॅलड बर्‍यापैकी तिखट होते. तो तिखटपणा कमी करायला घालत असावेत. बाकी त्याची खास, वेगळी चव लागत नाही. खलबत्त्यात हलके कुटल्यामुळं क्रंचीही रहात नाही.

सायो, स्नो पीजपण चालतील (चालतील काय, धावतील)
गुगलवरून अपलोड केले आहेत फोटो. पब्लिक अ‍ॅक्सेस आहे. काय चुकलं असेल? Uhoh

दिसायला तर मस्त वाटतं आहे !! खायला पण क्रंची चांगलं लागेल बहुतेक ! फिश सॉस आणि श्रींप घालायची कल्पना आवडली Wink

हुश्श, फाफॉक्सवर फोटो दिसतायत. मस्त, यम्मी. बाहेरच्या पपाया किंवा मँगो सॅलडला थोडासा फिशी वास असतोच.

सायो सफारी वर दिसतायत फोटो
मस्त सॅलेड! फोटो पण छान, ज्युलियन करायचे उपकरण आवडल. परवा मास्टरशेफ मधे पण हेच सॅलेड बनवायच चॅलेन्ज होत , थाइ लाल मिरच्या हिरव्या मिरच्या पेक्षा कमि तिखट असतात का? एकदा हिरव्या आणलेल्या काहिच्या काही तिखट असतात.

थाइ लाल मिरच्या हिरव्या मिरच्या पेक्षा कमि तिखट असतात का>> नाही, उलट जास्त तिखट असतात. मी मिरच्या लिंबाच्या रसात ३-४ वेळा बत्त्यानं चुरडून नंतर काढून टाकल्या.

बस्के, फोटोंचा काय प्रॉब्लेम असावा कळत नाहीये...

सायो एशियन मध्ये असेलच पण wlamart, इंग्रो मध्ये पण बघितलाय.
फोटोत दाखवलेल्या किसाच सॅलड करून झाल्यावर उरलेल्या पपईचं काय केलं?

सायो, कुठल्याही एशिअन, कोरीअन किंवा अगदी पटेलमधेही पाहिला आहे. इकडच्या वॉलमार्टात किंवा हॅरीस टिटर मधे पिकलेल्या पपया पाहिल्या आहेत.

अमित, उरलेली पपई फॉईलमधे गुंडाळून फ्रीझमधे ठेवली. पण २-३ दिवसात संपवायला लागेल नाहीतर मऊ पडायला लागते, मग बारीक julienne होत नाहीत. त्याचं लोणचं वगैरेपण करता येईल. किंवा थालिपीठमधे घालून संपवायची. मला वाटतं दिनेशनी कच्च्या पपईच्या काही रेसिप्या दिल्या होत्या.

http://www.maayboli.com/node/49399 इथे बघ, पपईच्या अजून काही रेसेपीज आहेत.

वॉव माझ फेव्हरेट.

-बिन्स न टाकता करते पण पपई कधी कधी थोडीसी पिकलेली निघते आणि मग लगदा होउन जातो. पुढच्यावेळी बर्फात टाकुन करुन बघणार.

अंजली, मस्त रेसिपी आहे. फोटो पण कातिल आहेत. अगदी तोंपासु. अतिशय आवडतं सॅलड आहे. थाइ रेस्टॉ. मधे गेलो की हमखास खाल्लं जातंच.

इथल्या एशियन दुकानात अशी julienne tool नी कापलेली पपई, गाजर दोन्ही मिळते. दोन्हीचा साइज खूप मोठा असतो. त्यामुळे आणलं जात नाही. आता हे julienne tool आणलं पाहिजे.