मनाचा उत्तम वैद्य -ध्यान (भाग ४)

Submitted by दीपा जोशी on 21 September, 2016 - 08:26

(संदर्भासाठी: गौतम बुद्धांच्या ध्यान पद्धतीवर संशोधन झाले असून, त्याचा उपयोग मानवी जीवनास व्हावा या हेतूने जगद्विख्यात वैज्ञानिक, मानसोपचार तज्ज्ञ, तत्वज्ञ, डॉक्टर्स, न्यूरो -सायंटिस्ट, यांची दलाई लामा यांच्याबरोबर ‘ माईंड अँड लाईफ XIII ‘ या नावाने २००५ साली अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सि येथे घेतल्या गेलेल्या परिषदेमधील काही वक्त्यांचे निवडक विचार येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे. परिषदेचा विषय होता ‘द सायन्स अँड क्लिनिकल ऍप्लिकेशन ऑफ मेडिटेशन’.)
वक्ते : जॉन कॅबॅट-झिन - १९७१ मध्ये ‘molecular biology’ मध्ये MIT(मॅसॅच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मधून नोबेल विजेते साल्व्हाडोर लुरिया यांच्या मार्गदर्शनाखालीं पी एच डी प्राप्त, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट च्या ‘स्कूल ऑफ मेडिसिन ‘ मध्ये प्रोफेसर म्हणून काम, मानसिक तणावासाठी ’माईंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन’ या आठ आठवड्याच्या कार्यक्रमाचे संस्थापक. ‘क्लिनिकल एप्लिकेशन ऑफ माईंडफुलनेस’ वर अनेक रिसर्च पेपर्स प्रसिद्ध . त्यांनी या कार्यक्रमा -अंतर्गत ऑलिम्पिक खेळाडू, न्यायाधीश, वकील, नेते, उद्योजक अशा विविध गटांना जगभर प्रशिक्षण दिले आहे. अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांची ३० भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या कामाबद्दल पारितोषिकांनी सन्मानित .
(‘माईंडफुलनेस’ ध्यान म्हणजे- क्षणो-क्षणी मनात येणाऱ्या विचारांची, शरीरात आणि बाह्य वातावरणात घडणाऱ्या घडामोडींची, ’चांगली’ अथवा ‘वाईट’ असे लेबल न लावता फक्त नोंद घेणे/ अवलोकन करणे. )

‘माईंडफुलनेस’ ध्यानाचा वैद्यकशास्त्र आणि मानसशास्तर यामध्ये उपयोग: ध्यानातून ताण निवारण .

मूलतः ’माईंडफुलनेस बेस्ड स्ट्रेस रिडक्शन’ अर्थात ‘एम बी एस आर’ हा कार्यक्रम, बुद्ध तत्वज्ञानातील ध्यानाच्या पद्धतीवर आधारित आहे. या ध्यान पद्धतीचे मूलतत्व आम्ही या पद्धतीने अशा लोकांसाठी विकसित केले आहे जे, बुद्धिस्ट अथवा अध्यात्मिक मार्गातून मिळवू शकत नाहीत पण ज्यांना तणावमुक्त जीवन हवे आहे, दुःखमुक्ती हवी आहे.
बोधिसत्वाने ‘अहिंसा’ धर्माचे प्रतिपादन केले आहे, तर वैद्यकामध्ये हिपोक्रॅट्स ने प्रतिज्ञा दिली आहे, त्यामध्ये ‘फर्स्ट डू नॉट हार्म ‘ अर्थात ‘कोणालाही दुखवू नका’ असेच सांगितले आहे. अहिंसेचे किंवा कोणालाही न दुखवण्याचे नैतिक तत्व अमलात आणण्यासाठी काही अंशी निःस्वार्थी पणा असावा लागतो. बुद्धाची ध्यान पद्धत आणि वैद्यक यांच्यामधला सारखा दुवा हाच आहे.
बरेच लोक म्हणतात कि आम्हाला ‘ध्यान’ जमत नाही. ‘एम बी एस आर’ हा कार्यक्रम अशा लोकांसाठी बनवला आहे ज्यांना ध्यान जमत नाही किंवा ज्यांच्या ध्यानाबद्दल काही विचित्र कल्पना आहेत. आम्ही याला ‘ताण - तणाव निवारण ‘ असे नाव दिले आहे कारण प्रत्येकजणच म्हणतो, “ताण -मलाही येतो. मलाही ताण कमी करायची गरज आहे.”
