" संभ्या आज पहाटेलाच एफ सी रोडला येऊन बसला होता. कारणच तसं होतं. कालच रात्री त्याला त्याच्या दोस्तानं मस्त 'आयड्या' दिली होती. थोड्याच वेळाच्या कामांने त्याचे पुढच्या ८-१० दिवसांच्या इतके पैसे जमणार होते. आज पुण्यात 'सह्याद्रीचे शिलेदार - १० किमी' ची रेस होती. सकाळी रेस सुरू झाल्यावर साधारण अर्ध्या तासात काम सुरू करायचं ते पुढच्या ४ तासात संपून जाणार होतं. त्याला शिर्क्यानं सांगून ठेवलं होतं, उगाच आळस करू नकोस. चांगल्या १५-२० गोण्या तरी घेऊन ये. त्यानं बजावून सांगितल्यामुळे रात्रीत मागून जमतील तितक्या सर्व गोण्या घेऊन तो बरोबर ७ वाजता जागेवर हजर झाला होता.
रेस सातला सुरू झाली आणि सगळे लोक जोरात पळू लागले. संभ्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे तो नुसता बघतच होता. शिर्क्याने त्याला पळायला सांगितले. म्हणाला,"चल पटापट पाय उचल. दोनच्या बोर्डाला पाण्याचा सटॉप हाय." दोघेही धावत २ किमी च्या बोर्डपर्यंत पोचले. एकतर इतक्या गोण्या घेऊन फिरायचं. आणि तेही इतकं धावत. दोन किमी च्या बोर्डाजवळ पाण्याचा स्टोप होता. बराच वेळ होऊन गेल्याने बरीच लोकं तिथून पुढे निघून गेली होती. आजूबाजूला छोट्या छोट्या पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे प्लास्टिकचे ग्लास पडले होते. बरेचसे तिथे ठेवलेल्या कचऱ्याच्या पेट्यांमध्येही होतेच. रस्त्यावर पाणी सांडून ओला झाला होता. संभ्या वाकून पडलेल्या बाटल्या, कप एकेक करत गोणीत भरायला लागला. शिर्क्या पण होताच सोबत.
मधेच फटकन एक पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर आला. घाबरून त्यानं वर बघितलं. एक जाडजूड पंचविशीतला पोरगा कसाबसा जोर लावून पळत होता. पाणी पिऊन त्याने ग्लास फेकला तो संभ्याच्या तोंडावर बसला. तोंडातून एक शिवी पडेपर्यंत तो पोरगा पुढं निघून गेला होता. शिर्क्याने त्याला समजावलं. "असू दे रं. ही असली जाडी माणसं पळून बारीक व्हय साठी तर अशा स्पर्धेत जात्यात. तू आपलं काम कर. "
पण संभ्याला प्रश्न होताच,"ही रेस म्हंजी तर काय रं. पळून झाल्यावर काय नंबर येतोय का? "
शिर्क्या," हा असतोय की नंबर. आणि बाकी लोकाला मेडल पण मिळतं. त्यांना मधीच थान लागली तर म्हून पानी देत्यात. म्हून तर इतक्या जोरात पळत्यात. आन पानी पिऊन ग्लास तसाच टाकून जात्यात. आपल्याला काय? आपलं धा दिवसाचं प्लास्टिक मिळतं आपल्याला. "
संभ्या जमेल तितक्या गोण्या भरून एका बाजूला ठेवत होता.
शिर्क्याने त्याला सांगितलं,'ह्ये बघ. त्या अर्ध्या पाण्याच्या बाटल्या आहेत ना, त्या येगळ्या ठेव. घरी जाऊन त्यातलं पानी गोळा करून प्यायला घेता येतं. "
संभ्याने मग त्या थोडं थोडं पाणी असलेल्या बाटल्या वेगळ्या ठेवल्या. हळू हळू करत ते चार किलोमीटरच्या टप्प्याला आले होते. त्याने पुन्हा विचारलं शिर्क्याला,"पन हे सह्याद्रीचे शिलेदार काय म्हनं?"
