कदंबम

Submitted by दिनेश. on 23 May, 2016 - 08:22
kadambam
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) कपभर तांदूळ, धुवून निथळून घेतलेले
२) पाव कप मूगाची डाळ
३) आवडत्या भाज्यांचे बारीक तूकडे, १ कपभर ( यात गाजर, कोबी, मका, फ्लॉवर वगैरे कुठल्याही भाज्या )
४)मीठ
५) हिंग ( नेहमी वापरता त्यापेक्षा किंचीत जास्त )
६) १ टिस्पून जिरे
७) हिरव्या मिरच्या किंवा मिरपूड ( आवडीप्रमाणे )
८) साजूक तूप वा लोणी

क्रमवार पाककृती: 

१) तांदूळ मिक्सरमधे फिरवून त्याचा जाडसर रवा करून घ्या आणि तो चाळून घ्या ( बारीक पिठ घेऊ नका.)
२) पातेल्यात तूप वा लोणी तापवून त्यात हिंग, जिर्याची फोडणी करा. वापरत असाल तर हिरव्या मिरच्याही त्यात
टाका.
३) मग त्यावर कोरडी मूगाची डाळ टाका, ती जरा परतून भाज्यांचे तूकडे टाका.
४) ते परतून तांदळाचा रवा टाका आणि तो जरा गुलाबीसर होईस्तो परता.
५) मग त्यावर दोन ते तीन कप ( तूम्हाला कितपत पातळसर हवे त्यानुसार ) आदणाचे पाणी टाका.
६) मीठ टाकून मंद आचेवर शिजू द्या.

वरुन साजूक तूप घेतले तर मस्त.. या प्रकाराला एक वेगळाच, भूक चाळवणारा गंध येतो.
सोबत लिंबाचे लोणचे वा ताक असेल तर आणखीन छान.

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांना पुरेल
अधिक टिपा: 

हा प्रकार पथ्यकर पाककृती या सदराखाली रुचिरात आहे. आजारी असतानाच नव्हे तर एरवीही कम्फर्ट फूड
म्हणून मी खुपदा करतो. ( माझ्याकडून काही बदल झाले असण्याची दाट शक्यता आहे तरीही, श्रेय ओगले आज्जींनाच )

तसा करायला सोप्पा आहे.
तांदूळ दोन तीन दिवस भिजत घालून ( अर्थात रोज पाणी बदलून ) मग निथळून, सावलीत वाळवून त्याचा रवा केला
तर आणखी छान चव येते. इडली रवा मी कधी यासाठी वापरला नाही. तो असा कूकरबाहेर शिजेल का,
याची कल्पना नाही. पण भिजवून निथळून घेतलेल्या तांदळाचा रवा, मिक्सरवर अगदी सहज होतो.
Kadambam2.JPG

माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!!
दिनेश दा, माझी आई, दलिया ह्या प्रकारे करते, त्याची पण चव मस्त लागते, पोटभरीचा आणि एकदम पौष्टिक प्रकारात मोडणारा Happy

नाव बघून मला वाटल कंदबाच्या फुलापासून काही बनवल असेल दिनेशदांनी Happy सही नाव आहे!!!

दिनेशदा, मस्तच आहे ही कृती. ह्यात सुकलेल्या लाल मिरच्या शोभून दिसतील.

अहो दिनेशदा तुमच्या किती पाककृती बुकमार्क करत जाव्या म्हणतो मी!! एक सो एक सरस मामले आणता बघा तुम्ही! एक तुम्ही एक जागु तै आरारारारा , दिनेशदा तुम्ही खरंच एक तुमचं रेसिपी बुक काढायचा विचार कराच ही आग्रही विनंती करतो तुम्हाला मी

आहाहा... खरंच एकदम कंफर्ट वाटलं ही रेसिपी वाचून.. Happy
दिनेश.. आवडत्या दहात किती रेसिपीज टाकू.. आता निवडक दहा ऐवजी वीस करावे अशी अ‍ॅडमिन ना विनंती करावी लागेल.. Happy

म्हणजे भाज्या घातलेली पातळसर मुग डाळीची खिचडी आहे का? पथ्याला छानच आहे. पित्त झाले तर बनवून खाण्यालायक आहे. तांदूळ व डाळ दोन्ही हलके कोरडे भाजून घेउन मग भरड काढली तर अजून मस्त लागेल.

ह्यात एक म्हणजे काजू तुकडे गुलाबी तळून वरून घालायचे. दुसरे सोबत खाराची मिरची. लिंबू मोहरी वाली.