ताण-तणाव हे तात्पुरते आलेले असू शकतात किंवा खूप काळापासून असल्याने मुरलेले असू शकतात. गरज पडल्यास औषधांद्वारे अथवा मानस-रोग-चिकित्सकांकडून तात्पुरता ताण चांगल्या रीतीने हाताळता येतो . त्यांच्यासाठी ‘क्लिनिक’ची गरज नसते. पण खूप काळ मुरलेली ताणाची समस्या असेल , जी औषधांद्वारे पूर्णतः बरी होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी माञ ‘स्ट्रेस रिडक्शन क्लिनिक’ ची गरज भासते.
खूप मानसिक तणावाखाली असलेले लोक बऱ्याचदा म्हणतात, ‘हा अनुभव माझ्या -आयुष्याची बरीच वर्षे खातोय.’ वस्तुतः खरी परिस्थिती तशीच असते असे आता वैज्ञानिक पुरावे मिळाले आहेत. काही प्रकारच्या यातनांमुळे ,पेशीतील क्रोमोसोमच्या शेवटी असणाऱ्या ’टेलोमरेज’ या भागाची लांबी कमी होते असे आढळले आहे. हे टेलोमरेज पेशी विभाजनाशी संबंधित असतात. आणि त्यांची लांबी जेवढ्या झपाट्याने कमी होते, तेवढी आपल्या आयुष्याची दोरी देखील कमी होते!
म्हणूनच शारीरिक आणि मानसिक दुखण्यांमध्ये ढासळलेला तोल सावरायला, आधी मनावरचा ताण कमी करायला हवा.
‘मनाच्या सजग अवस्थेतून ताण निवारण’ ( ’माईंडफुलनेस- बेस्ड- स्ट्रेस -रिडक्शन’) करताना आधी ‘माइंडफुलनेस’
म्हणजे काय हे समजून घ्याल हवे. त्याची व्याख्या अशी करता येईल,’प्रत्येक क्षणाचे -चांगले / वाईट असा निवाडा न करता , हेतुपुरस्कर लक्ष देऊन केलेले अवलोकन. यामघ्ये मनाची जागरूकता मुद्दाम विकसित केलेली असते.’प्रत्येक क्षण तादात्म्याने जगणे - म्हणजे ‘माइंडफुलनेस’ . प्रत्येक क्षण जसा आहे तसा अनुभवताना सह्र्दयता आणि अनुकंपा हे अन्तरभूत गुण असतात.
‘एम बी एस आर’ ध्यानाच्या कार्यक्रमा- अंतर्गत आमचे अश्या वातावरण निर्मितीचे प्रयत्न असतात की, ज्यामुळे लोक आपले आयुष्य थोडे धीमे पणाने घ्यायला, आयुष्याची गती कमी करायला शिकतील. आम्ही प्रत्येक क्षणी शरीर आणि मनाच्या पातळीवर काय चाललंय याचे निरीक्षण करायला आणि, जशा असेल तशा वर्तमान क्षणाबद्दल एक प्रकारची जवळीक निर्माण करायला सांगतो. अश्या पद्धतीने, वर्तमान क्षणात सजग राहायला सुरुवात केल्यावर बऱ्याचदा लोकांना
आश्चर्य वाटते की, चालू क्षणामध्ये मन जवळजवळ हजर नसतेच. एक तर ते भूतकाळातल्या आठवणीत असते, किंवा भविष्याच्या काळजीत अथवा नियोजनात असते. या ध्यानाच्या सरावात काही काळ शान्तपणे बसून मनात काय चालले आहे हे पाहिल्याने जागरूक अवस्थेत राहणे जमू लागते.
