‘प्रथम’- विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह आता लवकरच अवकाशात

Submitted by दीपा जोशी on 23 September, 2016 - 06:42

‘प्रथम’ विषयी -
२६ सेंटिमीटर लांबी रुंदी आणि उंची असलेला आणि ९.८ किलोग्रॅम वजन असलेला एक घन म्हणजे ‘प्रथम हा उपग्रह’.त्याला ३ अँटीना पण जोडलेले आहेत. त्याचे कार्य फॅराडे च्या सिध्दान्तावर वातावरणातल्या ‘इओनोस्फिअर‘ थरामधल्या इलेकट्रोन्स घनतेचे मोजमाप करणे’ असे आहे. या माहितीचा उपयोग करून जि पी एस
( ग्लोबल पोझीशनिंग सिस्टीम GPS ) द्वारा उपलब्ध होणारी माहिती अधिक अचूक आणि दोषविरहित स्वरूपात मिळू शकेल. २६ सप्टेंबरला सतीश धवन स्पेस सेंटर , श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण होऊन उपग्रह भारताच्या सेवेत रुजू होतोय.
Pratham2.jpgकसा बनला ‘प्रथम’
मुळात ही कल्पना आय आय टी मुंबई च्या एरोस्पेस इंजिनिअरिंग च्या दोन विद्यार्थ्यांची. २००७ साली आय आय टी मुंबईचे दोन विद्यार्थी शशांक तामस्कर व सप्तर्षी बंदोपाध्याय यांना एका कॉन्फरन्स मुळे आपणही उपग्रह तयार करू शकतो असे वाटले. या दोघांचे हा उपग्रहाचा ‘उद्द्योग’ करण्यामागचे उद्देश म्हणजे भारतात अवकाश व उपग्रह तंत्रज्ञान यांची अधिक माहिती उपलब्ध व्हावी, आणि उपग्रह बनवण्याची कौशल्ये अधिक विकसित व्हावीत असे होते. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दोघांनी बऱ्याच मेहनतीने उपग्रह बनवण्याची एक योजना तयार केली, आणि आय आय टी च्या प्राध्यापकांसमोर त्याचे सादरीकरण केले. सादरीकरण पाहून कल्पना खरोखरीच प्रत्यक्षात उतरू शकते अशी खात्री पटल्याने एरोस्पेस इंजिनीरिंग विभागाने त्यांना आवश्यक तो पाठिंबा द्यायचे कबुल केले. आता कामाला लागायचे तर आणखी काही जण मदतीला हवेत. मग एक टीम तयार करण्याचे ठरले. आय आय टी च्या विविध विभागातून विद्यार्थी निवडायचे ठरले. इतक्या पट्कन विद्यार्थी मिळणे तसे सोपे नव्हतेच. कारण अभ्यासाव्यतिरिक्त हे जास्तीचे काम करायचे होते ना! त्यासाठी एक प्रश्नावली तयार करून विद्यार्थ्यांना देण्यात आली, आणि ३३ जणांची टीम निवडण्यात आली.
शेवटी टीम तर तयार झाली. मग सगळे कामाला लागले, आणि एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या सर्व कामाचा आढावा लक्षात येईपर्यंत २००७ सालचा डिसेंबर महिना उगवला. अखेरीस जानेवारी २००८ पासून खरी कामाला सुरुवात झाली. लगेच पुढच्याच महिन्यात प्रकल्पाच्या उप विभागांचे मॅनेजर्स आणि लीडर्स यांनी बेंगलोरच्या ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन च्या सॅटेलाईट रिसर्च सेंटर’ ला भेट दिली. तिथे या सगळ्यांनी, लहान उपग्रह प्रकल्पांचे डायरेक्टर श्री राघव मूर्ती आणि त्यांची अभियंत्यांची टीम यांची भेट घेतली. त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचे पुनरावलोकन केले. अखेरीस, बऱ्याच चर्चा आणि परीक्षणानंतर मे २००८ मध्ये या उपग्रहाचे उद्दिष्ट, वातावरणातल्या ‘इओनोस्फिअर‘ थरामधल्या इलेकट्रोन्स घनतेचे मोजमाप करणे असे ठरले. पुढच्या वर्षी सुरवातीचे टीमचे सदस्य पास होऊन बाहेर पडल्याने नवीन सदस्य घेऊन काम पुढे चालू ठेवले गेले. तयार केलेली सर्व योजना आणि तिचा आराखडा प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’(इसरो) च्या सहयोगाने अद्ययावत होत गेला. जून २०१६ मध्ये अखेरीस, उपग्रह इसरो च्या सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्याने तो लाँच करण्यासाठी इसरो कडे सोपविला गेला. आता सप्टेंबर (26) अखेरीस PSLV-C35 च्या साहाय्याने वातावरणात ७२० किलो मीटर उंचीवर प्रक्षेपित करण्यात येणार आहे
प्रकल्पासाठी आय आय टी मुंबई च्या एरोस्पेस इंजिनिअरिंग व्यतिरिक्त मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अशा बऱ्याच विभागांचा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा महत्वाचा सहभाग असल्याने खऱ्या अर्थाने हा पूर्ण संस्थेचा उपक्रम ठरला आहे. प्राध्यापक पी एम मुजुमदार, प्राध्यापक हेमेंद्र आर्या , प्राध्यापक सुधाकर या वरिष्ठ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मोलाचे होते. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी चिकाटीने प्रयत्न केले तर किती मोठी झेप घेता येते , याचे हे उदाहरण आहे. २६ सप्टेम्बरला सकाळि ८.४० (भारतिय) वेळेनुसार हे प्रक्शेपण खालिल वेबसाईट वर आणि दुरदर्शन वर 'लाइव्ह टेलिकास्ट' दिसणार आहे.
http://www.isro.gov.in/pslv-c35-scatsat-1/pslv-c35-scatsat-1-mission

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००७ प्रकल्पाची सुरवात ते २०१६ उपग्रह प्रक्षेपणाकरिता तयार होणे, हा बराच मोठा कालावधी आहे. आय आय टी मुंबईचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या चिकाटीला सलाम!!! आणि इसरोने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे कौतुक!!! मेरा भारत महान!!!
आपणांस विनंती आहे कि ह्या लेखाला आपण सगळ्या प्रकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करावा.

सर्वान्चे आभार.
दुरदर्शन वर आज प्रक्शेपणाचे छान प्रसारण दाखविले. पन्त्प्रधानानि सुध्धा ट्विटर वर त्यान्चे अभिनन्दन केले आहे.