"आरं आता आपण हिथं राहतोय. आपल्या हिथं किती डोंगर आहेत आजूबाजूला. आपल्या देशाची शान आहयेत ना त्ये. डोंगरावर लोकं जाऊन घान करत्यात. कधी झाडं तोडून नासधूस करत्यात. आनी आता या दुष्काळानं पाऊस बी नाय डोंगर वाचवायला. आपला सह्याद्री आपली शान हाय. त्याला जपायला लोकास्नी सांगायला ही रेस हाय.",
शिर्क्या मोठ्या माणसासारखं समजावून सांगत होता.संभ्याला काय कळत नव्हतं. आपण हिथं बसून डोंगराचं रक्षण कसं करणार आणि त्याचा पळण्याशी काय संबंध? आणि असेही तो कधी डोंगरावर गेलाच दोस्तांसोबत तर आपला डबा घेऊन जायचा आणि पाण्याची बाटली. परत येताना परत. पाण्यासाठी अशा बाटल्या विकत घ्यायच्या का आणि टाकायच्या का? हे त्याला काही कळत नव्हतं. जाऊ दे म्हणून त्याने ते सोडून दिलं आणि कामाला लागला. पुढे सहा किलोमीटरच्या टप्प्यावर कसल्या रंगीत बाटल्याही होत्या. शिर्क्याने त्याला समजावले की या 'शक्तिदायक पाण्याच्या' बाटल्या आहेत. इतके पळून लोकांना दम लागतो म्हणून प्यायला ते पाणी ठेवलेलं होतं. संभ्यानं जरा चव घेतली एक बाटलीची. त्याला काय त्याची चव आवडली नाही.
त्याने परत शिर्क्याला विचारलं,"मी काय म्हंतो या बाटल्या, गिलास कोन आनतो? आन असंच फुकट देत्यात पानी? ".
शिर्क्या म्हणाला,"आरं त्या पाण्याच्या बाटल्या विकणाऱ्या कंपन्या असतात. त्या देतात लोकांना पानी इथं. त्यांची जाहिरात होते ना फुकट."
संभ्याला वाईट याचं वाटत होतं की लोकांना इथे प्यायला पाणी आणायला २-४ किलोमीटर जायला लागतंय आणि इथे फुकट वाटलेलं पाणी असं फेकून हे लोक पळत आहेत.
त्याने पुढे विचारलं,"पन काय रे, हे डोंगर साफ ठेवायचं म्हंजी लोकांनी काय करायचं? आन त्यासाठी पळून काय हुनार हाय?". त्याला काहीच मेळ जुळत नव्हता.
शिर्क्याला तरी काय माहीत? तो स्वतः इथे बसून प्लास्टिक गोळा करत होता. त्याच्या समोर लोकं धडाधड बाटल्या, ग्लास टाकून पळत होते. आता या लोकांना हे माहीत असतं तर ते स्वतःच साफ करत असते ना? पळत जाताना उलट अजून कचरा कशाला करत बसले असते? त्याला याचाही आंनद होता की या साफसफाईने करण्याचे त्याला पैसे पण मिळणार होते आणि कचरा विकून अजून पैसे. आठ किलोमीटरला मात्र संभ्याला राहवेना. सकाळी नुसता चहा घेऊन निघालेला तो. शिर्क्याने त्याला समजावलं,"जरा कळ काढ. आता शेवटच आलाय बघ. रेस संपली की तिकडं काहीतरी छोटं मोठ खायला मिळल. "
संभ्याला भारी वाटलं. काहीतरी खायला मिळेल ऐकून. "काय असल रे? आन हे असं फुकट वाट्ट्यात लोकांना खायला?" त्याच्या मनात आता येत होतं आपण पुढच्या शर्यतीत नक्की जायचं. एकतर असेही ८ किलोमीटर तो पोचलाच होता. अजून दोन करून त्याला प्यायला पाणी, नास्ता मेडल सर्व मिळणार होतं. मग काय?
"आरं येड्या, केळ-बीळ मिळल. अजून पाव-बिव पन असल. आन हे काय फुकट देत नायीत. त्ये लोक पैसे देऊन पळत हायत. शर्यतीत भाग घ्यायचा म्हंजी खायचं काम नाय नुसतं. ५००-५०० रुपय भरतात लोकं यासाठी. "
"घ्या म्हंजी आपणच पैसं द्यायचं, आपणच पळायचं? त्यापेक्षा मग हे कचरा गोळा करायचं काम बरं हाय की. ", त्याने स्वतः पळायचा विचार मनातून काढून टाकला.
त्याने अजून ४-५ गोण्या भरून ठेवल्या. ते दोघे रेस संपते तिथे पोचले. एकदम उत्साहाचं वातावरण होतं. ढोल ताशे वाजत होते. शर्यत पूर्ण केलेले लोक फोटो काढत होते. अनेकांच्या गळ्यात मेडल्स दिसत होते.
त्याने विचारलं शिर्क्याला, "हे फोटो कशाला काढताय रं सगळे?".