‘एम बी एस आर’ कार्यक्रमात प्रत्येक कृती मन लावून करायची शिकवली जाते. अगदी साधी आणि नेहमीच्या परिचयाची
खाण्याची कृती सुरवातीला घेतली जाते. बऱ्याचदा, आपण काही खात असतो, पण आपले लक्ष माञ दुसरीकडेच गुंतलेले असते. ‘एम बी एस आर’ मध्ये सुरवातीला एखादे द्राक्ष दिले जाते. डोळ्यांनी ते पाहणे, त्याचा वास घेणे, हाताला होणारा त्याचा स्पर्श अनुभवणे, तोंडात टाकल्यावर लागणारी चव अनुभवणे, या सगळ्या जाणीव लक्षपूर्वक अनुभवण्यासाठी दहा मिनिटे दिली जातात.या प्रकारे परिचित गोष्टींचाही लक्षपूर्वक अनुभव घ्यायचा याची जोपासना करता येते. आपल्याला अगदी परिचित असणारी वस्तू नेमकी कशी आहे याबद्दल आपण बरेच अनभिद्न्य असतो. पण असे लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक अवलोकन करताना जणू जगच आपल्या पुढे उघडले जाते. अनुभवांची एक दिशा उजळली जाते. आपण एखादी वस्तू किंवा एखादी घटना पूर्वी अनुभवली असूनही नव्याने अनुभवतोय असे वाटते.
याच प्रकारे, घडोघडी चालणारा आपला श्वास, ज्ञानेंद्रियांच्या संवेदना,- नंतर विचार आणि भावना यांचे पूर्ण विश्व यांचेही -त्यामध्ये गुंतून न जाता , सजगतेने अवलोकन करण्याकडे वळायचे असते.
या रीतीने सगळ्या गोष्टी लक्षात घेणाऱ्या ’सजगता‘ अथवा ‘जाणिवे’ शीच जवळीक जोपासायची , आणि ही सजगता आपल्या रोजच्या आयुष्यात आणायची. रोजचे आयुष्य एक अनुभव म्हणून पाहायचे. खरी ध्यानाची सवय म्हणजे -ध्यानासाठी कसे बसता हे नसून, तुम्ही आयुष्य कसे सजगतेने जगता हे होय. प्रत्येक क्षणातली अशी चैतन्यमयता खरी महत्वाची असते.
‘एम बी एस आर’ मध्ये याबरोबरच सह्र्दयता , दयाळूपणा, जिवंत असल्याबद्दल कृतज्ञता (- भले समस्या आणि दुःख असेल तरीही..),जीवनाबद्दल उत्सुकता आणि स्वीकार यांच्यावरही भर दिला जातो.
शारीरिक यातना असतात त्यांच्याकडेही असेच पाहायला शिकायचे. याउलट आपण एरवी काय करतो? यातनांबद्दल विचारांचे एक जग निर्माण करतो. “किती वेदना होत आहेत. माझं सगळं आयुष्य यामुळे दुःखी झाले आहे. ‘माझं सगळं जीवन संपल्यागत झालं आहे’ वगैरे. पण हे सगळे नुसते विचार असतात. केवळ शब्द. आपण माञ हे विचार, हे शब्द म्हणजेच सत्य परिस्थिती आहे असे धरून चालतो. आणि मग भावनिक दुःखाचा भाग चालू होतो. निराशा वाटणे,चिडचिड वाटणे, आपलेच शरीर आपल्याला नकोसे वाटणे अशा भावना निर्माण होत राहतात. पण या भावनांकडेही, सुखकारक वा दुःखदायक भावना असो . निवाडा न करता नुसते पाहत राहिले, जागरूकतेने अवलोकन करीत राहिले की ,जणू काही जखमेवरच लागलेला बाण उपसून काढला असे होते. त्यामुळे, भावनिक दुःखामुळे आणखी होणाऱ्या वेदना टळतात. वेदनांकडे कसं पाहायचा दृष्टीकोन विकसित होऊ लागतो.
आपण जेव्हा असं म्हणतो, ‘जीव घेणाऱ्या वेदना किंवा दुःख ‘ त्याऐवजी असा विचार करायचा,’खरंच आपला जीव आत्ता या वेदनांमुळे जातो आहे का?’ आपलाच उत्तर येत, ‘नाही पण भविष्यात जाईल.’ पण आपण जर ठरवलेलंच असेल, की आत्ताच्याच क्षणात जगायचं; तर, भविष्यातले दुःख, दुसऱ्या क्षणातले दुःख काय असेल ते तेव्हाचे तेव्हा पाहू अशी मनोभूमिका विकसित होऊ लागते. बऱ्याच अंशी आपल्याला आत्ताच्याच क्षणात राहणे जमू लागते. या पद्धतीने- कोणत्याही ताणाला, शारीरिक अथवा भावनिक दुःखाला आपण यांत्रीक पणे अथवा विचार न करता - पट्कन प्रतिक्रीया देतो; त्याऐवजी जास्त सजगपणे, जाणीव पूर्वक (माइंडफुली) प्रतिसाद देतो. ताण - तणावाच्या त्रासदायक अनुभवापासून सुटका करून घेण्यासाठी झगडण्यापेक्षा, आपण अशा अनुभवाला सामोरे जातो. परिस्थिती अधिक जागरूकपणे हाताळायला शिकतो. त्यामुळे एकूणच अशा अनुभवाबरोबरच आपला नाते - संबंधच बदलतो.
