शेवंड्/लॉब्स्टर कढई

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 March, 2016 - 01:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

७-८ शेवंड मासे

२ चिरलेले कांदे
१-२ चिरलेले टोमॅटो
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा तिखट
अर्धा लिंबाचा रस
थोडी चिरलेली कोथिंबीर
चविनुसार मिठ
फोडणीसाठी तेल
दोन चमचे आल-लसुण पेस्ट
१ चमचा कसुरी मेथी

कढई मसाला
धणे, जिरे, ओवा प्रत्येकी १ चमचा
५-६ काळे मिरे
२ लाल सुक्या मिरच्या
२ वेलची

क्रमवार पाककृती: 

शेवंड साफ करण हे खुपच कटकटीच म्हणण्यापेक्षा आपल्याच हाताला काटे टोचण्याच काम असत. शेवंडीच्या डोक्याला काटे असतात. म्हणून शक्यतो कोळ्णींकडूनच शेवंडी साफ करून घ्याव्यात. काटे क्लियर दिसण्यासाठी हा फोटो. फोटोतल्या शेवंडी लहान आहेत. मी साफ केल्या त्या ह्याहून दिसाय ला डेंजर (राक्षसा सारख्या :हाहा:) आणि मोठ्या होत्या.

ह्यावेळी शेवंडी घरी भेट आल्या होत्या. काहीतरी वेगळे करावे म्हणून टिव्हीवर पाहीलेली झिंगा कढईचे रुपांतर आपण शेवंड कढाईत करू ह्या उत्साहात होते. पण अशी डिश केली म्हणजे मुलिंना खाताना सहज खाता आल पाहीजे ह्या हेतूने मी शेवंडी पुर्ण सोलायचा मनसुबा केला आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात त्याप्रमाणे स्वतःच्या हाताला काटे टोचून घेतले. कारण हे पकडतानाच आधी त्याची लांब शेपटाची टोक आणि डोक्याचे काटे हाताला टोचत होते. शिवाय हा शेवंड प्रकार असा असतो की त्यात कवच जास्त आणि मांस फारच कमी असते. हिच्या डोक्यातही मांस असते ते डोक्याला चिकटून असते आणि मी ते काढण्याची धडपड करत होते आणि त्यात यशस्वी झाले. एक एक शेवंड सोलताना अजुन सोप्या प्रकारे कशी सोलता येईल हे स्वतःच स्वतःच शिकत गेले. पण किती तो वेळ. पुन्हा कधी असा सोलण्याचा उपद्व्याप करणार नाही असे सोलून झाल्यावर ठामपणे स्वतःला बजावले. पण मेहनतीचे फ़ळ मांसल निघाल. म्हणजे मुलांना आणि सगळ्यांनाच खाण्यास सुलभ झाल.

बर आता पुरे झाल हे स्वच्छता शेवंड अभियान. आता रेसिपी पाहू.

साफ केलेल्या शेवंडला आल-लसुण पेस्ट चोळून त्यातच हिंग, हळद, मसाला लावून थोडावेळ मुरवत ठेवले.

कढाई मसाल्याचे सगळे जिन्नस तव्यात थोडे गरम केले आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घेतले.

कढईत तेल तापवून त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवला. मग त्यावर टोमॅटो शिजवून घेतला.

आता ह्या मिश्रणावर मसाला लावलेले शेवंडीचे तुकडे टाकून परतून घेतले. थोडा वेळ शिजल्यावर त्यावर बारीक केलेला कढई मसाला घातला.

ह्यानंतर राहीलेल बाकी जिन्नस म्हणजे मिठ, कसुरी मेथी, लिंबूरस घालून परतवून शेवंड पुर्ण शिजू द्या. पाणि घालण्याची तशी गरज नसते. शेवंडीला पाणी सुटते. पण जर तुम्हाला पातळ ग्रेव्ही हवी असेल तर घालू शकता. शेवंड शिजली की त्यावर कोथिंबीर पेरा.

तयार आहे शेवंड कढाई.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्या रेसिपीतून काही शेवंडीबद्दल शिकायला मिळाले ते म्हणजे शेवंड कवचासकट्च करतात कारण मी सोलली पण शिजवल्यावर मांस सुटले. कोलंबीचे असे होत नाही. शिवाय साफ करताना होणारा त्रासही जास्त होतो.

मसाल्यातली वेलची मला खटकली. म्हणजे ह्या रेसिपीला मला तिचा वास नाही आवडला. इतर मसाले नो प्रॉब्लेम.

बाकी शेवंडीचे मास मात्र टेस्टी लागत होते.