शिर्क्याने कपाळावर हात मारला. म्हणाला, "आरं आता इतकं पळून मेडल मिळालं तर लोक सर्व्यांना दाखवायला फोटो काढत्यात. ते फोनमधी असतं कायतरी त्याच्यावर समदी बघत्यात मग. "
संभ्याला जरा वाईट वाटलं, आपणही रोज इतकं चालून कचरा गोळा करतो. आज चाललो तितकं जर जवळ जवळ रोजच चालतो. आपला फोटो कधी नाही काढला कुणी? उलट काढला असता फोटो तरी त्याला लाजच वाटली असती, असा कचरावाल्याचा फोटो काढत आहेत म्हणून. त्याला भूकही लागली होती, त्यामुळे त्याने विचार सोडून दिला. त्याला त्याचं काम पूर्ण करून काहीतरी खायचं होतं. शर्यत संपते तिथे तर अजूनच कचरा होता. पाव खाल्लेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, पेपरचे तुकडे, पाण्याच्या बाटल्या, कागदाचे ग्लास, केळाची सालं. अनेक ठिकाणी कचरापेट्या असूनही हे सगळं खाली का पडलंय हे त्याला कळत नव्हतं. त्याने भराभर जमेल तेव्हढ सामान भरलं. त्याच्या गोण्या आता संपल्या होत्या. त्याला मागे जाऊन पुन्हा सगळ्या गोण्या गाडीत टाकून न्यायला लागणार होत्या.
मधेच शिर्क्या कुठेतरी जाऊन माघारी आला होता. त्याच्या हातात दोन पिशव्या होत्या. त्याने एक पिशवी संभ्याला दिली. त्यात खायला होतं. शिर्क्याने ओळखीच्या सायबांना विचारून ते मागून आणलं होतं. संभ्याने एक केळ गपागप खाल्लं. पावाचे तुकडेही मोडले. जमा झालेला कचरा आपल्याच जवळच्या पिशवीत टाकला. पिशवीतील बाटलीतून पाणी पिलं. आणि रिकामी बाटली आपल्या गोणीत टाकली. खाल्ल्यावर त्याला जरा बरं वाटलं. रेस सुरू झाले तिथेपर्यंतच्या गोण्याचा हिशोब त्याने लावला आणि खुश झाला. इतका वेळ चालल्याचं चीज झालं.
सगळं आवरून निघायचं असा विचार करत होताच तेव्हढ्यात कुणी साहेब तिथे आले. बाकी सर्व लोकांनी गर्दी केली. त्यांनी संभ्याच्या हातातून पिशवी घेतली. एक खाली पडलेली बाटली त्यात टाकण्याचा आव आणला. एका माणसाने त्यांचा छान फोटो काढला. अजून दोन चार फोटो काढून साहेब निघूनही गेले. संभ्याने गाडीवाल्याला तिकडे यायला सांगितलं होतंच. त्याने एकेक करत गोण्या गाडीत टाकायला सुरुवात केली. लवकरच आपलं काम संपवून तो घरी निघून गेला. दिवसभर त्याला शर्यतीत घडलेल्या नवीन नवीन गोष्टी आठवत राहिल्या. दुसऱ्या दिवशी शिर्क्याने त्याला पेपर दाखवला. त्या साहेबांच्या मागे हे दोघे उभे असल्याचा फोटो आला होता, 'स्वच्छता अभियानाचा'. पुढच्या सर्व शर्यतीला जायचा पक्का निर्णय संभ्याने केला होता."
गोष्ट लिहून संपली. सगळीकडे पोस्ट केली. रेसचे, मेडलचे फोटोही टाकले होतेच. लोकांचे मेसेज बघून खूष झाले. जरा आराम करावा म्हणून मी लॅपटॉप बंद केला. आज सकाळीच रेस संपल्याने पाय दुखत होतेच. खाऊन झालं होतं. पाय पाण्यात ठेवून, टीव्ही लावून मी सोफयावर बसून राहिले. आता पुढच्या रेसचं प्लॅनिंग करायचं होतंच.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
झकास ! अनेकदा अगदी अगदी
झकास ! अनेकदा अगदी अगदी झाले. एकदम डोळ्यासमोर आले सर्व. पाण्याच्या बाटल्या, जेल चे रॅपर, क्लिफ बारचे पाकिटं आणि केळीचे साल अशी मजा चहुकडे बघायला मिळते.
उत्तम.. इंग्रजीत पण लिहा आणि
उत्तम.. इंग्रजीत पण लिहा आणि चेपुवर टाका.. भरपूर फिरेल ही स्टोरी..
मस्त! अगदी वर्मावर घाव
मस्त! अगदी वर्मावर घाव
एकच घटना ... पण दोन भिन्न
एकच घटना ... पण दोन भिन्न टोकांच्या माणसांसाठी केवढा विरोधाभास.. खुप मस्त
वॉटर स्टॉप वर काम केलेले आहे
वॉटर स्टॉप वर काम केलेले आहे त्यामुळे सगळे अगदी डोळ्यासमोर दिसले. फक्त इथे संभ्यासारखे कोणी येत नाही. सगळे कार्यकर्तेच ग्लास उचलून भरून ठेवतात.
Thank you all for the
Thank you all for the comments.
Vidya.
धनिला अनुमोदन.
धनिला अनुमोदन.
छानच! शेवटचा पॅरा.अनपेक्षित
छानच! शेवटचा पॅरा.अनपेक्षित आला.. परत वाचला.