या अभ्यासामुळे एक क्षण असा येतो ,की सगळ्या ताणापासून आपण एक प्रकारची मुक्ती अनुभवतो. त्याच मनात, त्याच शरीरात, त्याच आयुष्यात शांती निर्माण होते. आपले विचार, भावना, संवेदना यांचे नुसते सजगपणे अवलोकन करत राहिल्याने, शरीर- मनाचा आणि आयुष्याचा ढळलेला तोल सावरला जाऊ शकतो. ‘माझे’ दुःख, ‘माझे’ विचार, ‘माझा’ राग या सगळ्या ‘मी’ ‘मी’ च्या कोषातून ‘मी’ बाहेर पडतो. ‘एम बी एस आर ‘ प्रशिक्षणात लोकांना असे अनुभव आले आहेत की, ‘माझी’ शारीरिक अवस्था, ’माझी’ मानसिक आंदोलने यामधली ‘माझे’ म्हणून ओळख वाटण्याची तीव्रता अचानक कमी होऊ लागली आहे.
आता वळूया या प्रश्नाकडे कि , प्रत्येक क्षणात तादात्म्य पाऊन - सजगतेने तो क्षण जगण्याच्या ‘माइंडफुलनेस’ ध्यानाच्या अभ्यासामुळे वेदनेच्या शारीरिक स्वरूपामध्ये काही बदल होतो का? एखादी शारीरिक वेदना ज्या बिघाडामुळे निर्माण झाली त्या बिघाडात काही फरक पडतो का? आम्ही एका रुग्णाचा अभ्यास केला. त्याच्या बऱ्याच मोठ्या वेदनादायी आजाराची लक्षणे त्याच्या आठ आठवड्याच्या ध्यानाच्या प्रशिक्षणामुळे कमी झालेली आढळली. आणि ती पुढे एक वर्षापर्यंत टिकली . दुसऱ्या एका घटनेत, आठ आठवड्याच्या प्रशिक्षणामुळे लक्षणे कमी झालेली पुढे चार वर्षे टिकली. या प्रशिक्षणात स्वतःबद्दलची अनुकंपा, समजूतदारपणाची भावना आपल्या वागण्यात येते. त्यामुळेच, कितीही मोठ्या दुःखात , तणावाच्या प्रसंगात असताना आपण ते सहजपणे पेलू शकतो. म्हणूनच, ध्यान हे एक फक्त ‘रिलॅक्स’ होण्याचे तंत्र नसून स्वतःला स्वतःला शुध्ध स्वरूपात पाहण्याचे आणि त्यामध्ये स्थिर होण्याचा, स्वतःतच गुंतण्याच्या कूपमंडूक वृत्तीतून मुक्त होण्याचा एक मार्ग आहे.
१९९० पासून ‘एम बी एस आर’ प्रोग्रॅम- अमेरिका, कानडा सहित जगात बरयाच ठिकाणी घेतला जातो. ‘माइंडफुलनेस’ तंत्रातूनच ’माईंडफुलनेस- बेस्ड- कॉग्निटिव्ह थेरपी ‘(MBCT) चा उदय झाला आहे. अमेरिकेत जॉन हॉपकिन्स आणि जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर मध्ये मन आणि शरीर यांच्या एकमेकांच्या संबंधावर काम करणारे ’इंटिग्रेटीव्ह मेडिसिन’, हे नवे क्षेत्र अभ्यासलें जात आहे. इतरही अजून २९ विद्यापीठे त्यांच्याशी या क्षेत्रासंदर्भात संलग्न आहेत.
आजाराच्या उपचारासाठी ध्यानाचा उपयोग झालेल्या एका प्रयोगाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. कामाचा अथवा इत्तर कसलाही ताण असताना जर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले, तर त्यामुळे रोग-प्रतिकार शक्तीवर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला.
