कोबीच्या वड्या

Submitted by टवणे सर on 15 October, 2016 - 15:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ १/२ कप बारीक चिरलेला कोबी. मिक्सरमधून काढला तर उत्तम.
१ कप बेसन
४ चमचे तीळ
चवीनुसार मीठ
१ चमचा लाल तिखट किंवा २ बारीक चिरलेल्या मिरच्या
२ चमचे जिरे पूड
२ चमचे धने पूड
२ चमचे गरम मसाला
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
३ चमचे तेल. स्ट्राँग फ्लेवरसाठी मोहरीचे तेल वापरावे

क्रमवार पाककृती: 

कोबी, कोथिंबीर, सर्व मसाले, मीठ आणि तेल एका परातीत वा बोलमध्ये एकत्र करावेत.
त्यामध्ये १/२ कप बेसन व थोडे पाणी घालावे. मग लागेल तसे पाणी व बेसन घालून सैलसर गोळा भिजवावा.
हाताला गोळा चिकटत असेल तर थोडे तेल लावावे. मग ३-४ लांबसर (कोथिंबीर वडीला करतो तसे) रोल करावेत.
स्टीमरमध्ये पाणी घालून पाण्याला उकळी आणावी. एका प्लेटला तेल लावून त्यात तयार केलेले रोल्स ठेवावेत व ती प्लेट स्टीमरमध्ये ठेवावी. वरुन तीळ पेरावेत.
१५ मिनिटे हे रोल उकडावेत. गार झाले की फ्रीजमध्ये ठेवावे.

खाण्याच्या आधी वड्या शॅलो फ्राय वा फुल फ्राय कराव्यात. अर्थातच फुल फ्राय केल्या तर अधिक चांगल्या लागतात.

वाढणी/प्रमाण: 
६-७ लोकांसाठी
अधिक टिपा: 

राइस कूकरमध्ये वर स्टीमरची चाळणी घालून पार्चमेंट पेपरवर थोडा ऑइल स्प्रे मारुन वड्यांचे रोल्स उकडायला ठेवू शकता.

माहितीचा स्रोत: 
बायको
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीळ ,तेल वगळून थोडा कांदा,चिमूट्भर साखर घालून करते.रोल न करता भांडयातच ओतलेले मिश्रण उकडवून घेते.