लिंबूरसाने वईसपणा म्हणजे येणारा विशिष्ट वास जातो.

घाबरू नका माझ्या ह्या अशा कटकटीच्या वर्णनाच्या रेसिपी वरून. शेवंड सरळ बाजारातून साफ करून आणा.

माहितीचा स्रोत: 
टिव्ही वरील प्रोग्राम.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नव्या मुंबईच्या कुठल्या मासळीमार्केटात जाता? बेलापूर दिवाळे गावात?...

साधना, मी शिरवणे गावातील (सेक्टर १ नेरुल पूर्व) मासळी मार्केटात जातो.
रोज वरायटी येत नाही पण अधुन मधुन वेगवेगळ्या प्रकारच्या मासळी येत असतात.
छोट मार्केट आहे. थोड्याच दिवसात नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्केट बिल्डिंग मधे
हे रस्त्यावर भरणारे मार्केट शिफ्ट होणार आहे.

टॉम हँक्स च्या स्प्लॅश चित्रपटात हीरॉईन डेरिल हना एक मोठा लॉबस्टर कचकन चावताना दाखवलीय... आता तिची काळजी वाटायला लागलीय. ( १९८४ सालचा आहे तो )

दा Lol

नितीन हॅन्ड ग्लोज ला होल पडतील. पण टोचायचे राहणार नाही इतके तिक्ष्ण काटे असतात.

वाम चांगली लागते हे खुप जणांकडून ऐकलय. पण ती सापासारखी दिसते म्हणून जरा किळसवाण वाटत. पण आता एकदा नक्की आणून पहाणार आहे.

सिंडरेला मला एक अडकित्ता पाठव Lol

छान दिसतोय हा प्रकार.
पण शाहाकारी असल्याने खाणे, या जन्मी तरी शक्य नाही. Happy

शेवंड ऐवजी पनीर टाकुन कशी लागेल ही रेसीपी! पहायला हवे.

मस्तच गं जागू! भारताले लॉबस्टर खाल्ल्याला बरीच वर्षे झाली. इथे मिळणार्‍या लॉबस्टरना खेकड्यासारखे मोठे नांगे असतात. मी चिंबोर्‍यांप्रमाणे आख्खा लॉबस्टर करते.
हा माझा झब्बू
lobster (400x267).jpg

जागू, मस्तच .. हे लॉबस्टर प्रकरण घरी करणं झेपायचं नाही पण एकदा खाऊन बघावंसं वाटत आहे .. Happy

लॉबस्टर मीट गोडुस लागतं ना (किमान इकडे यु एस् मध्ये जे लॉबस्टर्स मिळतात त्यांची चव गोडुस असते? तर ती आपल्या भारतीय मसाल्यांमध्ये चांगली लागते का?)

स्वाती२, मस्तच .. आमच्याकडच्या आची अप्पाकडै मधल्या नन्दू (तामिळ नण्ड, क्रॅब) मसाल्याची ग्रेव्ही अशीच दिसते ..

लॉबस्टर पिझ्झा खा.... मस्त लागतो. भारतात मिळतो का ते बघायला पाहिजे. तिथे मिळायचा चिलीज, रेड लॉबस्टेर मध्ये....

फक्त बटर आणि लसूण टाकून बेक करायचा.
इतका मसाला चव नाही मारत? आणि इतकं शिजवून चिवट नाही होत?

लॉबस्टर पिझ्झा खा <<<मी रेड लॉब्स्टर मधे खाल्लेला. बेस्ट पिझ्झा एवर...
बाकी एकदा लॉबस्टर बटर लाउन खाल्ला आणि एकदा पास्त्यात तेव्हा त्यापेक्श्या कोळंबी १००० पटीने बरी असे वाटलेले.
जागु आणिस्वाती तोपासु फोटोज अल्टीमेट!!

धन्यवाद सशल आणि आदिती.

आम्हाला लहानपणापासून भारतीय मसाल्यातला लॉबस्टर खायची सवय असल्याने ती चव आवडते. इथे टँकमधला जिवंत लॉबस्टर मिळतो. मी एक ते सव्वा पौन्ड वजनाचा लॉबस्टर घेते. इथले लोकं पाण्यात जिवंत लॉबस्टर स्टीम करतात त्या ऐवजी मी मसालेदार ग्रेवीत स्टीम करते. १०-१२ मिनीटेच स्टीम करते त्यामुळे चिवट होत नाही.
एकदा वेकेशनला सॅफरॉन सॉसवाला लॉबस्टर पास्ता खाल्ला होता तोही छान होता.

Pages