‘सोरायसिस’ या अति- तापदायक त्वचेच्या रोगाच्या उपचारात ध्यानाचा समावेश केला गेला. भावनांचा ताण वाढल्यास सोरायसिस चा उद्रेक होतो, त्वचेच्या एपिडर्मिस या थरामध्ये पेशींची अनियंत्रीत वाढ होते. या प्रयोगामागची मूळ कल्पना अशी होती की, सोरायसिस च्या उपचारात अतिनील किरणांच्या माऱ्यात शेक घेताना (हा अत्यंत तणावयुक्त असतो , कारण- त्यामध्ये ओव्हन मध्ये भाजल्या सारखे होते) रुग्णावर उपचारादरम्यान एक ताण निर्माण होतो; तो ध्यानाच्या अभ्यासामुळे कमी होतो का, आणि सोरायसिस बरा करण्यासाठी त्याचा काय उपयोग होतो , हे पाहणे. रुग्णांमध्ये दोन गट केले होते. एक गट नियमितपणे ध्यान करणाऱ्यांचा; आणि दुसरा ध्यान न करणाऱ्यांचा. पहिल्यांदा केलेल्या या प्रयोगाचे निष्कर्ष विश्वास न बसण्याइतके सकारात्मक आल्याने परत दुसऱ्यांदा हा प्रयोग करण्यात आला. दोन्ही वेळा प्रयोगांचे निष्कर्ष आले की -ध्यान करणाऱ्या गटातील लोकांचा सोरायसिस जलद गतीने बरा झाला. सांख्यिकी पृथ्थकरणानंतर असे दिसले कि, ध्यान करणारा गट, ध्यान न करणाऱ्या गटापेक्षा चौपट गतीने बरा झाला. मनाचा प्रभाव पडून, ध्यान करणाऱ्या गटाचा सोरायसिस लवकर बरा झाला असेल का?
वरील प्रायोगिक चाचणीवरून असे दिसते की , ध्यान करणाऱ्या गटाच्या मनामध्ये अश्या काहीतरी घडामोडी होत होत्या , की त्यांचा हा रोग बरा होण्यावर खूप खोलवर प्रभाव पडला. पेशी नियंत्रित करणाऱ्या जनुकावर असेल, चेता संस्थेवर असेल, एंडोक्राइन संस्थेवर असेल, रोग प्रतिकारक शक्तीवर असेल, किंवा या सगळ्यावर मिळून असेल- आम्हाला नक्की
काय झाले ते माहित नाही.
तसे असेल तर कर्करोगासारख्या दुर्घर रोगा साठी ध्यानात्मक उपचार पध्धतीचा उपयोग होऊ शकतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय उत्तम लेख,.......
ध्यान करणे म्हणजे नक्की काय व त्यामागची शास्त्रीय कारणे हे अचूकपणे मांडलंय

दीपा
हा ध्यान प्रकार कुठे शिकता येईल?

खरेतर या विषयवर बोलण्याचा माझा काही संबंध नाहीये. पण पुढील वाक्य वाचल्यावर जे सुचले ते मांडतोय

>>>>> ’प्रत्येक क्षणाचे -चांगले / वाईट असा निवाडा न करता , हेतुपुरस्कर लक्ष देऊन केलेले अवलोकन. <<<<<

ज्याक्षणी आजुबाजुच्या परिस्थितीचे/घटनांचे चांगले/वाईट असा निवाडा करु लागु, त्याक्षणी आपणही त्या बर्‍यावाईट परिस्थिती/घटनांमधे पहिल्यांदा मानसिक व पुढच्या पायरीला शारिरीक दृष्टीने गुंतुन पडु लागू.
असे जर केले नाहि, म्हणजेच केवळ साक्षीभूत होऊन अवलोकन केले, तर मात्र आपण बाह्य जगापासुन अलिप्त बनत जाऊ.
आपण जितके जास्त अलिप्त व तटस्थ बनत जाऊ, तितक्या जास्त प्रमाणात आपणांस "स्वार्थरहित आत्मभान" येत जाईल .
मग हे आत्मभान म्हणजे काय? तर हिंदू धर्मपद्धतीनुसार हाच तो द्वैताकडून अद्वैताकडचा प्रवास होय. असे माझे मत.